सहानुभूतीपलीकडचं वास्तव

सहानुभूतीपलीकडचं वास्तव

काल ऑफिसवरुन येताना विलक्षण गोष्ट नजरेस पडली. कदाचित मुंबईकरांसाठी ती नवी नसेल, पण मला आश्चर्य वाटलं. अंधेरीवरुन सीएसटीला जाणारी लोकल पकडली. फर्स्ट क्लासच्या डब्यातून प्रवास करावा म्हणून घुसलो आत. सगळी कामावरुन घरी जाणारी मंडळी आपापल्या हातातील खेळण्यासोबत(मोबाईल) खेळत होती. कोणाचं एकमेकांकडे लक्ष नव्हतं. दिवसभर कामामुळे वैतागलेली ही मंडळी घरी जाताना विरंगुळा शोधण्याचा प्रयत्न करतात.

डब्यात एक नऊ-दहा वर्षाचा एक अधू मुलगा बसलेला होता. फाटके कपडे, तोंडातून गळणारी लाळ, खोल गेलेली गालपाड-डोळे, कमीत कमी 10 दिवस आंघोळ न केलेला देह, जवळ फाटकी पिशवी, त्यात शिळं अन्न असा त्याचा एकूण किळसवाणा अवतार. हे दृश्य मुंबईकरांना नवीन नाही. तो सगळ्यांपुढे हात पुढे करत भीक मागत होता. कुणी 1, तर कुणी 2 असे त्याला पैसे देत होते. मी ही पैसे दिले. त्यानंतर अख्खा डबा फिरुन आल्यावर तो दरवाज्यात बसला. मधेच येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडे हात पुढे करत दादा भूक लागली असं म्हणत होता.

मला कंटाळा आला म्हणून मी दरवाज्यात येऊन थांबलो. त्या मुलाकडे पाहत होतो. अनेक विचार मनात येऊन जात होते. नंतर बाहेरच्या झोपडपट्ट्यांकडे पाहू लागलो. अचानक मला थिनरचा(नेल पेंट काढायचे लिक्विड) उग्र वास आला. मनात म्हटलं की इथं, या वेळेला, कोणी आणलाय थिनर. खाली पाहिलं तर तोच मुलगा. खिशातून त्याने 100 मिलीची बाटली काढून त्यातलं थिनर रुमालावर टाकून तोंडाने जसा गांजा ओढला जातो तसा ओढत होता. मी त्याला विचारलं की थिनर आहे का? नशा करतो का? त्यावर बिचकला.

मी त्याचा फोटो काढणार तेवढयात माहीम स्टेशन आलं अन तिथं उतरुन पळू लागला. झटका बसावं अशी ती गोष्ट जिव्हारी लागली. कारण स्पष्ट होत, थोड्यावेळापूर्वी जे विचार माझ्या मनात येत होते ते म्हणजे की या पोराचे आई वडील कोण असतील,? कोणी सोडलं असेल याला या परिस्थितीत? काही क्षणात ते विचार गळून पडले, अन् दुसऱ्या विचारांनी जागा घेतली. याला ही सवय कोणी लावली असेल? कोणाला याचा फायदा आहे?

भारतात भिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जवळपास 5 लाखांवर भिकारी आज फिरत आहे. असे असून देखील भारतातील काही राज्यांमध्ये भीक मागणे गुन्हा आहे. लोकांना भीक मागण्याची वेळ का येते? भीक मागणे हा संघटित व्यवसाय झाला आहे. गुंडांच्या टोळीद्वारे हा व्यवसाय चालवला जातो. भीक मागणारे लोक प्रामुख्याने दोन गटात विभागले जातात. पहिले ते लोक ज्यांना गरिबीमुळे भीक मागायला भाग पाडले जाते आणि दुसरे ते लोक जे भीक मागायच्या “कले”मध्ये तरबेज असतात.

ठराविक ठिकाणी भीक मागणाऱ्या भिकाऱ्याला त्याच्या मिळकतीपैकी काही हिस्सा टोळीच्या म्होरक्याला दिला जातो. स्वत:ला भिकेच्या लायक बनवण्यासाठी जास्तीत जास्त घाणेरडे आणि विचित्र करण्यावर भिकाऱ्यांचा भर असतो. जितकं जास्त घाण तितकी सहानुभूती जास्त.

भीक मागण्यासाठी लहान मुलांचा वापर सर्रास होतो. अगदी नवजात बालकापासुन ते 10-12 वर्षापर्यंतची मुलं–मुली या टोळीमध्ये आढळतात. एवढे मुलं यांच्याकडे येतात कुठून? हा देखील संशोधनाचा विषय आहे. यातील बरीच मुलं–बालके अपहरण करुन आणलेली, कामाला लावतो अस खोट बोलून पळवून आणलेली, गरीब परिस्थितीमुळे आई–बापाने विकलेली असतात.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानुसार भारतात दरवर्षी सुमारे 40,000 मुलांचं अपहरण केलं जातं. यातील काहीजण सापडतात, तर काहीजणांच्या नशिबात कायमचा काळोख होतो. या मुलांना वेगवेगळ्या अमली पदार्थांची व्यसनं लावली जातात. त्यांना मारल जातं, उपाशी ठेवलं जातं, जोपर्यंत त्यांची अवस्था इतर भिकाऱ्यांसारखी होत नाही.लहान बालकांना अफु खायला देऊन शांत बसवलं जात. कितीही तळपतं ऊन असो किंवा गोठवणारी थंडी असो. ही लेकरं हुं की चुं करत नाहीत. बळजबरीने या गोष्टी करायला लावतात. कितीतरी कोटींच्या पुढे गेलेली ही सगळी यंत्रणा मानवी तस्करी करणाऱ्या समुहाद्वारे चालवली जाते.

निशांत भाटी जे नोयडा, उत्तर प्रदेशचे राहणारे आहेत, यांच्यासोबत घडलेला एक प्रसंग आहे. सिग्नलवर थांबले असताना त्यांना एका महिला भिकारीने पैसे मागितले. तिला त्यांनी इग्नोर केलं. त्यानंतर तिच्याच वयाचा एक माणूस त्यांच्याजवळ येऊन भीक मागू लागला. त्यावेळेस त्यांनी न राहून त्या भिकाऱ्याला विचारलं की "तुम्ही भीक का मागता? काय भेटतं त्यातून?" भिकाऱ्याने भीक मागण्यामागचे व्यावसायिक गणित सांगितल्यावर निशांत आश्चर्यचकित झाले. ते दोघे भिकारी एक टोळीच्या म्होरक्यासाठी काम करत होते.

म्होरक्याने आपलं "कार्यक्षेत्र" ठरवून घेतलेलं असत. उदा. एखादा रस्ता. त्या रस्त्यावर भीक मागण्यासाठी त्याची परवानगी घ्यावी लागते. रु. 300 प्रति कुटुंब असा रोजचा हफ्ता ठरलेला होता. जर तुम्ही एकटे भीक मागणार असाल तर रु.200 प्रति माणूस हफ्ता रोज द्यावा लागतो आणि जर तुमच्या सोबत लहान मुले आणि स्त्रिया असतील तर तुम्हाला बोनस म्हणून कुठलाही हफ्ता देण्याची गरज नाही. उलट जेवढे लहान मूल जास्त असतील तेवढाच जास्त फायदा.

समजा, जर एका टोळीच्या म्होरक्याकडे 2 कुटुंब आणि 2 प्रौढ व्यक्ती असतील आणि जर त्याच्या अखत्यारीत 4 रस्ते असतील तर, तो म्होरक्या दिवसाकाठी 800 ते 1000 रुपये प्रति रस्ता रोज याप्रमाणे चार रस्त्याचे 3600 ते 4000 कमावतो. इतके पैसे मिळाल्यावर काम कोणाला मेहनत करावसं वाटेल. जर भिकारी हप्ता देत असेल, तर हे दिवसाला किती कमावत असतील, याचा अंदाज लावता येऊ शकतो. या हफ्याच्या बदल्यात म्होरक्या त्यांना पोलिसांपासून, दुसऱ्या टोळीच्या भिकाऱ्यांपासून संरक्षण, राहायला झोपडी, कामाच्या जागेपासून ने आण करण्याची सोय तो करत असतो. रोज असे किती भिकारी आपण आपल्या आजूबाजूला पाहत असतो. त्यांचे विचित्र अवतार बघितल्यावर आपल्याला त्यांची किव येते, दया येते म्हणून आपण दोन-पाच रुपये देत असतो, परंतु त्याचा फायदा यांना होतो का हे देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यांना भीक देऊन आपणच समाजविघातक कृत्यं करणाऱ्यांना पोसत नाही ना? कारण अशाच लोकांकडून विघातक गोष्टी घडवून आणल्या जातात.

समजा एखादा भिकारी मरण पावला, तर त्याच्या शरीरातील सहीसलामत असलेलं अवयव काढून घेतले जातात आणि त्याची विक्री केली जाते. याचा भक्कम असा पुरावा नाही पण जर भिकाऱ्यांच्या टोळ्या मानवी तस्करी करणाऱ्या लोकांमार्फत चालवल्या जात असतील तर त्याचे अवयव विकले जात असल्याची दाट शक्यता आहे.

आपण माणसंच आहोत. कितीही टाळायचं म्हटलं तर एक मर्यादेपर्यंत आपण स्वत:ला भीक देण्यापासून रोखू शकत नाही. मग पैसे देण्यापेक्षा कमीतकमी एखादी खाण्याची वस्तू आपण त्यांना देऊन त्यांचं पोट भरु शकतो. त्याच्या पोटात गेलं, म्हणून त्याचा आत्मा शांत अन् आपण त्याला खाऊ घातलं म्हणून आपल्या पदरात थोडस पुण्य पडलं असं समजा. पण खाऊ अशाच लोकांना घाला जे दिव्यांग असतील, ज्यांना काम करणं जमत नसेल. मी या ठिकाणी खाऊ घाला म्हणतोय, भीक द्या असं म्हणत नाही.

भारतातील काही राज्यांमध्ये भीक मागणे हा गुन्हा आहे. 2010 च्या राष्ट्रकूल स्पर्धेच्यावेळी दिल्लीतील सर्व भिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. स्पर्धा संपल्यावर त्यांना सोडून दिलं, पण एवढ्या मोठ्या भिकाऱ्यांच्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवणं खूप कठीण काम आहे आणि ती संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राजकीय इच्छाशक्ती असली, तरीही भिकाऱ्यांवर नियंत्रण मिळवणं अवघड आहे. कारण अजूनही भारतात गरिबीचं प्रमाण कमी झालेले नाही. अनेक गरीब लोकांना कामावर पण कोणी लवकर ठेवायला तयार होत नाही. काहीच काम न करता पैसे मिळवण्याचा हा मार्ग सोपा वाटत असल्यामुळे अनेक जण भीक मागणे हा व्यवसाय म्हणून स्वीकारत आहे.

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV