घुमक्कडी : (२) सीतेची तहान

घुमक्कडी : (२) सीतेची तहान

इच्छेइतकं आकर्षक आपल्या मनात दुसरं काही नसतं. काही सहज पूर्ण होतात, तर काही पूर्ण करण्यासाठी वणवण होते. या जंगलातून जंगलात फिरताना मला कायम हा शब्द ‘वन-वन’ असेल असं वाटत राहतं. इच्छा ठेवू नयेत, अपेक्षा करू नयेत, स्वप्नं पाहू नयेत असं अध्यात्म मला आवडत नाही आणि पटत तर मुळीच नाही. इच्छा ठेवण्यासाठी, अपेक्षा करण्यासाठी, स्वप्नं पाहण्यासाठी आणि हे सारं प्रत्यक्षात आणण्याची धडपड करण्यासाठीच तर माणसाचा जन्म असतो. इच्छा - अपेक्षा - स्वप्नं पूर्णत्वास नेणारी कृतिशील माणसं मोठी देखणी दिसतात.

 

वयाच्या एका टप्प्यावर मी मागे वळून पाहिलं की आपण काय-काय केलंय आजवर आणि काय राहिलंय? तर लक्षात आलं की माझ्या बहुतेक सर्वच इच्छा पूर्ण झाल्या आहेत, फक्त एक शिल्लक राहिली आहे.

कोणती?

- तर मला अंबुतीर्थ बघायचं आहे!

धार्मिक मी मुळीच नाही. कर्मकांडांचा मला तिटकारा आहे. चुकीच्या रूढी - परंपरा कायम नाकारत आलेली आहे. मग या 'तीर्थ'स्थळी मला कशाला जायचं होतं? अशी कोणती गोष्ट तिथं होती, जी हाका मारत होती?

Ghumkaddi Blog photo 1

घनदाट जंगल, मध्ये प्रचंड विस्ताराचे पाषाणखंड, खळाळत वाहणारी नदी... अंबुतीर्थाचे जे फोटो आणि व्हिडिओ मी पाहिले होते, त्यात हे होतं. जंगल आणि नदी मला नवं नव्हतं, मात्र हे विलक्षण आकार धारण केलेले आणि नृत्य करता-करता कुणा अनामिक शापाने गोठून दगड बनले आहेत असे वाटणारे पाषाणखंड मात्र कधी अनुभवले नव्हते. पायांना वाटा हव्या असतात. माझ्या पायांमधून तर असंख्य वाटा फुटत असतात. त्यांना कधी पाण्याची ओढ लागते, कधी वाळूची, कधी मातीची. तळव्यांना कधी सोनपिवळ्या वा लालकेशरी पाकळ्यांचा स्पर्श हवा वाटतो, तर कधी सुकूनही अनेकविध रंग ल्यालेला पाचोळा मोहात पाडतो. यावेळी पायांना कातळांच्या हाका ऐकू येत होत्या.

Ghumkaddi Blog photo 2

ही इच्छा मनात तीव्र होत होती, त्याच दिवसांत वैदेही या कन्नड लेखिकेने मणिपाल विद्यापीठात मुलाखतीसाठी आमंत्रित केलं. मुलाखत घेण्यासाठी प्रसिद्ध अनुवादक उमा कुलकर्णी असणार होत्या. त्यांचं घर माझं माहेरच. एकमेकींना शब्दांत न सांगताही आम्ही गप्प बसू शकतो किंवा तासंतास बोलू शकतो. बोलण्याचे विषय आणि मौनाच्या जागा दोन्हीही अमाप.

कार्यक्रम संपताच उडुपीहून कुद्रेमुख अभयारण्य ओलांडून आम्ही कळस या गावात रात्रीचा मुक्काम केला आणि भल्या पहाटे अगदी चहाही न घेता अंबुतीर्थावर पोहोचलो.

 

अंबु या कन्नड शब्दाचा अर्थ आहे धनुष्य! इथून जी नदी वाहते तिचं नाव आहे शरावती. या नावांमागची गोष्ट होती रामायणातली. घनघोर वनातून जात असताना सीता तहानेने व्याकुळ झाली. रामाने आपलं धनुष्य उचललं आणि कातळ वेधला. त्यातून पाण्याची धार उंच उसळून आली आणि सीतेच्या मुखात पडली. सीतेची तहान भागवणारी ही नदी शरातून जन्मली म्हणून शरावती. उगमापासून धावत ती उतरू लागते ती जागा म्हणजे अंबुतीर्थ! ज्या कातळातून ती जन्मली त्याच्या अंगाखांद्यावर नाचणारी, खळाळून हरणारी अल्लड शरावती इथं भेटते. पुढे ती निरनिराळी रुपं घेते, अगदी तुफ्फान कोसळणारा शुभ्र दुधसागर देखील बनते.

Ghumkaddi Blog photo 3

पाषाणांचं सौंदर्य हे रुक्षतेतलं सौंदर्य होतं. त्यांना शरावतीने कातलं होतं. लेकीच्या मायेने कठोर बाप निवळावा तसे पाषाणांचे सारे कोनेकंगोरे मऊमवाळ झाले होते. कुठेही धारदारपणा शिल्लक राहिलेला नव्हता. त्या नैसर्गिक पाषाणशिल्पावर एकुलता पक्षी येऊन बसला, तो मी कॅमेऱ्याने टिपला.

Ghumkaddi Blog photo 4

सगळं जणू या जगातलं नाहीचये इतकं अद्भुत सुंदर दिसत होतं. मी एका कातळावर बसले. वाकून नकळत ओंजळ पाण्यानं भरून घेतली आणि पाणी प्यायले.एकच ओंजळ... पण न जाणे किती जन्मांची तहान तिने भागवली. डोळ्यांना पाणी लावलं. पाय पसरवून अलगद पाण्यात उतरवून बसले निवांत. पल्याडच्या जंगलातून सूर्य हळूहळू वर आला. पाणी केशरी झालं. करडे-भुरकट तांबडे कातळ, केशरी पाणी आणि कातळांच्या पाण्यात थरथरणाऱ्या निळ्याभोर  सावल्या. आपल्या त्वचेचा रंगही त्या प्रकाशाच्या खेळात बदलून जातो.

Ghumkaddi Blog photo 5

या कातळांची देखील एक गोष्ट आहे, ती मला स्कंदपुराणात सापडली. पूर्वी या प्रदेशाचं नाव होतं धर्मारण्य. इथं एका राक्षसाचं राज्य होतं. नव्या लोकांचं आगमन आणि नव्याने इथे रुजू लागलेल्या त्यांच्या प्रथा त्याला अमान्य होत्या. खास करून विवाहाची प्रथा. त्यामुळे जिथे कुठे विवाह होतो आहे असे तिथं जाऊन तो विवाह मोडण्याचा प्रयत्न करायचा. नवविवाहितांना पकडून आकाशात भिरकावून द्यायचा. धर्मारण्यातल्या लोकांनी श्रीमाता या देवीला साकडं घातलं. तिनं स्वतः:तून अठरा हातांची मातंगी देवी त्याला धडा शिकवण्यासाठी निर्माण केली. गौरी आणि हर यांच्या विवाहात त्याने अडथळा आणला आणि त्यांना उचलून नेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मातंगीने त्याच्याशी बरेच दिवस युद्ध केलं. अखेर तिनं त्याला गिळलं, तेव्हा तो तिच्या कानातून बाहेर पडला. त्यामुळे त्याचे नाव कर्णाट असं पडलं. मग त्या राक्षसाने सुंदर रूप धारण केलं आणि मातंगीला लग्नाची मागणी घातली. आता याच्याशी आपल्याला एकटीने लढता येणार नाही, हे ध्यानात येऊन ती त्याला श्यामलादेवी या आपल्या बहिणीकडे घेऊन गेली. तीन महिने त्यांचे युद्ध सुरू होते. मरणोन्मुख झाल्यावर तो दक्षिणेकडे समुद्राच्या दिशेने निघाला. जाताना त्याने विराट रूप धारण केले. त्यामुळे तो कोसळला, तेव्हा थेट समुद्रापर्यंत पसरला. त्याच्या दणकट, जखमी शरीराचा पाषाणमय प्रदेश बनला... तोच कर्नाटक!

Ghumkaddi Blog photo 6

Ghumkaddi Blog photo 7

इच्छा पूर्ण झाल्यानं मन समाधानानं भरून मोकळं झालं होतं. आता अजून काही नको. एका लहानशा दगडावर आदिमानवांनी काढलेली गुहाचित्रं असतात, तशी नक्षी होती. मी तो उचलून न्याहाळला. सोबत न्यावा अशी भावना क्षणभर उमलली, ती मिटवून पुन्हा खाली ठेवला. काय - काय नेणार होते मी आणि नेऊन ठेवणार तरी कुठे होते? तिथं ते इथल्यासारखं दिसलंही नसतं. डोळ्यांत, स्पर्शात, चवीत जितकं मावलं आहे तितकं घेऊन मी कर्नाटकातून परत निघाले.

Ghumkaddi Blog photo 8-compressed

हे कातळ चांदण्यात कसे दिसत असतील? पावसाच्या मुसळधार सरी त्यांवर कोसळत असतील, तेव्हा ऐकू येणारा नाद कसा असेल? हेच दृश्य हरेक ऋतूत, हरेक क्षणी कसं नवं बनत असेल?

 

इच्छा पूर्ण झाली, तरी कुतूहलं शिल्लक राहतातच!

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: Kavita Mahajan कविता महाजन
First Published:

Related Stories

LiveTV