ब्लॉग : माजघरातल्या उबदार भीतीचा चेहरा

ब्लॉग : माजघरातल्या उबदार भीतीचा चेहरा

भारतीय सिनेमाची सगळ्यात मोठी आत्मवंचना कोणती आहे माहिती आहे? या देशात मलबार हिलच्या एका बंगल्यापासून खेड्यापाड्यातल्या एका झोपडीपर्यंत यत्र तत्र सर्वत्र भुतांच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. शतकानुशतकं. पण जगातली सगळ्यात मोठी फिल्म इंडस्ट्री असण्याचा दावा करणाऱ्या बॉलीवुडला चांगल्या हॉरर फिल्म्स करण्यात पूर्णपणे अपयश आलं आहे . या अजस्त्र देशाला चेटकिणी, ब्रम्हराक्षस, भूत, चकवा, उत्तर प्रदेशमध्ये लोकप्रिय असणारा मुंहनोचवा अशी भूत कथांची विविधरंगी परंपरा आहे. तरीही या देशातले हॉरर सिनेमा बनवणारे लेखक -दिग्दर्शक संदर्भांसाठी हॉलिवुडच्या सिनेमांकडे बघतात. भारतात हॉरर जॉनरला लोकप्रियता मिळवून देणाऱ्या रामसे बंधूंच्या सिनेमाबद्दल मला काही विशिष्ट कारणांमुळे आपुलकी आहे. मध्यंतरी मी एकदा रामसे बंधूंच्या सिनेमांबद्दल एक लेख लिहिला होता. त्यात मी एक मुद्दा मांडला होता.  एका आख्ख्या पिढीच्या भीतीला आणि लैंगिकतेला आवाहन करणारा दिग्दर्शक विरळा असतो. रामसेंचा सिनेमा हे विशिष्ट काळाचं अपत्य होतं. त्या काळाच्या सामाजिक - आर्थिक अक्षांनी या सिनेमाला अर्थ दिला.  रामसेंच्या सिनेमातल्या भयामागे किंवा क्रौयामागे एक सुप्त निरागसता होती. तिला एक लोभस अपील होतं. पण हे सगळं असलं तरी रामसेचा सिनेमा आणि त्यांचा 'झी हॉरर शो ' सारखा टीव्ही कार्यक्रम हे काही दर्जेदार हॉरर होतं असं विधान करण्याची हिंमत मी करणार नाही .पण तरी त्याचं स्वतःच असं एक महत्वाचं स्थान आहेच. कारण रामसे बंधूंच्या कामातून मला पहिल्यांदा अनिरुद्ध अग्रवाल भेटला . एकेकाळचा पडद्यावरच्या भीतीचा चेहरा असणारा, अनिरुद्ध अग्रवाल.

अनिरुद्ध अग्रवाल काही स्टार नाही . पण अनेक लोक त्याला त्याच्या ओळखतात . रामसेंच्या सिनेमात एकाचवेळेस भीतीदायक आणि एकाचवेळेस किळसवाण्या भुताचे रोल करणारा माणूस म्हणजे अनिरुद्ध अग्रवाल. नॉर्मली अशा भुताखेतांच्या भूमिका करणारे लोक ज्युनियर आर्टिस्ट वगैरे असतात . पण अनिरुद्ध अग्रवाल हा माणूस वेगळा आहे. अनिरुद्ध अग्रवालचा जन्म डेहरादूनचा. अनेक लोक अभिनेता बनण्यासाठी मुंबईला पळून येतात तस काही अनिरुद्धचं नव्हतं . अनिरुद्ध अग्रवाल चक्क आयआयटीसारख्या ख्यातनाम संस्थेतून पासआऊट झाला आहे . पण कॉलेजमध्ये असताना नाटकात काम करत असतानाच अनिरुद्ध अग्रवालला अभिनयाचा किडा चावला होता. मुंबईला जॉब करत असताना पण अनिरुद्ध अग्रवाल अस्वस्थ होताच. शेवटी मोठ्या पगाराची नोकरी सोडून अनिरुद्ध अग्रवालने सिनेमात काम करण्याचं ठरवलं. लहानपणापासूनच अनिरुद्धला एक प्रकारचा विकार आहे. त्यामुळे त्याचा चेहरा थोडा विचित्र आहे. पसरट आणि भयानक. सोबतीला धाडधिप्पाड उंची. रस्त्यावर लोक त्याच्या या रुपामुळे त्याला वळून वळून बघायचे. रामसे बंधूनी अनिरुद्ध अग्रवालला हेरलं. आपल्या 'पुरानी हवेली' चित्रपटात त्याला भूमिका देऊ केली.  अनिरुद्धचा चेहराच इतका भयानक होता, की त्याला भुताचा मेकअप थापण्याची फारशी गरज नव्हती. पण रामसे बंधू हे त्यांच्या भडक कामासाठी प्रसिद्ध आहेत. ते अनिरुद्धच्या चेहऱ्यावर भडक मेकअपचे थर चढवायचे. इतके की एरवी सिंगल स्क्रीनमधला निर्ढावलेला प्रेक्षक पण थरथर कापला पाहिजे. पण परकीय भाषेतले हॉरर चित्रपट बघणाऱ्यांसाठी हे तुफान विनोदी होत. मला आठवत एका चित्रपटामध्ये (बहुतेक 'सामरी ') मध्ये अनिरुद्धचं भूत आदिदासचे शूज घालून नायिकेचा पाठलाग करत होत. अनिरुद्धने नंतर रामसे बंधूंसोबतच अनेक चित्रपट केले. एकजात सगळ्या चित्रपटांमध्ये त्याने भुताची भूमिका केली. भारतात नवीन नवीन खाजगी चॅनलच आगमन झालं होत , त्या काळात झी टीव्हीवरचा 'झी हॉरर शो ' खूप गाजला होता. तो पण रामसे बंधूनीच केला होता. त्यात पण ट्रेडमार्क भुताच्या भूमिकेत अनिरुद्ध होताच. याशिवाय 'बँडिट क्वीन'मध्ये फुलनदेवीला मरणांतिक यातना देणारा बाबू गुज्जरपण त्याने केला. आमिर खानच्या 'मेला'मध्ये पण सहाय्यक खलनायकाची भूमिका त्याने केली. बाकी फुटकळ भूमिका पण केल्या. पण विचित्र चेहरा आणि उंची ही भुतांच्या भूमिकेतली बलस्थानच नंतर त्याची मर्यादा बनत गेली . त्याला रोल मिळणं हळूहळू बंद होत गेलं. सगळे मार्ग खुंटल्यावर अनिरुद्ध निमूट आपल्या इंजिनिअरिंगच्या नोकरीकडे पुन्हा वळला. अभिनयाला कायमची पाठ दाखवून.

अनिरुद्धचा अभिनेता म्हणून अस्त होत जाणं आणि रामसेंची हॉरर जॉनरमधली सद्दी संपत जाणं या प्रक्रिया समांतर घडत गेल्या. अनिरुद्ध आणि रामसे एकाचवेळेस आऊटडेटेड झाले. रामसेंनी रिकामी केलेली जागा भट्ट कंपनी आणि एकता कपूरने भरून काढायला सुरुवात केली. मला व्यक्तीशः त्यांचे हॉरर चित्रपट आवडत नाहीत. त्यांच्या चित्रपटातलं सगळंच कसं प्लास्टिक, चकचकीत आणि गुळगुळीत असतं. अगदी भूतदेखील. अनिरुद्ध अग्रवाल आज सिनेमात काम जरी करत असता तरी त्याला या भट्ट लोकांच्या चकचकीत जगात स्थान मिळालं नसतंच .

टीव्हीवर ‘झी हॉरर शो’ सुरु असतानाच्या माझ्या काही रम्य आठवणी आहेत. टीव्हीवर ‘झी हॉरर शो’ चालू असायचा. रूममध्ये लाईट बंद असायचे. शो मधल्या अनिरुद्ध अग्रवालच्या भयानक भुताची  भीती पण वाटत असायची . डोक्यावरून पांघरूण घेऊन एका फटीतून तो शो मी बघायचो. अति भीती वाटत असल्यावर डोळ्यावर ब्लँकेट ओढून घ्यायचं स्वातंत्र्य तिथं होतंच. पण बाजूलाच आई पण तो शो बघत असायची. त्यामुळे आपण इथे खूप सुरक्षित आहोत, अशी उबदार भावना पण मनात असायची. तो शो बघताना मुळीच न घाबरणाऱ्या बाबांचं खूप कौतुक वाटायचं. हे  थ्रील अनेकांनी लहानपणी अनुभवलं असेल. हा शो बघत असताना जी भीती वाटायचं त्याला असं सुरक्षिततेचं उबदार आवरण होतं. माझ्यासाठी अनिरुद्ध अग्रवाल हा त्या उबदार भीतीचा भयानक चेहरा आहे. लहानपणी वाटणार्‍या माजघरातल्या अंधाराच्या उबदार भीतीचं आणि रामसेंच्या सिनेमाचं आकर्षण एकाच जातकुळीचं असावं.

संबंधित ब्लॉग

एका हरवलेल्या दशकाची डायरी : या 'सूर्यवंशम'चं काय करायचं ?


जावेद जाफरी -दुर्लक्षित गुणवत्तावान 


अलका याज्ञिक : जिचं गाण्यात असणं आपण गृहीत धरायचो अशी गायिका


गर्दीश : हातातून निसटत जाणाऱ्या स्वप्नांची गोष्ट 


श्रीदेवी नावाचं फेनॉमेन 


कुमार सानू -एका  दशकाचा  आवाज (1)

Blog शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: amol udgirakar blog on aniruddha agrawal
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV