खान्देश खबरबात : पावसाची पाठ, शेतकरी चिंतेत

By: | Last Updated: 29 Aug 2016 12:29 PM
खान्देश खबरबात : पावसाची पाठ, शेतकरी चिंतेत

खान्देशातील तीनही जिल्ह्यात ऑगस्टच्या मध्यापर्यंत समाधानकारक पाऊस झाला आहे. हा पाऊस पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त होता. मात्र, खान्देशातील धरण, बंधारे प्रकल्प अद्यापही पुरेशा प्रमाणात भरलेले नाहीत. आता पावसाची दुहेरी प्रतिक्षा आहे. वाढीच्या स्थितीत असेल्या पिकांना पाऊस हवा तसेच भविष्यात पिण्यासाठी पाणी हवे म्हणून धरण प्रकल्पात परिसरात पाऊस हवा. सध्या सर्वात वाईट स्थिती नंदुरबार जिल्ह्यात असून शेतकरी आत्महत्येच्या घटना सुरु झाल्या आहेत.

 

Khandesh Khabarbat

 

जून महिन्यात पावसाने ताण दिली होती. मात्र, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खान्देशात पाऊस रेंगाळला. जवळपास सर्वच भागात पेरण्या आटोपल्या. नंतर पिकांच्या वाढीमुळे शेतकरी तूर्त समाधानी आहे. खरीपाची जवळपास सर्वच पीके शेतकऱ्यांच्या हाती आहेत. यावर्षी काही प्रमाणात डाळवर्गीय पिकांची पेरणी वाढलेली दिसत आहे. त्यातही कापसाकडून शेतकरी सोयाबिनसारख्या इतर पिकांकडे वळत असल्याचे चित्र समाधानकारक आहे.

 

जळगाव जिल्ह्यात खरीपाच्या पेरणीचे क्षेत्र ८ हजार ३३२.१६ हेक्टर असून त्यावर सर्व पेरण्या आटोपल्या आहेत. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यावर पाऊस मेहरबान आहे. त्यामुळे कडधाने व तृणधान्ये जरी उशीरा पेरली गेली तरी त्यांची वाढ व स्थिती हातातील पिके अशीच आहेत. हंगामाच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात सर्वच पिकांची वाढ समाधानकारक असून सध्या पिकांवर कोणत्याही रोगांचे थैमान नाही. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात सरासरी पाऊस ६० टक्के म्हणजे, सरासरी ६६४ मिलीमीटरच्या तुलनेत ५०० मिलीमीटर झाला आहे.

 

धुळे जिल्ह्यात यंदा चार लाख ५७ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. यात तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य व अन्य पिकांचे पेरणीचे क्षेत्र नियमित पेक्षा सरासरी आहे. काही तालुक्यात नेहमीपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. शिरपूर तालुक्यात १०४ टक्के पेरणीचा अंतिम अहवाल आहे. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने ताण दिल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.

 

नंदुरबार जिल्ह्यात पेरण्याची स्थिती ठिक आहे. जिल्ह्यात खरीपाचे पेरणी क्षेत्र ७७ हजार ५०० हेक्टर आहे. ९९ टक्के पेरण्या झाल्या आहेत. जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला. ढगफुटी झाल्यामुळे पाचोराबारी गावात कहर झाला. जवळपास सर्वच जिल्ह्यात जारदार पाऊस त्या दरम्यान झाला. तेव्हा पेरण्यांना प्रारंभ झालेला नव्हता. त्यानंतर मात्र पावसाने कमी अधिक प्रमाणात केवळ हजेरी लावली. पिकांच्या वाढीलायक अद्यापही झालेला नाही. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.

 

धुळे जिल्ह्यात पुरेशी कृपा नसल्याने जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांत अपेक्षित जलसाठा झालेला नाही. यात केवळ साक्री तालुक्‍यातील पश्‍चिम पट्ट्यातील पांझरा, मालनगाव, जामखेली व शिरपूर तालक्‍यातील करवंद प्रकल्प शंभर टक्के भरले. कनोली, सोनवद, वाडीशेवाडी प्रकल्प कोरडे असून अमरावती, सुलवाडे बॅरेज क्षेत्रात पुरेसा पाऊस झालेला नाही. बुराई प्रकल्पात ७४ टक्के, अनेर प्रकल्पात १८ टक्के, अक्कलपाडा प्रकल्पात सहा टक्के जलसाठा आहे.

 

जळगाव जिल्ह्यात हतनूर ५६, गिरणा ६५ व वाघूर धरण ५५ भरले आहे. उर्वरित १३ लघु प्रकल्पात अध्यापही १० टक्के सुद्धा जलसाठी झालेला नाही. सध्या पावसाची कायम हजेरी असून कधी जोरदार तर कधी हळूवार पाऊस होतो आहे. त्याचा परिणाम म्हणून भूजल पातळीत बऱ्यापैकी वाढ झाली आहे. गेल्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील भूजल पातळीत ३ मीटरपेक्षा जास्त घट नोंदली गेली होती. आता, सरासरी ८ ते १० मीटर जलपातळी उपलब्ध झाली आहे. पाऊस रेंगाळला तर जिल्ह्यातील विहीरीत पूर्ववत जलपातळी असण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात भूजल यंत्रणेच्या जवळपास १७८ निरीक्षण विहीरी असून त्यातील भूजल निरीक्षणाचे अंदाज सध्या नोंदले जात आहेत.

 

खान्देशातील पावसाची आजची स्थिती लक्षात घेतली तर जोरदार पावसाची अपेक्षा तीनही जिल्ह्यात आहे. धुळे व जळगाव जिल्ह्यात पिकांच्या वाढीसाठी पाऊस हवा. नंदुरबारमध्ये परिस्थिती अगदीच बिकट आहे. यापूर्वी या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या होत नव्हत्या, मात्र यावेळी चार घटनांची नोंद झालेली आहे. जळगाव पाठोपाठ नंदुरबार जिल्ह्याही शेतकरी आत्महत्येच्या यादीत समाविष्ट झाला आहे.

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV