गीता दत्त - शापित स्वरागिनी

गीता दत्त - शापित स्वरागिनी

'एक सौसोला चाँद की रातें, एक तुम्हारे कांधे का तिल

गीली मेंहदी कि खुशबू, झुठ-मूठ के शिकवे कुछ

झूठ-मूठ के वादे सब याद करा दूँ सब भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो

एक इजाज़त दे दो बस, जब इसको दफनाऊँगी, मैं भी वहीं सो जाऊंगी.....'

इजाजत मधलं हे गाणं गुलजारजींना कसे सुचले असेल? मला वाटते, गुलजारजी जेव्हा गीता दत्तला भेटले असतील तेव्हा तिचं दुःख तिच्या अबोल वेदना त्यांच्या हृदयात बंदिस्त झाल्या असाव्यात. एका मनस्वी देखण्या अभिनेत्रीची ती आर्तकरुण शोकांतिका त्यांच्या मनात घर करून राहिली असणार. जेव्हा गीतादत्तने गुरुदत्तचे वहिदा रेहमानशी वाढत चाललेल्या जवळीकीपायी सगळे संबंध तोडले, नाते तोडले, त्याला घटस्फोट दिला. तेव्हा तिचा जीव तळतळला असणार. आपल्या नवऱ्यापायी, संसारापायी तिने करिअर अर्ध्यात नासवून घेतले होते, आपल्या ताटात पुढे काय वाढून ठेवले आहे याची तिला कल्पना नव्हती. नंतर गुरुदत्तला उमजले की आपण जिच्यामागे धावत होतो ते तर मृगजळ होते. पण तोवर त्याला गीतादत्तचे दरवाजे बंद झाले होते. त्याच्यापायी ती अक्षरशः गालिचावरून रस्त्यावर आली होती. तिने त्याला शेवटच्या रात्रीपर्यंत माफ केले नाही. अखेर तो आत्महत्त्या करून अकाली देवाघरी गेला. तिचा जीव पुन्हा तळमळत राहिला. गीताने जेव्हा गुरुला सोडले असेल, नवरा आपल्याला फसवतोय असे वाटले असेल, आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात दुसरी बाई आल्यामुळे आपले स्थान डळमळीत झाले आहे असे वाटले असेल तेव्हा त्या अवस्थेत एक संवेदनशील, प्रतिभाशाली स्त्री आपल्या पतीला अखेरचं मागणं म्हणून काय शकते हे गीतादत्तला भेटल्यावर गुलजारजींना नक्की जाणवले असणार.

आज गीता दत्तचा स्मरणदिवस आहे. १९६४ मध्ये आपल्या पतीच्या अकाली एक्झिटमुळे गीता दत्त पार कोलमडून गेली होती. मधुर आवाजाची अन अभिजात प्रतिभेची देखणी गायिका अशी तिची ओळख या धक्क्याने पुसून निघाली अन् नवा अपयशी संसाराचा ठपका तिच्यावर बसला. त्यानं तिचं सांगीतिक जीवन जवळपास लुप्तच झालं. परंतु तिच्यातली गायिका तिला स्वस्थ बसू देईना. संगीताशिवाय जीवन व्यर्थ आहे, हे ज्या क्षणी तिला जाणवलं, त्या क्षणी तिने पुन्हा नव्या उमेदीनं जगायचं ठरवलं, उभं राहायचं ठरवलं; परंतु  बराच उशीर झाला होता. अशा वेळी कोणत्याही कलाक्षेत्रात जे घडते तेच तिच्याबरोबर घडले होते. तिची स्पेस भरून निघाली होती. तिची जागा अन्य कुणी तरी भरून काढली अन् तिला काम मिळेनासे झाले.

अतिशय दिलदार असलेल्या या गायिकेनं एके काळी चक्क काही संगीतकारांना पैशाची मदत केली होती पण तिच्या संकटकाळी तिला कुणी मदतीचा हात दिला नाही. चरितार्थासाठी तिला पैशाची गरज भासू लागली तेंव्हा तिला रस्त्यावर येणं भाग पडलं. आधी आवड म्हणून पुनरागमन केलेल्या या ज्येष्ठ गायिकेला पुढे कुटुंबाच्या खर्चाचे वांदे पडले! तिचा नाईलाज झाला अन् आपल्याकडे गणेशोत्सवात गातात तसे तिने तिच्या राहत्या भागात कोलकत्त्यात दुर्गापूजेसारख्या उत्सवामध्ये स्टेज शो करायला सुरवात केली. एके काळी जिला हजारो चाहत्यांचा गराडा पडलेला असायचा, ती लाकडी फळकुटाच्या स्टेजवर अन कॅटेगोराइज्ड ताफ्यासोबत गाऊ लागली.

तिच्या दुर्दैवाचे उलट फेरे सुरु झाले होते. एकेकाळी मुंबईचा एकही रेकॉर्डिंग स्टुडियो असा नव्हता की जिथे तिची पायधूळ झडली नव्हती. ती आता धुळकट रस्त्यावर, मैदानात शो करत होती! बंदिस्त वातानुकुलित रेकॉर्डिंग रूम आणि लाईट, अॅक्शन, कॅमेरा या विश्वात रमलेली ती एके काळची अप्सरा आता रस्त्यावर गाणी म्हणत होती. 'बाबूजी धीरे चलना…' असलं मदहोश गाणं गाणारी ती. आता तिलाच चालायला कोणाचा हात सोबतीला नव्हता. तिची प्रसिद्ध गाणी म्हणजे ‘बाबूजी धीरे चलना’, ‘थंडी हवा काली घटा’, ‘जाता कहाँ है दीवाने’, ‘मेरा नाम चिन चिन चूँ’, ‘कैसा जादू बलम तू ने डाला’, ‘न जाओ सैय्या’.

त्या शापित स्वरागिनीची गीतादत्तची आठवण आजही अस्वस्थ करून जाते. तिचे पती गुरुदत्तही तिच्यासारखे दुर्दैवी होते. पण एका अत्यंत देखण्या पोर्ट्रेटचे हे दोन कॅनव्हासचे तुकडे कधी एकत्र येऊच शकले नाही. एक चित्र विस्कटलेलेच राहिलं. अर्धे तिच्या घरी आणि अर्धे त्याच्याकडे. कदाचित नियतीला तेच मंजूर असावे.

आताच्या बांगलादेशातील फरीदपूर इथं देबेंद्रनाथ घोष रॉय या जमीनदार घराण्यात जन्मलेली गीता कालांतराने आई अमियादेवी, वडील व भावंडांबरोबर कोलकाता इथं आणि त्यानंतर मुंबईला येऊन स्थायिक झाली. गोरापान रंग, रेशमी काया, अर्धगोलाकार भुवया, मासोळी डोळे, उभट कपाळावर रुळणारी कुरळ्या केसांची महिरप, चाफेकळी नाक. नाजूक ओठाआड मोत्यांची सुबक दंतपंक्ती अन जोडीला मधाळ आवाज असं देखणं रुपडं होतं गीता दत्तचं.

दादरमधल्या आपल्या अपार्टमेंटच्या टेरेसवर सहज गुणगुणत असलेल्या गीताच्या आवाजानं प्रसिद्ध संगीतकार हनुमान प्रसाद भारावून गेले आणि त्यांनी गीताला चित्रपटांमध्ये गाण्यासाठी आग्रह केला. गीताच्या आवाजावर त्यांनी मेहनत घेतली व १९४६ मध्ये ‘भक्त प्रल्हाद’ या पौराणिक चित्रपटाच्या निमित्ताने फिल्मी गाण्याच्या पार्श्वगायनाची पहिली संधी त्यांनी गीताला दिली. गीताच्या चित्रपट संगीतातील प्रवास इथूनच सुरू झाला. दिलीपकुमार व नर्गीस यांच्या ‘जोगन’ चित्रपटासाठी तिने भजनं व काही भक्तिगीतं गायली. त्याचप्रमाणे मीराबाईचं ‘घुंघट के पट खोल दे’ आणि ‘मैं तो गिरिधर के घर जाऊंगी’ ही पदं गायली. भक्तिगीतं व भजनांसाठी साजेसा आवाज असल्यामुळे सुरवातीला तिने अशाच प्रकारची गाणी गायली. तिच्या खऱ्या गुणांची पारख अजून व्हायची होती. जसे एखादा निष्णात जवाहिरी हिऱ्याची खरी पारख करून त्याला सोनेरी कोंदणात सजवतो तसे प्रतिभावंत कलाकारातील खरी प्रतिभा एखादा अव्वल अन् अवलिया कलावंतच ओळखू शकतो. गीताची ओजस्वी अलौकिक प्रतिभा सचिनदाच्या पारख्या माणसाच्या नजरेस पडली अन् तिथून गीताच्या कारकिर्दीला वेगळे वळण मिळाले.

संगीतकार सचिनदेव बर्मन यांनी तिला भजन-भक्तीगीते यापासून अलिप्त केलं आणि अनोख्या मेलोडीयस मदहोश गाण्यांच्या नोट्स तिच्या हाती ठेवत रेकॉर्डिंगरूमच्या माईकपुढे उभे केले. सचिनदांनी गीताच्या आवाजाची पारख करून तिला वेगळ्या धाटणीची गाणी गाण्यासाठी प्रवृत्त केलं. १९४७ मध्ये ‘दो भाई’ या चित्रपटातील गाण्यांना दिलेल्या संगीतामुळं सचिनदांची व गीताची केमिस्ट्री जुळली आणि १९५१ मध्ये ‘बाजी’ या चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिलेल्या ‘तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले’ या गाण्यामुळं वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी गीता उत्तुंग लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोचली. सचिनदांनीच संगीत दिलेली ‘आज सजन मोहे अंग लगा लो’, ‘हम आपकी आँखों में’, ‘हवा धीरे आना’, ‘वक्त ने किया’ अशी बरीच गाणी गीताने गायली. ती अफाट लोकप्रिय झाली.  ओपींनी संगीत दिलेली ‘बाबूजी धीरे चलना’, ‘थंडी हवा काली घटा’, ‘जाता कहाँ है दीवाने’, ‘मेरा नाम चिन चिन चूँ’, ‘कैसा जादू बलम तू ने डाला’ अशी वेगळ्याच स्टाईलची गाणी गाऊन गीताने आपल्या तडफदार आवाजाची ओळख रसिकांना करून दिली. हेमंतकुमारने संगीत दिलेल्या ‘जय जगदीश हरे’, ‘न जाओ सैय्या’, ‘न ये चाँद होगा’, ‘पिया ऐसो जिया में’ गाण्यांमधून तिने आवाजातील मृदुतेचा- सोज्वळपणाचा अनुभव रसिकांना दिला. नौशादजींनी संगीत दिलेली तिच्या आवाजातली ‘तू मेरा चॉंद, मैं तेरी चाँदनी’, ‘मुझे हुजूर तुम से प्यार है’ ही गाणीही चिकार लोकप्रिय झाली. अमल मुखर्जी, कनू घोष, नचिकेत घोष आदी संगीतकारांनी स्वरबद्ध केलेली गाणीही गीता दत्त यांनी गायली. रफी, किशोरदा, मन्ना डे, हेमंतदा, तसेच लताजी, आशाजी, सुमनजी, सुधा मल्होत्रा अशा अनेक दिग्गज गायक-गायिकांसमवेत गीताने माईक शेअर केला होता.

‘बाजी’मधील गाण्यांपासून गीता खऱ्या अर्थाने लोकप्रियतेच्या शिखरावर पोचली होती. त्याच चित्रपटातील गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी तिची ओळख सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहत असलेल्या गुरुदत्तशी झाली. गुरुदत्तने गीताला मागणी घालण्यासाठी बहीण ललिताच्या हातून सोन्याची अंगठी व पत्र पाठवलं, तेव्हा गीताने आधी अंगठी परत केली. तेव्हा गीता ललिताला म्हणाली होती, ‘Tell your brother, I am not a flirt.’ एवढी मोठी गायिका आपल्याला होकार देईल की नाही, अशी भीती त्यांच्या मनात होतीच. घडलेही तसेच. पण गुरुदत्त हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. पुढं दोघांची मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. नंतर थाटामाटात त्यांचं लग्न झालं. आता ती गीता दत्त झाली होती. त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवातीची काही वर्षे चांगली गेली. तीन अपत्ये झाली. पण दरम्यानच्या काळात गुरुच्या वैवाहिक जीवनात वहिदा रेहमानने प्रवेश केला आणि त्यांचा सुखी संसार पार उद्ध्वस्त झाला. पण पुढे जाऊन एकवेळ अशी आली की वहिदा आणि गीता ह्या दोघींची दारे गुरुदत्तला बंद झाली त्याचा जीव कासावीस झाला.

गुरुदत्तचे काळीज त्याच्या अखेरच्या काळात अक्षरशः तळमळत होते. त्याच्या अखेरच्या दिवशीची ९ ऑक्टोबर १९६४ची ही घटना काळजाचा थरकाप उडवते. रात्रीचे दहाएक वाजले होते. आसमंतात मंद उदास हवा वाहत होती. थंडी अजून म्हणावी तशी सुटलेली नव्हती. तिने बंगल्यातले दिवे मंद केलेले होते. झोप येत नव्हती तरी जबरदस्तीने बेडवर पडल्या पडल्या तिचे डोळे छताकडे लागलेले होते. इतक्यात दिवाणखान्यातील फोन खणाणला. बराच वेळ रिंग वाजत राहिली तशी ती नाईलाजाने उठली, इतक्या रात्री कुणाचा फोन आला असेल असा विचार करत तिने फोन उचलला. काही सेकंद ती हॅलो हॅलो करत राहिली रिसिव्हर ठेवणार इतक्यात पलीकडून आवाज आला. गुरुदत्त फोनवर होता. बऱ्याच कालावधीनंतर त्याचा आवाज तिच्या कानी पडला.

त्याच्या आवाजावरून गीताला वाटले की बहुतेक त्याने थोडी दारू प्यायली असावी. तो अस्पष्ट पुटपुटत होता. त्याच्याशी इतक्या काळानंतर अन् अशा अपरात्री अवेळी काय आणि कसे बोलावे हे तिला काही केल्या सुचत नव्हतं. शेवटी तोच म्हणाला, ‘मला नीनाला भेटू वाटतेय, तिला बघायचे आहे. प्लीज फक्त एकदा... तू इतकी कठोर होऊ शकत नाहीस, प्लीज.’ तिच्या मनात राग, दया, हतबलता, द्वेष, करुणा आणि प्रेम या सर्व भावनांचा कल्लोळ माजला होता. ती काहीच बोलू शकली नाही, ती रिसिव्हर हातात धरुन पुतळ्यागत थिजून उभी राहिली. तिच्या प्रतिसादाची वाट बघून त्याने फोन ठेवला. हताश आणि हतबल झालेला तो रात्रभर दारू पीत राहिला, तेव्हा सलग कित्येक महिने तो निराशेच्या गर्तेत होता. त्या मध्यरात्री त्याने झोपेच्या मूठभर गोळ्या घेतल्या. भल्या पहाटेपर्यंत तर त्याची या 'जालिम दुनियेतून' मुक्ती झाली होती. तो सर्व काही अर्ध्यात टाकून निघून गेला होता. गुरदत्तने ज्या नीनाला भेटायची इच्छा व्यक्त केली होती ती नीना या दांपत्याची दुर्दैवी कन्या होती.

गुरुदत्त गेल्याचा धक्का गीताला आयुष्यातून आणि करियरमधून उठवून गेला. तरीही तिने जमेल तितका संघर्ष केला. १९६७ मध्ये ‘बधु भरण’ या बंगाली चित्रपटात तिने काम केलं. १९७१ मध्ये कनू रॉय यांनी संगीत दिलेल्या ‘अनुभव’ या चित्रपटासाठी गात गीता दत्तने चित्रपट संगीतामध्ये पुन्हा पाऊल ठेवलं; परंतु त्या चित्रपटात गायलेलं ‘मुझे जा न कहो मेरी जा’ हे तिचं शेवटचं गाणं ठरलं. २० जुलै १९७२ रोजी गीताने या जगाचा निरोप घेतला.

गीताने गायलेल्या ‘मेरा सुंदर सपना बीत गया’, ‘मैं प्रेम में सब कुछ हार गई’, ‘बेदर्द जमाना जीत गया’ हे गाणं तिच्या वैयक्तिक जीवनाशी मिळतं-जुळतं आहे. गीताची भाची कल्पना लाझमी गीताला श्रद्धांजली वाहताना म्हणाली होती, ‘हमारी मामी में थोडासा पेशन्स होता और थोडा कम रेस्टलेसनेस होता तो वो आज तक गाती रहती.’ मला वाटतं हे अर्धसत्य आहे. कारण त्या-त्या क्षणाला येणारे दुःख, अवहेलना, विश्वासघात आणि अपमान यांचे कढ कोण कसे पचवू शकेल हे कुणी सांगू शकत नाही. संवेदनशील माणसाबरोबर असं काही घडलं तर तो पूर्णतः उन्मळून पडतो. त्यात त्याला दोष देता येणार नाही.

प्रेमाचा डाव मांडून सुखी संसाराची सुंदर स्वप्ने पाहणाऱ्या या दाम्पत्याचे स्वप्न अधुरेच राहिले. अकाली अन दुर्दैवी मृत्यूने त्यांच्या सहजीवनाची अखेर झाली. संसाराचे सर्व खेळ अर्ध्यावरती सोडून राजा आधी अनंताच्या प्रवासाला गेला अन मग राणी गेली. तिच्याच आवाजातलं 'तू मेरा चांद, मै तेरी चांदनी…' हे गाणं त्यांनी वसुंधरेवर सजगपणे अनुभवले नसेल पण स्वर्गस्थ तारांगणात तर त्यांनी नक्कीच याची अनुभूती घेतली असेल. या दाम्पत्यास तरुण आणि अरुण ही दोन मुले अन नीना ही मुलगी होती. त्यातील तरुण दत्त यांनी देखील नंतरच्या काळात आत्महत्त्या केली अन् काही वर्षांपूर्वी अरुण दत्त यांचे कर्करोगाने पुण्यात निधन झाले. ज्या प्रमाणे तरूण दत्तने आत्महत्या केली होती त्याच प्रमाणे अरुणनेही आत्महत्त्या केल्याचे कल्पना लाजमी सांगतात पण ऑन द रेकॉर्ड ती आत्महत्या सिद्ध होऊ शकली नाही. कॉमेडिअन मेहमूदचा भाचे नौशाद मेमन हा गीता दत्तच्या मुलीचा म्हणजे नीना दत्तचा पती होय, नीना मेमन आणि नौशाद मेमन या दांपत्याची कन्या नफिसा मेमन हिने काही काळापूर्वी म्युझिक अल्बम रिलीज केला होता पण त्यात यश मिळू शकले नाही. नीनाने सुद्धा दोन अल्बम काढले होते पण तेदेखील अपयशी ठरले होते. संगीताच्या अतीव प्रेमनादात हेही कुटुंब विस्मृतीत अन दैन्यावस्थेत गेले. अशा प्रकारे पूर्ण कुटुंबाची वाताहत झाल्याने कधी कधी गुरु दत्त वा गीता दत्तचे नाव देखील कधी गप्पाष्टकात निघाले तरी उगाच उदास वाटत राहते.

आज या शापित स्वरागिनीचा स्मरणदिवस आहे. तिच्या अनमोल गायकीला अन् तिच्या लोभस व्यक्तीमत्वाला मायबाप रसिकांनी मनाच्या एका कप्प्यात आजही जतन केलेलं पहायला मिळतं. तिच्यावर लोकांनी केलेलं हे निखळ प्रेम असंच टिकून राहावं, तिच्या आवाजातले 'ना जाओ सैय्या छुडाके बय्या…. ' हे मनावरचं गारुड तिच्यासाठी रसिकांच्या मनात सदैव राहावं अशी मनोकामना! तिच्यासाठी प्रेमाची ही चार श्रद्धासुमने

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV