खान्देश खबरबात : पर्यटन विकासाला संधी

खान्देश खबरबात : पर्यटन विकासाला संधी

धुळे जिल्ह्यातील रहिवासी जयकुमार रावल यांच्याकडे राज्याच्या पर्यटन विकास मंत्रालयाचे नेतृत्व देण्यात आले आहे. रावल हे धडाडीचे नेते असून त्यांच्याकडून जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. खान्देशचा परिसर हा गिरणा, तापी या मोठ्या नद्यांनी व्यापलेला आहे. तीनही जिल्ह्याच्या सिमांना लागून सातपुडा व पर्वताच्या रांगा आहेत. त्यामुळे बरिचशी पर्यटनस्थळे ही सातपुड्याच्या कुशीत आणि तापी, गिरणा खोरे परिसरात आहेत. अशा प्रकारच्या वातावरणात इको टुरिझम ही नवी संकल्पना नियोजन पद्धतीने साकारू शकते.

 

 

रावल यांनाही पर्यटनस्थळांच्या विकासाचा व तेथील सुविधींचा अनुभव आहे. रावल कुटुंबियांनी नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटक सुविधा केंद्र यशस्वीपणे चालविले होते. आता ते केंद्र बंद पडले आहे. सरकारी धोरणे आणि पर्यटकांची कमी संख्या यामुळे तोरणमाळ येथील पर्यटक सुविधा केंद्र फारसे धावू शकले नाही. त्यातील आर्थिक अडचणींची कल्पनाही रावल यांना आहे. म्हणूनच खान्देशातील पर्यटनासंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी रावल काही तरी ठोस पावले उचलतील अशी अपेक्षा आहे.

 

Khandesh Khabarbat

 

नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ, अस्तंबा, सारंखेडा यात्रा, दक्षिण काशी म्हणून उल्लेख होणारे प्रकाशा या स्थळांचा पर्यटन केंद्र म्हणून विकास होवू शकतो. प्रकाशा येथे. केदारेश्वराच्या मुख्य मंदिरासोबत काशी विश्वेश्वराचे मंदिर आहे. जवळच प्रकाशा बंधारा आहे. तोरणमाळ हे राज्यात सर्वाधिक उंचीचे दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण. गुजरातच्या सीमेलगतच्या हिरवाईने नटलेल्या या परिसराचे निसर्गसौंदर्य विलोभनीय आहे. तेथे सीताखाई, खडकी पाईंट, मच्छिंद्र गुंफा, गोरखनाथ व नागार्जुन मंदिर आहे. येथील सूर्यास्त पाहण्यासारखा असतो. सारंगखेडा येथे दत्त जयंतीला यात्रा भरून तेथे घोडे विक्रीचा बाजार लागतो. नंदुरबार शहरात दंडपाणेश्वर मंदिर भाविकांच्या गर्दीचे ठिकाण ठरत आहे.

 

 

धुळे जिल्ह्यात राजकीय इच्छाशक्तीअभावी पर्यटन क्षेत्रे विकसित झालेली नाहीत. धुळे शहराजवळ असलेले डेडरगाव तलाव, नकाणे तलाव, सोनगीरीचा सुवर्णगिरी, थाळनेरच किल्ला, साक्री तालुक्यातील अलालदरी ही क्षेत्रे विकसित झाली तर पर्यटनाची मोठी संधी मिळू शकते व रोजगार वाढीसाठी हातभार लागू शकतो. लळिंगचा भाग पर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे मात्र पुढील कार्यवाही झालेली नाही.

 

 

धुळे जिल्ह्यातील शिरपूर हे शहर पर्यटन केंद्र म्हणून विकसित होते आहे. तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी केले कार्य, पद्धती, उपाय पाहण्यासाठी इतर ठिकाणाहून लोक येतात. त्याला शिरपूर पॅटर्न म्हणतात. अगदी तसाच शिरपूर पॅटर्न पुन्हा पर्यटनात निर्माण झाला आहे. शिरपूर शहर सौंदर्यीकरणाच्या योजना व दोन अद्ययावत मनोरंजन पार्क लोकांना आकर्षून घेत आहेत.

 

 

जळगाव येथे गेल्या काही वर्षांपासून खान्देश महात्सवाचे आयोजन  करण्यात येते. खान्देशी संस्कृती दर्शन, खाद्य संस्कृती विकास आणि पर्यटन सुविधांचा विस्तार करणे हे या खान्देश महोत्सवाचे उद्दिष्ट आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून हा महोत्सव औपचारिक स्वरुपातच साजरा केला जातो आहे.

 

 

जळगाव जिल्हाही पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पाल, मनुदेवी, पाटणादेवी ही निसर्गस्थळे आहेत. यावल परिसरात अभयारण्य विकसित होणार होते. उनपदेव येथे गरम पाण्याचे झरे आहेत.

 

 

अमळनेर येथे मंगळग्रह मंदिर, यावल येथे व्यास मंदिर, मुक्तानगर येथे मुक्ताई मंदिर ही भाविकांची आकर्षण स्थळे आहेत. पाटणादेवी येथे भास्कराचार्य यांचे निवास्थान असून तेथे गणित विद्यापिठ स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. हतनूरच्या बॅक वॉटरमध्ये मुक्ताई प्रकल्प विकास काम सुरू आहे. वरील सर्व स्थळांच्या विकासाचा आराखडा यापूर्वी खान्देश पर्यटन विकास योजना म्हणून तयार झालेला आहे. त्यासाठी सुमारे ५० कोटी रुपये मिळणार होते. ते अद्याप मिळालेलले नाहीत. जळगाव येथे खासगी तत्वावर आर्यन इको रिसोर्च हा २५ एकरातील प्रकल्प तयार झालेला आहे. त्याला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटन केंद्र म्हणून मान्यता दिली आहे.

 

 

वरील सर्व स्थिती लक्षात घेता मंत्री जयकुमार रावल हे खान्देश विकासाच्या प्रलंबित योजनांचा पाठपुरावा करून त्याला गती देवू शकतील. खान्देशातील सातपुड्यील पर्यटन स्थळे ही राज्यातील व बाहेरील पर्यटकांसाठी आकर्षण ठरू शकतात. त्यांना पूर्वी मंजूर निधी जरी मिळवून दिला तरी खान्देशात आशादायक वातावरण निर्माण होवू शकते. खान्देशच्या पर्यटनाचे महाद्वार म्हणून जळगाव विमानतळाचा विकास होवू शकतो. कारण, जळगाव येथून धुळेकडे जाण्यासाठी अशियन हायवे क्रमांक ३५ आहे. तसेच जळगाव ते नंदुरबार रेल्वे सुविधा उपलब्ध आहे.

 

 

पर्यटन मंत्री  जयकुमार रावल यांनी खान्देश पर्यटन विकासासंदर्भात एक बैठक लवकरात लवकर घेवून त्यात सर्व संबंधित घटकांचे एकत्रिकरण करून खान्देश पर्यटन विकासाला चालना द्यावी अशी अपेक्षा आहे.

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV