घुमक्कडी (31) : जीवट डोकऱ्या माशाची गोष्ट!

घुमक्कडी (31) : जीवट डोकऱ्या माशाची गोष्ट!

“सगळ्यांत जीवट, चिवट कोण?” याविषयी चर्चा सुरू होती. समोर नदी. नदीकाठी हिरवा झाडोरा. इकडे अजून रस्ते नव्हते, रस्ते नाहीत म्हणून विजेचे खांब टाकायला आणि पाण्याचे पाईप टाकायला साहेबलोकांच्या गाड्या कशा येणार, म्हणून अजून घरादारात वीज आणि पाणीही नव्हतं. विहीर नव्हती. शाळा, दवाखाना नव्हते. घरात गॅस सिलेंडर तर सोडाच, रॉकेल भरलेला ‘स्टो’देखील नव्हता. अशा स्थितीत माणसं आणि जनावरं यांच्या जगण्यात, जगण्याच्या संघर्षात फरक काय? – हा मुख्य मुद्दा होता.

Kavita Mahajan 31

कामावरून थकून आलं की जेवूनखाऊन झोपायचं किंवा कुणी पाव्हणं आलं असेल तर गप्पागोष्टी रंगवत एखाद्याच्या अंगणात बसायचं. एका म्हाताऱ्या आजीनं उत्तर दिलं, “सगळ्यांत जीवट डोकऱ्या मासा! त्याची एक गोष्ट आहे...”

डोकऱ्या किंवा डोक / डोख किंवा डाकू या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या माशाचं प्रमाण नाव आहे मरळ. आकाराने भलामोठा... म्हणजे वीस सेंटीमीटर लांबीइतकाही सापडू शकतो. नद्यांमध्ये, तळ्यांमध्ये सापडतो. याचं चपटं डोकं सापासारखं दिसतं, त्यामुळे जरा भयानकदेखील भासतो. त्याचे फुलमरळ, पट्टमरळ उर्फ धडक्या आणि बोटरीमरळ असे अजून तीन भाउबंद आहेत. ते लांबीत डोकऱ्याला हरवतात.

Kavita Mahajan 31 2

तर गोष्ट अशी होती...

एकदा डोकऱ्याला पाण्याचा थोडा कंटाळा आला. तो जमिनीवर थोडी ओल मिळाली, तरी तग धरू शके; म्हणून मुलाबाळांना म्हणाला, “मी जरा जमिनीवर काय चाललंय ते पाहून येतो. पाण्यातले बारकेसारके मासे खाऊन खाऊन कंटाळा आलाय. आजकाल इथं चिंबोऱ्याही चांगल्या मिळत नाहीयेत. वर गेलो तर बेडकं मिळतील; थोडा चवबदल होईल.”

हे ऐकून डोकऱ्याची लेकरं रडू लागली... “आम्हांला अजून नीट पोहताही येत नाही. तुम्हाला वर माणसांनी पकडलं आणि खाऊन टाकलं तर इकडे पाण्यात आमचं कसं होणार? तुम्ही जाऊ नका.” डोकऱ्याचा निर्णय पक्का होता. तो म्हणाला, “घाबरू नका. मला ज्ञानी माणसांनी पकडून खाल्लं तर मी इकडे परत येईन. आणि परत आलोच नाही, तर मला अज्ञानी माणसांनी पकडून खाल्लंयअसं समजा. मी वायदा करतो की मी नक्की परत येईन.”

“ज्ञानी माणसं आणि अज्ञानी माणसं यांच्यात काय फरक असतो?” मुलांनी विचारलं.

“ज्ञानी माणसं अन्न तर मिळवतातच, खेरीज अन्न मिळवण्याचे मार्गही जतन करतात. अज्ञानी माणसं मात्र एकदा अन्न मिळवून मार्ग नष्ट करून टाकतात.”

हे ऐकून मुलांनी डोकऱ्याला पाण्यावर जाऊ दिलं.

००

Kavita Mahajan 31 3

मला गोष्टीचा अर्थ लागला नाही. योग्य माहिती जवळ नसेल, संदर्भ नीट माहिती नसतील तर अत्यंत साधी वाटणारी गोष्टही अनेकदा कळत नाही. मग सगळ्यांनी हसत-हसत माहिती पुरवली...

“डोकऱ्या पकडला की लगेच मरत नाही. जमिनीवर ओल असेल तर सरपटत चालू शकतो. त्याला पकडल्यावर लगेच त्याच्या डोक्याला शेण लिंपायचं. मग त्याला जाळावर भाजायचं. त्याचा काटा, कल्ले आणि शेपूट जसेच्या तसे राहू देऊन नुसतं भाजलेलं मांस खायला काढून घ्यायचं. मग त्याला पुन्हा पाण्याजवळ नेऊन डोक्यावरचं शेण धुवून काढून टाकायचं आणि त्याला पाण्यात सोडून द्यायचं. डोकऱ्या जगतो. त्याच्या काट्यावर पुन्हा मांस धरतं. कल्ले आणि शेपूट शाबूत असल्याने तो पहिल्यासारखाच व्यवस्थित पोहू शकतो.”

माझा यावर आधी विश्वास बसला नाही. परतल्यावर माहिती शोधून काढली, तर डोकऱ्या हवेतील ऑक्सिजनचाही थोडाफार उपयोग करू शकत असल्यामुळे कमी पाण्यात, घाणेरड्या पाण्यात देखील व्यवस्थित जगतो आणि त्यामुळे मत्स्यपालनाच्या उद्योगासाठी तो एक आदर्श मासा मानला जातो असं समजलं. तो पाण्यातल्या वनस्पती खात नाही, पक्का मांसाहारी आहे आणि त्याला पाळणारे लोक चक्क सुकट भिजवून त्याला खाऊ घालतात आणि मस्त पोसतात अशीही माहिती मिळाली. फक्त तो मांसाहारी असल्याने त्याला ठेवलेल्या तळ्यात बाकी माशांची पैदास मात्र करता येत नाही. माशाला कोंबडी खाऊ घालतात हे ऐकून तर मजाच वाटली.

हे मासे अंडी घालतात. त्यासाठी पाण्यातली गवतं, काड्याकुड्या, पाण्यात पडलेली पानं जमवून घरटं बनवतात. अंड्यांना पाण्यातला ऑक्सिजन मिळावा म्हणून कल्ले वापरून त्यांवर पाणी लोटत राहतात. एक मादी एका आयुष्यात तब्बल चार ते आठ हजार अंडी घालते. नरमादी दोघंही अंड्यापिल्लांचं रक्षण करतात. त्यांना पोहायला शिकवताना आधी जमिनीजवळची उथळ जागाच निवडतात आणि डोक्यावरच्या बाजूला पिल्लं ठेवून त्यांच्या खालून पोहत पोहत त्यांना मार्गदर्शन करतात. एकदा शिकलीसवरली की मग मात्र चक्क हुसकावून लावतात. पोरं सुरक्षेची उब सोडून ‘वेगळं राहायला’ तयार झाली नाही, तर त्यांना पुढच्या आयुष्यात बाहेरच्या जगात ज्या संघर्षाला सामोरं जावं लागणार असतं तो संघर्ष इथं प्रथम आईबापांसोबतच करावा लागतो. तो मजबूत हल्ला परतवून लावत ते जगले तर टिकतात, अन्यथा मरतात.

एकेका जीवाच्या वास्तवकथा देखील अशा रोमांचक आणि माणसांना चकित करणाऱ्या असतात.

डोकऱ्या उर्फ मरळ चवीला चांगला. युट्यूबवर त्याच्या शिकारीचे लहान व्हिडीओदेखील पाहायला मिळतात. गळाने पकडणे ही पारंपरिक पद्धत आहेच, पण मोठा आकार असेल तर तो गळ तोडून पळू शकतो; त्यामुळे तो श्वास घ्यायला थोडा वर आलेला दिसला की लोक बंदुकीने गोळ्या घालतात. सापासारख्या डोक्याचे मोठाले अवजड मासे मारून हातात उचलून घेऊन हे शिकारी हौसेने त्यांचे फोटोही काढून फेसबुकवर वगैरे टाकतात. हे सारं पाहायला काहीसं अवघड वाटलं, तरी मासे खायला आवडतातच. स्वत:ला जीवट, चिवट बनवायचं तर इतपत निर्ढावल्याखेरीज इलाज नसतो.

संबंधित बातम्या:


घुमक्कडी (30) : पलाश... धगधगती अग्निफुले...


घुमक्कडी (29) : एको आणि नार्सिसस


घुमक्कडी (28) : तू-ती आणि रेशमी प्रेमाचा लोचा


घुमक्कडी (27)  भई जब लाखो उदला वायरो


घुमक्कडी (26): महुआ बीने दोहर होये जाय


घुमक्कडी (25): साकाचं बेट


घुमक्कडी (24) : कार निकोबार आणि नारळ


घुमक्कडी (23) लावण्याची देवता आणि प्रलय


घुमक्कडी (22) : त्यांना दुसरे हृदय दे, वा मला वेगळी भाषा!


घुमक्कडी (२१) : सतगुरु सिंवरो मोवण्या, जिण ओ संसार उपायो


घुमक्कडी (20): सात जिभांचा अग्नी आणि पुलोमाचे अश्रू


घुमक्कडी : (19) : जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे!


घुमक्कडी : (18) : जिवंत होणारी चित्रं


घुमक्कडी : (17) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ


घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे


घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे


घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!


घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे


घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!


 घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!


घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर…  


घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी


घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये


घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण


घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना


घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!


घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी


घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना


घुमक्कडी : (2) सीतेची तहान


घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV