खान्देश खबरबात : 'उमवि'त डॉ. पी. पी. पाटील यांची सन्मानाने एन्ट्री

खान्देश खबरबात : 'उमवि'त डॉ. पी. पी. पाटील यांची सन्मानाने एन्ट्री

संपूर्ण शिक्षण जगताचे लक्ष लागलेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सहाव्या कुलगुरुपदी प्रा. डॉ. पी. पी. पाटील यांची निवड कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी जाहीर केल्यानंतर दि. २६ ऑक्टोबरला त्यांनी अत्यंत सन्मानाने कुलगुरु पदाची सूत्रे स्वीकारली. उमवित त्यांच्या स्वागत समारंभाला उमविचे पहिले कुलगुरू प्रा. डॉ. एन. के ठाकरे व माजी कुलगुरु प्रा. डॉ. के. बी. पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमात उमविची वाटचाल व पुढील दिशेच्या संदर्भात उत्तमपणे विचार मंथन झाले.

कुलगुरु प्रा. डॉ. पाटील यांच्या नियुक्तीमुळे उमवितील बहुतांश अधिकारी तथा कर्मचारी वर्ग तथा जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षण संस्थाचालक, प्राध्यापक वर्ग आनंदून गेला आहे. सण-उत्सवाच्या वातावरणात तसेच दीपावलीच्या शुभमुहूर्तावर अनेक अरिष्टे दूर होतात असे संकेत आहेत. त्याच मुहूर्तावर उमवि अंतर्गत वातावरणातील बदल हाही सर्वांना निश्चित सुखावणारा आहे. म्हणूनच प्रा. डॉ. पाटील यांच्या स्वागतासाठी उमवितील प्रत्येक कर्मचारी व अधिकारी प्रवेशद्वाराजवळ रांगा करुन उभा राहिला आणि टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले.
Khandesh-Khabarbat-512x395
प्रा. डॉ. पाटील हे सौम्य, शांत स्वभावाचे मात्र, वक्तशीर व कडक शिस्तीचे आहेत. त्यांनी उमवित पहिले कुलगुरु प्रा. डॉ. एन. के.ठाकरे यांच्यासोबत लेक्चरर म्हणून कार्य सुरू केले. त्यानंतर विविध कामांची, पदांची जबाबदारी पार पाडत ते आजपर्यंत उमवितच कायम राहिले. उमविचे नॅक अंतर्गत दोनवेळा मुल्यांकन झाले. पहिल्यांदा ते त्या समितीचे सचिव होते व नंतर अध्यक्ष होते. इतर ठिकाणी चालून आलेल्या संधीही त्यांनी स्वीकारल्या नाहीत. यापूर्वीही त्यांना कुलगुरू होण्याची संधी चालून आली होती. परंतु, त्यांनी तेव्हा अर्ज केला नाही. यावेळी मात्र, अनेक गोष्टी जुळून आल्या. समाजातील काही मान्यवरांनी प्रा. डॉ. पाटील यांना कुलगुरुपदाची संधी घेण्याची विनंती केली. याचा चांगला व सकारात्मक परिणाम म्हणूनच प्रा. डॉ. पाटील हे आज कुलगुरुपदी विराजमान झाले आहेत.

उमवितील यापूर्वीच्या पाचही कुलगुरुंनी आपापल्या कार्याचा निश्चित असा ठसा उमटविला आहे. प्रत्येकाची स्वतंत्र कार्यशैली होती. त्याचे मूल्यांकन करताना निश्चितपणे डावे-उजवे ठरविता येत असले तरी प्रत्येकाच्या पारड्यात उमविच्या कामकाजाच्या प्रगतीच्या अनेक गोष्टी निश्चितच जास्त दिसतात. अलिकडे उमविला ग्लोबल चेहरा देण्याचा प्रयत्न सर्वच पातळ्यांवर उत्तमपणे झाला आहे. अशा पार्श्वभूमीवर उमविला अधिक गुणवत्तापूर्ण करणे व बदलत्या काळातील रोजगाराभिमुख अभ्याक्रम सुरू करण्याचे कार्य प्रा. डॉ. पाटील यांना करावे लागणार आहे.

प्रा. डॉ. पाटील यांनीही स्वागताच्या उत्तरादाखल केलेल्या भाषणात आपल्या मनातील काही विचार मोकळेपणाने मांडले. कोणत्याही विद्यापीठाची गुणवत्तेची शक्ती ही तेथील विद्यार्थ्यांवर अवलंबून असते. हाच मूलभूत विचार लक्षात घेवून प्रा. डॉ. पाटील म्हणाले, उमवि आणि महाविद्यालयांमधील समन्वयासाठी आंतरसंवाद कक्षाचा प्रयत्न केला जाईल. अशा प्रकारच्या संवाद कक्षातून महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन, अनुदाने, समुपदेशन व विकास विषयक उपक्रमांचे नियोजन करणे शक्य होईल. महाविद्यालयीन शिक्षणात कौशल्याधारित शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे, हे लक्षात घेवून विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास केंद्राचा विचारही त्यांनी बोलून दाखविला.

विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे अनेक लहान-मोठे प्रश्न असतात. काही समस्या अथवा सूचना असतात. त्या वेळच्यावेळी सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ द्यावा म्हणून आठवड्यातून अर्धा दिवस विद्यार्थ्यांसाठी राखीव व अर्धा दिवस महाविद्यालयांमधील प्राध्यापक तथा उमवि परिसरातील प्राध्यापकांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेणार असल्याचे प्रा. डॉ. पाटील म्हणाले.

प्रा. डॉ. पाटील यांच्या नियुक्तीचा आनंद व समाधान सर्वचस्तरातील घटकांमध्ये दिसत आहे. प्रा. डॉ. पाटील यांनी विद्यापिठ विकास मंडळाच्या (बीसीयूडी) संचालकपदी प्रा. डॉ. पी. पी. माहुलीकर यांची नियुक्ती केली आहे. प्रा. डॉ. माहुलीकर यांच्या कार्यशैलीचे अनेक पैलू उमवित कार्यक्षम प्रशासन निर्माण करु शकतात. शिक्षण संस्थाचालक, प्राध्यापक, विद्यार्थी, उमविचे कर्मचारी, अधिकारी आणि समाजातील विविध संस्था यांच्या वर्तुळात प्रा. डॉ. पाटील यांच्या वक्तशीरपणा व शिस्तबद्ध कार्याची चर्चा आहे. त्याच्या या कार्यशैलीचा लाभ उमविला गुणात्मक व गतिशील दर्जा वाढविण्यासाठी निश्चित होईल हा विश्वास आहे.

खान्देश खबरबातमधील याआधीचे ब्लॉग :


खान्देश खबरबात: उसनवारीच्या पालकमंत्र्यांमुळे प्रशासन खिळखिळे... !!!

खान्देश खबरबात: मुख्यमंत्री जळगावसाठी उदार झाले...

खान्देश खबरबात: खान्देशात डेंग्यूचा कहर

खान्देश खबरबात : सारंगखेडा फेस्टिव्हल

खान्देश खबरबात : जळगावच्या राजकारणात अस्वस्थ खामोशी!

खान्देश खबरबात : खान्देशी काँग्रेस गलितगात्र

खान्देश खबरबात : गाईंना कत्तलखान्यात पाठवणारे कोण असतात?

खान्देश खबरबात : पोषण आहार घोटाळ्याचे रॅकेट

खान्देश खबरबात : वैद्यकीय सेवा महागणार, IMA चा इशारा

खान्देश खबरबात : पर्यटन विकासाला संधी

खान्देश खबरबात : पावसाची पाठ, शेतकरी चिंतेत

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV