खान्देश खबरबात : जळगावच्या राजकारणात अस्वस्थ खामोशी!

खान्देश खबरबात : जळगावच्या राजकारणात अस्वस्थ खामोशी!

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात सध्या खामोशीची स्थिती आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सध्या थंडावल्या आहेत. सर्वच नेते मंडळी पुढे काय? याचा अंदाज घेत वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. सध्या एक गोष्ट नक्की की, ही शांतता वादळापूर्वीची नसून अनेक काळ केलेल्या संघर्षानंतर थोडे विसावण्याची आहे. म्हणूनच याला अस्वस्थ खामोशीची अवस्था म्हणता येईल.

घरकुल घोटाळा प्रकरणात संशयित आरोपी म्हणून जवळपास साडेचार वर्षे कारागृहात काढल्यानंतर सुरेश जैन यांना जामीन मिळाला. जैन यांची जळगाव वापसी त्यांच्या समर्थकांनी व हितचिंतकांनी जोरदारपणे केली. जैन लगेच राजकीय पटावर एन्ट्री घेतील की काय अशी स्थिती होती. बंगल्यावर भेटीस आलेल्या हितचिंतकांना भेटून जैन यांनीही थोडे रिलॅक्स होण्याचा प्रयत्न केला. एक गोष्ट मान्य करावी लागेल ती म्हणजे, साडेचार वर्षे जैन हे लोकांपासून लांब होते तरीही यांच्यावर प्रेम करणारी मंडळी जराही कमी झालेली नाहीत. अर्थात, हे जैनांच्या राजकीय प्रवासातील चांगुलपणाचे संचित आहे.

तीन-चार दिवस जैन यांनी लोकांच्या भेटी गाठी घेतल्या. त्यानंतर ते कुलदेवतेच्या दर्शनासाठी राजस्थानात रवाना झाले. आता जैन यांच्या गोटात शांतता आहे. जैन यांच्या काही उताविळ समर्थकांनी जैनांच्या वापसीनंतर राजकारणात गरमा गरमी निर्माण करायचा प्रयत्न केला. परंतु जैन कुटुंबियांनी संबंधितांना थोडे लांब ठेवल्यानंतर आता वातावरण निवळले आहे.
Khandesh Khabarbat

जैन यांच्या वापसीनंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या गोटात काय होणार? ही उत्सुकता होती. खडसेंचा वाढदिवस आणि जैनांची वापसी असे मुहूर्त एकाचवेळी आल्याने दोघांच्या समर्थकांनी आपापल्या नेत्यांना सिंह, वाघ अशा उपमाही दिल्या. वाढदिवसाच्या दिवशी आपल्या मनातील भावना कार्यकर्त्यांसमोर व्यक्त करताना खडसेंनी मंत्रिपद सोडल्याचे शल्य शब्दांतून मांडले. त्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका केली. सध्या खडसे आणि त्यांच्या कडून लाभ घेतलेली काही मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टार्गेट करीत आहेत. मात्र अशा प्रकारातून भाजप अंतर्गत खडसेंचेच नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण, खडसेंची काही वक्तव्ये ही थेट राष्ट्रीय नेतृत्वावर आणि काही वक्तव्ये राज्यातील नेतृत्वावर आरोप करणारी असल्याचे आढळून आली आहेत. या प्रकारामुळे खडसेंची मंत्रीपदावरील वापसी सध्यातरी अनिश्चित दिसत आहे.

भोसरी एमआयडीसीतील भूखंड जमीन खरेदी प्रकरणातील खडसेंच्या समोर असलेली अडचण मुंबई हायकोर्टाच्या एका आदेशामुळे अधोरेखित झाली आहे. या प्रकरणात खडसेंच्या मंत्रीपदाचा वापर झाल्याचा अगदी प्राथमिक निष्कर्ष  न्यायाधिशांनी व्यक्त करून पुढील चौकशीचे आदेश दिले आहेत. याच आरोपाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने नेमलेल्या एक सदस्य माजी न्या. झोटींग समितीचे काम अजून सुरु झालेले नाही. मात्र त्यांच्या कामकाजाला तीन महिन्यांची मुदत वाढ दिली आहे. या दोन्ही बाबी खडसेंच्या तंबूत सध्या शांतता आहे.

जैनांच्या वापसीनंतर राजकारणातील एकमेव सनसनाटी राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी निर्माण केली. खडसेंचा मतदार संघ मुक्ताईनगर आहे. तेथील शिवसेना नेते चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम जोष जल्लोषात झाला. तेथे गुलाबराव पाटील यांनी केलेले भाषण खडसेंना टार्गेट करणारे होते. हा प्रकार थोडा खाजवून खरुज करण्याचाच होता. भाजपमधील एकाही पदाधिकारींने यावर उत्तर दिले नाही, हे अचंबित करणारे आहे. मात्र गुलाबराव पाटील यांनी केलेला टीकेचा प्रकार शिवसेना कार्यकर्ते वगळता इतरांना आवडलेला नाही. याचे कारण म्हणजे खडसे, जैन, मंत्री गिरीश महाजन व मंत्री यांच्या भोवती फिरणारे वाद वाविदाचे विषय केवळ त्यांच्या खासगी हेवेदावे व प्रतिष्ठेचे आहे. यातून जळगाव शहर व जिल्हा विकासाचे काहीही उद्दिष्ट्य साध्य होणार नाही, हेही तेवढेच कटू सत्य आहे.

जैन यांच्या वापसी नंतर मंत्री महाजन व राज्यमंत्री पाटील यांनी त्यांचूया घरी जावून सदिच्छा भेट घेतली. या भेटीमुळे भाजपतील खडसेंच्या कट्टर समर्थकांनी महाजन, पाटील यांना शकुनी, कौरव अशी खोचक उपमा दिली. खडसेंना कृष्ण ठरविण्याचा प्रयत्न केला. राजकीय नेत्यांना रामायण किंवा महाभारतातील संदर्भ व त्यातील व्यक्तिरेखांची वैशिष्ट्ये माहित नसतात. त्यामुळे आपण बाळबोधपणे दिलेली उपमा नेत्याला अडचणीत आणते हेही त्यांना कळत नाही. एखाद्याला कृष्ण म्हटले तर त्याच्या कृष्णलिला या शब्दाचा अर्थही उताविळ मंडळींनी समजून घ्यायला हवा. तसेच महाभारतात पूत्रप्रेमात आंधळा झालेला धृतराष्ट्रही आहे, हे कसे विसरता येईल ? जळगावच्या राजकारणात असेही व्यक्तिमत्व असू शकते.

मंत्री महाजन यांच्या सध्याच्या भूमिकेत गुळमिळीतपणा आहे. जळगाव जिल्ह्याच्या विकासाकरिता, जळगाव शहरासाठी महाजन मंत्री म्हणून काही वेगळे कराताहेत असे काही दिसत नाही. गणपतीची आरती, रथासमोर किंवा गणपती मिरवणुकीत लेझीम खेळणे असे काहीसे स्वतःचे व्यक्तिमत्व महाजन यांनी निर्माण केले आहे. हीच बाब त्यांच्या प्रशासकीय कामकाजातील कमकुवतपणाचे लक्षण समजले जात आहे. मंत्री म्हणून प्रभाव पडण्याच्याऐवजी महाजन प्लेबॉय (लेझीम खेळणारे या अर्थाने) असल्याचे चित्र आहे.

अशा प्रकारे जैन यांच्या घरवापसीनंतर चारही पातळ्यांवर सध्यातरी अस्वस्थ खामोशी आहे. यानंतर काही राजकीय  वादळ वगैरे येईल अशी शंका अजिबात नाही. कोणतेही राजकीय  स्टंट करणे प्रत्येकासाठी धोकादायक आहे. मराठा क्रांती मोर्चाचा हैंगओव्हर सध्या राज्य सरकारवर आहे. त्याच परिणाम कधीही काहीही होवू शकतो. म्हणूनच आता वेट ॲण्ड वॉच याच अवस्थेत सारे नेते आहेत.


‘खान्देश खबरबात’मधील पत्रकार दिलीप तिवारी यांचे याआधीचे ब्लॉग :


शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV