जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची

जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची

यावर्षीच्या 26 जानेवारीला पद्म पुरस्कारांच्या यादीत शेफ संजीव कपूर यांचं नाव झळकलं, पद्म पुरस्कार मिळवणारे पहिलेच बल्लवाचार्य ठरले ते. मात्र त्यामुळे एक प्रकर्षानं जाणवलं की गेल्य़ा काही वर्षात भोजन उद्योगाला चांगलीच प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळालीय. एरव्ही सार्वजनिक जागी किंवा भोजनालयासारख्या ठिकाणी चविष्ट जेवणावर ताव मारताना हे चवदार जेवण कोणी बरं तयार केलंय असा विचार क्वचितच मनात यायचा. नाही म्हणायला घरी चविष्ट स्वयंपाक कऱणाऱ्या महिलेचं ‘सुगरण’ म्हणून कौतुक व्हायचं पण व्यवसाय म्हणून स्वयंपाक करणाऱ्यांना अपवादानेच है कौतुक मिळाय़चं, पण आता मात्र परिस्थिती बदललीय खास एखाद्या शेफच्या हातचा एखादा पदार्थ खायचा म्हणून लोक विशिष्ट ठिकाण गाठतात. त्यामुळे आणि टीव्हीवरच्या पाककलेच्या कार्यक्रमांमुळे या बल्लवाचार्यांनाही सेलिब्रिटींना असतं तसं वलय प्राप्त झालंय.

या सेलिब्रिटी शेफ्समधले संजीव कपूर अगदी आद्य असले तरी अनेक मराठी नावंही टीव्हीवरच्या कार्यक्रमांमुळे घराघरात पोहोचलंय, त्यातलं सगळ्यात लोकप्रिय नाव म्हणजे नागपूरचे विष्णु मनोहर..गेली अनेक वर्ष विविध वाहिन्यांवर घरी करता येतील सोपे आणि कमी त्रासाच्या  पदार्थांचं प्रात्यक्षिक करुन दाखवणं या त्यांच्या वैशिष्ट्यामुळे गेल्या काही वर्षात महिलावर्गात विष्णु मनोहर हे नाव प्रचंड लोकप्रिय आहे.

नुकताच त्यांनी सलग स्वयंपाक करण्याचा विश्वविक्रम केला त्यामुळे तर हे नाव अगदी राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय, त्यांच्य़ा या लोकप्रियतेमुळे आणि हटके अशा थीममुळे विष्णु मनोहरांचं रेस्टॉरन्टही मराठी खवय्यांमध्ये तितकंच लोकप्रिय झालंय..

आजकाल थीम रेस्टॉरन्ट म्हंटलं की अगदी कुठलीही थीम असू शकते, मुंबईत एक जंगलाच्या थीमचं रेस्टॉरन्ट आहे, आगगाडीच्या थीमचं रेस़्टॉरन्ट आहे, तर चोखी ढाणी आणि व्हिलेजसारखं राजस्थानी आणि गुजराती राहणीमानाची चुणूक दाखवणाऱ्या थीमचं रेस्टॉरन्ट.

‘विष्णुजी की रसोई’  या विष्णु मनोहरांच्या रेस्टॉरन्टला याच पठडीतलं महाराष्ट्रीयन थीम रेस्टॉरन्ट म्हणता येईल.. काही वर्षापूर्वी विष्णुजी की रसोईची पहिली ब्रांच नागपुरात निघाली आणि नागपूरकरांनी तर अल्पावधीतच त्याला आवडल्याची पावती दिली, त्यानंतर पुणे, ठाण्यातही विष्णुजी की रसोईच्या शाखा निघाल्या त्याही आता चांगल्याच लोकप्रिय झाल्यात.

Vishnu ji ki Rasoai-compressed

या रेस्टॉरन्टमध्ये शिरल्या शिरल्या आपल्याला वाटतं की हे एखादं गार्डन रेस्टॉरन्ट असावं, एका मोठ्या हिरव्यागार गार्डनमध्ये खुर्च्या टेबलं टाकलेली दिसतात, अर्ध्या भागावर मात्र टिनाचं शेड आणि तिथेही बसण्याची सोय केलेली दिसते..पण नीट निरखून पाहिल्यावर मात्र या जागेचं एकेक वैशिष्टय दिसू लागतं..दूर एक बैलगाडी उभी केलेली दिसते, त्या गाडीवर लहान मुलं बिनधास्त चढून खेळू शकतात अशी सोय दिसते..एका कोपऱ्यात जुन्या काळी घरोघरी असणारा तांब्याचा पाणी तापवण्याचा बंब ठेवलेला दिसतो..आतल्या बाजुला चकचकीत घासलेली तांब्याची आणि पितळेची जुनी भांडी अगदी आकर्षक पद्धतीने मांडलेली दिसतात,

Vishnu ji ki Rasoai 1

कुठेतरी जुनं जातं दिसतं, तर एखाद्या भिंतीला टेकवलेली पितळेची परात, एका कोपऱ्यात एकावर एक रचून ठेवलेले हंडे, अशा एका ना अनेक जुन्या घरगुती वस्तुंचा खजिना. खरंतर याच सगळ्या जुन्या विस्मरणात गेलेल्या वस्तूंचंच डेकोरेशन आहे इथे, त्याचबरोबर सगळीकडे मोठ्या अक्षरात लावलेले सुविचार आणि मोठे महापुरुषांचे फोटो. ते सुविचारही एकदम हटके.. सगळ्यात ठसठशीत आणि लक्षात राहणारा सुविचार म्हणजे ‘सभी महंगी चिजे अच्छी नही होती’... बाकी कृत्रिम डेकोरेशन असं नाहीच..

Vishnu ji ki Rasoai 3

आपल्या बालपणी पाहिलेल्या पण आता फारसा संबंध नसलेल्या या घरगुती वस्तू बघता बघता एका स्टॉलवर एका द्रोणात ठेवलेली दिसतात ती उकडलेली बोरं, म्हणजे शाळेतल्या आठवणींना उजाळाच. बुफेकडे वळण्याआधी विष्णुजी की रसोईमध्ये अशा छोट्या छोट्या बऱ्याच गमती जमती असतात..कुठे ताकाचा ग्लास मिळतो तर कुठे गरमागरम भजी, ज्याला आजकाल स्टार्टर म्हंटलं जातं असा जेवणाच्या आधी कुठला तरी मराठमोळा खास विष्णु मनोहर यांच्या रेसिपीचा पदार्थ ही विष्णुजी की रसोई ची खासियत, मग तो पदार्थ भाजणीचं थालीपीठ असू शकतं, किंवा साबुदाण्याचे वडे, डाळीचे वडे असा कुठलातरी चटकदार पदार्थ खाऊन मगच वळायचं मुख्य जेवणाकडे..

Vishnu ji ki Rasoai 5

जेवणाचं ताट घेताना पुन्हा एकदा विस्मरणातल्या पदार्थांची सफर घडवली जाते..जुन्या काळी वापरल्या जाणाऱ्या दगडी खलबत्यांच्या खलांमध्ये अनेक चटण्या ठेवलेल्या दिसतात..तिळाची, जवसाची, दाण्याची अशा विविधरंगी आणि विविध चवीच्या चटण्यांनंतर पळी लोणच्यांची, आंबा, लिंबु, आवळा अशी लोणची आणि त्यानंतर खास वैदर्भिय हिरवा ठेचा.. असा हा ताटाच्या उजव्या बाजुला वाढला जाणारा चवदार पसारा अगदी जुन्या पंगतींची आठवण करुन देणारा..त्या उजव्या बाजुला सगळ्यात शोभणारा पदार्थही विष्णुजी की रसोईला चाखायला मिळतो, ते म्हणजे वैदर्भिय पंचामृत..केवळ सणासुदीला घरी केलं जाणारं आंबटगोड पंचामृत हा तर केवळ याच ठिकाणी मिळणारा सर्वात हिट पदार्थ...त्यानंतर ज्याला आपण मेन कोर्स म्हणतो त्यासाठी इथे पंजाबी आणि मराठी असे दोन मेन्यू दोन बाजुला लावलेले असतात, पंजाबी मेन्यूत पनीरची भाजी, जिरा राईस, तंदूरी रोटी असे पदार्थ मिळतात, पण खरी गंमत आहे ती महाराष्ट्रीयन मेन्यूत..

Vishnu ji ki Rasoai 4-compressed

गरमागरम फुलके, जळगावची शेवेची भाजी, पालकाची पातळ भाजी पण तीही अगदी वऱ्हाडी पद्धतीने केलेली, ज्याला वरऱ्हाडात डाळभाजी म्हणतात अगदी तशा पद्धतीची पातळभाजी खायला मिळते ती इथेच..त्याचबरोबर खास विदर्भात केला जाणारा गोळा भात, भडा भात, वडाभात असे इतर ठिकाणी चाखायला न मिळणारे पदार्थ ही विष्णजी की रसोईतील खासियत. अर्थात या सगळ्या पदार्थांबरोबर  या रेस्टॉरन्टला गेल्यावर अगदी खायलाच पाहीजे असा किंवा केवळ त्या एका पदार्थासाठी तरी या जागेला भेट द्यायला पाहीजे असा पदार्थ आहे इथली पुरणाची पोळी. पुणे, ठाणे, कल्याण इथल्या खवय्यांनी तर खास नागपुरात केली जाणारी भरपूर आणि ओलं पुरण भरुन केलेली पुरणपोळी विष्णुजी की रसोईला जाऊन खायलाच पाहीजे..ही पुरणाची पोळी खाल्ल्यावर पुणे श्रेष्ठ, मुंबई श्रेष्ठ की नागपूर श्रेष्ठ असा पिढ्यानपिढ्या चाललेला वर्चस्वाचा वाद निदान पुरणपोळीच्या बाबतीत तरी संपेल इतकं नक्की..

अर्थात या सगळ्या पदार्थांबरोबर प्रत्येक मोसमात त्या त्या मोसमात खाल्ले जाणारे वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ मिळण्याचं ठिकाणही आहे विष्णुजी की रसोई, म्हणजे उन्हाळ्यात इथे आमरस मिळतो, तर हिवाळ्यात नागपुरी पुडाची वडी. कधी कढीगोळे, मिळतात तरी कधी अळुची भाजी, बेसनाच्या धिरड्यांपासून ते मुगाच्या भज्यांपर्यंत कितीतरी वेगवेगळे मराठमोळे कधीकाळी घरोघरी केले जाणारे पदार्थ मिळण्याचं  हे ठिकाण.

इथे जेवणाचा शेवटही मस्तच होतो, तयार पान किंवा बडीशोपेच्या तबकाऐवजी थेट हातात ठेवलं जातं ते पानदान.. आणखी एक जवळजवळ विस्मरणात गेलेली पद्धत. सुंदर नक्षीकाम केलेली पानाची पेटी, त्यात तसाच सुबक अडकीत्ता आणि चुना, काथ, खोबऱ्यापासून सगळं पानाचं सामान..आपल्याला हवं तसं पान लावत भरपेट जेवलेला माणूस इथे चांगलाच रेंगाळतो.. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक आजीआजोबा यांना घेऊन आलेली कुटूंबं तर इथे चांगलीच रमतात, कारण लहान मुलांना खेळायला भरपूर जागा, बैलगाडीसारख्या मुलांना आकर्षित करणाऱ्या अनोख्या गोष्टी आणि उकडलेल्या बोरांसारखे पदार्थ य़ामुळे मुलं आणि त्यांचे आईबाबा  खूष, तर दुसरीकडे इतर रेस्ट़ॉरन्टमधल्यासारखं मसालेदार जेवण इथे नाही, आजकाल घरोघरी फारसे न केले जाणारे पदार्थ मात्र आहेत, त्यामुळे आजीआजोबाही खूष.

आजकाल नोकऱ्या, प्रवास अशा फास्ट लाईफस्टाईलमुळे आपण राहणीमान खाण्यापिण्याच्या सवयी सगळ्यातच आमूलाग्र बदल केलाय, पण त्या बदलामुळे कितीतरी गोष्टी आपण मागे टाकून आलोय, खरं सांगायचं तर याचा सगळ्यात मोठा फटका आपल्या खाद्यसंस्कृतीला बसलाय..ती पुन्हा अनुभवण्याचं ठिकाण म्हणजे विष्णुजी की रसोई..

Vishnu ji ki Rasoai 2-compressed

संबंधित ब्लॉग 

जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास 

जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’

जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती

जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू

जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस

जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’

जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार

जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया ! 

जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV