घुमक्कडी (39) : दाट काळं धुकं आणि फान्गु

By: | Last Updated: > Wednesday, 3 May 2017 10:12 AM
घुमक्कडी (39) : दाट काळं धुकं आणि फान्गु

विश्वउत्पत्तीच्या कथांमधली चिनी कथा देखील खूप रोचक आहे. प्रत्येक नवी कथा वाचली, ऐकली ही बाकीच्या कथांहून जास्त चांगली आहे असं वाटू लागतं. सगळ्या एकत्र पाहिल्या की, आदिम मानवी मनाच्या कल्पनाशक्तीने थक्क आणि नम्रदेखील व्हायला होतं.

तर तेव्हा सगळीकडे फक्त धुकंच धुकं होतं. सगळीकडे म्हणजे एका प्रचंड मोठ्या अंडाकृती पोकळीत! तिच्यात जमीन नव्हती, आकाश नव्हतं, पाणी नव्हतं. होतं केवळ गडदगर्द, दाट काळं धुकं. तिथं दाही दिशांचं अस्तित्व नव्हतं. ना वर काही, ना खाली काही. ना कुठे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. ना कुठे आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. अंतर नावाची गोष्टच नव्हती. या ब्रह्मांडात तब्बल अठरा हजार वर्षं एक जीव फळत होता. त्याचं नाव फान्गु वा फान्कू. गर्भनिद्रेतून फान्गु जागा झाला, डोळे किलकिले करून त्यानं पाहिलं, तेव्हा आपलं सर्वांग या काळ्या, घट्ट धुकाळ काळोखाने माखलेलं आहे, हे त्याला जाणवलं. त्यानं उठून हालचालकरण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. सर्वत्र काळं धुकं एखाद्या कठीण धातूसारखं जड होऊन गोठून बसलेलं होतं. त्यात घुसमटून त्याचं शरीर प्रचंड तापू लागलं. मन क्रोधीत बनलं. आपलीच उष्णता त्याला इतकी असह्य झाली की, श्वासदेखील घेता येईना. आपल्यासोबतच एक हत्यारदेखील जन्माला आलं आहे, असं त्यांना दिसलं. परशु वा कुऱ्हाडीसारखा त्या अजस्त्र दिव्य हत्याराचा आकार होता. हाताजवळच असलेलं ते हत्यार फान्गुने पकडलं आणि सगळी ताकद एकवटून त्या काळोखात वार केला. काळं धुकं चिरून त्या हत्याराने ते अतिविशाल अंडं फोडलं. प्रचंड गडगडाट करत अंड्याचं कवच दुभंगलं. त्यातलं काळं धुकं वितळून त्यातला पातळ, हलका द्रव वर उसळला. त्या द्रवाचं आकाशात रुपांतर झालं. जड द्रव खालीच राहिला, त्याची जमीन बनली.

Ghumakkadi 39 1

आकाश, जमीन आणि मधलं अंतराळ आपण निर्माण करू शकलो या जाणीवेने फान्गु आनंदी झाला. पण पुढच्याच क्षणाला त्याला जाणवलं की आकाश आणि जमिनीला एकमेकांची जबरदस्त ओढ असणार आहे, ते पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न करतील आणि जर का ते एकमेकांशी पुन्हा जोडले गेले, तर विश्वाचं अस्तित्व कायमचं नष्ट होईल. फान्गु उठून उभा राहिला. त्यानं आपले पाय जमिनीत घट्ट रोवले आणि मग मस्तक आकाशाला भिडवलं. तरीही अंतराळ अद्याप कमीच होतं. मग फान्गुने स्वत:ची वाढ करण्यास सुरुवात केली. दररोज दिवसातून नऊ वेळा तो एक जांग – म्हणजे सुमारे साडे तीन मीटर वाढायचा. त्यामुळे आकाशही तितकं वर सरकायचं आणि जमीनही तितकी खाली धसायची. हे पुन्हा अठरा हजार वर्षं सुरू राहिलं. नव्वद हजार मैलांहून लांब देहाचा फान्गु पहिला मानव होता. जमीन आणि आकाशाच्या दरम्यान नांदणारा विशाल मानव. अठरा हजार वर्षांनंतर फान्गु वाढायचा थांबला. आता जमीन आणि आकाश पुरेसे दूर जाऊन स्थिरावले होते. आता त्यांना कधीच एकत्र येता येणार नव्हतं. मात्र त्यांना असं दूर राखण्याच्या अथक प्रयत्नाने फान्गुचा शक्तिपात झाला. गलितगात्र होऊन तो जमिनीवर कोसळला आणि मृत्यू पावला.

Ghumakkadi 39 2

त्याचा तेजस्वी देह हळूहळू विघटित झाला. त्याच्या शेवटच्या श्वासाचा ढग बनला होता आणि त्याचा अंतिम चित्कार विजेच्या कडकडाटात रुपांतरीत झाला होता. त्यातून जमिनीवर पहिला पाऊस कोसळला. संतप्त डोळा सूर्याचा लाल गोलक बनून आकाशात विहरू लागला. उजवा शांत डोळा चमकदार शुभ्र चंद्रात रुपांतरीत झाला. डोक्यावरचे आणि दाढीचे केस चंदेरी तारांमध्ये रुपांतरीत झाले, त्यांचेच तुकडे होऊन लाखो चांदण्या जन्माला आल्या. त्याच्या शकलीत मस्तकाचे चार खंड बनले. कवटी आणि दातांपासून सोनं, चांदी, लोखंड, तांबं असे धातू आणि विविध रत्नं उत्पन्न झाली. पायांचे पर्वत झाले. स्नायूंपासून सुपीक जमीन निर्माण झाली. घामाचं पाणी झालं. रक्ताचं नद्या आणि सरोवरांमध्ये रुपांतर झालं. नसांचे मार्ग बनले. त्वचेपासून मोठ्या झाडांची मुळं आणि खोडं बनली. त्वचेवरची लव झुडुपं, गवतं, रानफुलांमध्ये रुपांतरीत झाली.

विश्व आकाराला आलं!

Ghumakkadi 39 3

(tianzi mountain : by Karmen Ahmed Lofty )

ताओइझममध्ये या कथेतल्या विश्व निर्माण होण्यापूर्वीच्या स्थितीचा अत्यंत तात्विक उपयोग करून घेतलेला आहे. पुराकथा, मिथकं, तत्त्वज्ञान इत्यादी गोष्टी एकवटत एखादा समाज कसा घडत जातो, हे त्याविषयी वाचताना जाणवत राहतं. व्याख्येत न मावणारं, स्वत:त पूर्ण असणारं काहीतरी अस्तित्वात असणं ही कल्पनाच मर्त्य मानवाला किती धीर देणारी आहे.

या कथेच्या चीनमध्ये असंख्य आवृत्त्या अस्तित्वात आहेत. मौखिक गोष्टी लेखी स्वरुपात येऊ लागल्यावर तर कैक लेखकांनी आपल्या कल्पनाशक्तीला मुक्त वाव देत, देखणी शब्दकळा वापरून ही गोष्ट पुन:पुन्हा लिहिली आहे. आपल्याकडे रामायण – महाभारताच्या अनेक आवृत्त्या आहेत, तसंच. या गोष्टीत अजून माणसं मात्र दिसत नाहीयेत. म्हणजे फान्गु पहिला मानव असला तरी तो ‘आदी पिता’ नाहीये. त्यानं अख्खं विश्व घडवलं किंवा ते ‘त्याच्यातून’ / ‘त्याच्या देहापासून’ घडलं; पण त्या नरदेहातून मानव मात्र जन्मला नाही; माणसाला जन्माला घालण्याची क्षमता अखेर एका ‘स्त्री’मध्येच असते, असं या गोष्टीच्या रचनाकर्त्यांना वाटलं असण्याची दाट शक्यता आहे. मग या विश्वात माणसं आली कशी आणि कुठून? त्याचीही दुसरी गोष्ट आहेच. ती पुढच्या लेखात वाचू.

घुमक्कडी मधील आधीचे ब्लॉग :

घुमक्कडी (38) : धरतरी माझी मायु रं, तिच्यावं पाय कसा मी ठेवू रं

घुमक्कडी (37) : कार्तिकेयाचं मंदिर आणि चैत्रातली जत्रा

घुमक्कडी (36) : इसामई काला लगी सोना

घुमक्कडी (35) : सुपारी माझी आईबाई !

घुमक्कडी (34) : लोकल दारवा आणि चखणे!

घुमक्कडी (33) : रहिमन पानी राखिये, बिन पानी सब सून…

घुमक्कडी (32) : सर्वांत स्वच्छ गावं…

घुमक्कडी (31) : जीवट डोकऱ्या माशाची गोष्ट!

घुमक्कडी (30) : पलाश… धगधगती अग्निफुले…

घुमक्कडी (29) : एको आणि नार्सिसस

घुमक्कडी (28) : तू-ती आणि रेशमी प्रेमाचा लोचा

घुमक्कडी (27)  भई जब लाखो उदला वायरो

घुमक्कडी (26): महुआ बीने दोहर होये जाय

घुमक्कडी (25): साकाचं बेट

घुमक्कडी (24) : कार निकोबार आणि नारळ

घुमक्कडी (23) लावण्याची देवता आणि प्रलय

घुमक्कडी (22) : त्यांना दुसरे हृदय दे, वा मला वेगळी भाषा!

घुमक्कडी (21) : सतगुरु सिंवरो मोवण्या, जिण ओ संसार उपायो

घुमक्कडी (20): सात जिभांचा अग्नी आणि पुलोमाचे अश्रू

घुमक्कडी : (19) : जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे!

घुमक्कडी : (18) : जिवंत होणारी चित्रं

घुमक्कडी : (17) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ

घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे

घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे

घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!

घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे

घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!

घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!

घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर… 

घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी

घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये

घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण

घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना

घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!

घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी

घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना

घुमक्कडी : (2) सीतेची तहान

घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई

First Published: