घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी

By: | Last Updated: > Saturday, 27 August 2016 10:43 AM
Ghumakkadi Sata Prashnachi Kahani blog by Kavita Mahajan

‘निर्णय’ नावाचा एक अगदी साधा लघुपट काल बघितला. पुष्पा नावाच्या एका तरुण मुलीने handycam घेऊन बनवलेला. ही मुलगी दिसत नाही, पण प्रश्न विचारते. गोड – अगदी चांदीच्या घंटा वाजाव्यात तशा मंजुळ आवाजात प्रश्न. प्रश्न अगदी साधे, लहान, नेहमीच्या शब्दांमधले आहेत. भावुक नाहीत, खवचट तर अजिबातच नाहीत. कमी शब्द, छोटी वाक्यं.पुष्पा म्हटलं तर स्वत:ची गोष्ट सांगतेय आणि इतर समवयस्क मुलींना सामावून घेत जाते तेव्हा ती ती गोष्ट अनेकींची बनत जाते… केवळ स्त्रियांची नव्हे, तर पुरुषांची देखील बनते!

 

 

Ghumakkadi 4 Photo 1

 
प्रश्न विचारण्याची सुरुवात पुष्पा घरात आपल्या भावापासून सुरुवात करते. तो वैतागतो. आई डोळ्यांवर हात ठेवून निजलीये. पुन:पुन्हा विचारून देखील  ती काहीच उत्तर देत नाही, हेच तिचं उत्तर. वडील चिडतात, त्रासतात, पण ‘आपण केलं ते चांगल्यासाठी केलं, जात-बिरादरीला उत्तरं द्यावी लागतात,’ असा खुलासा करतात.

मग प्रियकर. त्याचं नाव सुनील. त्याचा चेहरा कोवळा आहे अजून. घराची जबाबदारी घेऊन, कमावून कुटुंब सांभाळतोय. तो अजून म्हणतोय की तुझ्याशीच लग्न करायचं आहे. मग त्याची बहीण. ती रानात मेंढरासाठी चारा कापतेय. नाही – नाही म्हणत ती आपलं स्वप्न सांगते की, “मला बीएड करून शाळेत शिकवायचं आहे.’ मग त्याच्या घरी त्याचे आई-वडील.आईचं म्हणणं असं की, “जातीतली मुलगी असेल तर तिला आपले रीतिरिवाज, स्वयंपाकाच्या पद्धती शिकवण्यात जास्त वेळ जात नाही.ती सासरघराशी लवकर जुळवून घेते.”
मग एक आनंदी घर. तिथली लाजरीबुजरी मुलगी. ही पुष्पाच्या प्रियकराची भावी पत्नी आहे. तिच्या आई-वडलांशी बोलणं होतं.  तिने भावी नवऱ्याचा पाहिलेलं आहे, पण त्याच्याशी बोललेली नाहीये. ती म्हणते की,”मला एकटीला वाटून काय उपयोग? लग्नाआधी त्याला जाणून घ्यायला आवडलं असतं, पण तशी पद्धत नाही. काय करायचं ते लग्नानंतर!”

 

 

Ghumakkadi 4 Photo 2
पुष्पाच्या प्रेमकथेत काहीतरी सकारात्मक घडेल असं मनापासून वाटतं, पण तसं घडत नाही हे वास्तव असतंच. आणि मग पुष्पा चक्क आपल्या प्रियकराच्या लग्नाचंही शूटिंग करते.
मग मैत्रिणी. त्यांची स्वप्नं.साधी दृश्यं. खूप वेळ चिवचिवत राहणारी एक चिमणी. नदीचं वाहतं पाणी. घरं. मग या तरुणी पुन्हा. त्यांच्या स्वप्नाचं काय झालंय ते सांगणाऱ्या.
एक माहेराविषयी बोलून झाल्यावर म्हणते,”इथं मी सगळ्यांत जास्त मिस करते ते मला!”
निर्णय शिक्षणाचे, छंद – कला विकसनाचे, प्रेमाचे, लग्नाचे, मुलं होऊ देण्याचे, मुलगी जन्मायला नको म्हणून लिंग तपासणी करण्या-न करण्याचे, गर्भपाताचे, घुंघट न घेण्याचे, अर्थार्जनाचे… ते दुसरेच कुणी घेतात. आपल्याला तो हक्क नाही. सुरू होईल वाटताना संपतं आयुष्य. ते गहिरे अपेक्षाभंग. अपेक्षा देखील किती लहान आणि साध्या, पण पूर्ण होत नाहीत. सासूला गर्भपाताचं दु:ख नाही, पण मुलीचा म्हणून पाडलेला गर्भ मुलाचा निघाला याचा खेद आहे. बाळाला खेळवत एकजण म्हणते, “मी याला चांगला माणूस करेन. कुणाला टोमणे मारून बोलू नये असं शिकवेन. किती वाईट वाटतं माहिती सतत असं ऐकून…” आणि तोंड झाकून रडते.
पुष्पा पुन्हा सुनीलला भेटते. जत्रेत. आकाशपाळण्यात जोडपी आहेत. एका जोडप्याचे अधांतर पाय फ्रेम मध्ये दिसत राहतात. तो जबाबदाऱ्या वाढून अकाली प्रौढ दिसणारा. त्याचं बरं चाललंय.
पुन्हा त्याचं घर. ती विचारतेच आहे अजून प्रश्न…………
“मुलाला घरच्यांचा विचार करावा लागतो, तर मग तो मुलींना करावा लागत नाही? त्यांची जात – बिरादरी असते, तशी मुलींची असत नाही? त्यांना जबाबदाऱ्या असतात तशा मुलींना असत नाहीत?”
तो कसाबसा म्हणतो, “पोरवय होतं… पोरकटपणा झाला सारा…”
पुष्पा विचारते, “अजून प्रेम करतोस माझ्यावर?”
त्याच्या डोळ्यांत किंचित पाणी तरळतं. बोलत काही नाही. मनाजोगा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य घरातला कर्ता- कमावता तरुण असून त्यालाही नाहीये.
या तरुण मुलीच्या मनातले हे किती प्रश्न आणि किती साधे आणि किती अवघड प्रश्न.
उत्तरं माहीत आहेत, तरी ते विचारण्याचं असं धाडस, तेही हातात कॅमेरा घेऊन खेड्यातली कुणी अर्धशिक्षित मुलगी करेल हे मला फार नवं आहे. तिच्याशी बोलताना माणसं बिचकतात, पण अखेर बोलतात. तिची एक मैत्रीण तर चक्क हेवा करत म्हणते,”तुझं काय, तुझ्या हातात आज निदान कॅमेरा आहे!”
आता यात विशेष अशी गोष्ट काहीच नाही आणि खूप गोष्टी आहेत. म्हटलं तर आपल्याच, म्हटलं तर रोजच्याच. तरी एक मुलगी एक साधा handycam घेऊन तीच गोष्ट सांगतेय म्हटल्यावर ऐकावी वाटतेच!

 

Ghumakkadi 4 Photo 3

विकासाची माझी व्याख्या आहे : व्यक्तीने निर्णयक्षम बनणं.
भरपूर शिकलेली इत्यादी माणसं देखील याबाबत महान घोळ घालताना दिसतात. विचार न करता पटकन कृती करावी, मनमानी वागावं असा याचा अर्थ नाही; पण एखादा साधा निर्णय घ्यायला आपल्याला नेमका किती वेळ… मिनिटं, तास, दिवस, आठवडे, महिने, वर्षं लागतात… याचा एकदा नक्कीच हिशेब करून पाहावा. संभ्रम असणं आणि कल्पनाशक्ती नसणं हे निर्णय न घेता येण्यातले दोन प्रमुख अडथळे आहेत. निर्णयाचे परिणाम काय होतील याची धास्ती, भीती असते आणि म्हणून सल्ले घेणं, सूचना मागवणं इत्यादी चालतं. अमुक निर्णय घेतला तर चांगलं काय होईल आणि वाईट काय होईल याचे फायदेतोटे काय असतील याची दोन्ही टोकांना जाऊन व्यवस्थित कल्पना केली, तर भीती नष्ट होऊ शकते.
कोणतीही गोष्ट मुलांनी विचारून करावी, केल्यावर सांगावी, असे जे तथाकथित संस्कार घरात केले जातात, त्यातून दडपण वाढून मुलांची निर्णयक्षमता विकसितच होत नाही. ती विकसित होऊच नये असंच अनेकांना वाटत देखील असतं. साधा आपल्या लग्नाचा निर्णय आपण घेणं अजून, अगदी या पिढीतल्या २५-३५ वयाच्या तरुणांना जमत नाही अजून! या निर्णयक्षमताहीन असण्याचे तोटे त्यांच्या लहानमोठ्या कृतीतून व कृती न करण्यातून व उशिरा कृती करण्यातून व हळहळीतून दिसत राहतात. कामाच्या जागी जेव्हा त्यातून अकार्यक्षमता दिसू लागतात, तेव्हा तर ते व्यक्तिगत नुकसानासह सामाजिक नुकसान देखील ठरतं.

 

कविता महाजन यांचे घुमक्कडी मालिकेतील यापूर्वीचे ब्लॉगः

घुमक्कडी : (1) आभाळाचा कागद, समुद्राची शाई

घुमक्कडी : (2) सीतेची तहान

घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना


 

News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Ghumakkadi Sata Prashnachi Kahani blog by Kavita Mahajan
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published: