जिभेचे चोचले : महाराष्ट्राचा काठ आणि घाट

जिभेचे चोचले : महाराष्ट्राचा काठ आणि घाट

मस्त मराठी पद्धतीच्या जेवणावर ताव मारायचा मग ते शाकाहारी किंवा मांसाहारी ते चारी ठाव जेवायचं, असाच विचार येणार, पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला चवींचा खजिना खास फोर कोर्स जेवणाच्या पद्धतीने कुणी तुमच्या समोर मांडला तर... सूप, स्टार्टर, मेन कोर्स, साईड डिशेश आणि डेझर्ट अशा आधुनिक पद्धतीत मराठी जेवणाचा चविष्ट पसारा कुणी आकर्षक पद्धतीने सादर केला तर खवय्यांसाठी ‘सोने पे सुहागा’. असा हा अनोखा अनुभव आजकाल मिळतोय ठाण्यातल्या पाचपाखाडी भागात नव्यानं सुरु झालेल्या काठ अन् घाट नावाच्या मराठी फाईन डाईन रेस्टॉरन्टमध्ये.

COLLAGE-WEB

काठ आणि घाट म्हणजे अक्षरश: महाराष्ट्राची लांबी रुंदी अगदी दोन शब्दात वर्णन करणारे दोन शब्द. या रेस्टॉरन्टमध्ये शिरल्याबरोबर खरोखर संपूर्ण काठ आणि घाटाच्या सौंदर्याचं, संस्कृतीचं छोटेखानी दर्शन घडतं आपल्याला. दोन मजली भव्य रेस्टॉरन्टचा खालचा मजला आहे. काठाचं सौंदर्य दाखवणारा तर दुसरा मजला थेट पेशवाईची आठवण करुन देतो. एखाद्या भव्य पुणेरी वाड्यात आपण फिरतोय आणि तिथेच आता जेवायला बसणार असंच प्रत्येक खवय्याला वाटू लागतं. अतिभव्य झुंबरं, तीही काचेची नाही तर सुंदर नक्षीकाम केलेली धातूंची झुंबरं, लाकडी नक्षीकाम केलेल्या खिडक्या आणि खिडकीतल्या नक्षीकामात महाराष्ट्राचं महावस्त्र असं संबोधल्या जाणाऱ्या पैठणीची नक्षी.

paithani

लाकडाच्या भिंतीवरही लाकडी कोरीव काम आणि छतावर अंजिठा वेरुळमधल्या कलाकृतींची झलक. एका भिंतीवर कुठे मशाली तर कुठे तलवारी लटकवलेल्या, वरच्या भागात एके ठिकाणी तर अठराव्या शतकातील काळातील घराला शोभतील अशा खिडक्याही त्या भव्यदिव्य जागेची शोभा वाढवतात. अशी पहिल्या संपूर्ण मजल्यावर महाराष्ट्रातल्या वाड्यांची झलक दिसते तर खालच्या मजल्यावर लाल दगडांच्या भिंती. भिंतींवरही लाकडी कोरीव काम आणि त्याचबरोबर जुन्या काळी घरोघरी दिसणाऱ्या वस्तूंचं एक छोटेखानी प्रदर्शनच. मग त्यात सुंदर नक्षी असलेले अडकित्ते दिसतात, तर तशीच सुबक किसणी, त्याशिवाय एकेकाळी घरांच्या दिवाणखान्यातली आवश्यक वस्तू ठरणारा पानाचा डबाही ठेवलेला दिसतो. अशा या महाराष्ट्राच्या गतवैभवाच्या खुणा बघून खरोखर हरखून जातो आपण आणि जेवणाचा आस्वाद घ्यायला इथे आलोय हेच काही क्षण विसरलं जातं, इतकी काठ आणि घाटमधली सजावट जबरदस्त आहे. अशा सगळ्या सजावटींमध्ये अगदी प्रशस्त पद्धतीने आपल्याला बसण्यासाठीचे टेबलही ठेवलेत. टेबलवर एरव्ही कापडाचे किंवा प्लॅस्टीकचे असणारे टेबल मॅटही तांब्याचे, महाराष्ट्राच्या गतवैभवाची आठवण करुन देणारे, पाणी पिण्याचे सोनेरी ग्लास तर एकदम रॉयल फिलिंग देतात.

Soup

दोन मजली रॉयल फाईन डाईनची ऐतिहासिक सफर झाल्यावर तितकीच रोचक ठरते ती इथल्या मेन्यूकार्डाची सफर. सूप सेक्शनमध्ये या संपूर्ण मराठी जेवण सर्व्ह करणाऱ्या रेस्टॉरन्टमध्ये काय बरं असेल अशी उत्सुकता असते. त्याचं उत्तरही फारच रंजक सूप सेक्शनमध्ये चक्क पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, शेंबुळ्या, कढण असे आपल्या जिव्हाळ्याचे पदार्थ सूप म्हणून पिताना एक वेगळीच मजा येते. गंमत म्हणजे तब्येत बिघडल्यावर आपल्या घरची मोठी मंडळी आपल्याला काढा देतात, तो काढाही इथे सूप म्हणून आकर्षक पद्धतीने सर्व्ह केला जातो. बरं महाराष्ट्राच्या विविध भागात अगदी घरोघरी, पिढ्यानपिढ्या केले जाणारे पदार्थ थेट आंतरराष्ट्रीय पद्धतीने आपल्याला सर्व्ह केले जातात ते काठ अन घाटमध्येच. सूपसोबत साधारणपणे रेस्टॉरन्टमध्ये सॅलड्सचा पर्याय असतो. आंतरराष्ट्रीय पद्धतीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले चवदार पदार्थ करायचे तर आंतरराष्ट्रीय निकषांत आपले कोणते मराठी पदार्थ बसतात याचा विचार करणं खरंच खूप रंजक आहे. सॅलड्सच्या सेक्शनमध्ये मिश्र कोशिंबिरी, काकडीची कोशिंबिर आणि पोह्याचे डांगरसारखे घरगुती पदार्थ पाहून फारच मजा येते.

koshimber

पण सगळ्यात मजा येते ती स्टार्टर्सची यादी पाहताना आणि त्या यादीतली स्टार्टर्स मागवून खाताना. कांदा भजी, कोथिंबिर वडी, अळू वडीसारख्या सर्रास उपहारगृहांमध्ये मिळणाऱ्या नाश्त्याच्या पदार्थांपासून ते मासवडी, सुरण वडे, तळलेले बोबिलं असे सगळे मराठी चमचमीत पदार्थ मिळतात ते याच सेक्शनमध्ये.

masswadi

मेन कोर्स किंवा मुख्य जेवण म्हणजे खऱ्या अर्थानं काठ आणि घाटाचा संगम, खानदेशी शेवभाजी, कोकणस्थांच्या घरची डाळिंबीची उसळ, मेथीची भाजी, वैदर्भीय पाटोडी रस्सा, भरलेली वांगी अशा शाकाहारी भाज्या तर दुसरीकडे वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतीतील मांसाहार मग त्यात मालवणी, आग्री, कोल्हापुरी, खानदेशी, सावजी आणि थेट गोवन पद्धतीने केलेले मासे, चिकन आणि मटण सगळं मिळत. त्याबरोबरच सावजी मटण खूर, मालवणी कालवं, आग्र्यांची सुकी बोंबिल, कोल्हापुरी रक्ती मुंडी अशी त्या-त्या खाद्यसंस्कृतीतल्या स्पेशल डिशेसचीही इथे रेलचेल आहे. काठावरच्या आणि घाटावरच्या खाद्यसंस्कृतींचा इथे मेळा आहे म्हटलं तरी मांसाहार करणाऱ्यांचीच जास्त चंगळ आहे. कारण इतक्या वेगवेगळ्या प्रकारांनी केलेले मासे, चिकन, मटण असं सगळं असताना कडकनाथ थाळी नावाचा आणखी एक युनिक प्रकार इथली खासियत. पारंपरिक पद्धतीनं बनवललेलं चिकन. या सगळ्या शाकाहारी मांसाहारी भाज्यांबरोबर खायला पोळ्या, भाकरींचेही चांदा ते बांदा विविध प्रकार आहेत इथे. घडीची पोळी, तांदळाची, बाजरीची, ज्वारीची भाकरी, घावनं, आंबोळ्या, पुऱ्या अगदी कोळंबीचे वडे असा सगळा थाट. तोच प्रकार भात आणि वरणांच्या बाबतीत खानदेशी डाळ खिचडीपासून गोव्याच्या रेशाद अफागादोपर्यंत भाताचेही कितीतरी नवे प्रकार इथे चाखायला मिळतात. वरणांचेही तसेच अनेक प्रकार – साधं वरण हा तर असा पदार्थ आहे की जो कधी रेस्टॉरन्टमधे मिळेल असा आपण याआधी कधी स्वप्नातही विचार केलेला नव्हता. पण काठ अन घाटमध्ये साधं वरणही मिळतं.

hotel

या सगळ्या बरोबर नेहमीच्या थाळी पद्धतीला एक नविन नाव देऊन इथे खवय्यांसमोर सादर केलंय. नाव दिलंय ‘डब्बा आपला आपला’ या डब्ब्यात मालवणी, कोल्हापुरी, वैदर्भीय अशी एक खाद्यसंस्कृती आपण ठरवायची आणि त्याचा डब्बा मागवायचा, ते केल्यावर त्या पदाधतीनं तयार केलेलं स्टार्टर, सुका पदार्थ, भाजी, भात, गोडपदार्थ अशी थाळी आपल्यासमोर आणून ठेवली जाते. म्हणजे समजा आपण खानदेशी डब्बा मागवला तर त्या खाद्यसंस्कृतीच्या सात-आठ पदार्थांची चव एकाचवेळी आपल्याला चाखता येते.

solkadi

सूपपासून भातांच्या प्रकारांपर्यत सगळ्या पदार्थांमध्ये काठ आणि घाटच्या शेफ्सनी पारंपरिक चव राखण्याचा प्रयत्न केलाय. पण शेफ स्पेशल प्रयोग केलेले दिसतात ते डेझर्ट्स आणि म़ॉकटेल्समध्ये. मॉकटेल्सचे प्रयोग तर भन्नाटच. पण त्यातही सोलकढी, मठ्ठा, ताक अशा खास मराठी चवींची पेय मिळतात, पण इतर पेय म्हणजे नवे प्रयोगच. नागपूर डेअरी नावाचा संत्र्याचा रस, क्रिम आणि हेझलनटचं कॉम्बिनेशन घ्या किंवा पेरुचा चटका नावाचं पेरुचं ज्यूस मिरे आणि मीठ लिंबाचं मिश्रण घ्या, चव एकदम हटकेच. गोड चवींपेक्षा शीतपेयांना चटकदार चव देण्याचा शेफचा प्रयत्न मॉकटेल्समध्ये प्रामुख्यानं जाणवतो. तिखट आंबा, टिवळ, पेरु चटका अशी तिखट शीतपेयं चवबदल देतात. डेझर्टस किंवा गोड पदार्थांमध्येही शेफने चांगलेच प्रयोग केलेत. पण नावांवरुन मात्र ते बिलकुल लक्षात येत नाही. मेन्यूकार्डातली नावं वाचली, तर मोदक, हलवा, खरवस, पुरणपोळी, मस्तानी अशी खास मराठी गोड पदार्थांचीच नावं दिसतात. पण मागवलेली मस्तानी मात्र पुढे आली ती एखाद्या इंटरनॅशनल डेझर्टच्या दिमाखात.

mastani

आधी एका बाऊलमध्ये अननसाचे छोटे काप आणि जेली आणून ठेवली गेली आणि वेटरनी चमच्याने तीनही जिन्नस किंचित एकत्र केले, त्यावर किटलीने पायनॅपल मस्तानी टाकली गेली आणि अशा पसरट बाऊलमधल्या मस्तानीचा मग आपण स्वाद घ्यायचा. असा हा रॉयल मराठी खाद्यसफरीचा गोड शेवट. त्यानंतरही एक छोटंसं सरप्राईज येतं ते बिलापूर्वी, पानाचा डबा वगैरे आहे की काय असा विचार करत असताना, सुपाच्या चमच्यात जेलीसारखा पदार्थ येतो, चमचा तोंडाच घातल्यावर कळतं की ती जेलीच पानाच्या चवीची आहे आणि सोबतीला चेरीचीही चव.

paan jelly

ठाण्यात गेल्या काही वर्षात ‘मेतकूट’ नावाच्या मराठी पदार्थांच्या रेस्टॉरन्टने ठाणेकरांची चांगलीच पसंती मिळवलीय, त्यांचाच नविन आणि भव्य दिव्य प्रयोग म्हणजे काठ आणि घाटचा युनिक अनुभव आहे. पाचपाखाडीच्या सर्विस रोडवरचं हे रेस्टॉरन्ट महाग या सदरात मोडणारं आहे, पण एरव्ही पंजाबी, चायनिज, कॉन्टिनेन्टल पदार्थांसाठी आणि रेस्टॉरन्टच्या अनुभवासाठी आपण भरपूर पैसै मोजतोच, आपले मराठमोळे पदार्थ खातानाही तसाच आंतरराष्ट्रीय अनुभव येत असेल तर पैसा सोडायला खरंच हरकत नाही. मात्र काठ आणि घाट म्हणताना शाकाहारी पदार्थांची रेंज वाढवण्याची मात्र गरज आहे, कारण महाराष्ट्राच्या घरोघरच्या स्वयंपाकघरांमध्ये कितीतरी युनिक शाकाहारी रेसिपीज दडलेल्या आहेत, त्यांचाही थोडा समावेश व्हावा. मेन्यू तयार करताना खरं तर काठ आणि घाटमध्ये खूप मेहनत घेतलीय कोशिंबिरींपासून लोणच्यांपर्यंत सगळ्याचा समावेश आहे मेन्यूमध्ये, पण पापड मात्र अगदीच वगळलेत. घरोघरी बायका किती विविध प्रकारचे पापड करतात. त्याचीही झलक इथे असायला हवी. अर्थात मराठमोळ्या वातावरणनिर्मितीला आणि मेन्यूमागच्या कल्पनेला मात्र तोड नाही.

‘जिभेचे चोचले’मधील याआधीचे ब्लॉग :


जिभेचे चोचले: केक चॉकलेट पेस्ट्रीचं रोलिंग पिन

जिभेचे चोचले : पाणीपुरी – ‘तोंडभर’ आनंद जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार


जिभेचे चोचले : मुंबईतलं मिनी दक्षिण भारत : इडली-डोशाचं गाव


जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन


जिभेचे चोचले : कुटुंबसंस्थेचं सेलिब्रेशन


जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची


जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास


जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’


जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती


जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू


जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस


जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’


जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार


जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया ! 


जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट
शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV