चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब

चालू वर्तमानकाळ हा ‘चा’चा उच्चार बदलून ‘चालू’देखील बनलेला दिसतोय. या चालू वर्तमानाकडे आणि त्याच्या चालूपणाकडे देखील त्याच्यासोबतच चालत बघण्याचा, त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न मी या सदरातून करणार आहे.

By: | Last Updated: > Tuesday, 15 August 2017 2:23 PM
Chalu Vartmankal Kavita Mahajan Blog on women empowerment

आज देशाच्या स्वातंत्र्याने सत्तरी गाठली आहे. स्वातंत्र्याचा लढा इतिहासाच्या पुस्तकात जाऊन निवांत बसलाय. लढ्याच्या काळात जन्मलेली पिढी अजून आहे; मात्र जे प्रत्यक्ष लढले आहेत ते लढ्यांचा ‘आंखो देखा हाल’ रसाळपणे सांगणारे लोक आता जवळपास गायब झालेत. कुणी शिल्लक असतील तरी त्यांच्या आठवणींवर धुकं पसरलेलं असण्याची शक्यताच जास्त. स्वातंत्र्याने पंचविशी गाठली, साधारणपणे तेव्हापासून सामाजिक कार्यकर्त्यांकडून सुरू झालेला ‘स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षं झाली तरी…’ असा कंठशोष करणारे कार्यकर्ते देखील स्वयंसेवी संस्थांच्या भूलभुलय्यात हरवून गेले आहेत. पूर्वी वृत्तपत्रं भूतकाळाचा आढावा घेत वर्तमानाची खबर घेणारं लेखन स्वातंत्र्यदिनाच्या आसपासच्या दिवसांत छापत. आता या विषयाला मनोरंजनमूल्य नसल्याने तेही लोकांना ‘उगाच गंभीर करण्याच्या उठाठेवी’ करत नाहीत. स्पर्धेच्या युगातली माणसं धावपळ करून दमून जात असताना, त्यांना ‘वैचारिक खाद्य’ देणं म्हणजे अकारण व्यर्थ शिणवणं होय. त्यापेक्षा वाचून न वाचल्यासारख्या होतील, पाहून न पाहिल्यासारख्या होतील, अशा गोष्टीच त्यांना देणं हे त्यांच्या प्रकृतीसाठी हितकारक असणार, असं बहुतेक सर्वच प्रसारमाध्यमांना वाटतंय.

इतिहासाला त्यांचा नकार नाहीये, फक्त गौरवास्पद इतिहास तेवढा सांगावा हे सगळ्यांनाच सोयीचं वाटतंय. त्यासाठी काही लपवणं, काही गायब करणं, काही कायमचं नष्ट करणं आणि काही बदलणं हेही कालोचितच आहे. त्यावर ‘सत्याचा अपलाप’ वगैरे गळे काढायचं काही कारण नाही, असंही वाटतंय. यात नजीकचा इतिहास शोधणं, मांडणं तर फारच मुश्कील होऊन गेलंय. महापुरुष हे अभ्यासाचे नव्हे, तर केवळ पूजा करण्याचे विषय बनून राहिलेत.

नव्या सदरासाठी हे शीर्षक लिहिताना पुन्हा एकदा जाणवलं की, भाषा कितीही प्रिय असल्या, तरी एरवी माझी व्याकरणाशी गणिताइतकीच दुष्मनी आहे. व्याकरण म्हणजे भाषेचं गणितच असतं एका अर्थी. भाषा आधी जन्मते, व्याकरण मागाहून घडत जातं, वा जाणीवपूर्वक घडवलं जातं. याचा यत्किंचितही विचार न करता व्याकरणशुद्धतेच्या पवित्र चौकटीतच नव्या लोकांचं नवं लेखनही व्हावं, असा अट्टहास धरणारे कर्मठ लोक या शत्रुत्वाला जबाबदार आहेत. ते नवे शब्दही घडवू देत नाहीत. ‘हा शब्द व्याकरणदृष्ट्या चुकीचा आहे’ असं म्हणतात आणि भाषेची वाढ खुंटवून पुन्हा ‘भाषा मरतेय’ म्हणून रडायला मोकळे होतात. अर्थातच नवे लेखक, व्याख्याते त्यांना फाट्यावर मारून आपलं भाषिक स्वातंत्र्य उपभोगत राहतात, हे निराळं. मात्र यात काळ आणि उर्जा अकारण खर्च होते. सगळ्या अडचणींवर मात करून नवा शब्द भाषेत चुकतमाकत रुळतो आणि प्रस्थापित बनतो.

चालू वर्तमानकाळ हा ‘चा’चा उच्चार बदलून ‘चालू’देखील बनलेला दिसतोय. या चालू वर्तमानाकडे आणि त्याच्या चालूपणाकडे देखील त्याच्यासोबतच चालत बघण्याचा, त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न मी या सदरातून करणार आहे. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे, असे जेव्हा समजते. तेव्हा तो काळ ‘वर्तमानकाळ’ असतो. त्याच्या चार प्रकारांपैकी एक प्रकार म्हणजे अपूर्ण वा चालू वर्तमानकाळ… घडत असलेल्या, घडणं सुरू होऊन अजून संपलेलं नसलेल्या गोष्टी यात येतात. उदाहरणार्थ आत्ता मी हा लेख लिहितेय!

मी मुक्त लिहिण्याचं स्वातंत्र्य उपभोगते आहे; लिहिताना माझ्या मनावर कुठलंही दडपण नाहीये, जसं पंधरा-वीस वर्षांपूर्वी होतं. तेव्हा मी महाराष्ट्रातल्या आदिवासी भागात, आदिवासी महिलांच्या ‘सद्य:स्थिती’चा अभ्यास करण्यासाठी भटकत होते.

 

mahajan blog 1

 

राजकीय पटलावर महिलांसाठी 33 टक्के राखीव जागांचा विषय गाजत होता. गावोगावच्या बायका पंचायत सदस्य बनून पहिल्यांदाच चावडीवर पाऊल टाकत होत्या. त्यांना सरपंचाच्या खुर्चीत बसलेलं पाहून घरच्या-दारच्या पुरुषांची मन:स्थिती पार बिघडून गेली होती. त्यांच्या नावे ती सत्ता आपण उपभोगायचे प्रयत्न दडपशाहीने सुरू झाले होते. ज्या ऐकणार नाहीत, त्यांना खुर्चीतून खाली खेचण्यासाठी चारित्र्यहननापासून ते अविश्वासाच्या ठरावापर्यंतचे उपाय अवलंबले जात होते. अगदी साध्या, स्वाभाविक गोष्टींपासून ते कायदेशीर हक्कांच्या गोष्टींपर्यंत प्रत्येक जागी संघर्ष करावा लागत होता. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्ताने केलं जाणारं झेंडावंदन हा अनेकींसाठी असाच एक वादग्रस्त दिवस ठरला होता. वडगावात सरपंचबाईला झेंडावंदन करू दिलं नाही, पिंपळगावात ते वेळेआधी घाईने उरकून घेतलं, बोरगावात तिला घरातून बाहेर पडू दिलं नाही, उंबरगावात जी धाडसाने उंबरठा ओलांडून झेंडावंदनासाठी आली तिला अपमान करून हाकलून लावलं… अशा बातम्या सलग चार-पाच वर्षं वृत्तपत्रांमध्ये झळकत राहिल्या होत्या.

 

mahajan blog 2

सुरय्या तय्यबजी यांनी तिरंग्याचं डिझाईन केलं. दुसरं छायाचित्र हंसाबेन मेहता यांचं. 1947 साली 14 ऑगस्ट सरल्यावर मध्यरात्री कौन्सिल हाऊसमध्ये ( संसदभवन हे नाव नंतरचं ) पहिलं ध्वजवंदन झालं, त्यासाठी ‘फ्लॅग प्रेझेन्टेशन कमिटी’च्या वतीने हंसाबेन मेहता यांनी भारतीय स्त्रियांच्या वतीने पहिला ध्वज भेट दिला.

यानंतरच्या काळात निवडून आलेल्या बायकांना कायदे व जबाबदाऱ्यांची माहिती देणारी, अधिकारांची जाणीव करून देत खंबीरपणा वाढवत नेणारी, एकेका जिल्ह्यातल्या सर्व सरपंच स्त्रियांना एकत्र मेळवणारी शिबीरं धडाक्यात सुरू झाली. अनुभवांची देवाणघेवाण वाढली. राखीव नसलेल्या जागांवर देखील बायका निवडून येऊ लागल्या. कुठं अख्खी पंचायत फक्त बायकांचीच होती. रस्ते, पाणी, वीज, शौचालयं… अनेक कामं या बायकांनी जबाबदारीने पार पाडायला सुरुवात केली. मतांनी खुर्ची जिंकली होती, कामानं मनं जिंकायला सुरुवात झाली.

 

आत्ता तुम्ही हा लेख वाचताय आणि याच क्षणी अनेक गावांमधल्या सरपंच बायका कुठल्याही विरोधाशिवाय सन्मानाने तिरंगा फडकावताहेत, झेंडावंदन करताहेत, ताठ-सावध उभं राहून राष्ट्रगीत गाताहेत. त्यांच्यात आदिवासी, दलित, मुस्लीम स्त्रियाही आहेत. गावातले लहान-थोर त्यांच्या सुरात सूर मिसळताहेत. स्वातंत्र्य मागून मिळत नाही, ते मिळवावं लागतं; हे या 20 वर्षांच्या काळात त्यांनी अनुभवातून जाणलं आहे. चालू वर्तमानकाळ रितीवर्तमानकाळात रुपांतरीत करण्याची धम्मक या रंगबिरंगी बांगड्या भरलेल्या काळ्यासावळ्या मनगटांमध्ये आहे. पावसाच्या साचलेल्या पाण्यात स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब मोठं देखणं दिसतंय!

mahajan 3

News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Chalu Vartmankal Kavita Mahajan Blog on women empowerment
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published: