घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना

घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना

करमून घेणार्‍याला कुठेही करमते.. न रमणार्‍याचा जीव कुठेच रमत नाही! दुनियेत असंख्य गोष्टी आहेत आणि त्यात रोचक असलेल्या गोष्टीदेखील इतक्या आहेत की, लोकांना कंटाळा कसा काय येऊ शकतो, असा प्रश्न मला पडतो. कंटाळा येण्याचं एक मुख्य कारण म्हणजे तोचतोचपणा!

 

वर्षानुवर्ष माणसं एक नोकरी करतात, एकाच घरात आणि त्याच नातलगांसोबत राहतात, एकाच गावात अनेक पिढ्या वास्तव्य करतात, प्रवास त्यांना आवडत नाही. कारण त्यात 'घरच्यासारख्या' सोयीसुविधा मिळत नाहीत, बदल त्यांना अनावश्यक वाटतात. आयुष्यात एकदाच प्रेम होतं आणि तेही एकाच व्यक्तीवर होतं, अशा आचरट कल्पनांमध्ये रमणं त्यांना नैतिक वाटतं आणि त्याच व्यक्तीशी लग्न करून संसार थाटला की नैतिकतेचा परमोच्च बिंदू गाठल्यागत वाटतं.

 

मनोरंजनाच्या त्यांच्या कल्पनाच मग थिट्या होऊन जातात. टीव्ही मालिकांपाशीच ज्यांच्या मनोरंजनाच्या कल्पना संपतात, त्यांना ऑपेरा आणि नौटंकी एकसमानच!

 

blog 1 ( ‘पाखंडी बाबा’ या नौटंकी शैलीतील नाटकातले एक दृश्य )

नौटंकी या शब्दाविषयी एक सुंदर पंजाबी लोककथा आहे. नौटंकी हे मुळात कुणा नाट्य प्रकाराचं नाव नव्हतं, तर ते चक्क एका राजकन्येचं नाव होतं.
एकदा काय झालं, पंजाबमधल्या सियालकोट भागातल्या राजा राजोसिंहचा धाकटा मुलगा फूलसिंह शिकारीला गेला. राजवाड्यात परत आला, तेव्हा त्याला खूप तहान लागली होती. समोरच त्याला त्याची वहिनी दिसली. वहिनीला त्यानं पाणी मागितलं. तर त्याला पाणी न देता टोमणा मारत वहिनी म्हणाली, "जा, जाऊन मुलतानची राजकन्या नौटंकीसोबत लग्न कर. आणि मग माग आपल्या बायकोला पाणी!"
जिद्दी फूलसिंह मुलतानला गेला. राजकन्या नौटंकीपर्यंत पोहोचायचं कसं, या विचारात असताना त्याला राजवाड्यात बागकाम करणारी माळीण भेटली. तिला विश्वासात घेऊन त्यानं तिच्या मार्फत राजकन्या नौटंकीला एक सुंदर फुलांचा हार भेट म्हणून पाठवला. राजकन्या नौटंकीला तो हार खूपच आवडला. तेव्हा माळीण म्हणाली, "हा हार माझ्या भाचेसुनेनं बनवला आहे."

 

blog 2

 

राजकन्या नौटंकीनं तिला भेटायला बोलावलं. माळिणीनं फूलसिंहला तसा निरोप दिला. मग फूलसिंहनं एक युक्ती केली. चेहर्‍याची रंगरंगोटी करून, स्त्रीवेश परिधान केला आणि स्त्रियांप्रमाणे दागिनेही घातले. राजकन्या नौटंकीला माळिणीची ही भाचेसून खूपच आवडली. तिनं आग्रह करून तिला आपल्यासोबत ठेवून घेतलं. दिवसभर खाणंपिणं, गप्पाटप्पा झाल्या, तरी तिनं त्याचं नाटक ओळखलं नाही. रात्री झोपायची वेळ झाली, तेव्हा मात्र फूलसिंहचं बिंग फुटलं. त्याने राजकन्या नौटंकीला सगळी हकिकत सांगितली आणि लग्नाची मागणी घातली.
नौटंकी आणि फूलसिंहचं लग्न झालं. पण तेव्हापासून असं पुरुषांनी स्त्रीचं वेषांतर करून केलेल्या मनोरंजक प्रेमकथा असलेल्या नाटकांना नौटंकी म्हटलं जाऊ लागलं. आता प्रश्न पडला की एखाद्या मुलीचं, जी कुणी ऐरीगैरी नव्हे तर एक राजकन्या आहे, नाव नौटंकी का ठेवलं गेलं असेल? अर्थ काय होतो या शब्दाचा? अजून थोडं खोदकाम केल्यावर उत्तर सापडलं, ते फारच रोचक होतं. टंक हे एक वजनाचं परिमाण आहे, जे पूर्वीच्या काळी चांदी मोजण्यासाठी वापरलं जाई. चार मासे चांदी म्हणजे एक टंक, असा तो हिशेब होता. ज्या नाजूक तरुणीचं वजन नऊ टंक इतकं आहे, ती नौटंकी!

 

नौटंकी हा 'स्वांग' या गंभीर नाट्यप्रकाराचीच काहीशी हलकीफुलकी आवृत्ती आहे. सोंग, सोंगाड्या हे शब्द आपल्याकडेही आहेतच; पण त्यांचा अर्थ हिंदीतल्या स्वांगप्रमाणे गांभीर्यदर्शक नाही. बाराव्या शतकाच्या सुमारास नौटंकी हा नृत्यगायनाने समृद्ध असलेला नाट्यप्रकार उत्तर भारतात उदयास आला. यात प्रामुख्याने प्रेमाख्याने असतात. क्वचित धार्मिक विषय येतात.

 

blog 3

एक सूत्रधार पूर्ण नाटकाचा डोलारा सांभाळून नेतो. प्रसंग बदलला की पडदा पाडतात आणि पडदा उघडला की नवा प्रसंग सुरू झालेला असतो. पात्रं प्रेक्षकांसोबत गप्पा मारतात, प्रश्न विचारतात, कधी प्रेक्षकांमध्ये मिसळतात आणि कधीतर प्रेक्षकांमधूनच स्टेजवर येतात. संवाद बहुतेकवेळा पद्यमय असतात. सोबतीला प्रामुख्याने नगारे असतात. गायन आणि वादन एकत्र होत नाही. आधी गाणं होतं, ते संपल्यावर दोन-चार मिनिटं वाद्यवादन! नौटंकी रात्रभर चालते. शेवटाकडे सूत्रधार नाटकाचं 'तात्पर्य' सांगून उपदेशही करतो.

 

blog 4

नौटंकीचं स्वरूप काळानुसार बदलून उच्छृंखल व्हायला लागलं तेव्हा सुसंकृत वर्गाने तिच्याकडे पाठ फिरवली; याचा खेद वाटून अमीर खुस्रो यांनी नौटंकीला परिष्कृत रूप दिलं. नव्या प्रकारची पद्यं आणि निराळं संगीत समाविष्ट करून तिच्यातले अजून काही अवगुण दूर केले. पुढे नौटंकीत कानपूर आणि हाथरस अशी दोन प्रसिद्ध घराणीही निर्माण झाली.अठराव्या शतकात इंदरमन यांनी कीर्तनपद्धतीने नौटंकी सुरू केली. नत्थामहाराज या हरहुन्नरी कलावंताने गायन, अभिनय यात बाजी मारलीच, खेरीज स्वत: अनेक आख्याने रचून नौटंकीला शिष्टसंमत रूप दिलं.

 

दीपचंद या कलावंताने नौटंकीत वीररस आणला.हे सारे हाथरस घराण्यातले होते. कानपूर घराण्यानेही संगीताचे नवे प्रकार नौटंकीत आणले आणि खास करून स्वातंत्र्यपूर्व काळात जनमानसात राष्ट्रीय भावना चेतवणारी वीरांची आख्याने सादर केली.आजही या धारेतल्या नौटंकीत हुंड्यासारख्या कुप्रथा, दहशतवाद, धार्मिक दंगली असे विषय सादर केले जातात. 1930 सालापासून नौटंकीत स्त्रियांनीच स्त्री भूमिका करण्यास सुरुवात केली. गुलाबबाई ही नौटंकीत आलेली पहिली अभिनेत्री, जिला पुढे पद्मश्रीही मिळाली. तथापि आजही स्त्री भूमिका करणारे पुरुष अभिनेते नौटंकीचं आकर्षण असतातच.

 

blog 5

नौटंकीचं स्वरूप स्वातंत्र्योत्तर काळात पुन्हा बिघडत गेलं. आपल्याकडे तमाशाचं जे झालं तेच तिकडे नौटंकीचंही झालं. नौटंकी हा शब्द गुगल करून पाहिला तर भोजपुरी चावट गाणी आणि गलिच्छ हावभावांसह केलेले नाचच जास्त सापडतात. बाष्कळपणाही मुबलक आढळतो आणि छायाचित्र शोधले तर भारतातील सर्वपक्षीय मोठमोठ्या राजकीय नेत्यांची छायाचित्रे आढळतात. शब्दांचे अर्थ काहीवेळा काळानुसार इतक्या टोकाने बदलून जातात.असो.. आपण आपलं अमीर खुस्रोच्या ओळी गुणगुणाव्यात आणि पुन्हा कधीतरी नौटंकीला चांगले दिवस आणणारा एखादा खुस्रो जन्मेल, याची वाट पाहावी...
किसे पडी है जो जा सुनावे
पियारे पी को हमारी बतियां ||
न नींद नैना, ना अंग चैना
ना आप आवें, न भेजें पतियां ||
ज़िहाल-ए मिस्कीं मकुन तगाफ़ुल,
दुराये नैना बनाये बतियां ||

 

कविता महाजन यांचे घुमक्कडी मालिकेतील यापूर्वीचे ब्लॉगः

घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई

 

घुमक्कडी : (2) सीतेची तहान

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV