जिभेचे चोचले : हम काले है मगर... आईस्क्रीमचा भन्नाट फ्लेवर

जिभेचे चोचले : हम काले है मगर... आईस्क्रीमचा भन्नाट फ्लेवर

आजकाल स्पर्धेत टिकून रहायचं तर नवनवीन कल्पना शोधून काढाव्याच लागतात, अगदी सगळ्याच क्षेत्रात हे सूत्र लागू होतं, पण खाद्यजगतात मात्र नवनवीन कल्पनांची आवश्यकता जास्त असते कारण तेचतेच खाऊन कंटाळलेले खवय्ये सतत काहीतरी नव्याच्या शोधात असतात, मग ती चव तरी असते, दोन विविध पदार्थांचं कधीही ऐकलं नाही असं मिश्रण तरी असतं किंवा पदार्थ सादर करण्याची नवी पद्धत तरी असते. फुडीजना भुरळ घालण्यासाठी सध्याचे शेफ काहीतरी भन्नाट आयडिया शोधत असतात, त्यातही गोड पदार्थ किंवा डेझर्टसमध्ये तर अतिशय हटके प्रयोग आजकाल बघायला मिळतात. त्यातलाच सध्या मुंबईच्या खाद्यसंस्कृतीत लोकप्रिय होऊ पाहणारा ट्रेण्ड आहे. काळं किंवा ब्लॅकचा.

black cone

आता खाद्यपदार्थांबद्दल बोलत असताना काळ्या रंगाचा उल्लेख कसा काय? असा प्रश्न पडणं सहाजिक आहे. कारण खाण्याचा पदार्थ बिघडला किंवा जळला की त्याला ‘कोळसा झाला’ म्हणण्याची पद्धत आपल्या घरोघरी आहे. पण हा कोळसाच एखाद्या पदार्थाचा भाग असला तर.. कसा असेल तो पदार्थ... नाही म्हणायला आजकाल ग्रील किंवा बार्बैक्यूची प्रचंड क्रेझ असल्याने चारकोल ग्रील्ड म्हणजे कोळशावर ग्रील केलेले पदार्थ खाल्ले जातात, पण एखाद्या पदार्थात थेट कोळसाच वापरला गेलाय अशा पदार्थाचा मात्र कुणीही विचार आत्तापर्यंत केलेला नव्हता. बरं कोळशाचा वापर ते ही गोड अशा आईस्क्रीममध्ये हा तर आणखीच चक्रावून टाकणारा प्रकार. पण असंच कोळसा आणि चॉकलेट एकत्र करुन कुट्ट काळ्या रंगाचं आणि काळ्या रंगाच्याच कोनमध्ये मिळणारं एक आईस्क्रीम आजकाल मुंबईत मिळू लागलं आहे.

chacole ice cream

‘ब्लॅक मॉन्स्टर’ नावाने हे काळं आईस्क्रीम आईसक्राफ्ट नावाच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळतं. ओशिवरा आणि नवी मुंबई अशा दोन ठिकाणी आईसक्राफ्टच्या ब्रांचेस आहेत आणि या वेगळ्या पद्धतीच्या आईस्क्रीमची क्रेझ इतकी वाढत आहे की लवकरच चेंबूर आणि मुलुंडमध्येही ‘काळं आईस्क्रीम’ मिळू लागणार आहे. डार्क चॉकलेटही बरेचदा काळपट दिसतं. पण ब्लॅक मॉन्स्टरचा काळा रंग पूर्ण कोळशासारखा काळा. कारण चॉकलेट आणि एडीबल चारकोल म्हणजे खाण्यायोग्य कोळशाचा वापर या आईस्क्रीममध्ये केला जातो. या आईस्क्रीमच्या नावात ‘मॉन्स्टर’ आहे आणि नावाप्रमाणेच आपण एरव्ही खातो त्यापेक्षा खूप मोठं असतं ते आईस्क्रीम. खास कोळशाचं आईस्क्रीम देण्यासाठीच तयार केलेल्या भल्या मोठ्या काळ्या रंगाच्या वॅफल कोनमध्ये काठोकाठ भरुन हे आईस्क्रीम सर्व्ह केलं जातं. आधीच काळ्या रंगाच्या या आईस्क्रीमवर चॉकलेट सॉस आणि चॉकलेट चिप्स टाकून त्याला अधिकच भरगच्च करुन तो काळा कोन आपल्या हातात दिला जातो. आता याची चव लागते कशी याची उत्सुकता असतेच. चव घेतल्या घेतल्या पहिल्यांदा जाणवते ती कोळशाची मातकट चव. अर्थात मातकट म्हणत असताना ती चव वाईट बिलकुल लागत नाही उलट चॉकलेटच्या चवीबरोबर ती कोळशाची चव एकत्रित अगदी छान लागते. आईस्क्रीमचं टेक्श्चर मात्र नेहमीच्या आईस्क्रीमपेक्षा वेगळं जाणवतं.

toppings

दूध घट्ट करुन केलेलं आईस्क्रीम खातोय असं न वाटता एखाद्या केकपासून आईस्क्रीम तयार केलंय की काय असं वाटावं असं याचं टेक्स्चर जिभेला जाणवतं. गंमत म्हणजे हे आईस्क्रीम खाताना काळं दंत मंजन लावून दात घासताना जसे दिसतात अगदी तसे आपले दात काळे होतात. (खरंच आईस्क्रीममध्ये कोळसा वापरला आहे याचं प्रुफ!!) काळ्या रंगाचा वॅफल कोनही मोठा वैशिष्ट्यपूर्ण आहे. एकतर मॉन्स्टर आईस्क्रीम भरायचं असल्याने इतर कोन्सपेक्षा आकाराने चांगलाच मोठा आहे हा कोन आणि कोळशाच्या काळ्या चवीची थोडीशी झलक कोनच्या चवीमध्येही जाणवते, त्यामुळे अनोख्या चवीचा डबल धमाका मिळतो एकाच वेळी.

making

आईस्क्रीमच्या दुकानात गेल्यावर तयार केलेलं काचेच्या शोकेसमध्ये ठेवलेलं आईस्क्रीम आणि आपण जो मागू तो फ्लेवर कप किंवा कोनमध्ये काढून देण्याची पद्धत या दोन्ही गोष्टी आता जुन्या झाल्या. आता तर आपण फ्लेवर मागितल्यावर आपल्यासमोरच आईस्क्रीम तयार केलं जातं. लिक्वीड नायट्रोजन असलेल्या गारेगार अल्युमिनियम टेबलवर दूध आणि इतर मिश्रण एकत्र करुन ते मिश्रण अक्षरश: धारदार प्लेट्सच्या मदतीनं ठोकलं जातं. त्याचा जोरदार आवाजही होतो आणि ठोकता ठोकताच आपल्याला हवं ते आईस्क्रीम तयार होऊन त्याच्या गोल सुरळ्या कप किंवा कोनमध्ये काढल्या जातात. त्यामुळे आजकाल आईसक्राफ्ट सारख्या आईस्क्रीम पार्लरमध्ये आपल्याला हव्या त्या चवीचं आणि कॉम्बिनेशनचं आईसक्रीम आपण बनवून घेऊ शकतो. त्यासाठीच क्राफ्ट युवर ओन आईस्क्रीम असा एक सेक्शन आहे इथे.

make to order

आपल्याला हवं ते आईस्क्रीम सांगायचं, म्हणजे व्हेनिला, चॉकलेट, कॉफी असा हवा तो फ्लेवर सिलेक्ट करायचा, त्यावर कोणत्या चवीचा सॉस हवा ते ही आपणच ठरवायचं आणि त्यानंतर चेरी, मार्शमेलोज, जेली, शोपेच्या गोळ्या असा कुठला देखणा गोड पदार्थ आईस्क्रीमवर टाकून हवा ते देखील आपणच ठरवायचं. आपल्या आवडीनुसार तयार केलेलं असं डेझर्ट काही मिनिटात आपल्या पुढे येतं. आईसक्रीमचा हा मेक टू ऑर्डर प्रकार आईसक्राफ्टच्या चारकोल आईस्क्रीम शिवाय आणखी एक वैशिष्ट्य आहे.

fries

आईस्क्रीम खायला गेलोय पण पोटात किंचित भूकही आहे, अशावेळी साधी आईस्क्रीम पार्लर्स बिलकूल कामाची नसतात, पण आईसक्राफ्टमध्ये मात्र त्या किंचित भूकेचीही काळजी घेतली जाते. सॅण्डविचेस, सॅलड्स, गोड वॅफल्स यांच्याबरोबरच मिळतात ते वेगवेगळ्या प्रकारचे बटाट्याचे फ्राईज आणि विविध पद्धतीने सर्व केले जाणारे कॉर्न. इथले क्रिंकल कट फ्राईज नावाचे चमचमीत मोठाले फ्रेंच फ्राईज तर फारच लोकप्रिय आहेत आणि चित्रविचित्र चवींची गोडसर आईस्क्रीम खाताना सोबत चाट फ्लेवरचे कॉर्न किंवा चटकदार फ्राईजचा गोडावरचा उतारा खवय्यांनाही हवाहवासा वाटतो.

make to order

सध्या देशविदेशातल्या बऱ्याच शेफ्सना खाद्यपदार्थातल्या ‘काळ्या’ रंगानी चांगलीच भूरळ घातली आहे. खास काळे ब्रेड बनवले जातात. काळे केक बनवण्याचाही प्रयोग केला जातो. परळच्या रोलिंग पिनमध्ये तर काळ्या बनचा खास बर्गर मिळतो. त्यालाही चारकोल म्हणजे कोळशाची चव आहे. काळे ऑर्गैनिक तांदूळ वापरुन राईसच्या विविध डिशेश बनवण्याचा ट्रेण्ड तर अनेक पंचतारांकीत हॉटेल्समध्येही लोकप्रिय झाला आहे. पण या सगळ्यात चारकोल आईस्क्रीम मात्र सर्वात भन्नाट पदार्थ आहे आणि नवनवीन चवीच्या चाहत्यांनी तर ही हटके चव चुकवायलाच नको.

‘जिभेचे चोचले’मधील याआधीचे ब्लॉग :जिभेचे चोचले: केक चॉकलेट पेस्ट्रीचं रोलिंग पिन

जिभेचे चोचले : पाणीपुरी – ‘तोंडभर’ आनंद जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार


जिभेचे चोचले : मुंबईतलं मिनी दक्षिण भारत : इडली-डोशाचं गाव


जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन


जिभेचे चोचले : कुटुंबसंस्थेचं सेलिब्रेशन


जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची


जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास


जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’


जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती


जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू


जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस


जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’


जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार


जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया ! 


जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV