जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू

जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू

अग्नीचा शोध लागल्यानंतर मनुष्यप्राण्याने लगेच काय केलं असेल, मला तर वाटतं सगळं सोडून पहिल्यांदा त्या आगीवर अन्न शिजवलं असेल किंवा भाजलं असेल असं म्हणूया. म्हणजे मॉडर्न खाद्यपदार्थांच्या भाषेत सांगायचं तर ‘ग्रील’ केलं असेल. अनादी काळापासून जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ केवळ भाजून करण्याची स्वयंपाकाची पद्धत बघायला मिळते.. आमच्याही घरी दर हिवाळ्यात मागच्या अंगणात पाणी तापवायला चूल पेटवली जायची..आणि सुट्टीच्या दिवशी त्या चुलीच्या निखाऱ्यांवर कांदे, बटाटे, वांगी भाजायची आणि त्या भाजक्या पदार्थांना एकत्र करुन त्याचं भरीत करायचं आणि अंगणातच वनभोजन करायचं..याचा अर्थ आम्ही सध्या जी मॉडर्न लोकप्रिय ग्रील किंवा बार्बेक्यूची पद्धत आहे तोच प्रकार घरी चुलीचा वापर करुन करायचो. सध्या मात्र पिकनिकला जाऊन बार्बेक्यू किंवा ग्रील करायचा चांगलाच ट्रेण्ड आलाय, तितकीच महत्त्वाची झालीत ती थेट टेबलवर ग्रील पदार्थ सर्व्ह करणारी स्पेशालिटी रेस्टॉरन्टस्.

grill 2

मुंबईत अशा प्रकारच्या रेस्टॉरन्टसची सुरुवात केली ती बार्बेक्यू नेशन नावाच्या चेनने. खास ग्रीलचं भांडं टेबलवर ठेवता यावं म्हणून टेबलला मधोमध केलेली जागा, त्या जागेत बरोब्बर मावणारी निखार्यांनी भरलेली ग्रीलची भांडी आणि त्या भांड्यावर लोखंडी सळ्यांना खोचलेले ग्रिल पदार्थ अशी ही नेहमीच्या रेस्टॉरेन्ट्समध्ये न दिसणारी पद्धत अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली आणि मग ग्रील आणि बार्बेक्यू ज्यांची स्पेशालिटी आहे अशा पद्धतीच्या रेस्टॉरेन्ट्सचा आता केवळ मुंबईतच नाही तर छोट्या शहरांमध्येही चांगलाच ट्रेण्ड आलाय..बार्बेक्यू नेशनपाठोपाठ बॉम्बे बार्बेक्यू आणि सिगरी ग्लोबल ग्रील या रेस्टॉरन्ट ब्रॅण्डसनी चांगलाच जम बसवलाय..नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी तर ही रेस्टॉरन्टस अगदी ‘फुड हेवन’ ठरतात, कारण तुमच्या समोर येणाऱ्या ग्रीलमध्ये चिकन, मटण, फिश, प्रॉन्स अशी सगळ्या प्रकारची चमचमीत ग्रील व्हेरायटी ठेवलेली असते आणि तीही अनलिमिटेड, ग्रीलच्या सगळ्यांना टोचलेल्या स्टार्टर्सशिवाय तुमच्या प्लेटमध्येही खास शेफने तयार केलेले स्टार्टर्स येतच असतात.. बार्बेक्यू नेशनमध्ये तर हे ग्रील स्टार्टर्स खायला सुरुवात कऱण्याआधी एक छोटासा वाकवता येणार झेंडा तुमच्या पुढ्यात आणून ठेवतात.. तो झेंडा आपण वाकवला की वेटर समजणार की तुमचे स्टार्टर्स खाऊन झाले, पण जोवर तो झेंडा तुम्ही वाकवणार नाही तोवर न थकता त्या दिवशी असलेली सगळी स्टार्टर्स आणि सगळे ग्रील्स तुमच्या प्लेटमध्ये पडतच राहणार.

zenda

या रेस्टॉरन्टची कल्पनाच पूर्णपणे वेगळी असल्याने टेबलवर ठेवलेली कटलरीसुद्धा एकदम वेगळी वापरली जाते.. चमचा काट्यांबरोबरच काट्यासारखाच पण दोनच दात असलेला खास सळीवरचे ग्रील्ड पदार्थ ओढून काढण्यासाठीचा काटाही ठेवलेला असतो. आपण खाणार असतो त्या ग्रील पदार्थांबरोबर चाखायला एका ट्रेमध्ये सॉस, ऑलिव्ह ऑईल सारख्या चव वाढवणाऱ्या छोट्या वाट्या असतात. आणि त्या वाट्यामधला द्रवपदार्थ आपल्या ग्रील्ड पदार्थाला लावण्यासाठी चमचा नाही तर थेट छोट्या मोठ्या आकाराचे ब्रश दिले जातात. अर्थात अशा रेस्टॉरन्टमध्ये जाऊन फक्त हे ग्रील्ड पदार्थ खायचे आणि बाकी काहीच नाही, असाही प्रकार नाही.. टेबलवरचे ग्रील्स आणि स्टार्टर्स मनसोक्त खाऊन झाल्यानंतर एक भलामोठा बुफे तुमची वाट बघत असतो, त्यात सूपपासून डेझर्टसपर्यंत सगळं काही असतं आणि ते ही व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोघांसाठीही...

Desert-Table

सॅलड्स, चाट, पंजाबी भाज्या, नुडल्स, पास्तासारखे लोकप्रिय पदार्थ तर असतातच, पण सगळ्यात आकर्षक असतो तो त्यांचा डेझर्टसचा टेबल.. गरमागरम मिनी गुलाबजाम, रबडी, वेगवेगळे केकचे आणि पेस्ट्रीचे प्रकार, बर्फीचे प्रकार, खीर, आईसक्रीम, ताजी फळं आणि या सगळ्यासोबतच नव्याने सुरु झालेलं लाईव्ह कुल्फी काऊंटर असा ग्रीलच्या मसालेदार चवीवर गोडाचा उतारा..

kulfi

यातलं कुल्फी काऊंटर तर बच्चे कंपनीमध्ये भलतंच लोकप्रिय आहे, तीन चार चवींच्या कुल्फीतली एक निवडायची, मग त्या निवडलेल्या कुल्फीवर सिरप कोणतं ओतलं जाणार ते ही निवडायचं आणि ड्रायफ्रुट्स किंवा फळांच्या बरोबर ती कुल्फी मटकवायची.  अशी ही सगळी ग्रील आणि त्यानंरच्या भरपेट जेवणाची मजा घेतली की पोट आणि मन तुडूंब भरतं..अशा या वेगळ्या अनुभवासाठी लोक सहकुटूंब इथे कायम हजेरी लावतात.

dance

बार्बेक्यू नेशनमध्ये या ठरलेल्या मेन्यूतही दररोज वैविध्य आणण्याचा प्रयत्न केला जातो त्यासाठी वेळोवेळी वेगवेगळे फेस्टीवल्स आयोजित केले जातात.. कधी अवधी फेस्टीवल तर कधी सी फुड फेस्टीवल, नवरात्रीसारखे उपवासाचे दिवस असतील तर व्हेज फेस्टीवल. मग आपल्या आवडीचा फेस्टीवल असला की खवय्यांची पावलं थेट वळतात ती अशा स्पेशालिटी रेस्टॉरन्टकडे.. आजकाल बाहेर खायला जाणं म्हणजे केवळ जिभेची तृप्ती एवढंच ठरु नये यासाठी वेगवेगळी रेस्टॉरन्टस वेगवेगळे फंडे आजमावत असतात, कुणी लाऊड म्युझिक लावतात, काही जण गायकांचा लाईव्ह कार्यक्रम ठेवतात, तर काही ठिकाणी क्रिकेट, फुटबॉलसारख्या लोकप्रिय खेळांचे सामने बघण्यासाठी मोठ्या स्क्रीन्स लावल्या जातात..पण बार्बेक्यू नेशन इथेही त्यांची ‘स्पेशालिटी’ दाखवून देतात, इथे टिव्ही स्क्रीन नाही, मंद आवाजात गाणी सुरु असतात पण आपापल्या टेबलवर लोक निवांत गरमागरम ग्रील्सचा आनंद घेत असताना अचानक लाईट्स बंद होतात, वेटर्सची पळापळ होते, सगळ्यांचं लक्ष तिकडे जातं.. टेबलांच्या मधल्या रिकाम्या जागेत सगळे वेटर्स, सर्व्हर्स जमा होतात, म्युझिक बदलतं आणि इतका वेळ इतका वेळ आपल्याला गरमागरम पदार्थ वाढणारे वेटर नाचायला लागतात. ते ही अगदी सराईतपणे, एखादा बसवलेला, वारंवार प्रॅक्टीस केलेला परफॉर्मन्स असावा असा..गाण्यांचा ठेकाही असा काही असतो की आलेले लोकही त्या धमाल मस्तीमध्ये सहभागी होतात..आपण आपल्या स्वत:च्या किंवा आपल्या कुटूंबियांच्या वाढदिवसासाऱख्या स्पेशल दिवशी या ठिकाणी गेलो तर हे रेस्टॉरन्ट आपला खास दिवस अधिकच खास होईल याची पुरेपूर काळजी घेतात, आधी सांगून ठेवलं तर एक छोटासा केक येतो टेबलवर (तो ही विनामूल्य)..केक कापताना सगळा स्टाफ येतो आपल्या आनंदात सहभागी व्हायला आणि त्यांच्या डान्स परफॉर्मन्सनी ते आपलं सेलिब्रेशन आणखीच खास करतात..आपलेपणा वाटावा अशी आणखी एक बाब म्हणजे प्रत्येक टेबलवर खाणं सुरु असताना घरच्या बाईनं जातीनं येऊन आलेल्या पाहुण्यांची विचारपूस करावी अगदी तशाच पद्धतीनं हेड शेफ येऊन विचारपूस करुन जातो. आवडतंय ना हे विचारुन जातो..त्या दिवशीच्या मेन्यूमध्ये नसलेला एखादा पदार्थ मागवल्यास लगेच तयार करुन पाठवला जातो..त्यामुळे आलेल्या प्रत्येकालाच स्पेशल असल्यासारखं वाटतं..

grill

ग्रील पदार्थ खाताना शाकाहारी लोकांसाठी पर्याय थोडे कमी असतात, कारण पनीर, बटाटे, मशरुम, शिमला मिर्चीसारख्या भाज्या सोडल्या तर ग्रील करता येणारं व्हेजमध्ये फारसं काही नसतं. पण याची कसर बार्बेक्यू नेशनचे शेफ इतर चमचमीत स्टार्टर्स वाढून भरुन काढतात, त्यामुळे शाकाहारी लोकंही मोठ्या आवडीनं या स्पेशालिटी ग्रीलचा अनुभव घेतात. शाकाहारी लोकांना आणखी सुखावणारी छोटीशी पण लक्षात राहणारी बाब म्हणजे मांसाहार आणि शाकाहारासाठी दोन वेगळ्या प्रकारच्या प्लेट्स दिल्या जातात.. हिरव्या रंगाच्या प्लेट्स या शाकाहारी लोकांसमोर ठेवल्या जातात तर चॉकलेटी रंगाच्या प्लट्समध्ये मांसाहार वाढला जातो..दोघांची सरमिसळ कधीच होत नाही. इथे बिलात सर्विस चार्ज घेतला जातो..त्यामुळे जर पण बिलानंतर टीप ठेवली तर तिथले वेटर ही टीप अगदी नम्रपणे नाकारतात, टीप न घेण्याला इतकं महत्त्व आहे की टीप ठेऊन एखादं कुटूंब निघून गेलं, तर ते पैसे परत देण्यासाठी कुणीतरी धावत मागे येतं..बार्बेक्यु नेशनला आणि त्यांच्या या ग्रीलच्या संकल्पनेला इतकं यश मिळालंय की यांच्याच मुंबईत किमान पंधरा शाखा निघाल्यात आणि मुंबईबाहेर पुणे, नागपूरातही बार्बेक्यू नेशनने आपली रेस्टॉरन्टस थाटलीत, ही लोकप्रियता पाहून इतर अनेक चेन्स निघाल्यात, आधी उल्लेख केल्याप्रमाणे बॉम्बे बार्बेक्यु नावाची चेन ही अशीच एक नक्कल, एका यशस्वी कल्पनेची नक्कल करुन ते ही आता यशस्वी झालेत.. याच प्रकारात मोडणारं पवईतलं सिगरी ग्लोबल ग्रील.. ग्रीलला आणि पिझ्झा, पास्ताची जोड देत त्यांचं वेगळेपण जपायचा प्रयत्न सिगरी ग्लोबल ग्रील करतंय..या तिनही ठिकाणचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची ओपन किचन्स..पूर्वी माझे आजोबा सांगायचे, हॉटेलात जेवायला जाता, पण त्यांचं स्वयंपाकघर पाहिलं तर पुन्हा तिथे खाणार नाही इतकं ते अस्वच्छ असतं.. त्याच समजाला फाटा देणारं ठरतंय ओपन किचन. शेफ जो काही पदार्थ शिजवणार, तो थेट आपल्यासमोर, अगदी स्वच्छ किचनमध्ये..त्यामुळे ग्रील्ड पदार्थ खायचे म्हणूनच नाही तर एक संध्याकाळ कुटूंबियांबरोबर एन्जॉय करायला या जागा एकदम परफेक्ट आहेत...

‘जिभेचे चोचले’मधील याआधीचे ब्लॉग :

जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस


जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’


जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार


जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया ! 


जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: barbecue dezert grill
First Published:
LiveTV