खादाडखाऊ : गणेशोत्सव आणि मास्टरशेफ

सोसायट्यांमधल्या विविध गुणदर्शन नामक एकुलत्या एक स्पर्धापेक्षाही आता, टीव्हीवरच्या (मोजक्याच) चांगल्या रियालिटी-शो मधून स्फूर्ती घेत त्यावर आधारित वेगवेगळ्या ‘क्रिएटिव्ह’ स्पर्धा घ्यायला सुरुवात झाल्या. त्यातल्याच ‘मास्टरशेफ’च्या धर्तीवरची ‘कुकिंग’ची स्पर्धा आजकाल सोसायटींच्या गणेशोत्सवाचं प्रमुख आकर्षण बनलं आहे.

hadadkhau ambar karves blog on master chef

गणेशोत्सवाचा काळ म्हणजे आसपास राहणाऱ्या सगळ्या लोकांनी एकत्र येण्याचा बेस्ट सिझन. सार्वजनिक गणपतीसाठी एकत्र येऊन वर्गण्या मागत फिरायचं, गणपतीची स्थापना, आरत्या करायच्या (आणि घरोघरी खिरापती खात फिरायचं), आख्या सोसायटीने एकत्र येऊन रात्रभर सिनेमे बघायचे, ह्यातला आनंद काय आणि कसा वर्णावा? हे ज्यांनी निदान त्या-त्या वयात केलं नाही, समझलो उसकी जिंदगी झूठ है!

 

food 4-

 

आता काळ बराच बदललाय, पुढे गेलाय. सोसायट्यांमधल्या विविध गुणदर्शन नामक एकुलत्या एक स्पर्धापेक्षाही आता, टीव्हीवरच्या (मोजक्याच) चांगल्या रियालिटी-शो मधून स्फूर्ती घेत त्यावर आधारित वेगवेगळ्या ‘क्रिएटिव्ह’ स्पर्धा घ्यायला सुरुवात झाल्या. त्यातल्याच ‘मास्टरशेफ’च्या धर्तीवरची ‘कुकिंग’ची स्पर्धा आजकाल सोसायटींच्या गणेशोत्सवाचं प्रमुख आकर्षण बनलं आहे.

 

food 1

 

मागच्या आठवड्यात ज्यावेळी कोथरूडची प्रसिद्ध टाऊनशिप ‘कपिल अभिजात’ सोसायटीमधल्या गणेशोत्सवाच्या स्पर्धेसाठी अस्मादिकांना परीक्षक म्हणून विचारणा झाली त्यावेळी पहिल्यांदा तर आश्चर्य वाटलं. त्याचं काये! प्रत्यक्ष ओळखणारे लोकं खवैय्या म्हणत असले तरी रुढार्थाने मी ‘शेफ’ नाही. लोकांच्या खाण्यापिण्याची, राहण्याची जय्यत सोय करून देत असलो तरी अजून ‘हॉटेलीयर’ हे लेबल लावून घेतलेलं नाही. स्वतःची “रेडी टू इट फूड प्रॉडक्ट” बाजारात आणायला नुकतीच कुठे सुरुवात केली आहे. तरी मार्केट मध्ये आपली ओळख व्हायला अजून जरा वेळ आहे. त्यामुळे परीक्षक म्हणून विचारणा झाल्यावर त्याला होकार देताना विचारात पडलो. पण आयोजकांनी, “आम्हाला फक्त ‘शेफ’ नकोय,खाद्यपदार्थांच्या चवीची जाण असलेली व्यक्ती पाहिजे” असं सांगून अंगावरच्या मणभर मासात मुठभराची अजून भर घातली. झालं! त्या नादात परीक्षक म्हणून हो म्हणून बसलो आणि दिलेल्या वेळात तिथे पोचलो.

 

food 2

 

ज्या सोसायटीत अश्या स्पर्धांच्या वेळी काही डझन मुलं बागडत असतात, त्यांच्या किलबिलाटाच्या आणि त्यांच्या पालकांचा आवाजानी कळस गाठलेला असतो ना? ती खरी लाईव्हली सोसायटी, बाकी नुसत्याच बिऱ्हाड नामक घरात लोकं राहतात तश्या ‘कॉलन्या’. सुदैवाने माझे लहानपण खऱ्या ‘लाईव्हली’ वातावरणात गेल्यामुळे, ’कपिल अभिजात’मधल्या वातावरणात गेल्यावरच फुल्ल चार्ज झालो.

 

food 3

 

स्पर्धा सोसायटीतील लहान मुला-मुलींपासून ते अगदी जेष्ठ आज्यांपर्यंत सगळ्यांसाठी होती. अर्थात थीम फक्त वेगवेगळ्या ठेवल्या होत्या.

 

food 5

 

आजकालच्या ह्या पोरांचं किती कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आमच्या पिढीतल्या मुलांना ह्यांच्या वयात ‘सलाड’हा शब्दही माहिती नसायचा. थोडं मोठं झाल्यावर ‘सलाड’ म्हणजे काकडी, गाजर, टॉमेटो ही त्रिमूर्ती माहिती झाली. इथे ६-१२ आणि १२-१८ वयोगटातल्या मुलांनी, फ्रुट् सलाडपासून अगदी ब्रोकोली आणि चीज पासून ते मेयोनीजपर्यंत अनेक जिन्नस वापरून ‘सलाड थीम’साठी कस्सली जबरदस्त कॉम्बिनेशन्स केली होती? हॅट्स ऑफ!

 

त्यांनतर माझ्या स्वतःच्या सगळ्यात आवडीच्या थीमची वेळ झाली. ती म्हणजे ज्येष्ठ वयोगटातल्या स्पर्धकांनी केलेले ‘विस्मरणात गेलेले पदार्थ’. त्यात कोकणातही मिळायला दुर्मिळ झालेल्या पातोळ्यापासून ते वऱ्हाडातल्या उकडपेंडीपर्यंत, गव्ह्ल्यांपासून ते गुलागुल्यांपर्यंत आणि खानदेशी पातोड्या, शेंगोळ्यांपासून ते मोकळ्या भाजणीपर्यंत अनेक पदार्थ परीक्षकाची (म्हणजे माझीच) वाट बघत होते. त्यातही पुढे काकडीच्या आप्पमसारखे कधी नावही न ऐकलेले पदार्थ बघून, स्पर्धेला परीक्षक म्हणून आल्याचं सार्थक झालं. येवढे एकसे बढकर एक पदार्थ केले होते ह्या सगळ्यांनी, की ह्या अन्नपूर्णांच्या पदार्थांची चव बघून मार्क देताना मनात मलाच लाज वाटत होती.

 

food 7-

 

मध्यम वयोगटासाठीच्या ‘क्वीन्स’ तर अश्या स्पर्धेसाठी कायमच हक्काच्या स्पर्धक असतात. त्यांच्या थीम मधले ‘ग्रिल्ड’ आणि ‘स्वीट्स’ हे दोन भाग व्यवसायामुळे माझ्या विशेष औत्सुक्याचे होते. पण ’क्रिएटिव्हीटी’ सगळ्यात जास्ती बघायला मिळाली ती अर्थातच ह्या गटात. भारतातल्या बंगाली, पंजाबी पदार्थापासून ओरिएन्टलपर्यंत पदार्थ आणि त्यांची मस्त फ्यूजन बघायला आणि चाखायलाही मजा आली.

 

food 6-

 

शेवटी (तुडुंब) भरल्या पोटी सगळ्यांचा निरोप घेऊन आमची परीक्षकपदाची सांगता केली.

 

घरी जाताना विचार करत होतो लोकमान्यांना अपेक्षित गणेशोत्सव म्हणजे उत्सवाच्या निमित्ताने आसपासच्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन काहीतरी चांगले काम करावे ह्यापेक्षा काय वेगळा होता?

 

गणेशोत्सवातले मेळे वेगेरेचा काळ उलटून आता कैक वर्ष लोटली. जे संपले त्यांच्या नावानी अनेक वर्ष अश्रू ढाळून तसेही कोणाच्या पदरात काही पडत नाही. महाराष्ट्रात गणेशोत्सवातल्या सार्वजनिक स्पर्धांमधून गाणी म्हणत, नाटकं करत अनेक हौशी, गुणी कलाकार पुढे नामवंत झाले. कुणास ठाऊक अश्या स्पर्धांच्या निमित्तानं एखादा मुलगा/मुलगी काही काळानी ‘मास्टरशेफ’ म्हणून पुढे येईल. त्यामुळे निदान आपण तरी गणेशोत्सव आणि त्यातल्या स्पर्धांकडे सकारात्मक दृष्टीने बघून, ह्यात कुठल्यातरी स्वरूपात सहभागी होत राहायचं… बास!

 

खादाडखाऊ सदरातील इतर ब्लॉग:

 

खादाडखाऊ : पुण्यातला पहिला ‘आमराई मिसळ महोत्सव’

खादाडखाऊ : खाद्यभ्रमंती मुळशीची

खादाडखाऊ : मंदारची पोह्यांची गाडी

खादाडखाऊ : आशीर्वादची थाळी

खादाडखाऊ : पुण्यातील महाडिकांची गाडी

खादाडखाऊ : पुन्हा एकदा लोणावळा

खादाडखाऊ : ‘इंटरव्हल’ भेळ आणि जय जलाराम

खादाडखाऊ : ‘तिलक’चा सामोसा सँपल

खादाडखाऊ : प्रभा विश्रांतीगृहाचा अस्सल पुणेरी वडा

ब्लॉग : खादाडखाऊ : हिंगणगावे आणि कंपनी

खादाडखाऊ : पुण्यातील 106 वर्षं जुनी ‘वैद्यांची मिसळ’!

खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचा

News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:hadadkhau ambar karves blog on master chef
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published: