मिशन : प्लास्टिकमुक्त राजगड

मिशन : प्लास्टिकमुक्त राजगड

सह्याद्रीच्या कडे-कपारीला स्वराज्य रक्षणाची पोलादी भिंत मानून अवघड चढाया आणि निमुळत्या उताराच्या निसरट वाटा रेंदाळून, कित्येक स्वराज्य निर्मात्या मावळ्यांच्या बलिदानाचा ज्या उंचच उंच गगनचुंबी डोंगराला परिसस्पर्श झाला. छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या त्याच डोंगररांगाना ढाल बनवून, रयतेचं, गोरगरीबांचं, प्रत्येकाला आपलं वाटावं असं स्वराज्य निर्माण करण्याचं दिव्य स्वप्न याचं डोंगरातल्या किल्ल्याच्या रुपातून शिवछत्रपतींनी पाहिलं. त्याच महाराजांच्या स्वराज्याच्या पहिल्या राजधानीवर, गडांचा राजा राजगडावर शिवरायांच्या विचारांनी भारावलेल्या आम्हा मावळ्यांनी मोठ्या धाडसाने आणि उत्साहाने चढाई केली. जवळपास तीन ते चार किलोमीटरची उभी चढ सैर करुन चोर दरवाजावाटे आम्ही किल्ल्यात प्रवेश केला. अथांग पसरलेल्या सागराचा जसा किनारा धुंडाळणं कठीण तसा राजगडाचा अफाट विस्तार.

गवत आणि प्लॅस्टिकने अजगरी विळखा घालून या महाकाय किल्ल्याचा परिसर कोंडून टाकल्यागत केला होता. चोर दरवाजातून पद्मावती मंदिराकडे जाताना किल्ल्याच्या अस्ताव्यस्त पडझड झालेल्या भिंती जणू आम्हाला हाक देत होत्या. ती हाक आम्हा मावळ्यांना खुणावत होती. किल्ला आणि परिसराचं सौंदर्य अत्यंत विलोभनीय वाटत होतं. जर तत्कालीन काळातल्या किल्ल्याची जशीच्या तशी वास्तू शाबूत राहिली असती, तर आजच्या जगातल्या तथाकथित आठही आश्चर्यांनी तोंडात बोट घालून आश्चर्य व्यक्त केलं असतं.

trecker 6

ज्या महाराजांनी आणि त्यांच्या स्वराजनिष्ठ मावळ्यांनी एवढ्या उंचीवर एक एक दगड गोटा जुळवून जवळपास पाच ते सहा किलोमीटर डोंगरावर या किल्याची बांधणी केली. जगातला कुठलाही पुरस्कार या कामासमोर कमी पडावा.

आम्ही महाराजांवर प्रेम करणारी मावळे मुळातच आमच्या राजाच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या वास्तूला हात देण्याकरिताच या किल्ल्यावर पोहचलो होतो. महाराजांनी दिलेला खरा वारसा हा त्याच्या फोटो, झेंडा, पुतळा आणि स्मारके यापेक्षाही त्यांनी उभारलेल्या किल्ल्यात, किल्ल्यातल्या दगड मातीत, तिथल्या स्थापत्य कलेत आणि महाराजांच्या दुरदृष्टीपणात रुजल्याच्या खुणा महाराजांच्या 350 किल्ल्यापैकी कुठल्याही किल्ल्यावर गेल्यावरच समजतात. त्याचं वारसाचं जतन करुन महाराजांच्या किल्ल्यातून व पराक्रमी इतिहासातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्राचा नव्हे, तर देशाचा वर्तमान घडावा असं अपेक्षित असताना, मात्र महाराजांनी दिलेल्या या वारशाला मात्र उपेक्षितपणाच वाट्याला आला.

राजगडावरील पद्मावती मंदिरासमोरच्या चबुतऱ्यावर महाराणी सईबाई आऊसाहेबांची समाधी आहे, हे सूचवणारं साधं नामफलकही त्या समाधी स्थळाजवळ नव्हतं. समाधीला अगदी निरखून पाहिल्यास मगच खऱ्या अर्थानं समाधी असल्याची साक्ष पटते.

trecker 2 महाराणी सईबाई आऊसाहेबांची समाधी

अज्ञानापोटी रात्री गड चढून आलेले काही गडप्रेमी त्या अंधारात समाधीवर बसून गप्पा मारत होते. त्यात त्यांचा दोष नसला तरी सईबाई आऊसाहेबांच्या समाधीची नकळत विटंबनाच होत होती. सईबाई आऊसाहेब म्हणजे त्यागाचं प्रतिक त्यांच्या सहचऱ्यातून छत्रपती शिवरायांना प्रेरणा मिळाली. ज्यांच्या पोटी स्वराज्य रक्षक सर्जा शंभू महाराजांनी जन्म घेतला. आपल्या त्याच दोन वर्षांच्या तान्ह्या पोराला सोडून जाताना ज्यांचा जीव कायम ज्या राजगडावर घुटमळत राहिला त्या राजगडावर सईबाई आऊसाहेब आजही एकाकीच भासल्या.

‘राजगड’ला राजांचा गड आणि गडांचा राजा म्हटलं जातं. पण त्यावर स्वराज्याच्या महाराणी दुर्लक्षित राहिल्याचंच दिसून येतं.

व्हिडीओ : महाराणी सईबाई यांची समाधीएकीकडे पुरातत्व विभाग, पर्यटन विभाग आणि शासन व्यवस्था अगदी जमीन उकरुनही नवीन संशोधन करण्याचा अट्टाहास करण्यासाठी कोटींची उधळपट्टी करतं, तर दुसरीकडे आजही ताठ मानेनं उभ्या असलेल्या किल्ल्याकडे लक्ष पुरवायला आणि त्या किल्ल्यातून महाराष्ट्राची शौर्य परंपरा जगासमोर आणण्याला आणि पर्यटनाच्या दृष्टीने सुशोभित करण्याला या व्यवस्थेकडे वेळ नाही, याची खंत नव्हे तर चीड कोणत्याही शिवप्रेमीच्या ह्रदयात धगधगेल.

याच राजगडाला साक्षी ठेऊन गड प्लास्टिक मुक्त मोहिमेला आम्ही मावळ्यांनी सुरवात केली. सईबाई आऊसाहेबांच्या समाधीस्थळापासून सुरवात करुन पद्मावती मंदिर, रामेश्वर मंदिर, तलाव परिसर, बालेकिल्ला रस्ता, राजगड-तोरणा पायवाट आम्ही हळूहळू करून प्लास्टिकमुक्त केली.

आम्ही केलेली ही कृती किती मोठी होती किंवा छोटी होती, यापेक्षा ती किती महत्वाची होती हे तिथे जमलेल्या गडप्रेमींच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट होत होतं. आमची ही कृती पाहून तिथल्या गडप्रेमींनीही या मोहिमेला हातभार लावला. आम्ही आज एक किल्ला स्वच्छ केला,. यापुढेही ज्या किल्ल्यावर जाऊ त्या किल्ल्याची स्वच्छता करणं हा आमचा धर्म समजून या नंतरही ही मोहीम राबवत राहू. या एका मोहिमेतून गड स्वच्छ झाला असं नाही. पण यातून प्रत्येक गडप्रेमींनी गडसंवर्धन आणि गड स्वच्छता मोहिमा उभाराव्यात अशी अपेक्षा आहे.

trecker 1

ज्या वेळी प्रत्येक शिवप्रेमी गडसंवर्धन व गडस्वच्छतेचा आपल्या स्वतःच्या घर स्वच्छतेप्रमाण संकल्प करतील. ज्यावेळी महाराजांनी दिलेल्या वारसाचा झेंडा संबंध जगासमोर डोलानं फडकवतील, तेव्हा परत एकदा शिवराज्य, रयतेचे राज्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.

जर खरे शिवभक्त असाल, तर शिवछत्रपतींच्या या वारशाला जबाबदारीने सांभाळण्याची शपथ घ्या. गडांची आजची ही केविलवाणी अवस्था प्रत्येक मावळ्याला प्रत्येक क्षणी अस्वस्थ करत असेल. त्या अस्वस्थपणाला जगासमोर मांडण्याचा आणि प्लास्टिक मुक्त गड-किल्ले करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न होता. तो प्रयत्न यापुढेही अविरत सुरुच राहील, असा विश्वास आहे.

trecker 5-compressed

शेवटी एकच विचारावं वाटतं, ते म्हणजे, म्हणजे, एकीकडे रस्त्यावर थाटलेल्या चौकांसाठी, झेंड्यासाठी, फोटोंसाठी रस्त्यावर येणारे तथाकथित शिवप्रेमी, शिवाजी महाराजांच्या नावावर निवडणुका लढवणारे राजकीय नेते व पक्ष संघटना, महाराजांच्या नावासाठी जीवाचा आटापिटा करणारे भक्त मात्र अर्धांगणी व स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री आईसाहेब सईबाई यांची मोडकळीस आलेली अन् धूळ खात पडलेली समाधी उर्जित अवस्थेत आणण्यासाठी का लढा उभारत नाहीत?

स्वच्छता मोहिमेचा व्हिडीओ :

Blog शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Blog on cleaning movement at Rajgad fort
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV