घुमक्कडी (40) : न्युवाची भलीबुरी लेकरं

By: | Last Updated: > Wednesday, 10 May 2017 11:29 AM
घुमक्कडी (40) : न्युवाची भलीबुरी लेकरं

फान्गुने विश्व निर्माण करण्याचं आपलं कर्तव्य पार पडलं. या विश्वात न्युवा ही देवता संचार करू लागली. तिचं कमरेवरचं शरीर मानवी होतं, मात्र कमरेखालचं शरीर चक्क ड्रॅगनचं होतं. ती आकाशात, जमिनीवर, पाण्यात सगळीकडे सहज वावरत असे. झाडं किती वाढलीत, पाऊस किती पडतोय, पर्वत खचत तर नाहीयेत ना, ऋतू बदलला की सगळं वातावरण कसं बदलून जातं… सगळं बारकाईने न्याहाळत असे. हळूहळू पाण्यात मासे निर्माण झाले आणि जमिनीवर किडेकीटक. त्यांचे आकार, रंग बघत तिचा वेळ छान जाऊ लागला. पक्ष्यांच्या किलबिलीची आणि प्राण्यांच्या ओरडण्याची भरही रानावनात पडली. अशी कैक वर्षं गेली.

GHUMAKKADI 1

हळूहळू न्युवाला कंटाळा येऊ लागला. पृथ्वीवर कशाची तरी उणीव आहे आणि काहीतरी अजून निराळं इथं असलं पाहिजे असं तिला वाटू लागलं. मासे, किडे, पक्षी, प्राणी आपलं आपण जगत-मरत होते; त्यांचा वंश वाढत होता, पण बुद्धिमत्तेत मात्र विशेष फरक पडत नव्हता. त्यामुळे फान्गुने निर्माण केलेली पृथ्वीदेखील नैसर्गिक घडामोडींनी झालेले बदल वगळता फारशी बदलली नव्हती. काही नवे पर्वत निर्माण झाले, काही नद्यांनी वळणं बदलली, तरी तिला सारी दृश्यं सारखीच वाटू लागली. इतक्या प्रचंड पृथ्वीवर उदास आणि एकाकी वाटू लागलं.

एके दिवशी तिच्या ध्यानात आलं की, हे सगळं सुंदर आहे, मनोरम आहे, प्रिय आहे, तरीही याहून काहीतरी खास असं आपल्याला हवं आहे! असे जीव, ज्यांच्याशी संवाद साधता येईल, ज्यांच्यासोबत कल्पना शेअर करता येतील, जे जीव स्वतंत्र कल्पनाशक्ती आणि बुद्धिमत्ता असलेले असतील आणि ते या पृथ्वीवर, इथल्या सजीव-निर्जीवावर, आपल्यावर आणि एकमेकांवर देखील अतोनात प्रेम करतील!

ही कल्पना सुचली तेव्हा न्युवा पीतनदीच्या किनाऱ्यावर भटकत होती. नदीच्या पाण्यात पडलेल्या आपल्या प्रतिबिंबाकडे तिचं लक्ष गेलं. आपलं देखणं रूप पाहून तिला प्रसन्न आणि उत्साही वाटलं. एकाएकी दुसरी कल्पना तिच्या मनात चमकली की, आपल्याच सारखे दिसणारे जीव आपण बनवले तर? पण अगदी आपल्यासारखेही नकोत, अन्यथा देव आणि माणसांत फरक तो काय राहणार?

ghumakkadi 2

नदीच्या तळातून तिनं मऊ माती काढली आणि मानवाकृती बनवण्यास सुरुवात केली. मानवांचा वंश त्यांनी स्वत:च वाढवायला हवा, म्हणून तिनं नर-मादी वेगळे निर्माण केले. यांगछी म्हणजे नर आणि येनछी म्हणजे मादी, अशी त्यांची नावं ठेवली.

या माणसांना कमरेखाली ड्रॅगनसारखी शेपटी नव्हती, तर जमिनीवर चालता येतील असे दोन सुंदर पाय होते. काही तासांत तिनं अशी शेकडो शिल्पं घडवली. मग त्यांच्यात प्राण फुंकले. माणसं हालचाल करू लागली, नाचू – गाऊ लागली, हातांनी विविध कामं करू लागली… आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी स्वत:ला विकसित करण्यास सुरुवात केली. ही चतुर माणसं न्युवाच्या अवतीभोवती फेर धरत, तिची स्तुती करत, तिच्यावर प्रेम करत… त्यामुळे चहूकडे प्रेम आणि उल्हासाचं वातावरण निर्माण होई आणि आपल्या निर्मितीचा न्युवाला अभिमान वाटे.

हळूहळू माणसांची संख्या वाढू लागली आणि पृथ्वीच्या एकाच भागात, म्हणजे पीतनदीच्या किनाऱ्यावर त्यांची इतकी दाट वस्ती झाली की, आता इथं अजून माणसं जन्मली तर भांडणं होतील, असं न्युवाच्या ध्यानात आलं. पण आता ती थकली होती, तिच्या हातांमध्ये फारसं त्राण उरलं नव्हतं. खेरीज पृथ्वीवर सगळीकडे चालत जाऊन माणसं बनवत राहायची तर शतकं लागली असती आणि मग तेही काम कंटाळवाणं बनून गेलं असतं. मग तिला अजून एक कल्पना सुचली. तिनं गवतापासून एक जाडजूड दोरखंड बनवला आणि तो नदीचा तळ ढवळून काढत उचलून आकाशात अत्यंत वेगाने सर्वत्र गोल फिरवला. गवताला चिकटलेल्या मातीचे गोळे पृथ्वीवर सर्वदूर जाऊन पडले आणि त्यातून सगळीकडेच माणसं निर्माण झाली.

ghumakkadi 3

यातही माणसांनी वाद निर्माण केलेच आणि भेदभाव करत सांगितलं की, न्युवाने स्वत:च्या हातानं घडवलेली, पीतनदीच्या काठची माणसं अधिक बुद्धिमान व श्रेष्ठ आहेत आणि तिनं दोरखंड उडवून त्या मातीतून जन्मलेले जीव हे बिचारे दुय्यम, निर्बुद्ध व सामान्य आहेत!

भेदभाव करण्यासाठी माणसांना कारणांची कमतरता नसतेच! विश्वउत्पत्तीच्या व मानवनिर्मितीच्या मिथककथा देखील ते यासाठी बिनधास्त वापरतात.

याच कथेच्या एका आवृत्तीत असं सांगितलं जातं की, फान्गुच्या त्वचेतील सूक्ष्म जंतूंपासूनच किडे, मासे, पक्षी, प्राणी आणि माणसं बनली. पुरुषसत्तेचं वर्चस्व सुरू झाल्यानंतर ही आवृत्ती आली असावी. आपल्याकडे देखील अयोनिज माणसं कथा-कहाण्यांमधून दिसतातच. बाईपासून जन्मही नकोच, तेवढं तरी श्रेय तिला का द्यायचं? किंवा मग सगळे ज्या मार्गाने जन्मतात तशीच तुच्छ रीतीने न जन्मलेली व्यक्ती अधिक महान, असंही काही सिद्ध करायचं असेल काही हट्टीहेकट पुरुषांना. पण अशा कहाण्या काही सरसकट लोकांच्या पचनी पडल्या नाही आणि त्यांना कुणी विशेष भावही दिला नाही. आईचं महात्म्य अडथळ्यांचे सगळे पर्वत ओलांडून शाबूत राहिलंच.

 

घुमक्कडी मधील आधीचे ब्लॉग :

घुमक्कडी (39) : दाट काळं धुकं आणि फान्गु

घुमक्कडी (38) : धरतरी माझी मायु रं, तिच्यावं पाय कसा मी ठेवू रं

घुमक्कडी (37) : कार्तिकेयाचं मंदिर आणि चैत्रातली जत्रा

घुमक्कडी (36) : इसामई काला लगी सोना

घुमक्कडी (35) : सुपारी माझी आईबाई !

घुमक्कडी (34) : लोकल दारवा आणि चखणे!

घुमक्कडी (33) : रहिमन पानी राखिये, बिन पानी सब सून…

घुमक्कडी (32) : सर्वांत स्वच्छ गावं…

घुमक्कडी (31) : जीवट डोकऱ्या माशाची गोष्ट!

घुमक्कडी (30) : पलाश… धगधगती अग्निफुले…

घुमक्कडी (29) : एको आणि नार्सिसस

घुमक्कडी (28) : तू-ती आणि रेशमी प्रेमाचा लोचा

घुमक्कडी (27)  भई जब लाखो उदला वायरो

घुमक्कडी (26): महुआ बीने दोहर होये जाय

घुमक्कडी (25): साकाचं बेट

घुमक्कडी (24) : कार निकोबार आणि नारळ

घुमक्कडी (23) लावण्याची देवता आणि प्रलय

घुमक्कडी (22) : त्यांना दुसरे हृदय दे, वा मला वेगळी भाषा!

घुमक्कडी (21) : सतगुरु सिंवरो मोवण्या, जिण ओ संसार उपायो

घुमक्कडी (20): सात जिभांचा अग्नी आणि पुलोमाचे अश्रू

घुमक्कडी : (19) : जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे!

घुमक्कडी : (18) : जिवंत होणारी चित्रं

घुमक्कडी : (17) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ

घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे

घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे

घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!

घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे

घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!

घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!

घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर… 

घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी

घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये

घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण

घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना

घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!

घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी

घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना

घुमक्कडी : (2) सीतेची तहान

घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई

First Published: