BLOG : कुमार सानू -एका  दशकाचा  आवाज (1)

BLOG : कुमार सानू -एका  दशकाचा  आवाज (1)

प्रत्येक वर्षाचा एक चेहरा असतो. तुम्ही कितीही तिरस्कार करा, विरोध करा पण तुम्ही त्या वर्षावर असणारा त्या चेहऱ्याचा ठसा पुसून काढून टाकू शकत नाही. 1971 हे वर्ष इंदिरा गांधी ह्यांचं होत.  2009 हे वर्ष काँग्रेसला सलग सत्तेत बसवणाऱ्या मनमोहन सिंग यांचं होतं. 2012 आणि 2014 या वर्षांवर अनुक्रमे अण्णा हजारे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठसा होता. पण कुमार सानूचा ठसा एका पूर्ण दशकावर होता. वर उल्लेखित लोक हे त्या त्या चेहरा असतील, तर सानू हा एका दशकाचा आवाज होता. सानूची गाणी ऐकली नाहीत असा माणूस सापडणं मुश्किल. 'आशिकी' ते 'दम लगा के हैशा' हा सानूचा प्रवास त्याने समृद्ध केलेल्या आमच्या मनोविश्वाइतकाच समृद्ध आहे.

कुमार सानू उर्फ केदारनाथ भट्टाचार्य याचा उदय भारतीय चित्रपटसंगीताच्या जगात ज्या काळात झाला तो काळ वैशिष्ट्यपूर्ण होता . टीव्हीचा प्रचार फारसा झाला नव्हता. मनोरंजनाच्या साधनांची उपलब्धता फारशी नव्हती. घरी असणाऱ्या गृहिणी, बराच फावला वेळ हाती असणारा विद्यार्थी वर्ग, निवृत्त झालेला ज्येष्ठ वर्ग यांच्याकडे वेळ घालवण्यासाठी दोनच साधने होती. एक म्हणजे रेडियो आणि दुसरं म्हणजे एखाद्या दुकानातून 'भरून' घेतलेल्या कॅसेट. या भरून घेतलेल्या कॅसेट म्हणजे अनेक लोकांच्या जुन्या आठवणींचा ठेवा आहे. तर भारतीय जनतेच्या आयुष्यात संगीत हा महत्वाचा भाग होता.

ऐंशीचं दशक बॉलिवूड आणि चित्रपटसंगीताच्या इतिहासातलं सगळ्यात सुमार दशक मानलं जात. त्यामुळे या रेडियो आणि रेकॉर्डेड कॅसेट ऐकणाऱ्या वर्गाची उपासमार होत होती. ही परिस्थिती 'टी सीरिज' च्या गुलशनकुमार यांनी हेरली. आपण कंटाळलेल्या या वर्गाला नव्या दमाचे संगीत दिले तर कॅसेट विक्रीच्या धंद्यात कुणीही आपल्याला मागे टाकू शकणार नाही हे त्यांनी हेरलं. जुन्याच घोड्यांवर बेट लावण्यापेक्षा गुलशन कुमार यांनी नवीन गायकांना आणि संगीत दिग्दर्शकांना संधी द्यायला सुरुवात केली. कुमार सानू हा त्यांच्यापैकीच एक.
सानूचा जन्म 1957 ला कलकत्त्यामध्ये झाला. त्याचे वडील पशुपती भट्टाचार्य हे कलकत्त्यातले प्रस्थापित गायक आणि तबलावादक. पण सानुला लहानपणापासूनच शास्त्रीय संगीतामध्ये फारसा रस नव्हता. त्याचं दैवत होतं किशोर कुमार. तासनतास किशोरची गाणी ऐकत बसणं त्याला आवडायचं.

वडिलांकडून शास्त्रीय संगीताची दीक्षा मिळाली असली तरी सानूचा कल होता चित्रपटसंगीताकडे. चित्रपटांमध्ये गायन करण्यासाठी तो मुंबईत दाखल झाला. तत्पूर्वी त्याने एका बांगलादेशी चित्रपटासाठी गायन केलं होत पण त्याच्याबद्दल बोलण्यासारखं काही खास नाही. हिंदीमध्ये बऱ्यापैकी गाजलेलं त्याच पहिलं गाणं म्हणजे 'हिरो हीरोलाल ' मधलं. प्रख्यात गजल गायक जगजीत सिंग याना सानूचा आवाज आवडायचा. त्यांनी सानूची ओळख त्यावेळेसचे हिट संगीत दिग्दर्शक कल्याणजी आनंदजी यांच्याशी करून दिली. त्यांनी सानूचा आवाज अमिताभ बच्चनसाठी 'जादूगर ' नावाच्या चित्रपटात वापरला. पण सानूच नाव घराघरात पोंचल ते 'आशिकी'नंतर. गुलशनकुमार यांनी नदीम श्रवण आणि सानुमधलं पोटेन्शियल ओळखून त्यांना संधी दिली. 'आशिकी' मधली गाणी सुपरहिट झाली आणि सानूला मागे वळून पाहण्याची गरज पडली नाही. नंतर 'साजन', 'दिल है की मानता नही', 'सडक ', 'फिर तेरी कहानी याद आयी ', 'बाज़ीगर ', '1942 अ लव स्टोरी' अशा अनेक चित्रपटांमधून सानू नावाचा कल्ट वाढतच गेला .

नव्वदच्या दशकात चित्रपट संगीताचं पुनुरुज्जीवन करुन त्याला पुन्हा लोकप्रियता मिळवून देण्याचं श्रेय कुमार सानूसोबतच नदीम श्रवण, जतिन ललित, आनंद मिलिंद, समीर, उदित नारायण, अलका याज्ञिक, कविता कृष्णमूर्ती, अभिजित या लोकांना पण आहे . पण सानूला जी अफाट लोकप्रियता मिळाली ती त्या प्रमाणात इतरांना मिळाली नाही. त्याची काही कारण आहेत . सानू जेवढे स्टेज शो करायचा तेवढं कुणीच करायचं नाही. सानूला माईकवर गाणं म्हणण्याची जेवढी हौस होती तेवढीच कॅमेऱ्यासमोर येण्याची पण होती. त्याने बंगाली सिनेमा, म्युझिक अल्बम यांच्यात आपली अभिनयाची हौस पण पुरेपूर भागवून घेतली. त्यामुळे त्याचा चेहरा जेवढा लोकांना माहित होता तेवढा बाकीच्यांचा नव्हता. त्याशिवाय सानूने तब्बल सतरा हजार गाणी गायली आहेत. एकाच दिवसात अठ्ठावीस गाणी रेकॉर्ड करण्याचा विक्रम पण त्याच्या नावावर जमा आहे.

सानू आणि उदित नारायणमधली स्पर्धा हा विषय पण रोचक आहे . दोघांचंही एकमेकांशी मुळीच पटत नाही. 'धडकन' च्या 'तुम भी मुझसे प्यार कर लो' गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस दोघही चक्क हातघाईवर उतरले होते. सानूच्या आवाजावर तसा किशोर कुमारचा न पुसता येणारा ठसा. तुलनेने उदितचा आवाज त्याचा स्वतःचा होता, कुणाचाही ठसा नसणारा. दोघांचीही कारकीर्द समांतरपणे बहरली. ज्या वर्षी सानूचा 'आशिकी' आला त्याचवर्षी उदितची गाणी असणारा 'दिल' पण आला. तरी सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये तरी सगळा लाइमलाईट सानूवरच होता.

सानूने सलग पाच वर्ष सर्वोत्कृष्ट गायकाचा 'फिल्मफेयर' पुरस्कार पटकावला. सानूला इतर गायकांपेक्षा पैसे पण जास्त मिळायचे. सातत्याने हिट गाणी देऊन पण उदित कायम नंबर टू राहिला याचं शल्य उदितला सतावत असणार. पण मौका सबको मिलता है. उदितचा टाइम पण आलाच. एक काळ असा आला की  उदितच्या गाण्यांची संख्या वाढू लागली. उदितच्या हिट गाण्यांना जास्त लोकप्रियता मिळू लागली. सर्व ठिकाणी उदितला पुरस्कार मिळायला  लागले. सानूचा चढता तारा हळूहळू मावळायला लागला. नेमकं याच काळात सानूच्या अगोदरच्याच अस्थिर वैयक्तिक जीवनात कुनिका नावाचं वादळ आलं. कुनिकाशी लग्न करण्याच्या नादात सानूने आपले दुसरं लग्न पण मोडलं. नंतर कुनिकाशी झालेली एंगेजमेंट पण तुटली. यथावकाश सानूने तिसरे लग्न पण केलं. असं पुलाखालून बरच पाणी निघून गेल्यावर सानू आणि उदितची दिलजमाई झाली. सानूने उदितच्या मुलाला त्याच्या कारकिर्दीसाठी आशीर्वाद पण दिले. एका कटू स्पर्धेचा शेवट गोड झाला.

एकेकाळी चित्रपटसंगीतावर लता मंगेशकर, आशा भोसले, किशोर कुमार, मोहम्मद रफी, मुकेश सारखे गायक वर्षानुवर्षे राज्य करायचे. नव्वदच्या दशकानंतर गायकाचं 'शेल्फ लाईफ' सतत कमी होत गेल्याच दिसतं. 2000 सालानंतर सानू, उदित, अभिजित हळूहळू चित्रपटसंगीतातून अंतर्धान पावत गेले. शानसारखा नवीन गायक पण अल्पकाळात ऐकू येईनासा झाला. सोनू निगम आणि केके मर्यादित गायन करत आहेत. सध्या अरिजीतचा जमाना आहे पण तो किती वेळ टिकेल हे कुणीच छातीठोकपणे सांगू शकत नाही. अशावेळेस चित्रपटक्षेत्रावर एक दशक राज्य केलेल्या सानूची महती लक्षात येते. पण सानू सध्याच्या टेक्नो संगीताच्या काळात कालबाह्य झालेला असला तरी अस्तंगत झालेला नाही. निमशहरी आणि ग्रामीण भागात ज्याची गाणी अजून सर्वाधिक ऐकली जातात, असा गायक म्हणजे कुमार सानू .

निमशहरी किंवा ग्रामीण भागातल्या लग्नांमध्ये, सण-समारंभामध्ये, सिक्स सीटरमध्ये, ऑटोमध्ये, बारमध्ये अजूनही सानूची  गाणी सगळ्यात जास्त वाजतात. आजपण प्रेमभंग झालेल्या तरुण पिढीला सानूच 'अब तेरे बीन जी लेंगे हम' हे  गाणं सगळ्यात जवळचं वाटतं. रोमँटिक मूडमध्ये असले तर 'धीरे धीरे प्यार को बढाना है' हे 'फुल और कांटे'मधलं गाणंच हे लोक ऐकतात. प्रेयसीच्या डोळ्यांचं कौतुक करायचं असेल तर 'ये काली काली आँखे'च आठवतं. सानूने गायलेली पण  देशभरातल्या मेट्रो भागात आऊटडेटेड झालेली गाणी हा निमशहरी आणि ग्रामीण  भाग अजून नियमित ऐकतो. जोपर्यंत देशाच्या या भागात सानूची गाणी ऐकली जात आहेत तोपर्यंत सानू संपला असं म्हणण्याचं धारिष्ट्य त्याचे शत्रू पण करणार नाहीत .
मी शाळेत असताना माझ्या बेंचवर मुक्तदीर अन्सारी बसायचा. आमच्या दोघांनाही चित्रपटसंगीताचा नाद लागला होता. कुमार सानू म्हणजे अन्सारीचा जीव की प्राण. मी उदित नारायण कॅम्पमधला. आमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण उदित की सानू यावरून भरपूर वाद व्हायचे. आता अजूनही इतक्या वर्षानंतर उदितच माझा खूप आवडता आहे. पण सानू हाच नव्वदच्या दशकाचा आवाज होता हे मी मनाशी कधीच मान्य केले आहे. पर्यायच नाही.

दोन वर्षांपूर्वी 'दम लगा के हैशा' चित्रपट येऊन गेला. त्या चित्रपटाला एक नव्वदच्या दशकाचं नॉस्टॅल्जीक मूल्य होतं. चित्रपट जोरदार चालण्यामागे त्याचा मोठा वाटा होता. कुमार शानूची पूर्ण चित्रपटावर छाप आहे . चित्रपटाचा नायक सानूचा मोठा फॅन असतो. चित्रपटात एका सीनमध्ये सानू झळकला होता आणि टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट झाला होता. खूप वर्षाने सानूच गाणं पण होतं सिनेमात. त्या अर्थाने 'दम लगा के हैशा ' हा जितका दिग्दर्शक शरत कटारियाचा , आयुष्मान खुराणाचा, भूमी पेडणेकरचा आणि अनु मलिकचा तेवढाच कुमार सानूचा पण होता. चित्रपटाने सानूच्या कारकिर्दीला एकप्रकारे मानवंदनाचं दिली होती. असा 'दम लगा के हैशा ' उदित नारायणला मिळेल असं वाटत नाही. कारण नव्वदच्या दशकाचा एकच आवाज होता, कुमार सानू.

Blog शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV