हळद शिजवण्यासाठी बाष्प बंबची निर्मिती - ABP Majha

हळद शिजवण्यासाठी बाष्प बंबची निर्मिती

काहीतरी करायची जिद्द असली की यश तुमच्या हातात असते. हेच वास्तवात आणले आहे सांगली जिल्ह्यातल्या
कडगावच्या दत्तात्रय मोहिते यांनी. १० वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या दत्तात्रय यांनी आपल्या कल्पकतेने हळद शिजवण्याचा बाष्प बंबची निर्मिती केली आहे. यात १५ मिनिटात ३५० किलो हळद शिजवता येते.

सांगली जिल्ह्यातल्या वगडाव परिसरात हळदीचे मोठे क्षेत्र आहे. गेल्या काही वर्षांत हळदीला चांगला भाव मिळाल्याने
हळदीचे क्षेत्र वाढतच आहे. हळदीचे क्षेत्र वाढत असले तरी, हळद शिजवण्यासाठी आजही पारंपरिक पद्धतीचा अवलंब
होताना दिसतो. पारंपरिक पद्धतीने हळद शिजवणे म्हणजे मोठे कष्टाचे काम, शेतकऱ्यांचे हे श्रम कमी करण्यासाठी
दत्तात्रय मोहिते यांनी हळद शिवजण्याचे कुकर तयार केला आहे. यात हळद बाष्पाच्या सहायाने शिजवली जाते. त्यामुळे हळदीचा दर्जा चांगला मिळतो आणि या हळदीला भावही चांगला मिळतो.

दत्तात्रय मोहिते एका हाताने अपंग आहे, शेतीची सारी कामे ते एकाच हाताने करतात. पारंपरिक पद्धतीने हळद
शिजवण्यात त्यांना अनेक अडचणी येत होत्या, पण या कुकरच्या सहाय्याने त्यांचे काम सोप झाले आहे. हे कुकर
बणवण्यासाठी त्यांना १ लाख २० हजार रुपये खर्च आला. या कुकरची हाताळणी अत्यंत सोपी आहे. बैलजोडी किंवा
ट्रॅक्टरने हा कुकर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येते. दत्तात्रय मोहिते आपली हळद शिजवल्यानंतर हा
कुकर शेतकऱ्यांना भाड्याने देतात. एक क्विंटल हळद शिवजण्यासाठी ते ८० ते ९० रुपये शेतकऱ्यांकडून घेतात,
सरपणाचा खर्च शेतकऱ्यांना स्वत: करावा लागतो. गेल्या वर्षी ३० ते ३५ हजार रुपये कुकरचे भाड त्यांना मिळाले,
यंदा ६० ते ७० हजार रुपये मिळतील अशी त्यांना आशा आहे.

या कुकरमुळे शेतकऱ्यांच्या वेळेत, श्रमात, पैशात आणि सरपणात मोठी बचत झाली आहे. यात केवळ १५ मिनिटात
३५० किलो हळद शिजते. बॉईलरमध्ये बसविण्यात आलेल्या ५ जीआय पाईपमुळे ३० मिनिटात भरपूर बाष्प तयार होते.

त्यामुळे हळद शिजवण्यासाठी ६० टक्के वेळ आणि इंधनाची बचत होते. शिवाय कुठल्याही प्रकारच्या सरपणात-पालापाचोळ्यात या कुकरमध्ये हळद शिजवता येते. हळद शिजवण्याचे काम सोप झाल्याने शेतकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आपण यांत्रिक युगात असलो तरी शेतकऱ्यांना शेतीकामासाठी अनेक कष्ट सहन करावे लागते, मोठ मोठ्या कंपन्या,
मोठ-मोठे इंजिनियर शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान बनवेल तेव्हा बनवेल. पण शेतकऱ्यांनीच पुढे येऊन अशाप्रकारचे संशोधन केले तर शेतकऱ्यांचे श्रम कमी व्हायला वेळ लागणार नाही. एका हाताने अपंग असून दत्तात्रय पाटील यांनी हे कुकर बनवले आणि एक आदर्श घालून दिला आहे.

Download ABP LIVE app on your devices. Click here
Related Stories
<1--
-->