घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे

By: | Last Updated: > Wednesday, 23 November 2016 8:44 PM
Ghumakkadi : Kavita Mahajan Blog 15

बगळ्यांच्या काही आठवणी आहेत, त्यातली सर्वांत लहानपणची आठवण म्हणजे गच्चीवर उभं राहून आभाळात उडणाऱ्या बगळ्यांच्या रांगा पाहणं आणि ‘बगळ्या बगळ्या कवडी दे, पाची बोटं रंगू दे’ हे गाणं किंचाळत म्हणणं आणि नखांवर शुभ्र कवड्या आल्या आहेत का हे पुढचे काही दिवस तपासत बसणं. दुसरी आठवण साधी आहे. वसईहून नाशिककडे जाताना एका लहान शेतवाटेतून गाडी काढली, एका बाजूला ओढा आणि दुसऱ्या बाजूला दूरवर पसरलेली पोटरीएवढी वाढलेली हिरवीगार भातशेतं. त्यातून अवचित दीडदोनशे बगळ्यांचा शुभ्र थवा उडाला. ते दृश्य डोळ्यांत अजूनही पुन:पुन्हा उमटतं.
तिसरी आठवण गोव्याची. एका तळ्याकाठच्या झाडांवर बगळ्यांची शेकडो घरटी आणि विश्वास बसू नये इतक्या संख्येने बगळे. त्यांचा रोमान्स! आपल्या मादीला आकर्षित करून घेण्यासाठी नर इतकी देखणी नृत्यं करतात आणि त्यांची ती शुभ्र पिसं काय सुंदर दिसतात म्हणून सांगू…! असाच एक नृत्यमग्न बगळा मी काळ्या कॅनव्हासवर चित्रितही केला नंतर. प्रेमात आपण नाचू लागलो की चंद्र जणू फ्लॅशलाईट टाकतो आणि पायाखालचा निर्जीव पाचोळाही आपल्यासोबत नाचू लागतो.
Kavita Mahajan Blog Ghumakkadi 15
चौथी आठवण तोरणमाळची आहे. हे बगळे निशाचर होते. रात्री शिकार करून खाणारे. आम्ही गच्चीवर, गारवा अनुभवत, चांदणं न्याहाळत झोपायचं म्हणून पहुडलो होतो. चांदण्या अजून धुकट होत्या. तेवढ्यात बगळ्यांची एक माळ उडत आली, विस्कटली आणि आखलेले बिंदू असावेत तशा त्यांनी काही जागा घेतल्या. मग अजून काही बगळे आले. सरळ – तिरक्या रेषांमध्ये ते शांतपणे एका जागेहून दुसऱ्या जागी जाऊ लागले. एकदम नव्हे, तर एखादे अदृश्य टायमर लावलेले असावे तसे क्रमाने. वेग अगदी कमीही नाही आणि फार जास्तही नाही असा. त्या क्षणार्धात नाहीशा होणाऱ्या पांढऱ्या रेषांमधून भौमितिक आकृत्या तयार झाल्याचा भास होत होता. जणू कुणी आकाशातून मध्यरात्री कोड वापरून एखादा गोपनीय संदेश देत आहे कुणालातरी. जवळपास अर्धा तास अधांतरात हे देखणे ‘रेखाटन’ सुरू होते आणि पापणी लवू न देता मी ते अद्भुत चकित होऊन निरखत होते.

 

हितचिती जमातीची एक लोककथा आहे. बगळा आणि सूर्यपक्षी यांच्यात शर्यत लागली. चार दिवसांत जो कुणी नदीकाठच्या मृत झाडापर्यंत पोहोचेल, नदीतले सारे मासे खाण्याचा हक्क फक्त त्याला मिळेल. बगळा सरळ उडत निघाला, पण सूर्यपक्षी फुलांजवळ थबकत, मध चाखून फिरून उडत होता. तेव्हा बगळा पुढे निघून जाई आणि बगळा विश्रांतीला थांबला की सूर्यपक्षी पुढे निघून जाई. तीन दिवस बगळा रात्रीही विश्रांती न घेता उडत होता, पण तिसऱ्या रात्री तो झोपला. सूर्यपक्षीही ते पाहून निवांत झोपला. पहाटे उठून तो मृत झाडापर्यंत गेला, तेव्हा बगळा तिथं आधीच येऊन पोहोचला आहे असं त्याच्या ध्यानात आलं. बगळा धोरणीपणाने त्याला म्हणाला,”आता केवळ मासेच नाही, तर नदीचे पाणीही माझ्याच मालकीचे आहे. तू ते पिऊ शकणार नाहीस.” तेव्हापासून सगळे सूर्यपक्षी केवळ फुलांमधला मध चाखतात, पाणी कधीच पीत नाहीत.
बगळयाचं प्रतीक आपल्याकडे जरा नकारात्मक आहे. आपण त्याला ढोंगी, राजकारणी मानतो. चीनमध्ये बगळा शक्ती, पावित्र्य, संयम आणि दीर्घायुष्य यांचं प्रतीक मानला जातो. इजिप्तमध्ये त्याला प्रकाशाची निर्मिती करणारा मानतात. दोन डोक्यांचा बगळा हे तिथं समृद्धीचं प्रतीक आहे. आफ्रिकेत त्याला देवाशी संवाद साधण्याचं माध्यम मानतात. अमेरिकन जमाती बगळ्याकडून शहाणपणा, कुतूहल, योग्य निर्णय घेण्याचं कौशल्य आणि निर्धार शिकावा असं मानतात.

 

बगळे मला अजून एकदा दिसले ते घोरनृत्य पाहताना. पालघर-ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात दिवाळी सुमारास हे नृत्य केलं जातं. गुजरातमध्ये याला घेर नृत्य म्हणतात. घोर हे वाद्याचं नाव आहे असं कुणी सांगतात, तर कुणी अजून एक मजेशीर कारण सांगतात. गुजरातमधून टिपरकर म्हणजे टिपऱ्या वाजवत नाचणारे भटके लोक या काळात महाराष्ट्रात येतात. नाचून मनोरंजन करण्याच्या  बदल्यात त्यांना नवं धान्य मिळतं. यांनी कमरेला चांगल्या संत्रे-मोसंबी इतक्या मोठ्या आकाराचे घुंगरु लावलेले पट्टे बांधलेले असतात.

 

Kavita Mahajan Blog Ghumakkadi 15 2

 

टिपरकर दिसत नाहीत, पण आधीच दूरवरून ते येताना घुंगराचा आवाज वाड्यावाड्यांवर पोहोचतो. त्या आवाजाने घाबरून लहान मुलं रडायला लागतात. त्यांना रडून रडून ताप येतो आणि आईबापांच्या  जीवाला घोर लागतो. म्हणूनही या टिपरकरांच्या  नावाला स्थानिक आदिवासी घोरनाच म्हणतात.

टिपरकरांच्या  गाण्यांखेरीज या नाचात आदिवासी आपलीही वेगळी गाणी रचून गातात आणि नाचण्यात सहभागी होतात. यावेळी टिपरकरांचा जो मुखिया असतो, त्याच्या एका हातात मोरपिसांचा गुच्छ असतो, त्याला घोरया असं म्हणतात. दुसऱ्या हातात एक दहा-बारा फुट उंचीचा जाड बांबू असतो, त्याच्या टोकावर पांढऱ्या धोतरांपासून बनवलेली एक सुंदर बगळ्यांची जोडी लावलेली असते. या जोडीला नाचवत तो फेरनृत्यात मध्यभागी उभा असतो. धनत्रयोदशीला मंडलीमातेची पूजा करून या नाचाचा प्रारंभ होतो आणि हे भटके मग गावोगाव नाच करत फिरू लागतात.

काठीला बगळ्यांचे जोडपे बांधून का नाचवले जात असेल याचा मी विचार करत होते. हे असे शुभ्र असतात ते गायबगळे. नांगरणी सुरू झाली की काळ्या मातीच्या रेषा आणि तिथं नाचानाच करणारे बगळे मुबलक दिसतात… मात्र आपल्या डोळ्यांना चटकन दिसत नाहीत ते नांगरणीमुळे घरं मोडून गेल्याने सैरावैरा उडणारे किडे. या किड्यांना खाऊन शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम बगळे करतात. मग त्यांना नाचवलं पाहिजेच. दुसरा प्रश्न आला की लहानपणीच्या त्या गाण्यात बगळ्याला कवडी का मागितली जाते? कवडी मिळाल्याने पाची बोटं कशी रंगतात? कवडी हे आपल्याकडे प्राचीन काळापासून योनीचं प्रतीक मानलं गेलं आहे. जमीन ही बाईच. तिची देखभाल करणारा, ती सुपीक करण्यात सहाय्य करणारा बगळा. ती जितकी फळली, जितकी जास्त धान्याने लहरली, की माणसांची पाची बोटं दुधातुपाने माखून रंगणारच! मग आठवलं की, कवड्या आमच्या घरात आणू दिल्या जात नसत. त्याने ‘दारिद्र्य येतं’ असं कारण सांगितलं जाई. ‘कवडीमोल’ म्हणजे क्षुल्लक हा शब्द माहीत असल्याने ते खरं देखील वाटे. पुढे देवदासी आणि जोगते यांच्या अंगाखांद्यावरच्या कवड्या पाहिल्यावर ‘सभ्य स्त्रियांनी’ योनी अशी मिरवायची नसते, हा ‘संस्कार’ ध्यानात आला. तरीही कवड्यांचं आकर्षण मनात आजही आहेच… आणि बगळ्याचंही. बगळ्याची अजून एक आठवण कवितेतली आहे. ती मनोहर ओक यांची एका ओळीची कविता आहे –

थोडासा शुभ्र गल्बला बगळा जाताना उडून.०००

Kavita Mahajan Blog Ghumakkadi 15 3

( चित्रं : कविता महाजन )

 

‘घुमक्कडी’ ब्लॉग मालिकेतील याआधीचे ब्लॉग :

घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!

घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे

घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!

 घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!

घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर…  

घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी

घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये

घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण

घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना

घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!

घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी

घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना

घुमक्कडी : (2) सीतेची तहान

घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई

News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Ghumakkadi : Kavita Mahajan Blog 15
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published: