'तू पॉप्यूलर ट्रेंड प्रिये..' हा पडद्यामागील तारा गं!

'तू पॉप्यूलर ट्रेंड प्रिये..' हा पडद्यामागील तारा गं!

कोण आहे ही प्रिये? कुठून आलेय ही प्रिये? आणि त्याहूनही महत्वाचा प्रश्न का आलेय ही प्रिये? बरं आलीच आहेस, चार दिवस राहिलीच आहेस, तर आता घरी जा ना प्रिये. प्रिये हॅशटॅगला वैतागलेल्या जवळपास प्रत्येक नेटिझन्सची आता हीच भावना आहे.

कसंय ना, हल्ली फेसबूक लॉग इन केलं की दर एका पोस्टनंतर प्रियेवरची पोस्ट दिसतेच. पण सोशल मीडियावर ही प्रियेची साथ एकाएकी आली कुठून… तर हाच जांगडगुत्ता सोडवण्याचा हा प्रयत्न.

प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी एक इन्स्पिरेशन असतंच. प्रियेच्या ट्रेंड मागचं इन्स्पिरेशन आहे कवी नारायण पुरी यांची प्रेमाचा जांगडगुत्ता ही कविता.

कविता तशी फेमस आहे. मस्त आहे. आशयघनही आहे. याच कवितेच्या काही ओळी सोशल मीडियावर पोस्ट झाल्या. कविता सहज, सोपी, बोलीभाषेतली असल्याने अनेकांना जवळची वाटली आणि यातूनच पुढे प्रियेच्या ट्रेंडला प्रवाह मिळाला. जो तो आपल्या प्रेयसीचं वर्णन करु लागला. सुरुवातीला गंमत वाटली आणि नंतर अतिरेकाने विट आला.

नारायण पुरी यांचा काही दिवसांपूर्वीच गंगापूरमध्ये कवितांचा कार्यक्रम झाला होता. यातही ही कविता श्रोत्यांनी उचलून धरली. ती एका श्रोत्याने फेसबूकवर लाईव्हही केली. सध्याच्या साहित्यप्रेमाच्या प्रथेप्रमाणे या कवितेचेही तुकडे फेसबूकवर स्टेटसमध्ये विखुरले गेले. आणि ही आशयघन कविता एकाएकी व्हायरल फिव्हर झाली. आणि डोक्याला तापही.

“उखळात खुपसले तोंड #प्रिये मुसळाचा तुंबळ रट्टा गं.. प्रेमाचा जांगडगुत्ता गं, जीव झाला हा खलबत्ता गं” प्रेमाचं इतकं सुंदर वर्णन केलंय या कवीने.

मूळ संपूर्ण कवितेचा आशय काय आहे, तर एक प्रियकर ज्याची प्रेयसी त्याच्यापेक्षा सर्वार्थाने सरस आहे. आता अगदी सोप्प करुन सांगायचं तर आर्ची-परशा टाईप्स. आणि या प्रेयसीचं वर्णन कवी करु पाहतोय. “तू पखवाजाचा भक्तीनाद प्रिये.. मी कडकड घाई हलगीची… तू वीणा हरिच्या हाताची, मी तुणतुण तार तुनतुन्याची…” हे इतकं सुंदर आहे सगळं. ज्यापासून आपण अनभिज्ञ आहोत.

तेव्हा एकदा प्रियेच्या लाटेत डोळे झाकून डुंबताना जरा हेही लक्षात घ्यायला हवं. “’तू मुसोलिनी, हिटलरवादी… मी देशाचा फुटका माथा गं.. तू नामांतर, तू विषयांतर.. मी दंगलीमध्ये होतो अमर प्रिये.” हे इतकं जळजळीत वास्तव नेमक्या, मोजक्या शब्दात मांडण्याचं कसब पाहा. आणि दुसरीकडे तू ऑईव्ह मी पॉपाय प्रिये, तू आर्ची मी परशा प्रिये लिहिणाऱ्यांचं साहित्यिक दारिद्र्य पाहा. बाकी हा नारायण पुरींना हिरो करायचा, किंवा कुणाला हिणवण्याचा प्रयत्न नक्कीच नाही. तर फक्त व्हायरलच्या शब्दिक बुडबुड्यांमध्ये, भाषेचं, साहित्याचं सौंदर्य झाकून जाऊ नये म्हणून घेतलेला लहानसा आढावा आहे. पण तसं पाहिलं तर नारायण पुरी किंवा अन्य हिंदी कवी ज्यांची नावं या ट्रेंडनंतर पुढे केली जातायच ती केवळ निमित्तमात्र आहेत असं मला प्रामाणिकपणे वाटतंय. कारण प्रेयसीची तारीफ करणं हा ट्रेंड काही आताचा नक्कीच नाही. तो एक मस्त शेर आहे बघा.. तुम ले आओ मीर, ग़ालिब, फ़राज़ की किताबें, मैं सिर्फ अपने महबूब की तारीफ करूँगा.

(कवी नारायण पुरी)

(कवी नारायण पुरी)

संदर्भासाठी नारायण पुरींची संपूर्ण कविता खाली देतो आहे.

प्रेमाचा जांगडगुत्ता गं.. जीव झाला हा खलबत्ता गं..
उखळात खुपसले तोंड प्रिये.. मुसळाचा तुंबळ रट्टा गं…

तू लाजाळू परी कोमल गं.. मी निवडुंगाचे झुडूप प्रिये…
तू तुळशीवाणी सत्वशील.. मी आग्याबोंड वेताळ प्रिये…
तू वीडा रंगीला ताराचा.. मी रसवंतीचा चोथा गं..
तू काळी नागीन सळसळती.. मी मांडूळाची चाल प्रिये..
एसी गाडीने फिरसी तू.. मी टमटमने बेहाल प्रिये…
तू नॅशनल हायवे चौपदरी.. मी खड्ड्यातून रस्ता गं..
तू मनसेचे ऐलान प्रिये.. मी सावध धनुष्यबाण प्रिये
मी वेळ हातावर आलेली… तू कमळापरी बेभान प्रिये
तू सत्ताधारी माजोरी.. मी हताशलेली जनता गं
तू गावगढीचा ऊंच महल.. मी गावकुसाचा पाल प्रिये
तू पुरेदारीनी डौलाची.. मी विमुक्त भटकी चाल गं
तू नकाशात अन्‌ यादीतही.. अन्‌ माझा गायब पत्ता प्रिये
तू अच्छे दिनचा आभास प्रिये.. मी आत्महत्येचा फास प्रिये
मी दुबार पेरणी जीवघेणी.. तू पीकवीम्याची बॉस प्रिये
मी मराठवाडा दुष्काळी.. तू सत्तेचा रट्टा गं
तू ब्लॅकमनी स्वीस बँकेतील.. मी खाली तिजोरी देशाची
तू अटल पेन्शन वा जनधन.. कर वसूली माझ्या मासाची
तू मुसोलिनी, हिटलरवादी… मी देशाचा फुटका माथा गं
तू नामांतर, तू विषयांतर.. मी दंगलीमध्ये होतो अमर प्रिये
मी व्यापमची मर्डर मिस्ट्री.. तू देशभक्तीचे अवडंबर
मी पानसरे! मी दाभोळकर!.. तू स्वातंत्र्याचा बोभाटा ग
प्रेमाचा जांगडगुत्ता गं.. जीव झाला हा खलबत्ता गं

– नारायण पुरी (मु.पो.आष्टूर, ता. लोहा, जि. नांदेड)

 

Tags: priye
First Published: