घुमक्कडी (41) : समुद्राची निर्मिती आणि सूर्यचंद्राची वाटचाल

By: | Last Updated: > Wednesday, 17 May 2017 10:26 AM
ghumakkadi kavita mahajan blog 41

चीनमधली विश्वउत्पत्ती कथा आणि मानवनिर्मिती कथा अशा दोन कथा आपण या आधीच्या लेखांमध्ये वाचल्या. या लेखात त्यानंतरची तिसरी गोष्ट आहे नैसर्गिक संकटाची आणि त्यामुळे झालेल्या उलथापालथीची.

आकाश आणि पृथ्वी दुरावलेले होते आणि माणसं सर्वदूर विखुरली होती; त्यामुळे दीर्घकाळ लोक शांतपणे जगत होते, जगणं सुखकारक व्हावं म्हणून नवनवीन मार्ग शोधत होते. सारं काही छान सुरळीत चाललेलं होतं. अशा निवांत अवस्थेत एक प्रचंड महान अपघात घडला आणि आकाश व पृथ्वी पुन्हा जवळ येऊ लागले. त्या भयावह उत्पातात आकाशाला एक मोठी भेग पडली आणि पृथ्वीवर भूकंप होऊ लागले. ज्वालामुखींनी आपली तोंडं उघडली आणि निखऱ्यांच्या लालकेशरी अक्राळविक्राळ नद्या वेगाने धावत पर्वतांवरून खाली ओघळू लागल्या. त्यांच्या तावडीत सापडलेल्या प्रत्येक गोष्टीचं पापणी लवायच्या आत काळ्याकरड्या राखेत रुपांतर होत होतं. सर्वत्र धूर आणि गरम वाफा पसरल्या होत्या. हिरवीगार जंगलं त्या लाव्ह्याने गिळून टाकली. प्राण्यापक्ष्यांसह रानं, माळरानं, शेतं सारंकाही नष्ट केलं. लाव्ह्याची झळ इतकी तीव्र होती की लहानमोठे डोंगर भुईसपाट झाले. दरडी कोसळू लागल्या. त्यामुळे नद्या गोंधळून विस्कटल्या आणि उधाणून धावतांना त्यांना मोठे पूर आले. आगीतून वाचलं ते पाणी नष्ट करू लागलं. असंख्य जीव मृत्युमुखी पडले आणि गिधाड-घारी व भुतंप्रेतं त्यांच्यावर ताव मारायला अधाशासारखी तुटून पडली. या सगळ्यातून जी माणसं बचावली ती आक्रोश करत, त्यांना घडवणाऱ्या न्युवा या देवतेची प्रार्थना करू लागली.

blog 1

न्युवाच्या कानी ही प्रार्थना पडेपर्यंत पुष्कळ विध्वंस झालेला होता. तिनं प्रथम पूर थोपवले, ज्वालामुखी शांत केले, मग नरभक्षकांना मारून टाकलं आणि त्यानंतर फाटलेल्या आभाळाला शिवायचं ठरवलं. आभाळ शिवणं सोपं नव्हतंच. आधी भेग भरून काढायची होती. तिनं लाकडं, गवत जमवून आभाळापर्यंत पोचणारी रास तयार केली. आभाळासारखे निळे दगड मात्र तिला शोधूनही सापडले नाहीत. मग जे काही काळे, पांढरे, लाल, पिवळे दगड सापडतील ते जमवून या राशीवर ठेवले. जिवंत ज्वालामुखीतून आग घेऊन रास पेटवली. त्या आगीने अवघं अवकाश झगमगू लागलं. दगडांचे निखारे बनले आणि हळूहळू वितळू लागले. तो द्राव आभाळाच्या भेगेत भरला जाऊ लागला. रास जळून खाक झाली, तेव्हा आभाळाची भेग भरली गेली होती. न्युवाने ती सगळी जागा शक्य तितकी सुबक शिवण्याचा प्रयत्न केला, तरीही आभाळ पूर्ववत बनलं नाही; ते उत्तर आणि पश्चिम दिशांनी वाकलं. त्यामुळे एके जागी स्थिर असलेले सूर्यचंद्र आणि चांदण्या फिरू लागले. त्यांचं स्थैर्य नष्ट झालं.

आता पृथ्वीचं काय नुकसान झालं आहे, ते बघायचं होतं. न्युवाने पाहिलं की, दक्षिण-पूर्व दिशेला एक अत्यंत विस्तीर्ण आणि अत्यंत सखोल असा खड्डा पडलेला आहे. पुराने फुगलेल्या सगळ्या नद्या त्या दिशेने वळताहेत आणि ते सारं पाणी त्या खोल जागी जमा होतंय. काही काळातच तिथं समुद्र निर्माण झाला.

blog 2

पो हाई समुद्राच्या पूर्वेकडचा भाग अधिक सखोल होता, इतका सखोल की त्याचा तळ कुणी मोजू शकलं नसतं, तिथवर कधी कुणी पोहोचू शकलं नसतं. या भागाचं नाव होतं क्वी श्यु. क्वी श्युची पाण्याची पातळी ना कधी वाढायची, ना कधी कमी व्हायची. या पाण्यावर त्येयु, युंग छो, फांग हु, यंगचो आणि फंग लाई नावांचे पाच तरंगते पर्वत होते. प्रत्येक पर्वत दुसऱ्या पर्वतापासून शहात्तर मैल अंतरावर होता आणि प्रत्येकाची उंची तीस हजार मैल होती. पर्वतांवर रत्नं जडवलेल्या सुवर्णमहालांमध्ये देवदेवता राहत होते. या पर्वतांवरचे सारे पक्षी-प्राणी शुभ्र रंगाचे होते. इथल्या वृक्षांच्या मोत्यांसारख्या दिसणाऱ्या अमृतफळांमध्ये जीवांना दीर्घायुष्य प्रदान करण्याचा गुणधर्म होता. इथल्या शुभ्रवस्त्रधारी देवदेवतांना पक्ष्यांसारखे पंख होते आणि अपार आनंदाने पाचही पर्वतांवर उडत जाऊन ते एकमेकांना भेटून येत असत. फक्त पर्वत तरंगते असल्याने समुद्रात वादळ आलं की पर्वतांच्या जागा बदलून जात आणि देवदेवता त्रासून जात. जर एखाद्या मोठ्या वादळात हे पर्वत शहात्तर मैलांचं अंतर ओलांडून दूरवर वाहत गेले, तर देवांचं राज्यच संकटात आलं असतं. मग स्वर्गसम्राटाने समुद्रदेव यु छांगला विनंती करून पंधरा महाकाय कासवांना मदतीला पाठवण्यास सांगितलं. पाच कासवांच्या पाठीवर एकेक पर्वत ठेवला आणि सोबतीला प्रत्येकी दोन कासवं रक्षणासाठी ठेवली. दर साठ हजार वर्षांनी या कासवांची जागा बदलून ती दुसरी कासवं घेतील, असं ठरलं.

blog 3

पृथ्वी आणि आकाशाप्रमाणेच देवलोकातही शांतता नांदू लागली. मात्र एकेदिवशी लोम्पो नावाचा पर्वतकाय माणूस समुद्रात मासेमारी करण्यासाठी आला. त्याने आपलं मजबूत, विशाल जाळं समुद्रात फेकलं आणि पहिल्याच झटक्यात त्यात सहा कासवं सापडली. त्यांच्या विनवण्या न ऐकता अत्यंत बेपर्वाईने तो आपली शिकार घरी घेऊन गेला. त्यामुळे पाचांपैकी त्येयु आणि युंग छो हे दोन पर्वत निराधार बनले आणि वाऱ्याच्या प्रचंड वेगवान झोताने त्यांना पार उत्तर ध्रुवाकडे नेऊन ठेवलं. त्यांवरील देवदेवता उडत आपल्या पर्वतांच्या मागे निघाले, पण वाऱ्याच्या वेगापुढे त्यांचं काहीएक चाललं नाही. हे समजल्यावर स्वर्गसम्राटाने संतापून लोम्पो लोकांची शरीरं इतकी लहान करून टाकली की, पुन्हा कधी त्यांनी अशी विघातक कृत्यं करण्याची हिंमतच करु नये.

बाकी तिन्ही फांग हु, यंग चो आणि फंग लाई हे पर्वत आजही चीनच्या समुद्री पूर्वतटाला दिसतात; ते अजूनही कासवांच्या पाठीवर ठाम व स्थिर आहेत, अशी चिनी लोकांची कथा आहे. कासवाच्या पाठींवर केवळ पर्वतच नव्हे, तर अख्खी पृथ्वीच पेललेली असल्याच्या कथा अजूनही काही देशांमध्ये आहेत. त्या पुढच्या लेखात वाचू.

घुमक्कडी मधील आधीचे ब्लॉग :

घुमक्कडी (40) : न्युवाची भलीबुरी लेकरं

घुमक्कडी (39) : दाट काळं धुकं आणि फान्गु

घुमक्कडी (38) : धरतरी माझी मायु रं, तिच्यावं पाय कसा मी ठेवू रं

घुमक्कडी (37) : कार्तिकेयाचं मंदिर आणि चैत्रातली जत्रा

घुमक्कडी (36) : इसामई काला लगी सोना

घुमक्कडी (35) : सुपारी माझी आईबाई !

घुमक्कडी (34) : लोकल दारवा आणि चखणे!

घुमक्कडी (33) : रहिमन पानी राखिये, बिन पानी सब सून…

घुमक्कडी (32) : सर्वांत स्वच्छ गावं…

घुमक्कडी (31) : जीवट डोकऱ्या माशाची गोष्ट!

घुमक्कडी (30) : पलाश… धगधगती अग्निफुले…

घुमक्कडी (29) : एको आणि नार्सिसस

घुमक्कडी (28) : तू-ती आणि रेशमी प्रेमाचा लोचा

घुमक्कडी (27)  भई जब लाखो उदला वायरो

घुमक्कडी (26): महुआ बीने दोहर होये जाय

घुमक्कडी (25): साकाचं बेट

घुमक्कडी (24) : कार निकोबार आणि नारळ

घुमक्कडी (23) लावण्याची देवता आणि प्रलय

घुमक्कडी (22) : त्यांना दुसरे हृदय दे, वा मला वेगळी भाषा!

घुमक्कडी (21) : सतगुरु सिंवरो मोवण्या, जिण ओ संसार उपायो

घुमक्कडी (20): सात जिभांचा अग्नी आणि पुलोमाचे अश्रू

घुमक्कडी : (19) : जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे!

घुमक्कडी : (18) : जिवंत होणारी चित्रं

घुमक्कडी : (17) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ

घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे

घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे

घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!

घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे

घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!

घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!

घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर… 

घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी

घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये

घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण

घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना

घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!

घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी

घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना

घुमक्कडी : (2) सीतेची तहान

घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई

 

News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:ghumakkadi kavita mahajan blog 41
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published: