घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई

घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई

समुद्री हिरव्या रंगाच्या रेषांचे आखीव शुभ्र ताव, पावसात भिजलेल्या कावळ्याच्या पंखासारखी काळी कुळकुळीत शाई आणि नाजूक सोनेरी पत्तीची जीभ असलेलं लाल मातीच्या रंगाचं पेन... असं साहित्य जमलं की लिहावं वाटतंच. गुलाबी पायांचे पांढरे पक्षी स्थलांतर करून यावेत आणि इथं अन्न मिळेल हे ओळखून अलगद किनाऱ्यावर उतरावेत, तशा लाखो कल्पना मनात अलगद प्रवेश करतात. किती गोष्टी आहेत, ज्या मी कागदांना सांगायच्या बाकी आहेत, हे पुन्हा एकदा जाणवतं. कादंबरी, कविता, कधीमधी लहानग्या कथा... असं सारं लिहून देखील खूप शिल्लक असतं. शिल्पकार मातीच्या गोळ्याला आकार देत शिल्प बनवतात वा दगडाचे छिलके काढत त्यातून आत लपलेलं शिल्प बाहेर काढतात. माझी लिहिण्याची पद्धत अशी दुसऱ्या तऱ्हेच्या शिल्पाची आहे. काय लिहायचं हे स्पष्ट असतं आणि मग त्याच्या आजूबाजूचं अनावश्यक काळजीपूर्वक, बारकाईने बाजूला काढून ठेवत कलाकृती घडवत न्यायची असते. या बाजूला काढलेल्या गोष्टी टाकाऊ असतात असं नव्हे, उलट अनेकदा मोठ्या रसाळ आणि रोचक असतात. या गोष्टींना छोटेखानी लेखात जागा देता येते.

 

आज अशाच अजून एका लेखमालेचा प्रवास 'घुमक्कडी' या सदरातून सुरू करतेय. अनुभवलेल्या, ऐकलेल्या, वाचलेल्या, सुचलेल्या, स्वप्नात दिसलेल्या गोष्टींचा हा प्रवास आज सुरू करताना मला खूप उत्साह वाटतोय.       

 

घुमक्कडी आणि गोष्ट या दोन्ही माझ्या अत्यंत जिव्हाळ्याच्या बाबी आहेत. न आखलेले, परतीचं तिकीट न काढता केलेले प्रवास मला फार आवडतात. प्रवासात अगणित गोष्टी गोळा होतात. माझ्याशी जंगल बोलतं, पक्षी-प्राणी बोलतात; समुद्र-नद्या-तळी आणि मासे-कासवं-मगरी बोलतात; चांदण्यांनी माखलेलं वा ढगांचे काळे ढोल वाजवणारं आभाळ बोलतं. माणसं तर बोलत असतातच. आपले आणि इतरांचे कैक अनुभव गाठीशी जमा होतात. या सारे कसे छान-छान आणि सुखा-समाधानाचेच असते असे अजिबात नाही. अडथळे, अडचणी, संकटं, प्रश्न... आणि या सगळ्यांच्या परीक्षेत आपण कसे कसाला लागलो आणि किती खरे उतरून, तावून सुलाखून सोन्यासारखे झळझळू लागलो, हे पाहणं देखील खूप काही सांगणारं, शिकवणारं ठरतं. या प्रवासातल्या गोष्टी आणि हे गोष्टींचे प्रवास मी या 'घुमक्कडी'मधून उलगडत नेणार आहे. हा प्रवास म्हणजे सुरुवातीस तरी पूर्वीच्या प्रवासांकडे मागे वळून पाहणं असणार आहे.

 

सध्या कशावरूनही कुठल्याही गोष्टी आठवतात… या 'मागे वळून पाहण्या'वरून संगाई हरणाची आठवण झाली.

 

Ghumakkadi 2-compressed

मणिपूरमध्ये लोकतक नावाचं विस्तीर्ण सरोवर आहे, त्याच्या परिसरात हे देखणं हरीण आढळतं. याला 'प्रतीक्षारत' वा वाट पाहणारं हरीण असंही म्हणतात, कारण धावताना ते एकदातरी थबकून मागे वळून पाहतं. नाचणारं हरीण असंही म्हणतात, कारण नाचरी पावलं टाकत धावतं ते. माणसांची चाहूल लागली की बुजून लांब झेपा टाकत गायब होतं. १९५२ साली ही प्रजाती भारतातून नाहीशी झाली असं जाहीर करावं लागलं. मात्र पुढे अनेक वर्षानंतर ती पुन्हा दिसू लागली. मग त्यांचे जतन, संवर्धन करण्यासाठी विशेष उपक्रम आखले गेले. लोकतक तरंगतं सरोवर म्हणून ओळखलं जातं. लोक म्हणजे वाहतं पाणी आणि तक वा टक म्हणजे शेवटचं टोक. त्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथले फुमडीचे गोल घेरे. फुमडी हे एक पाणगवत असतं, त्याची तरंगती बेटं तयार होतात. या तरंगत्या पाणगवतावर लोक घरं बांधून राहतात. फुमडीचे गोल घेरे तयार करून त्यात मासेमारी करतात. त्यावर त्यांची उपजीविका चालते. किबुल लामिआयो नॅशनल पार्क हे या सरोवराचाच भाग असलेलं तरंगतं अभयारण्य! उन्हाळ्यात सरोवरातल्या पाण्याची पातळी कमी होते, तेव्हा फुमडी तळमातीतून पोषक द्रव्यं घेते. मातीच्या संपर्कातून फुमडीवर विविध गवतं आणि झुडुपं उगवतात, जी संगाई हरणांचं प्रिय खाद्य ठरतात. पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढली की ती पुन्हा तरंगू लागते. जंगलतोड, वाजवीपेक्षा जास्त आणि स्पर्धात्मक मासेमारी, अवैध शिकार, शेतीसाठी जमीन तयार करणं, औद्योगीकरण, कचरा, प्रदूषण यामुळे सरोवराचं क्षेत्र घटू लागलं. दलदल वाढू लागली. फुमडीचं तळाशी असलेलं नातं तुटू लागलं आणि हरणांचं खाद्य हरपलं. तळाचा गाळ काढणं आणि अनावश्यक वाढलेली फुमडी छाटणं मग सरकारी काम बनलं. एरवी उन्हाळ्यात स्थानिक मासेमार फुमडी छाटायचे आणि तिचा उपयोग घरं शाकारण्यासह अजून काही कामांसाठी करायचे. मध्यंतरी ही घरं अतिक्रमण ठरवून जाळून टाकावीत असं एका सरकारी अधिकाऱ्यानं सुचवलं. आपल्या देशात सुमारांची आणि बिनडोकांची अजिबात कमतरता नाही. ते अभ्यास न करता वा तज्ज्ञांचा सल्ला न घेता चुकीचे निर्णय घेतात आणि जुन्या चांगल्या व्यवस्था मोडून नवे प्रश्न निर्माण करतात! महाराष्ट्रात देखील मोहाची झाडं तोडून सागाची लागवड करावी, असा अविचारी आदेश निघाला होताच की.निसर्गाची राखण करणाऱ्या स्थानिक लोकांना जंगलातून, सरोवरातून हाकलायचं आणि धुडगूस घालणाऱ्या पर्यटकांना मात्र प्रवेश द्यायचा, अशी ही विचित्र धोरणं.

 

Ghumakkadi 3

इथली एक सुंदर लोककथा मला मिळाली.

 

फुमडीवर झोपडी बांधून इबेथोई नावाची एक लहान मुलगी आईच्या मृत्यूनंतर एकटीच राहत असते. तिच्या आईने नाखामाईनांगबी नावाच्या एका मासोळीराणीचे प्राण वाचवलेले असतात. नाखामाईनांगबी तिला सांगते, "तुला एकटीला कधी भीती वाटली ना, तर मला हाक मार... आणि कोळी मासेमारी करण्यासाठी आले, तर मात्र तू माझा जीव वाचव! पण तुला जर कधी खूप भूक लागली आणि काही खायला मिळालं नाही, तर तू आम्हाला खाऊ शकतेस."

 

एकेदिवशी मासेमारीसाठी आलेले बाहेरचे लोक इबेथोईचं सांगणं ऐकत नाहीत. इबेथोई ईश्वराची - थांगाजिंगची प्रार्थना करते. वादळ येतं, मुसळधार पाऊस कोसळू लागतो. मासेमारीसाठी आलेल्या लोकांच्या होड्या डळमळू लागतात, ते घाबरतात. नाखामाईनांगबी सगळ्या माशांसह इबेथोईच्या घराखाली जाऊन लपते आणि सगळ्यांचा जीव वाचतो.

 

लोकतकमध्ये मासेमारी करायची नाही, असं तेव्हापासून लोक ठरवतात!

 

ही गोष्ट स्थानिक लोक देखील न जाणे कधी विसरून गेले. मग बाहेरचे लोकही वाताहतीत सामील झाले.

 

आपली अशी 'विस्मरणं' दर पिढीगणिक वाढत जाताहेत. 'जुनं ते सोनं' म्हणणारे लोक आणि 'जुने जाऊद्या मरणालागुनी' म्हणणारे लोक यांच्या कचाट्यात स्मरणात काय ठेवायचं आणि काय विसरू द्यायचं याचा भेद आम्हाला करता येईनासा झाला आहे. अनावश्यक माहिती मेंदूत भरून त्याला बधिर करून ठेवलं जातंय. त्या भंगारातून वाट काढत, गोष्टींचे थांबे घेत, घुमक्कडी सुरू करते आहे.

चला सोबत...!!

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV