BLOG: डिलाईल रोडवरील कुलभूषण अडकला पाकिस्तानच्या कचाट्यात!

BLOG: डिलाईल रोडवरील कुलभूषण अडकला पाकिस्तानच्या कचाट्यात!

मुंबईच्या कुलभूषण जाधवचं नाव सध्या देशभरात चर्चेत आहे. पाकिस्ताननं कुलभूषणला भारतीय गुप्तचर यंत्रणेचं एजंट ठरवलं आहे. कुलभूषण नाव आता जरी चर्चेत आलं असलं तरी त्यांच्या कुटुंबीयांचं नाव याआधी देखील चर्चेत आलं होतं. कुलभूषणचे लहानपणीचे मित्र, त्याचे शाळकरी मित्र आणि शेजाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या कुटुंबीयांची आणि त्याची कहाणी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो.

 

परळच्या डिलाईल रोडशी कुलभूषणचं नातं:

 

कुलभूषणचे वडील सुधीर जाधव आणि काका सुभाष जाधव हे दोघेही मुंबई पोलिसात कार्यरत होते. दोघंही पोलिस अधिक्षक म्हणून निवृत्त झाले. पण दोघांच्या विचारसरणीत बराच फरक होता. कुलभूषणचे वडील सुधीर जाधव यांची प्रतिमा एक इमानदार पोलीस अधिकाऱ्याची होती. त्यांनी आपल्या कारकीर्दीत कधीच वाद ओढावून घेतला नाही. डिलाईल रोडवर आज जिथं क्राईम ब्राँच युनिट 3चं कार्यालय आहे त्याच्याच जवळ असणाऱ्या पोलीस वसाहतीत पहिल्या मजल्यावर सुधीर जाधव यांचं घर होतं. सुधीर जाधव यांचे मराठीतील सामाजिक, सांस्कृतिक आणि कला जगतातील लोकांशी चांगले संबंध होते. यामुळे अनेक प्रतिष्ठित लोकांचा वावर त्यांच्या घरी कायम असायचा. याच ठिकाणी कुलभूषण आपल्या आई-वडील आणि बहिणीसोबत राहत होता.

 

कुलभूषणचे काका म्हणजेच सुधीर जाधव यांचे भाऊ सुभाष जाधव हे त्यांच्यात घरासमोरील असणाऱ्या पृथ्वीवंदन या खासगी इमारतीत राहत होते. 28 सप्टेंबर 2002 साली कार अपघातप्रकरणी सलमान खानला अटक करण्यात आली. त्यावेळी अनेक टीव्ही चॅनलनं दाखवलं होतं की, सुभाष जाधव यांनी सलमानला आरोपीसारखं नाही तर आपल्या कुटुंबातील नातेवाईक असल्यासारखं अटक केलं होतं. त्यांच्या या कृत्यावरुन तेव्हा बराच वाद झाला होता. पण 2002च्या आधी म्हणजेच 10 वर्षापूर्वी 1992-93 मध्ये सुभाष जाधव यांची प्रतिमा अशी नव्हती. सुरुवातीला पोलीस निरीक्षक म्हणून सुभाष जाधव यांची पोस्टिंग दक्षिण मुंबईतील एल. टी मार्ग पोलीस ठाण्यात होती. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत झवेरी बाजार परिसर येत होता.

 

झवेरी बाजार परिसरात सुभाष जाधव यांची बरीच दहशत होती. पण त्यांना तेवढा मानही होता. असं सांगितलं जातं की, जाधव जेव्हा कधी एखाद्या चोराला पकडायचे तेव्हा त्याला बरीच मारहाण करायचे. त्यानंतर त्याला बेड्या ठोकून झवेरी बाजारच्या जुम्मा मस्जिद ते मुंबादेवी मंदिर परिसरातील रोडवर फिरवायचे. ‘मी चोर आहे, मी चोर आहे.’ असं चोराला जोरजोरात ओरडायलाही लावायचे. त्यावेळी आजसारखे मोबाईल कॅमेरा आणि सोशल मीडिया नव्हता. नाहीतर, त्यांच्या या सिंघम स्टाईलमुळे ते अडचणीतही आले असते. जाधव यांचा या परिसरात बराच दरारा होता. सुभाष जाधव यांनी झवेरी बाजारातील अनेक चोरांचा त्यांच्या स्टाईलनं बंदोबस्त केला होता. पण ते त्यावेळेस कधीही वादात अडकले नव्हते. काही वर्षानं त्यांची बदली वांद्रे पोलीस ठाण्यात झाली. त्यावेळी चोरीच्या आरोपात एका युवकाला अटक करण्यात आली होती. या अटकेमुळे सुभाष जाधव यांच्यावर बरीच टीका झाली होती. त्यावेळी सहआयुक्त वाय. सी. पवार हे होते. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार त्यांच्याकडे करण्यात आली होती. युवकाला चुकीच्या पद्धतीनं अटक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. याप्रकरणी पवार यांनी सुभाष जाधवांना बरंच सुनावलं होतं. बराच वेळ पवारांचं बोलणं ऐकून घेतल्यानंतर जाधव हे केबिनमधून बाहेर पडले आणि त्यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त एम. एन. सिंह यांच्याकडे पवार यांची तक्रार केली. त्या तक्ररीनंतरही जाधव आणि पवार यांच्यामध्ये वाद झाले होते. त्यानंतर काही महिन्यांनी पवार निवृत्त झाले आणि सुभाष जाधव यांचं पोलीस अधिक्षक म्हणून वांद्रे पोलीस ठाण्यात प्रमोशन झालं.

 

सुभाष जाधव यांना रायबन आणि माणिक  ही दोन मुलं आहेत. रायबननं कायद्या शिक्षण घेतल्यानंतर वकीली पेशा स्वीकारला. पण माणिक मात्र त्याच्यासारखं काही करु शकला नाही.

 

कुलभूषणचं घरं सुटलं पण मैत्री तुटली नाही…

 

कुलभूषणचे वडील सुधीर जाधव यांनी निवृत्तीनंतर डिलाईल रोडवरील पोलीस वसाहतीतील घर सोडलं. त्यानंतर ते कुटुंबासह पवईतील फ्लॅटमध्ये राहण्यास गेले. तर सुभाष जाधव हे देखील निवृत्तीनंतर शिवाजी पार्क परिसरात राहायला गेले. त्यामुळे कुलभूषण आता डिलाईल रोड भागात राहत नव्हता. पण तरीही त्याचं मन याच परिसरात अडकलं होतं. कारण की त्याचं संपूर्ण बालपण इथं गेलं होतं. कुलभूषणला त्याचे मित्र ‘भूषण’ म्हणून हाक मारायचे. छोट्या मुलांसाठी तो ‘भूषण दादा’ होता. भूषण फुटबॉलचा चाहता होता. जवळच्या मैदानात अनेकदा मित्रांसोबत तो फुटबॉलही खेळायचा. मित्रांची साथ हेच सारं काही त्याच्यासाठी होतं. जेव्हा एनडीएमध्ये त्याची पासिंग आऊट परेड झाली त्यावेळी त्यानं डिलाईल रोडवरील आपल्या सर्व मित्रांना तिथं नेलं होतं. ड्यु़टीवर रुजू झाल्यानंतर जेव्हा तो सुट्टीत यायचा तेव्हा-तेव्हा तो डिलाईल रोडवरील मित्रांना न चुकता भेटायचा. एकदा ट्रेनिंगमधून सुट्टी मिळाल्यानंतर कुलभूषणनं आपल्या सर्व मित्रांना काश्मीरमध्ये फिरण्यासाठी बोलावलं होतं.

 

चला मित्रांनो, लष्करात जाऊयात…

 

भूषणचे मित्र शुभ्रतो मुखर्जी यांच्या मते, भूषणच्या मनात देशभक्तीविषयी तीव्र भावना होती. त्यासाठीच त्यानं नौदलात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. कारण की, त्याला देशाची सेवा करता येणार होती. जेव्हा-जेव्हा तो  सुट्टीत घरी यायचा त्या-त्यावेळी आपल्या मित्रांना आपल्या नोकरीतील रोमांचक किस्से सांगायचा आणि लष्करात सामील होण्यासाठी प्रेरित करायचा.

 

मदतीला धावणारा कुलभूषण!

 

कुलभूषण नौदलात काम करत होता. तिथं तुमचा थेट संबंध शत्रूशी असतो. अशावेळी तुमच्या प्रचंड हिंमत असणं गरजेचं आहे. ती हिंमत भूषणमध्ये नेहमीच होती. पण नोकरीच्या बाहेरही त्याच्यातील हिंमत नेहमी दिसून यायची. भूषणचा एका मित्र तुलसीदासच्या मते, एकदा भूषण डिलाईल रोडवरील आपल्या मित्रांना भेटायला आला होता. त्यावेळी मित्रांसोबत भटकत होता. त्याचवेळी त्याची नजर फुटपाथवर पडलेल्या एका वृद्ध भिकारी महिलेकडे गेली. त्या महिलेच्या डोक्याला जखम झाली होती. ती जखम ऐवढी गंभीर होती की, त्यामध्ये किडे पडू लागले होते. असह्य वेदनेनं ती अक्षरश: ओरडत होती. शरीराला सुटलेल्या दुर्गंधीमुळे तिथून जाणाऱ्या अनेकांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. पण त्या वृद्ध महिलेची ती अवस्था पाहून कुलभूषण यांचं हृदय पिळवटून निघालं. त्याने तात्काळ त्या महिलेला हातानं उचललं आणि आपल्या गाडीत टाकून तिला रुग्णालयात नेलं. भूषण दाखवलेल्या या हिंमतीनं परिसरातील लोकांमध्ये त्याच्याविषयीचा आदर आणखी वाढला.

 

जेव्हापासून कुलभूषणच्या फाशीची बातमी समोर आली आहे तेव्हापासून त्याचे मित्र खूपच बैचेन आहेत. तो सलामत राहावा यासाठी त्यांनी देवाचा धावा सुरु केला आहे. गुप्तहेर म्हणून शत्रू राष्ट्रात पकडला गेल्यानंतर त्याचे काय हाल होतात हे सरबजीत प्रकरणानं दिसून आलं आहे. त्यामुळे भूषणचे मित्र त्याच्या सुटकेसाठी सरकारकडे मदत मागत आहेत.

 

First Published: Tuesday, 11 April 2017 6:06 PM