लाख रुपये मिळवून देणारा गिलक्या, चौधरी बंधूंची उत्तम सेंद्रीय शेती

धुळे जिल्ह्यातील चौधरी बंधूंनी अशाच सेंद्रीय शेतीनं प्रगती साधली आहे. सेंद्रीय पद्धतीनं लागवड केलेल्या गिलक्यांमधून त्यांना लाखोंचा नफा मिळत आहे.

लाख रुपये मिळवून देणारा गिलक्या, चौधरी बंधूंची उत्तम सेंद्रीय शेती

धुळे : रसायनिक शेतीच्या विपरित परिणामांमुळे शेतकऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या परिणामांमुळे शेतकरी आता सेंद्रीय शेतीकडे वळत आहेत. धुळे जिल्ह्यातील चौधरी बंधूंनी अशाच सेंद्रीय शेतीनं प्रगती साधली आहे. सेंद्रीय पद्धतीनं लागवड केलेल्या गिलक्यांमधून त्यांना लाखोंचा नफा मिळत आहे.

रसायनिक कीटकनाशकांच्या वारेमाप वापरामुळे पिकांची हानी तर होतेच, शिवाय, जमिनीचा पोतही बिघडतो. हे नुकसान टाळण्यासाठी  सेंद्रीय शेतीचा उत्तम पर्याय समोर येत आहे. याच सेंद्रीय शेतीमुळे धुळे जिल्ह्यातील वरखेडी गावच्या चौधरी बंधुंना लाखोंचा नफा मिळत आहे.

गेल्या १८ वर्षांपासून प्रभाकर आणि मधुकर चौधरी या भावंडांनी आपल्या 20 एकर वडिलोपार्जित शेती सेंद्रीय पद्धतीने करत आहेत. यंदा जून महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी अडीच एकरात गिलक्याची लागवड केली. दोन महिन्यातच या लागवडीतून त्यांना 3 लाखांचा नफा मिळाला आहे.

यासाठी त्यांनी घरातील पशुधनाच्या मलमुत्राचा वापर त्यांनी खत निर्मितीसाठी केला. सोबतच जिवामृत आणि गांडूळखतांचीही निर्मिती केली. पाटपाण्याद्वारे आणि ठिबकाद्वारे या सेंद्रीय द्रव्यांची मात्रा दिली. शेताच्या बांधावर गिरीपुष्पाचीही लागवड केली. त्याच्या पाल्याचा ते मल्चिंगसाठी वापर करतात. कीड व्यवस्थापनासाठी सेंद्रीय कीटकनाशकांसोबतच त्यांनी मित्र कीटकांचा वापर केला. सोबतच शेतात फेरोमेन सापळेही लावलेत. या सगळ्यांमुळे चौधरी बंधुंना गिलक्याचं भरघोस आणि विषमुक्त उत्पादन मिळालं.

चौधरी बंधूंनी गीलक्यांची मंडपावर लागवड केली. लागवडीनंतर 45 दिवसात उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली .रोज साधारण 400 ते 500 किलो गिलक्यांची तोडणी होत असते. सध्या बाजारात या गिलक्यांना 30 ते 40 रुपये प्रती किलोचा दर मिळतो. पहिल्या दोन महिन्यातच त्यांना 3 लाखांचा निव्वळ नफा मिळाला. आता आणखी 2 महिन्यांचा बहर असल्यानं त्याच्या विक्रीतून किमान 2 लाखांच्या नफ्याची त्यांना अपेक्षा आहे.

कोणतंही पीक घेतांना निम्मा खर्च त्याच्या देखभालीवर होतो. वेगवेगळ्या रसायनिक कीटकनाशक आणि खतांचा वापर करण्यापेक्षा चौधरी बंधूंनी सेंद्रीय शेती केली. यामुळे उत्पादनात वाढ होऊन, खर्चात मात्र घट झाली. ही खर्चातली घट म्हणजे एक नफाच असल्याचं ते म्हणतात. गिलक्याच्या यशस्वी उत्पादनातून चौधरी बंधूंनी सेंद्रीय शेतीचं एक उदाहरण शेतकऱ्यांपुढे ठेवलं आहे.

शेती शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV