ब्लॉग : विरोधकांच्या संघर्षयात्रेने खान्देशातील शेतकऱ्यांना काय दिलं?

ब्लॉग : विरोधकांच्या संघर्षयात्रेने खान्देशातील शेतकऱ्यांना काय दिलं?

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी संयुक्त आयोजित केलेली संघर्षयात्रा खान्देशात येऊन गेली. या यात्रेने शेतकऱ्यांना काय दिले, यापेक्षा जनाधार हरवलेल्या आणि गलितगात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांना काय दिलं? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. संघर्षयात्रा आयोजनाच्या निमित्ताने जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीनही जिल्ह्यात दोन्ही काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी काही काळ एकत्र आले. दोन्ही पक्षांच्या राज्यस्तरावरील प्रमुख नेत्यांच्या भेटींमुळे नव्या-जुन्यांची उजळणी झाली. फार थोड्या संख्येत असलेल्या युवाफळीला उभारी मिळाली. प्रमुख नेत्यांनी फारसे न बोलता, "कुछ तो राज है" अशी कृती केल्यामुळे वेगळे संकेतही दिले गेले.

एक गोष्ट मात्र नक्की, ती म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्याच्या पाठोपाठ संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातही शेतकरी आत्महत्यांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या तीन-चार वर्षांत आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या शेकड्यांवर जात आहे. जानेवारी २०१६ ते मार्च २०१७ या पंधरा महिन्यांत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबारमधील ५६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यात जळगाव जिल्ह्यातील १९६, धुळे ९१ आणि नंदुरबार जिल्ह्यात ११ शेतकऱ्यांचा समावेश आहे. ही आकडेवारी अस्वस्थ करणारी आहे.

या शिवाय, धुळे-नंदुबार जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करणाऱ्या धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आणि जळगाव जिल्ह्यात पीककर्ज वाटप करणाऱ्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आज आर्थिक स्थिती नाजूकच आहे. आगामी कृषी हंगामासाठी बँकांच्या तिजोरीत पैसा नाही. त्यामुळे कर्जमाफी झाली तर सरकारकडून पैसा मिळू शकतो, या आशेवर दोन्ही बँका आहेत. हे वास्तव लक्षात घेता खान्देशात आगामी काळात शेतकऱ्यांची अवस्था अधिक बिकट होऊन आत्महत्यांची संख्या वाढू शकते. या वातावरणात संघर्षयात्रेमुळे राजकारण ढवळून निघायला हवे होते. तसे काही झाले नाही. संघर्षयात्रा ही शेतकऱ्यांपेक्षा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नेत्यांचे समर्थक यांच्याच भोवती घुटमळत राहिली.

विदर्भातून जेव्हा संघर्षयात्रा जळगाव जिल्ह्यात आली तेव्हा त्यात अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, दिलीप वळसे-पाटील, अबू आझमी, जोगेंद्र कवाडे आदी होते.

यातील पवार, विखे-पाटील यांनी मुक्ताईनगर येथे सव्यंग प्रसिद्धीचा फंडा वापरला. या नेत्यांनी माजी कृषीमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या फार्म हाऊसवर अल्पोपहार केला. नारायण राणे भाजपच्या वाटेवर अशी चर्चा असताना दोन्ही काँग्रेसचे नेते खडसेंच्या दारी सदिच्छा भेटीसाठी गेले. गंमत म्हणजे, भाजप नेतृत्वातील सरकारने मागील वर्षांपासून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे वारंवार नाकारले आहे. या नकाराचा पहिला निर्णय कृषीमंत्रीपदी खडसे असताना त्यांनीच जाहीर केला होता. एवढेच नव्हे तर काँग्रेस आघाडी काळात कृषी योजनांमध्ये झालेल्या गैरव्यवहारावरही खडसेंनीच हल्लाबोल केला होता. या पार्श्वभूमीवर संघर्षयात्रेतील नेते पवार, विखे-पाटील यांनी खडसेंकडे अल्पोपहार करुन शेतकऱ्यांना काय बरे संदेश दिला असावा ?

पवार यांच्या उपस्थितीमुळे जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उत्साही होते. शिवसनेचे उपनेते आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात ८० बैलगाड्यांमधून नेत्यांची यात्रा निघाली. रोडशोमध्ये कार्यकर्ते जास्त आणि शेतकरी कमी होते. पवार, पाटील, मुंडे आदींनी तेथे शेतकऱ्यांशी संवाद साधला.

मुक्ताईनगरला खडसेंची भेट घेणाऱ्या पवार यांनी नंदुरबार येथे शेतकऱी मेळाव्यात जाण्याचे टाळले. यात्रेतील इतर प्रमुख नेत्यांनीही नंदुरबारचा मेळावा टाळला. तेथील नियोजन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी रघुवंशींचा मेळावा ठरवून टाळला. या मागे एक कारण असेही आहे की, नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. तेथे रघुवंशी विरोधात सध्याचे भाजपचे नेते डॉ. विजय गावित यांच्यात जंगी सामना होण्याची शक्यता आहे. पवार जर रंघुवंशींच्या व्यासपीठावर गेले असते तर तेथे संदेश वेगळा गेला असता. डॉ. गावित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांचे आणि अजित पवार यांचे संबंध उत्तम होते. रघुवंशींना आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी संभाव्य पाठबळ मिळू नये म्हणूनच पवार आणि काँग्रेसी इतर नेत्यांनी नंदुरबार टाळले, अशी आता चर्चा आहे. काँग्रेस नेत्यांनी नंदुरबारचा मेळावा टाळावा म्हणून धुळ्यातील आणि नवापुरातील काही माजी नेत्यांनी शब्द टाकला होता अशीही चर्चा आहे.

जळगाव आणि धुळे जिल्ह्यात विखे-पाटील आणि पवार सोबत होते. नंदुरबार जिल्ह्यात शहादा येथे यात्रेचे स्वागत झाले तेव्ही ते तेथे होते. मात्र, तेथून पवार सरळ धुळ्याला निघून गेले. शहादा येथे संघर्षयात्रेच्या स्वागतप्रसंगी आमदार अॅड. के. सी. पाडवी, रोहिदास पाटील, अॅड. पद्माकर वळवी, शरद गावित हे उपस्थित होते. शरद गावित हे डॉ. विजय गावित यांचे बंधू आहेत.

नंदुरबार येथे मेळाव्यास पवार आणि माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण येणार असे आयोजक रघुवंशी सांगत होते. मात्र, पवार गेले नाहीत आणि चव्हाण फिरकले नाहीत. मेळाव्यात जयंत पाटील, कवाडे, आजमी, भाई जगताप, आव्हाड यांनीच हजेरी लावली. इतर नेत्यांच्या अनुपस्थितीचीच आजही चर्चा आहे.

धुळ्यात संघर्षयात्रेच्या कार्यक्रमात अशोक चव्हाण यांच्यासह आझमी, कवाडे, पाटील, सुनील केदार, आव्हाड, रोहिदास पाटील, कुणाल पाटील, शिवाजी दहिते, काशीराम पावरा, डॉ. डी. एस. अहिरे, बापू चौरे, राजवर्धन कदमबांडे, योगेश भोये, रामकृष्ण पाटील, श्यामकांत सनेर, संदीप बेडसे, युवराज करनकाळ, मधुकर गर्दे, ज्ञानेश्वर भामरे आदी सहभागी झाले.

दोन्ही काँग्रेसची संघर्षयात्रा येऊन गेल्यानंतर कर्जमुक्तीच्या मागणीसाठी विदर्भातील आमदार बच्चू कडू यांनी काढलेल्या अमरावती ते अहमदाबाद अशा सीएम ते पीएम आसूडयात्रेचा ही बोलबाला खान्देशात झाला. याचे कारण म्हणजे, आमदार कडू यांची आसूडयात्रा नवापूर (जि. नंदुरबार) जवळच्या चेकनाका येथे आली असता गुजरात पोलिसांनी आमदार कडू यांना अटक करुन गुजरामध्ये प्रवेश करायला बंदी केली. गांधीमार्गाने मोर्चा काढून गांधीच्या गुजरातमध्ये जाणाऱ्या आमदाराला गुजरात पोलिसांनी रोखल्याची चर्चा राष्ट्रीय माध्यमांमध्ये गाजली. अर्थात नंतर बंदी मोडून आमदार कडू यांनी गुजरातेत प्रवेश केलाच. संघर्षयात्रा आणि आसूडयात्रेने खान्देशातील शेतकऱ्यांना काय दिले ? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहेच.

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV