जिभेचे चोचले : आस्वादचा ‘आस्वाद’

काही वर्षापूर्वीपर्यंत असं हमखास बोललं जायचं की आपल्या घरी जे पदार्थ केले जातात तेच काय बाहेर जाऊन खायचे, जे होत नाही, आपल्याला जमत नाहीत ते पदार्थ बाहेर जाऊन खायला पाहीजे, म्हणूनच पंजाबी भाज्या, तंदूरमध्ये तयार केले जाणारे पदार्थ, रोटी असं सगळं बाहेर रेस्टॉरन्टमध्ये जाऊन खाल्लं जायचं.

JIbheche chochale : Blog by Bharati Sahasrabuddhe on Aaswad

मराठी पदार्थ दक्षिण भारतीय पदार्थांसारखे बाहेर रेस्टॉरन्ट्समध्ये खाल्ले जात नाहीत, हा समज मोडून काढायचा असेल तर मुंबईतल्या मराठीबहुल भागांमध्ये एक फेरफटका मारावा. गिरगाव, दादर, पश्चिम उपनगरांमध्ये विलेपार्ले आणि त्यानंतर थेट ठाणे, कल्याण आणि डोंबिवली. खास मराठमोळ्या पदार्थांची आणि कितीतरी वर्षांची परंपरा असलेली उपहार गृह दिसतील..सध्याच्या गणपती उत्सवाच्या वातावरणात यांच्यातल्याच सर्वात प्रसिद्ध ठिकाणाबद्दल जाणून घेणं अगदी उचित ठरेल.

मिसळ पाव

मिसळ पाव

काही वर्षापूर्वीपर्यंत असं हमखास बोललं जायचं की आपल्या घरी जे पदार्थ केले जातात तेच काय बाहेर जाऊन खायचे, जे होत नाही, आपल्याला जमत नाहीत ते पदार्थ बाहेर जाऊन खायला पाहीजे, म्हणूनच पंजाबी भाज्या, तंदूरमध्ये तयार केले जाणारे पदार्थ, रोटी असं सगळं बाहेर रेस्टॉरन्टमध्ये जाऊन खाल्लं जायचं. पण गेल्या काही वर्षात मात्र शहरं कॉस्मोपॉलीटन झाली, कुटुंबातल्या महिला नोकऱ्यांमुळे व्यस्त झाल्या आणि अनेक मराठी पदार्थही घरी करण्याच्या यादीतून बाद झाले. मग उकडीचे मोदक, कोथिंबीर वडीसारखे मराठी पदार्थही बाहेर जाऊन खाण्याच्या यादीत आले. अशाच मराठमोळ्या पदार्थांसाठी प्रसिद्ध उपहारगृहांमध्ये दादरची काही नावं ठळकपणे घेतलं जातं..मग शिवाजी पार्कातलं जिप्सी, प्रकाश, पणशीकर आणि सेनाभवन चौकातलं ‘आस्वाद’.

Aaswad 4

वडापाव

इतर मराठमोळ्या उपहारगृहांपेक्षा बैठक व्यवस्था आणि पदार्थांच्या बाबतीत सोफेस्टीकेडेट असलेलं मराठी उपहार गृह म्हणजे दादरचं ‘आस्वाद’. दोन वर्षापूर्वी तर या उपहारगृहाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला जेव्हा आस्वादची मिसळ ही जगातील सर्वाधिक रुचकर शाकाहारी पदार्थ म्हणून निवड झाली… खरं तर मिसळ हा महाराष्ट्राचा सर्वात लाडका पदार्थ, कारण मुंबईत वडापावची क्रेझ असली तरी मिसळचे चाहते मात्र महाराष्ट्रात सर्वत्र आहेत… बरं प्रत्येक शहरातल्या प्रसिद्ध मिसळींची प्रत्येकाची वेगळी यादी असते. पण मुंबईतल्या लाडक्या मिसळींमध्ये जवळपास सगळ्यांच्याच यादीत ‘आस्वाद’ असणार एवढं नक्की..  अर्थात पुरस्कारप्राप्त मिसळ हे काही ‘आस्वाद’ मधलं एकमेव आकर्षण नाही.. मुंबईकरांचा लाडका वडापावही इथली एक स्पेशालिटी आहे.. हा वडापाव सर्व्ह करण्याची पद्धतही एकदम युनिक..कुठल्या प्लेटमध्ये न येता हा ‘आस्वाद’ चा भलामोठा वडापाव कागदी चौकोनी प्लेटमध्ये सर्व्ह केला जातो..दादरमध्ये इतर अनेक प्रसिद्ध वडापाव असतानाही आस्वाद चा वडापाव कायम डिमांडमध्ये असतो.. तसंच इतर खास मराठी पदार्थ पोहे, कोथिंबीर वडी, लोण्याच्या गोळ्याबरोबर सर्व्ह केलं जाणारं थालिपीठ हे सगळे पदार्थ ही सुद्धा आस्वादची ओळख. पण खरी गंमत आहे ती जेवणाच्या मेन्यूमध्ये. भरली वांगी, डाळींबीची उसळ, पिठलं आणि भाकरी यांच्या जोडीला तिथे मिळतात दोन पदार्थ डाळभात आणि वरणभात..मेन्यूकार्डात हे दोन पदार्थ पाहून पहिला प्रश्न पडतो तो वरण भात नावाचा पदार्थ उपहारगृहात नक्की कशा पद्धतीने येणार आपल्या पुढ्यात असा, पण हा पदार्थ अर्डर केल्यावर मात्र सुखद धक्का बसतो.. दोन मुदी भात, त्यावर गोडं वरण, बरोबर एका वाटीत गोडं वरण, तर दुसऱ्या वाटीत कढी, कुरडया, लोणचं, लिंबू आणि करंजी असा हा वरण भाताचा थाट आणि त्यावर साजूक तूपाची धार. अर्थात किमान वरण भात तरी घरचा खावा असं काही लोक म्हणतील, पण एरव्ही घाईघाईत घरी अशा शाही पद्धतीने वरण भाताचा आस्वाद कुठे घेता येतो असा विचार करुनच कदाचित लोक आस्वादमधल्या वरण भाताचा ‘आस्वाद’ घेत असावेत.. अगदीच बाहेर जेवायला गेल्यावर वरणभात नको असेल तर इथला मसालेभातही टेस्टी असतो.

थालिपीठ

थालिपीठ

मराठी पदार्थांबरोबर मराठी पेय ही सुद्धा ‘आस्वाद’ ची खासियत. पियुष हा खास मुंबईतला श्रीखंडसारखा, पण जरासा पातळ पदार्थ तर आस्वादला गेल्यावर चुकवायलाच नको..सोलकढी, ताक, कैरीचं पन्हं, लस्सीशिवाय विविध प्रकारचे मिल्कशेकही आस्वादला जेवायला गेलेले खवय्ये नक्कीच ट्राय करतात.

खास मराठी पदार्थांसाठी आस्वाद प्रसिद्ध आहेच, पण इथे अनेक प्रकारचे डोसे, उत्तपे, सॅण्डविचेस, पावभाजीचे हवे तेवढे प्रकार एवढंच नाही तर अगदी पिझ्झासुद्धा मिळतो..डोशाचे तर उडप्यांच्या हॉटेलातही मिळणार नाहीत इतके प्रकार आस्वाद च्या मेन्यू कार्डात आहेत..त्यामुळे मराठी पदार्थ खायला गेल्यावर इतरही पदार्थ चाखण्याची इच्छा झाल्यास उत्तम पर्याय इथे उपल्ब्ध आहेत. अर्थात या इतर पदार्थांपेक्षा खवय्ये इथल्या मराठी पदार्थानाच झुकतं माप देतात.

Aaswad 3

पुरणपोळी आईस्क्रिम

पारंपरिक मराठी पदार्थ चाखायचे तर आस्वाद ला पर्याय नाही हे जरी खरं असलं तरी आस्वादमध्येही प्रयोग करुन पारंपरिक पदार्थांचं मॉडर्न रुप खवय्यांसमोर आणलं जातं, या कडीतले त्यांचे सर्वात भन्नाट दोन  पदार्थ म्हणजे पुरणपोळी आईस्क्रीम आणि मोदक भाजी. पुरणपोळीच्या चवीचं आईस्क्रीम हा तर कल्पनाही करता येणार नाही असा जबरदस्त पदार्थ..पुरणपोळीच्या सारणाच्या चवीचं हे आईस्क्रीम आणि त्यासोबत पुरणाचं पातळ गोडसर चवीचं डीप..एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा खावंसं वाटावं असा हा पदार्थ.  तितकाच वेगळा पदार्थ मोदक भाजी..नावात मोदक असलं तरी गोड नसलेला हा पदार्थ..तिखट सारण भरुन तळलेले मोदक टोमॅटोच्या चमचमीत ग्रेव्हीत सोडलेले असतात. अशी ही आंबट तिखट मोदक भाजी, भाकरी, पोळी किंवा पुरीबरोबर चविष्ट लागते. उकडीचे मोदक किंवा प्रसादाचे तळलेले मोदक खाण्याची सवय असलेल्या आपल्यासारख्यांना हा तिखट बदल खरंच सुखावून जातो. पण असे हे प्रयोग चाखण्याचं धाडस एखाद्याला करायचं नसल्यास पारंपरिक गोड पदार्थांचे पर्याय अस्वाद देतंच. श्रीखंड, खरवस, पुरणपोळी, आमरस, मोदक असे खास मराठमोळे गोड पदार्थ तर चुकवायलाच नको. पण डेझर्ट म्हणता येतील अशी कॅरॅमल कस्टर्ड, फ्रुटसॅलड, फ्रुटसॅलड विथ जेली, रसगुल्ले यांची चवही लोकांना भूरळ घालते.  तेव्हा पारंपरिक मराठी पदार्थ आणि मराठी पदार्थ विथ ट्विस्ट असा दुहेरी अनुभव घेण्यासाठी ‘आस्वाद’ हा उत्तम पर्याय आहे आणि हो, अवॉर्ड विनिंग मिसळ तर मिस करायलाच नको…

वरण भात थाळी

वरण भात थाळी

 

संबंधित ब्लॉग

जिभेचे चोचले : स्पेशल सिझलरसाठी ‘फुड स्टुडियो’

जिभेचे चोचले : ‘फ’ से फ्यूजन… ‘फ’ से फूड

जिभेचे चोचले : ढाब्याची आठवण – चौबारा 601

जिभेचे चोचले : ग्लोबल एशियन फ्युजन

जिभेचे चोचले : हम काले है मगर… आईस्क्रीमचा भन्नाट फ्लेवर

जिभेचे चोचले : महाराष्ट्राचा काठ आणि घाट

जिभेचे चोचले: केक चॉकलेट पेस्ट्रीचं रोलिंग पिन

जिभेचे चोचले : पाणीपुरी – ‘तोंडभर’ आनंद

जिभेचे चोचले: पावभाजी – विथ लव्ह फ्रॉम मुंबई

 जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार

जिभेचे चोचले : मुंबईतलं मिनी दक्षिण भारत : इडली-डोशाचं गाव

जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन

जिभेचे चोचले : कुटुंबसंस्थेचं सेलिब्रेशन

जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची

जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास

जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’

जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती

जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू

जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस

जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’

जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार

जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया ! 

जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट 

News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:JIbheche chochale : Blog by Bharati Sahasrabuddhe on Aaswad
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published: