खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचा

खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचा

पुणे देशातील ऐतिहासिक, राजकीय चळवळींचे केंद्र तर छत्रपती शिवरायांच्या काळापासूनच होतं. ब्रिटिशांनी एकाच शहरात स्वतःचे ३ कॅम्प स्थापन करण्यातच पुण्याचे महत्व अधोरेखित होतं. स्वातंत्र्यानंतर भारतीय सैन्याच्या अनेक आस्थापना इथे आल्या. लोकमान्य टिळक, आगरकर, महात्मा फुले, भारतरत्न अण्णासाहेब कर्वे ह्यांच्यासारख्या दृष्ट्यांनी पुण्याला विद्येचं माहेरघर बनवलं. उत्तम दर्जाचे मनुष्यबळ मिळत असल्याने किर्लोस्कर, टाटा, गरवारे, बजाज, फिरोदिया प्रभूतींनी इथे औद्योगिक नगरी उभी केली. त्यांच्यासाठी अनेक पूरक उद्योग पुणे परिसरात सुरु झाले. तिथे काम करायला पुण्याच्या, महाराष्ट्राच्या बाहेरून लोक इथे यायला लागले आणि नकळतपणे वाढ झाली ती इथल्या खाद्यउद्योगाची, हॉटेल्सची.

आताची हॉटेलाबाहेर ओसंडून वाहणारी गर्दी बघून न-पुणेकरांना पडणारा हमखास पडणारा प्रश्न “हे पुणेकर कधी घरी जेवतात की नाही?”

त्यांच्यासाठीच जर सांगायचं झालं तर, म्हणजे नव्वदच्या दशकापर्यंत, पुण्यात शिकायला आलेले विद्यार्थी, कामानिमित्त आलेले ‘बॅचलर्स’ (पुणेरी उच्चार ‘ब्याचलर्स’) पेठांतल्या अनेक अनामिक भाऊ, अण्णा, मावशी ह्यांनी चालवलेल्या घरगुती खानावळींवर पोसले जायचे. क्षुधाशांती गृह किंवा उपहार/विश्रांतीगृह ह्यासारखी बिरूदं मिरवणाऱ्या ‘हाटेलच्या’ कळकट्ट फळकुटांवर बसून, चिनीमातीच्या डिशमधून वाढल्या जाणाऱ्या मिसळ, भज्या, वडे आणि काचेच्या बरण्यात ठेवलेल्या शेवचिवडा आणि शेंगदाणा लाडवांवर त्यांची मधल्या वेळेची भूक भागायची.

ambar karve

बाळ्या, राम्या, गण्या नामक पोऱ्यांनी हात बुचकळलेल्या काचेच्या ग्लासातल्या पाण्यावर त्यांची तहान भागायची. चालू तारखेला खिशात पैशांचा खुळखुळाट असेल तर उडप्याकडे डोसा, उत्तप्पा खाण्यात धन्यता मानली जायची. कॉलेजच्या पोरापोरांच्या ‘ओल्या’पार्ट्यांची सांगताही इराणी हॉटेलातल्या शिसवी लाकडाच्या खुर्चीत, समोरच्या दगडी टेबलावरच्या बन आम्लेट-चाय आणि दोघात एका ब्रेडपुडिंगवर व्हायची.

हा इतिहास तेव्हाचा आहे जेव्हा संपूर्ण कुटुंबांनी एकत्र हॉटेलात जायची वेळ वर्षातून फक्त एक दोनदाच यायची. जेव्हा पुण्यात उडपी लोक हॉटेल काढायला झुंडीने दाखल झाले नव्हते. गुंडूआण्णा, जगन्नाथआण्णा तेव्हा शेठ झाले नव्हते. गुडलकचा कासमशेठ जेवत असला तर समोर आलेल्या खास कस्टमरला आपल्याबरोबर ‘कासमखाना’ घेण्याचा आग्रह धरत असे. जहांगीरच्या शेजारच्या ‘वहुमन’चा इराणी ‘सेठ’ नेहमीच्या कस्टमरचे स्वागतही शिव्यांनीच करत असे. पण त्या शिवीमधला लडिवाळपणा मात्र, त्याच्याकडच्या ‘बन’ला लावलेल्या मस्क्यासारखा ओथंबणारा असे.

ह्या ब्लॉगमधला इतिहास आहे पाहिलेला, वाचलेला, अनुभवलेला, तर काही ऐकलेलाही. पण तो इतिहास मनाच्या कोपऱ्यात मात्र अलगद जपून ठेवलेला. इथे ओघानी येतील अनेक व्यक्तिमत्वं, हॉटेलं अगदी दुकानंही... जी होती, आहेत पुण्याच्या खाद्य इतिहासाची जिवंत साक्षीदार. त्या जोडीला असेल वर्तमानातल्या खाद्यजगताची, हॉटेलविश्वाची दखल; एका अस्सल पुणेकर खवय्याच्या नजरेतून.

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: Amber Karve blog blogger food history pune
First Published:
LiveTV