जिभेचे चोचले : मुंबईतलं मिनी दक्षिण भारत : इडली-डोशाचं गाव

जिभेचे चोचले : मुंबईतलं मिनी दक्षिण भारत : इडली-डोशाचं गाव

मुंबई खऱ्या अर्थाने कॉस्मोपॉलिटन शहर आहे, इतकं वैविध्य असलेलं शहर जगात खचितच दुसरं नसेल, मराठी लोकांच्या या मुंबईचं प्रत्येक उपनगर म्हणजे एक वेगळा प्रदेश आहे.. आता जुन्या मुंबईत पारशांचं बाहुल्य त्यामुळे पारसी खाद्यपदार्थांची चव चाखता येईल अशी ठिकाणं त्याच भागात सापडतील इतरत्र नाही, घाटकोपर हा खास गुजरात्यांचा एरिया त्यामुळे गुजरात्यांसाठीची खास व्हेज रेस्टॉरन्ट्स तिथे मोठ्या प्रमाणात. तर दादर, पार्ले अशा खास मराठी भागांमध्ये वडापावपासून पुरणपोळीपर्यंत सगळ्या मराठी पदार्थांची रेलचेल..या मराठमोळ्या दादरला खेटून असलेलं माटुंगा म्हणजे सर्वार्थाने अफलातून उपनगर....मुंबईतल्या शिक्षण क्षेत्राचा केंद्रबिंदू म्हणजे हा माटुंग्याचा परिसर, रुईया, पोतदार, वेलिंगकरसारखी प्रसिद्ध कॉलेजेस या भागात आहेत.

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीसारखी जगप्रसिद्ध शिक्षणसंस्थाही अगदी हाकेच्या अंतरावर. कितीतरी नामवंत शाळासुद्धा माटुंग्यात किंवा त्याच्या आजुबाजुच्या परिसराचं महत्त्व वाढवतात.. अर्थात ही झाली माटुंग्याची एक ओळख, पण दुसरी ठसठशीत ओळख म्हणजे इथे रुजलेली दक्षिण भारतीय संस्कृती. माटुंगा स्टेशनमधून बाहेर पडल्यावर लगेचच खास दक्षिण भारतीय पद्धतीचे हार टांगलेली फुलांची दुकानं, मसाल्यांची दुकानं पाहिली की क्षणभर चेन्नई वगैरेसारख्या शहरात फिरत असल्याचा भास होतो. मुंबईत वसलेलं मिनी दक्षिण भारतच जणू. कारण स्टेशनच्या रस्त्यावर पुढे गेल्यावर सुरु होते ती दक्षिण भारतीय पदार्थांच्या हॉटेलांची रांग..प्रत्येक रेस्टॉरन्टमध्ये जबरदस्त चवींचे इडली, डोसे, मेदूवडे, उत्तपम, रस्सम आणि सांबार मिळणारच पण त्यातही प्रत्येक रेस्टॉरन्टची एक वेगळी खासियत..गम्मत म्हणजे स्टेशन ते किंग सर्कल चौक एवढ्या एका रस्त्यावर साधारण दहा बारा रेस्टॉरन्टस आहेत, पण दिवसाच्या कुठल्याही वेळेला गेलं तरी यातल्या प्रत्येकाबाहेर किमान अर्धातासाचं वेटींग दिसणार हे नक्की. बरं यातील प्रत्येक रेस्टॉरन्टची वर्षानुवर्षाची एक वेगळी परंपरा, ती कायम राखूनच इथे चवदार पदार्थ वाढले जाणार.

थाळी व्यवस्था असलेलं सर्वात जुनं रामा नायकचं श्रीकृष्ण डायनिंग सोडलं, तर इतर सगळ्या ठिकाणी टिपीकल दक्षिण भारतीय इडली, वडे, डोसा, उत्तपम असेच पदार्थ प्रामुख्याने मिळतात. पण प्रत्येक ठिकाणची स्पेशालिटी मात्र वेगळी.. या सगळ्यामध्ये सगळ्यात जुनं आहे ते कॅफे म्हैसूर, प्रत्येक पदार्थाला ट्विस्ट देण्याची फॅशन असलेल्या या काळातही जुन्या पद्धतीने तयार केले जाणारे ठराविक पदार्थच इथे मिळतात, पण दर्दी खाणारे इथे गर्दी करतात ते इथल्या खोट्टो इडली नावाच्या पारंपरिक पदार्थासाठी. केळीच्या पानात गुंडाळलेला लाडुसारखा गोलाकार गोळा म्हणजे ही खोट्टो इडली..सांबार आणि चटणीबरोबर सर्व्ह केली जाते.

KHOTTO IDLI

डोशाचेही रवा डोसा वगैरे प्रकारसुद्धा इथे मिळत नाहीत, खायचा तर पारंपारिक पद्धतीचा डोसा खायचा, अन्यथा त्याच्या शेजारीच आणखी एक पर्याय आहे, रामा नायक नावाच्या उडुपी हॉटेलाचा... इथलं मेन्यू कार्ड बऱ्यापैकी मोठं..डोसा उत्तपमचे तर अनेक प्रकार इथे मिळतात, चिज डोसा, पेपर डोसा पासून तर रवा डोसा, ओनियन रवा डोसापर्यंत 30-40 प्रकारचे डोसे इथे खाता येतात, पण खऱ्या अर्थाने रामा नायकची स्पेशालिटी आहे ती त्यांचं रस्सम.. हॉटेलात पाय ठेवल्या ठेवल्या मेन्यूकार्डालाही हात लावायच्या आधी वडा रस्समची ऑर्डर एकमद कम्पलसरी.. आणि वडाही खायचा नसेल तर केवळ रस्समही ऑर्डर करता येतं, आपल्या कटींग चहाच्या ग्लासात लोक इथे फुरक्या मारत चक्क रस्सम पितात.

FILTER COFEE

इतर ठराविक पदार्थांबरोबरच जरा वेगळे पदार्थही इथे मिळतात पण मी आधी सांगितल्याप्रमाणे त्यांचे नियम आणि त्यांच्या परंपरा सांभाळून.. म्हणजे दक्षिण भारतीय मसाले घालून केलेला पनीर मसाला आणि पराठा असा पदार्थ केवळ शुक्रवारी आणि रविवारी मिळतो, इतर दिवशी मात्र पनीर मसाल्याच्या जागी व्हेज कोर्मा मिळतो.. इडली, वडे, डोसे यांच्यावर यथेच्छ ताव मारल्यावर रामा नायकचा दहीभातही अनेकांना आवडतो.

IDLI POLI

अर्थात आधी सांगितल्याप्रमाणे 10 – 12 रेस्टॉरन्ट्स इथे असले आणि सगळेच अतिशय प्रसिद्ध आणि वर्षानुवर्ष तूफान चालणारेच असले तरीही सगळ्यात प्रसिद्ध, अगदी मुंबई शहरातल्याही इतर हॉटेलांच्याही तुलनेत अधिक पॉप्युलर अशी दोन रेस्टॉरन्ट्स म्हणजे किंग सर्कलला एका कोपऱ्यात असलेलं कॅफे मद्रास आणि माटुंगा स्टेशनसमोरच्या रस्त्यावरचं हॉटेल रामाश्रय.

CAFE MADRAS

या दोन्ही ठिकाणी पोचल्यावर फक्त काय खायचं हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला असतो, बाकी तो पदार्थ कधी मिळणार, आपण कुठे बसायचं, कुणाबरोबर बसायचं यातली कुठलीही गोष्ट आपल्याला ठरवता येत नाही.. एखाद्या मंदिरातल्या भंडाऱ्याच्या जेवणासाठी रांगेत उभं राहतो तसं इथे रांगेत उभं रहायचं, जिथे जशी जागा होईल तशी आपल्याला अॅडजेस्ट केलं जातं, कधीकधी आपल्याच टेबलवर दुसरा कुणीतरी बसून आधी खातच असतो, त्याच्या शेजारी उरलेल्या जागेत आपला नंबर लागतो, ऑर्डर दिली की दोन मिनिटात मागवलेला पदार्थ हजर, तो भराभर खायचा आणि जागा रिकामी करुन द्यायची, उगीच टाईमपास वगैरे इथे चालतच नाही..असा सगळा प्रकार सहन करुनही अक्षरश: शेकडो लोकं इथे खायला येतात यावरुनच त्यांच्या चवीची कल्पना येऊ शकते.

कॅफे मद्रासचा डोसा तर मुंबईतला सर्वात चांगला डोसा म्हणूनच प्रसिद्ध आहे, कुठल्याही फुड चॅनलवर मुंबईची ओळख म्हणून सर्वात आधी कॅफे मद्रासचा डोसा दाखवला जातो. साधा डोसा, म्हैसूर मसाला, रवा डोसा यांच्याबरोबरच इथे काही स्पेशल डोसे मिळतात, एखाद्या तासाचा प्रतीक्षा झाल्यावर कॅफे मद्रासमध्ये जागा मिळाली असेल तर तिथला सेट डोसा, मुगाच्या डाळीचा पेसरेटू, नाचणीचे रागी डोसा, नीर डोसा, उडलुंडु डोसा अशा विचित्र नावाचा डोसा आणि खवय्यांचा फेवरेट असलेला तुप्पा डोसा (भरपूर तुपाने माखलेला) न खाता बाहेर पडणं म्हणजे गुन्हा आहे. कॅफे मद्रासच्या मेन्यूकार्डात इतरही बरेच पदार्थ आहेत, अगदी अप्पमपासून अवियल (केरळी भाजी) पर्यत अनेक पदार्थ इथे मिळतात, पण खऱ्या अर्थाने खवय्ये इथे जातात ते इथल्या डोशांसाठीच.

IDIYPPAM

कॅफे मद्रासला मेन्यूकार्ड तरी दिलं जातं, किमान तीस चाळीस पदार्थांची नावं तरी दिसतात, पण रामाश्रयला मात्र मेन्यूकार्ड वगैरे प्रकारच नाही.. दोन फळ्यांवर लिहीलेला मोजके पाच सहा पदार्थ म्हणजे इथला मेन्यू बस्स..इडली, वडा, बिसीबेळी भात, आणि डोशाचे ठराविक प्रकार, मागवलेला पदार्थही थेट --स्टीलच्या थाळीत येणार..कुठलाही वेगळा प्रयोग नाही किंवा डेकोरेशन नाही, फक्त आणि फक्त चव..त्यातही इथला सांबार आणि बिसीबेळी भात चाखायला कितीही तास उभं राहण्याची खवय्यांची तयारी असते..या दोन्ही ठिकाणी जाणं म्हणजे फॅमिली आऊटिंग वगैरेचं समाधान मुळीच मिळणार नाही. केवळ चवदार खाण्याचं समाधान मिळवायचं असेल तर मात्र कॅफे मद्रास आणि रामाश्रयसारखी दुसरी जागा नाही.

MINI IDLI

या पारंपरिक रेस्टॉरन्ट्सच्या बरोबरीत स्पर्धा करणारं पण जरासं मॉडर्न अशा रेस्टॉरन्टचा पर्याय हवा असेल तर मात्र माटुंगा स्टेशनसमोरच्या आर्य भवनलाच जायला पाहीजे.. इथे दक्षिण भारतीय पदार्थांबरोबरच पावभाजीसारखे ऑलटाईम फेवरेट पदार्थही मिळतात आणि काही युनिक पदार्थही इथे खाता येतात..सगळीकडे नेहमीच न मिळणारे दक्षिण भारतीय. पदार्थ म्हणजे जाळीदार गोल अप्पम आणि पांढऱ्या रंगाचं स्ट्यु (स्ट्यु म्हणजे नारळाच्या दुधात भाज्या घालून केलेला पदार्थ) इथे मिळतं..चटणी आणि आप्पेही खाता येतात, पण चुकवू नये असे दोन पदार्थ म्हणजे इडियप्पम – साध्या भाषेत सांगायचं तर चकलीसारख्या यंत्रातून पाडलेल्या नारळाच्या चवीच्या शेवया म्हणजे इडियप्पम, किंवा पांढरे नुडल्स म्हणता येईल त्यांना.. सांबार आणि स्टुबरोबर सर्व्ह केल्या जातात आणि दुसरा आर्य भवन स्पेशल पदार्थ म्हणजे रवा बिस्कीट..

RAWA DOSA

छोट्या छोट्या पाच सहा रवा डोशांमध्ये पिझ्झ्यात वापरल्या जाणाऱ्या भाज्या आणि चिज भरलेलं असतं..वरचं कव्हर कुरकुरीत असतं म्हणून हे बिस्कीट, पण चवीला जबरदस्त..तसंच खास केरळचा पदार्थ म्हणून प्रसिद्ध असलेला मलबारी पराठाही इथे ताव मारणाऱ्यांचा फेवरेट पदार्थ आहे. या चार पाच ठिकाणांशिवाय मणिज् लंच होमसारखी स्पर्धेत जराशी मागे पडलेली आणि इडली हाऊससारखी केवळ इडलीचे प्रकार मेन्यूत असेली ठिकाणंही माटुंग्याच्या या भागाची शान आहेच.

MALBARI PARATHA

खरं तर माटुंग्यातलं प्रत्येक रेस्टॉरन्ट युनिक आहे, पण कुठल्याही ठिकाणी जा, पायनॅपल, चॉकलेट अशा वेगवेगळ्या फ्लेवरचा शिरा आणि दुरुनच जिचा सुगंध नाकात भरतो अशी फिल्टर कॉफी मात्र यांच्यातला कॉमन दुवा..प्रत्येक ठिकाणी हे दोन पदार्थ टॉप क्लासच मिळणार.

PINAPLE SHIRA

इतर पदार्थांच्या बाबतीत मात्र प्रत्येक ठिकाणची चव वेगळी, सांबार वेगळं, रस्सम वेगळं आणि ते ही अतिशय कमी किमतीत..ही सगळी ठिकाणं खिशाला खूपच परवडणारी. आजुबाजुच्या कॉलेजेसची मुलं म्हणूनच तर या पदार्थांवरच जगतात. खऱ्या खवय्याने तर प्रत्येक ठिकाणची चव एकेकदा चाखायलाच हवी..काही न खाता सकाळी सकाळीच या पदार्थांवर ताव मारायला माटुंगा गाठलेलं कधीही जास्त चांगलं.

'जिभेचे चोचलेमधील याआधीचे ब्लॉग :

जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन


जिभेचे चोचले : कुटुंबसंस्थेचं सेलिब्रेशन


जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची


जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास


जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’


जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती


जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू


जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस


जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’


जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार


जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया ! 


जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV