खान्देश खबरबात : पोषण आहार घोटाळ्याचे रॅकेट

By: दिलीप तिवारी, पत्रकार | Last Updated: Friday, 9 September 2016 12:02 PM
खान्देश खबरबात : पोषण आहार घोटाळ्याचे रॅकेट

ब्लॉग लेखक : पत्रकार दिलीप तिवारी

धुळे, नंदुरबार आणि जळगाव हे जिल्हे सार्वजनिक वितरण प्रणालीत रॉकेल, धान्य व शालेय पोषण आहार वाटपात गैरप्रकार करणारे जिल्हे म्हणून सरकारी दप्तरात नोंदले गेले आहेत. धुळे जिल्ह्यातील रॉकेल गैरव्यवहाराची पाळेमुळे थेट मंत्रालयात पोहचली होती. रॉकेल पिणारा जिल्हा अशी धुळे जिल्ह्याची आजही ओळख आहे. आदिवासी बहुल लोकसंख्येच्या नंदुरबार जिल्ह्यातून रेशनवरील धान्य, तेल महाराष्ट्रातील खुल्या बाजारात विक्री होत असल्याचे आढळून आले होते. जळगाव जिल्ह्यात शालेय पोषण आहारातील तांदुळ खुल्या बाजारात विक्री करणारी टोळी आढळून आली आहे.

 

Khandesh Khabarbat

पोषण आहारातील हा गैरप्रकार पारोळा येथे उघडकीस आला. यात पुरवठादार व मुख्याध्यापक यांची मिलीभगत असलेले रॅकेट काम करीत असल्याचे सध्या तरी दिसत आहे. राजकारणातील दिग्गजांचा सपोर्ट असल्याशिवाय असा गैरप्रकार होवू शकत नाही. परंतु, पोलिसांचा तपास महिनाभरात फारसा पुढे सरकलेला नाही.

 

दि. १० ऑगस्टला मध्यरात्री वावडदा ते म्हसावद दरम्यान म्हसावद येथील पोलीस सुशील मगरे यांनी संशयावरुन एक ट्रक थांबवला. त्यात शालेय पोषण आहाराचा ७० क्विंटल तांदुळ असल्याचे आढळले. हा तांदुळ पाथरी येथून भरला होता. पोलिसांनी प्रथमतः चालक स्वराज तुकाराम महाजन (रा.पारोळा) व त्याचा सोबती वाल्मीक भानुदास पाटील यांना ताब्यात घेतले. सोशल मीडियातून या घटनेचा बोभाटा सुरू झाल्यानंतर जळगाव एमआयडीसी पोलिसांनी पाथरी येथून भरत उर्फ बापू शिवाजी पाटील (वय ४८), खंडू रामा पाटील (वय ४८) व सागर उर्फ मुकेश भीमराव पाटील (वय ३०) यांना अटक केली. तांदुळ गैरप्रकारात पडद्यामागचा मुख्य सूत्रधार म्हणून पारोळा येथील किरण पुंजू वाणी याचे नाव समोर आले. त्याला पोलिसांनी लगेच हात लावला नाही. कारण त्याचे राजकिय लागेबांधेही चर्चेत आहेत.

 

किरण वाणी याला काही मध्यस्थ शालेय पोषण आहारातील तांदुळ उपलब्ध करुन देत होते आणि तो त्याची विक्री खुल्या बाजारात करीत होता, अशी साखळी चौकशीत समोर आली. वाणीला तांदुळ देणारे मुख्याध्यापक किंवा गावपातळीवरील शाळा व्यवस्थापन समितीतील काही पुढारी यात गुंतले असावेत असा संशय बळावला आहे. वाणीकडे यावल, जामनेर, पाचोरा व जळगाव तालुक्यातील शाळांचे मुख्यध्यापक नियमितपणे तांदुळ विक्री करीत असल्याची चर्चा सुरू झाली. हा प्रकार लक्षात घेवून पोलिसांनी एक पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तित्व कुमार पाण्डे यांना दिले. पाण्डेय यांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमून संबंधित पुरवठादार कंपनी व शाळांकडून माहिती तांदुळ वाटपाची माहिती मागविली.

 

त्यानंतर हाती आलेल्या माहितीनुसार जामनरे तालुक्यातील ८ व यावल तालुक्यातील १ मुख्याध्यापक तांदुळ पुरवठ्याची परिपूर्ण माहिती देवू शकले नाहीत. त्यांना निलंबित करण्याचे आदेश पाण्डेय यांनी दिले. समाधानकारक उत्तर न देणाऱ्या ६७ मुख्याध्यापकांनाही नोटीसा बजावण्यात आल्या. याचवेळी काही मुख्याध्यापकांनी तक्रार केली आहे की, अनुपस्थित विद्यार्थ्यांचा तांदुळ काही शाळांमध्ये पडून खराब होत आहे. त्याचे काय करावे याची स्पष्ट सूचना नाही.

 

तांदुळ गैरप्रकारामुळे सर्वच शाळांमधील तांदुळ वाटपाचे काय होते ? हा प्रश्न उभा ठाकला आहे.

 

जिल्हाभरात ३६१८ शाळा आहे. यात पहिली ते पाचवी पर्यंत १७४४ तर ६ वी ते ८ वीपर्यंत १८७४ शाळा आहेत. पहिली ते पाचवीचे ३ लाख ४१ हजार ९८९ तर ६ वी ते ८ वी दरम्यान २ लाख ११ हजार १४५ विद्यार्थी आहेत. अशा एकूण साडे पाच लाखांवरील विद्यार्थ्यांना पोषण आहारांतर्गत तांदुळ पुरवठा होतो की नाही ? अशी शंका आता घेतली जात आहे.

 

तांदुळ पुरवठ्याचा मूळ ठेका दि महाराष्ट्र स्टेट कन्झ्युमर्स फेडरेशन लि. मुंबई यांचा असून त्यांच्यामार्फत पाळधी (ता. एरंडोल) येथील साई मार्केटींग अ‍ॅण्ड ट्रेनिंग कंपनी जळगाव जिल्ह्यातील शाळांना तांदुळ वाटप करते. या कंपनीचे संबंधित कर्मचारी व काही मुख्याध्यापक यांचे तांदुळ गैरव्यवहार करणारे रॅकेट असावे असा निष्कर्ष सध्या तरी समोर दिसत आहे.

 

साई मार्केटींगचा इतिहास स्वच्छ नाही. सन २०१४ मध्ये साई मार्केटींगच्या गोदामावर महसूल अधिकाऱ्यांनी छापे टाकले असता तेथे कालबाह्य तांदुळ साठा पकडला गेला होता. तेव्हा कंपनीला काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी असे प्रस्तावित होते. त्यावेळी काही सरकारी अधिकारी व राजकारणी मंडळींनी कारवाई होवू दिली नव्हती. आमदार संदीप बाजोरीया यांनी या विषयावर तेव्हा विधी मंडळात आवाज उठवला होता.

 

शालेय पोषण आहार गैरव्यवहार व मुदतबाह्य तांदुळ साठा प्रकरण पुन्हा चर्चेत आल्यानंतर यात माजी मंत्री एकनाथराव खडसे व आमदार सुरेश भोळे यांनी लक्ष घातले आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधितांवर फौजदारी खटले दाखल करावेत अशी मागणी दोघांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. चौकशी करण्याचे आश्वासन तावडे यांनी दिले आहे.

 

धुळे- नंदुरबार जिल्हेही बदनामच

 

धुळे व नंदुरबार जिल्ह्यांमधील शाळांमध्ये यापूर्वी निकृष्ट व दर्जाहिन पोषण आहार वाटप होत असल्याचे आढळून आले होते. तेव्हा त्या रॅकेटमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे हितसंबंधी गुंतले होते. हा विषय आमदार अनिल गोटे यांनी सातत्याने लावून धरला होता. त्यांनी थेट केंद्र सरकारकडे तक्रारी केल्या होत्या. गरोदर माता आणि बालकांसाठी असलेल्या टेक होम रेशन या योजनेत घोटाळ्याबाबतही आमदार गोटेंची तक्रार होती.

 

खान्देश खबरबातमधील दिलीप तिवारी यांचे याआधीचे ब्लॉग :

वैद्यकीय सेवा महागणार, IMA चा इशारा

पावसाची पाठ, शेतकरी चिंतेत

खान्देश खबरबात : पर्यटन विकासाला संधी

First Published: Friday, 9 September 2016 11:55 AM