चालू वर्तमानकाळ (२) - अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची!

अब्रू गेली की, माणसाच्या चेहऱ्यावरचं तेज गायब होऊन तो काळा पडतो. मग प्रतिष्ठा नष्ट होते म्हणजे काय होतं? मान, कीर्ती व स्थैर्य डळमळीत होतं, काहीवेळा नष्टच होतं!

By: | Last Updated: > Tuesday, 22 August 2017 11:26 AM
chalu vartmankal kavita mahajan blog on women cow and earth

अनेक शब्द आपण सवयीने वापरतो. त्यांचा अचूक, नेमका अर्थ विचारला तर तो पटकन वा आठवून देखील सांगता येतोच असं नाही. कधी एखाद्या शब्दाचा अचूक अर्थ शोधण्यासाठी मराठी-मराठी शब्दकोश उघडला की, एकेका शब्दाच्या अर्थांची अनेक वलये मनात रेंगाळत राहतात. अब्रू / इज्जत या शब्दाचे मराठी पर्याय शोधत होते. अब्रू आता मराठीच वाटत असला, तरी मुळात फारसी आहे. आब म्हणजे पाणी व रु म्हणजे चेहरा… थोडक्यात चेहऱ्यावरचं तेज, कळा असा या शब्दाचा अर्थ. तोंड उतरणं, काळं पडणं वगैरे वाक्प्रचार आठवून पाहिले की हा अर्थ अजून स्पष्ट होईल. मराठीतले पर्याय होते : कीर्ती , थोरवी , प्रतिमा , प्रतिष्ठा , मान , मान्यता आणि लौकिक. अब्रू जाणे म्हणजे दुष्कीर्ति / बदलौकिक होणे. अब्रू घेण्यात भ्रष्ट, निष्फळ, मोडता, अपमान, अप्रतिष्ठा, मानहानी करणे हे मुद्दे येत शेवटी ‘शील भ्रष्ट करणे; ( संभोगाचा ) बलात्कार करणे’ असे अर्थही आले. अब्रूची चाड म्हणजे प्रतिष्ठेची आस्था वा काळजी.
प्रतिष्ठा या शब्दावर मी थबकले. प्रतिष्ठेचा एक अर्थ मान, कीर्ती असा होताच; पण अजून एक अर्थ स्थापना, स्थैर्य असा होता. अब्रू गेली की, माणसाच्या चेहऱ्यावरचं तेज गायब होऊन तो काळा पडतो. मग प्रतिष्ठा नष्ट होते म्हणजे काय होतं? मान, कीर्ती व स्थैर्य डळमळीत होतं, काहीवेळा नष्टच होतं! अब्रू, इज्जत, प्रतिष्ठा हे सारेच शब्द बाईच्या संदर्भात सातत्याने वापरले जातात आणि तिचं शील, कौमार्य, योनी यांच्याशी तिची, कुटुंबाची, जातीची, धर्माची, गावाची, प्रसंगी अगदी देशाचीही प्रतिष्ठा निगडित केली जाते. हे नेमकं कधी. कसं व का सुरू झालं असावं याचा उगम शोधला पाहिजे असं वाटत होतं.

 

 

chalu vartamankaal

 

याच काळात मी जगभरच्या विविध भाषांमधल्या विश्वउत्पत्तीच्या पुराकथांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. भारतीय कथांपैकी एक कथा तैत्तिरीय संहितेत सापडली. सगळीकडे फक्त पाणीच पाणी होतं, अशीच विश्वउत्पत्तीच्या अनेक कथांप्रमाणे या कथेचीही सुरुवात होती. पाण्यात कमळं आहेत, कमळाच्या एका पानावर प्रजापती बसलेला आहे; पण लहरत्या, चंचल पाण्यामुळे त्याची बैठक डळमळते आहे. वराहरूप घेऊन त्याने पाण्यात बुडी मारली आणि तळाशी असलेला चिखल कमळपानांवर पसरवला. चिखलापासून हळूहळू पृथ्वी निर्माण झाली आणि त्यानंतर कुठे प्रजापतीला ‘प्रतिष्ठा’ लाभली. हे स्थैर्य! प्रतिष्ठेचे जे अनेक अर्थ आहेत, त्यातला मला हा मूळ अर्थ वाटतो. पुढच्या काळात तर ‘हुंड्या’ला आणि नवरदेवाच्या पोशाखाला देखील प्रतिष्ठा म्हणू लागले, इतकी त्या शब्दाची प्रतिष्ठा घसरली, हे निराळं. पाण्यात जशी कमळं, तशी पृथ्वी… ही एक प्राचीन कल्पना. कमळ हे समृद्धीचं रूपक म्हणून विकसित पावलं. कमळात उभ्या असलेल्या लक्ष्मीचं चित्र आपल्याला अतिपरिचित आहेच.
chalu vartamankaal 1-

 

आकाश-पृथ्वी या दांपत्याचं प्रतीक म्हणून सूर्य / चंद्र – कमलिनी असं प्रतीक येतं. पावसाने आर्द्र – ओली – स्निग्ध होणारी धरती ही पुन्हा स्त्रीचं प्रतीक बनली. धनधान्य-गायीवासरं हीच वेदकाळातली मुख्य संपत्ती होती. ही समृद्धी देणारी भूमाता हळूहळू देवतांची अनेक रूपं घेती झाली, त्यातलं एक लक्ष्मीचं. कमळ हे सृजनशीलतेचं, योनीचं प्रतीक मानलं गेलं. योनिद्वारातून जन्माला येणाऱ्या, वंशसातत्य राखणाऱ्या पिढ्यांमुळे ‘समृद्धी’ येते म्हणून ते समृद्धीचं प्रतीक बनलं. आणि मग अवघी पृथ्वीच जणू एक योनिकमळ आहे असंही म्हटलं गेलं.
सैषा धात्री विधात्री च धारणी च वसुन्धरा ।
दुग्धा हितार्थं लोकांना पृथुना इति नः श्रुतम् ।।
चराचरस्य लोकस्य प्रतिष्ठा योनिरेव च ।।
असा उल्लेख वायुपुराणात आहे. सकलांची निर्माती, धात्री, चराचराची प्रतिष्ठा आणि योनी म्हणजेच उत्पत्तिस्थान असलेल्या वसुंधरेचं पृथुराजाने प्रजेच्या हितासाठी दोहन केलं… असा याचा अर्थ. यामागे एक कथा आहेच.

 

chalu vartamankaal 2

 

समृद्धी आली की संघर्ष चुकत नाहीच, उलट तो वाढतो. मनातली हाव वाढते, असुरक्षितता वाढते, संरक्षणाची साधनं वाढतात, संरक्षक चीजांभोवतीची बंधनं वाढतात. हाव वाढल्याने माणूस गरजेहून अधिक साठवू पाहतो, त्यातून शोषण सुरू होतं. पृथ्वी तोवर शेतीविना पिकं देणारी होती; पण हाव वाढल्याने पृथ्वीचं शोषण सुरू झालं; जंगलं तोडून / जाळून शेतजमिनी किती वाढवाव्यात याचं प्रमाण राहिलं नाही; जमिनीत दडलेला धातू इत्यादींचा खजिना किती खोदावा – उपसावा याचं भान राहिलं नाही; समृद्धीसाठी केल्या जाणाऱ्या यज्ञांत पशुबळीचं प्रमाण कमालीचं वाढलं. यातून घाबरलेल्या पृथ्वीनं गायीचं रूप धारण केलं आणि ती अंतराळात धावत सुटली… दुष्काळ फैलावला, लोक अन्नानदशा होऊन मरू लागले, त्यांनी पृथु राजाला विनंती केली. तो धनुष्यबाण घेऊन तिच्या मागे धावला. अशी एक गोष्ट विष्णुपुराणात आहे. पृथु राजाने तिचं शोषण होणार नाही, असं आश्वासन तिला दिलं. गायीचं दूध हे अन्न म्हणून, औषध म्हणून लोक वापरू शकतील असा शब्द तिने राजाला दिला. तोवर ‘धरा’ असलेली पृथ्वी पृथु राजाच्या नावाने ओळखली जाऊ लागली. राजाने तिचं गरजेपुरतं दोहन केलं आणि मनू, देव व ऋषी यांना वासरांचं रूप देऊन दुग्धपान करवलं. अशा रीतीने त्याने पृथ्वीला आणि प्रजेलाही वाचवलं. शेती, अन्न-पाणी वाटप, व्यापार अशा अनेक गोष्टींमध्ये पृथुराजाच्या काळापासून सुसूत्रता आली. ही कथा विष्णुपुराणात आहे.

 

या सगळ्या कथांचे ठिपके एकमेकांशी जोडून पाहताना जाणवलं की, मानवजातीची प्रतिष्ठा स्त्रीच्या योनीशी का, कधी व कशी निगडित झाली आहे. पृथ्वी ही विश्वाची योनी, तिची प्रतिष्ठा / स्थैर्य डळमळीत झालं की नैसर्गिक आपत्तींचं संकट ओढवतं. गाय हे पृथ्वीचं प्रतीक. तिचं प्रतीकत्व नष्ट होऊन तिला देवरूप दिलं गेलं आणि पृथ्वीचा व स्त्रीचा कितीही अवमान होत असला, तरी गायीचा मात्र अवमान होता कामा नये, असं अविचारी टोक गाठलं गेलं. स्त्री मालमत्ता समजली जाऊ लागल्याने तिची योनी ही अब्रूचं केंद्र बनली, याला ही इतकी प्राचीन कथापरंपरा आहे. कौमार्याच्या कल्पना तीव्र झाल्या. बलात्कार पुरुषांवर देखील होतात, पण स्त्रीवर झालेला बलात्कार हा मानहानी करणारा ठरला आणि पुढील काळात तर त्यासाठी तिलाच अपराधी ठरवलं जाऊन तिच्यावरची बंधनं वाढत गेली.

 

कायद्यानुसार अब्रूनुकसानी  म्हणजे कोणत्याही मानवाच्या स्थैर्याला, मन:स्थितीला, बुध्दीला, सदगुणाला, जातीधर्माला, धंद्याला कमीपणा येईल असा मजकूर बोलून किंवा लिहून प्रसिध्द करणं; लिहून, बोलून, खुणांनी वा  चिन्हांनीं एखाद्या व्यक्तीची बेइज्जती करणं. ही बेइज्जती आज बाईची झाली वा पृथ्वीची झाली, तरी त्याकडे ‘दैनंदिन घटना’ म्हणून दुर्लक्ष होतं आणि त्यांचंच प्रतीक असलेल्या गायीच्या संरक्षणासाठी आटापिटा केला जातो. प्रत्यक्षाहून प्रतीकं मोठी बनतात, याचं हे खास उदाहरण. प्रतीकं जपायला काहीच हरकत नाही; मात्र त्या नादात प्रत्यक्षाकडे डोळेझाक नको, हीच अपेक्षा.

 

फोटो आणि चित्र : कविता महाजन

 

संबंधित ब्लॉग :

 

चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब

News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:chalu vartmankal kavita mahajan blog on women cow and earth
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published: