मुंबापुरीची तुंबापुरी होणं रोखता येईल का?

मुंबापुरीची तुंबापुरी होणं रोखता येईल का?

मुंबईच्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये गेल्या अनेक वर्षात किती प्रगती झालीय हा खरंच संशोधनाचा विषय ठरु शकतो. गेली अनेक वर्षे मुंबई पावसात पाण्याखाली जातेय. अनेक कुटुंब, या पावसाच्या पाण्यामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. या सतत भरणाऱ्या पावसामुळे मुंबईचे आर्थिक नुकसान किती झाले याचा तर अंदाज देखील न बांधलेला बरा. यावर उपाय म्हणून आपण पम्पिंग स्टेशन उभारले आहेत. पण हवा तसा उपयोग दिसून येत नाही. काही लोक मग याला मुंबईच्या भौगोलिक स्थितीचे कारण देतात. ज्यावर कोणाकडेही सहसा उत्तर नसते. पण असेही एक शहर आहे ज्याची भौगोलिक परिस्थिती मुंबईपेक्षा बत्तर असताना तिथे पुराची परिस्थिती निर्माण होत नाही. मग हा चमत्कार कसा झाला?

हे जाणून घेण्यासाठी आपल्याला जावं लागेल मुंबईपासून ६७२० किमी दूर टोकियोमध्ये... टोकियो हे जगातील सर्वाधिक दाट लोकवस्तीचे शहर आहे. त्याची भौगोलिक परिस्थिती हि मुंबईपेक्षा बिकट म्हणावी लागेल. या शहरातून अनेक नद्या वाहत जातात. त्यातच काही भाग हा प्रचंड खोलगट आहे. वाढते शहरीकरण, काँक्रिटीकरण, झाडांचा नाश या आणि अशा अनेक कारणांमुळे पावसाचे पाणी जायला वाट नाही, जमिनीत मुरत नाही. त्यात पावसाचे प्रमाण जास्त. पाऊस पडतो तो देखील कमी वेळेत खूप जास्त. या सर्व कारणामुळे नद्यांचे पाणी रस्त्यांवर आणि शहरात येऊन पूर्ण शहर पाण्याखाली जायचे. आता जर मुंबईचा आपण विचार केला तर सर्व परिस्थिती सारखीच भासेल आणि तशी आहे देखील. पण मग परिस्थिती आणि निसर्गाला दोष देत इथले लोक बसले नाहीत. यावर कायमस्वरुपी उपाय त्यांनी शोधला जो सध्या जगातला सर्वोत्तम उपाय सांगितला जातो.

Tokyo_1

बाकीचे वायफळ न बोलता आपण थेट हा उपाय जाणून घेऊ. सध्या टोकियोमध्ये जो उपाय आहे तो जगामधील अभियांत्रिकीचा चमत्कार आहे. जो कोणत्याही देशाने विचार केला नव्हता. मात्र जपानमधील आघाडीचे तंत्रज्ञान आणि सोबत अभियांत्रिकी. या उपायाचे नाव आहे, "मेट्रोपॉलिटन एरिया आऊटर इंडरग्राऊंड डिस्चार्ज चॅनल".

Tokyo_2

पाणी ज्या ठिकाणी साचते तो भाग मुख्यतः दोन नद्यांच्या मध्ये होता.(nakagwa basin) तो भाग बाकी भागांपेक्षा जास्त खोलगट होता. पण त्याच भागात जास्त लोकसंख्या होती. अशा या ग्रेटर टोकियो भागात पाणी साचू नये म्हणून पहिला विचार समोर आला तो म्हणजे नद्यांचे पाणी शहरात शिरता कामा नये. कारण फक्त याच दोन नद्या नाहीत तर एकूण पाच नद्या अशा होत्या ज्यांचे पाणी थोडा पाऊस पडला तरी शहरात घुसायचे. त्यामध्ये ayase, kuramatsu, nagakawa arakawa या मुख्य नद्या आहेत. आणि यासोबत सर्वात मोठी पण ग्रेटर टोकियोपासून थोडी लांब असलेली edogawa नदी देखील आहे. या सर्व नद्यांना पूर आला की त्या पुराच्या पाण्याला बाहेर जाण्यासाठी रस्ता नव्हता. (जसा मुंबईमध्ये देखील समुद्राशिवाय पर्याय नाही तसा तिथे देखील समुद्र आहे पण भरती ओहोटीचा खेळ असल्याने पाणी जाण्यास मार्ग नाही)

Tokyo_3

मग त्यासाठी एक शक्कल लढवली गेली. शोवा या ठिकाणी असलेल्या नदीपासून अगदी कासुकाबे या ठिकाणापर्यंत एक लांब आणि मोठे भुयार तयार करायचे ठरवलं गेलं. कासुकाबे हे ठिकाण edogawa नदीच्या काठावर वसलं आहे. भुयार तयार करतानाच त्यासोबत या नद्यांना लागून पाच साठवणूक टाक्या तयार केल्या गेल्या. या साठवणूक टाक्या नेमक्या अशा ठिकाणी बनवल्या गेल्या ज्याठिकाणी नदीतील अतिरिक्त पाणी थेट या टाक्यांमध्ये जाईल. साठवणूक टाकी हे ऐकून तुम्ही जी कल्पना करताय ती अजिबात करु नका कारण या टाक्या म्हणजे सिलेंडरच्या आकाराच्या अवाढव्य टाक्या आहेत. त्यांची उंची ७० मीटर आणि व्यास ३२ मीटरचा आहे. ज्यामध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी देखील आरामात उभी राहू शकेल. अशा या साठवणूक टाक्या पाच ठिकाणी बांधल्या गेल्या आणि मग आधी सांगितलेल्या भुयाराने त्या एकमेकांना जोडल्या गेल्या. हे भुयार पण थोडेथोडके नाही तर १०.२ मीटर व्यासाचे, ६.३ किलोमीटर लांब आणि जमिनीखाली ५० मीटर खोलवर निर्माण केले गेले. ज्याठिकाणी (कासुकाबे) हे भुयार संपते त्याठिकाणी जगातील आणखीन एक आश्चर्य आहे. कदाचित जगातील सर्वात मोठी जमिनीखालील आयताकृती साठवणूक टाकी इथे निर्माण केली गेली. आधी सांगितलेल्या सिलेंडर आकाराच्या टाक्यांपेक्षा ही टाकी अजस्त्र आहे. १७७ मीटर लांब, ७८ मीटर रुंद, २५.४ मीटर उंच आणि जमिनीखाली २२ मीटर अशी ही टाकी आहे. या टाकीला आधार देण्यासाठी भक्कम असे ५९ पिलर्स आहेत, त्यांची उंची १८ मीटर आहे तर एका खांबाचे वजन ५०० टन आहे. जापानमध्ये उपहासाने या टाकीला "अंडर ग्राउंड टेम्पल" असं म्हणतात. या सर्व निर्माणासाठी अतिशय अद्ययावत असे तंत्रज्ञान वापरले गेले. आता या सर्व प्रकल्पाचा वापर कसा केला जातो ते बघूया...

Tokyo_4

ज्यावेळी प्रचंड पाऊस पडतो, बर्फ वितळून नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते किंवा जपानला नेहमीच्या अशा वादळाचा तडाखा बसला की नद्यांमधील पाण्याच्या पातळीमध्ये प्रचंड वाढ होते. हे अतिरिक्त पाणी शहरात न जाता नदीच्या बाजूलाच असलेल्या साठवणूक टाकीत जाते. तिथून गोल भुयारातून मुख्य टाकीत येते. अशाप्रकारे पुराचे पाणी साठवले जाते. मुख्य आयताकृती टाकीत आल्यानंतर पाण्याला बाजूलाच असलेल्या edogawa नदीमध्ये पंप केले जाते. त्यासाठी मुख्य टाकीला १४ हजार अश्वशक्तीचे ७८ पंप लावले आहेत. या पाण्याला नदीत पंप करण्याचा वेग हा सेकंदाला २०० क्युबीक मीटर इतका आहे. म्हणजेच साध्या भाषेत २५ मीटरचा पाण्याने पूर्ण भरलेला जलतरण तलाव एका सेकंदात रिकामा होईल. हि संपूर्ण प्रक्रिया शोवा इथे असलेल्या मुख्य नियंत्रण कक्षातून नियंत्रित केली जाते. किती आणि कोणत्या वेगाने पाणी बाहेर फेकावे, टाक्यांमधील पाण्याची पातळी, आतील तापमान समान ठेवले जाते. त्याचसोबत मुख्य आयताकृती टाकीसाठी देखील कासुकाबे येथे वेगळा नियंत्रण कक्ष आहे.

Tokyo_5

या प्रकारच्या प्रकल्पाची गरज आपल्याला भासणार आहे हे जपानसारख्या देशाला आधीच कळलं. त्यामुळेच १९९२ सालीच या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर २००६ च्या जून मध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च देखील त्यांच्याप्रमाणेच अवाढव्य आहे. सुमारे २ बिलियन डॉलर या प्रकल्पावर खर्च केले गेले. पण त्याची परतफेड देखील हा प्रकल्प करतो आहे. ज्यावेळी २००४ साली टोकागे या चक्रीवादळाने टोकियो शहरात कहर केला तेव्हा प्रकल्प अर्धवट पूर्ण झालेला असून त्याचा वापर केला गेला, तरी देखील ग्रेटर टोकियोमध्ये पाणी साचले नाही. त्यानंतर २००८ साली देखील तसेच झाले. या प्रकल्पाचा उपयोग टोकियोला वर्षातून कमीतकमी सात वेळा तरी करावा लागतो. अजूनही यशस्वीपणे हा प्रकल्प सुरु आहे. ज्यावेळी याचा उपयोग नसतो त्यावेळी जगभरातील पर्यटक हा प्रकल्प बघण्यासाठी येतात आणि त्यांना याची सफर घडवली जाते.

Tokyo_6

आता पुन्हा येऊयात मुंबईकडे. मुंबईमध्ये नाही म्हटलं तरी २ नद्या आहेत. त्यापैकी एका नदीचा क्रोध आपण २००६ साली बघितला आहेच. तशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून आपण काय केले? नवीन पम्पिंग स्टेशन नक्की उभारले पण त्याचा किती फायदा होतोय हे मुंबईकरांना चांगले माहित आहे. रेल्वे आणि रस्ते आधीप्रमाणेच पाण्याखाली जात आहेत, वाहतूक विस्कळीत होत आहे, जनजीवन ठप्प होत आहे, मुंबईकर मानसिक आणि आर्थिक दृष्टीने खचत आहे. यापेक्षा वेगळे काही झालेले नाही. त्यासाठी बुलेट ट्रेन आणि कोस्टल रोडची स्वप्ने दाखवण्यापेक्षा मुंबईकरांना वेळेत घरी पोहोचवण्याचे स्वप्न पूर्ण करणे जास्त महत्त्वाचं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, मुंबईमध्ये पाणी भरु नये यासाठी कायमस्वरुपी उपाय विचार करुन तो सर्वाधिक प्राधान्याने अंमलात आणणे महत्त्वाचे आहे. नाहीतर दरवर्षी मुंबापुरीची तुंबापुरी होण्यापासून कोणी वाचवू शकणार नाही.

Tokyo_7

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV