खान्देश खबरबात : सारंगखेडा फेस्टिव्हल

By: दिलीप तिवारी, पत्रकार | Last Updated: Monday, 3 October 2016 4:02 PM
खान्देश खबरबात : सारंगखेडा फेस्टिव्हल

कधीकाळी दत्ताची यात्रा आणि घोडेबाजार असा पारंपरिक चेहरा असलेली सारंगखेडा (जि. नंदुरबार) येथील जत्रा आता सारंगखेडा चेतक फेस्टीवलचे रुप घेवून येत आहे. मागील वर्षापासून हा फेस्टीवल सुरू झालेला असून यावर्षी व्यापार, उद्योग, कृषी, युवक, क्रिडा, कला आदी विविध क्षेत्रांशी संबंधित रंगारंग कार्यक्रम घेवून सारंगखेडा फेस्टीवलचे नियोजन केले आहे.

 

Sarangkheda 3

 

खान्देशात पूर्वीच्या काळी जवळपास प्रत्येक गावात ग्रामदैवताची जत्रा भरत असे. देवाचा रथ, पालखी, उत्सव, किर्तन, तमाशा, संसारोपयोगी वस्तुंची दुकाने, खाद्यपदार्थांची दुकाने असे या जत्रांचे रुप असे. पंचक्रोशितील शेतकरी, कष्टकरी समाज या जत्रेत हजेरी लावत असे. अगदी तसाच पारंपरिक चेहरा सारंगखेडा जत्रेचा होता. मात्र, या जत्रेत भरणारा घोडे बाजार हे जत्रेतील उलाढालीचे मुख्य आकर्षण होते. कारण दुचाकी ते चारचाकी वाहनांच्या किमतीप्रमाणे घोड्यांच्या किमती असतात. त्यामुळे या बाजारातील उलाढाल लाखोंच्या आसपास जात असे. जत्रेचे हे वैशिष्ट्य आता महोत्सवात रुपांतरित झाले असून व्यवसाय-व्यापार याचे गणित जमून महोत्सव पर्यटकांसाठीही आकर्षण ठरला आहे. सारंगखेडा चेतक फेस्टीवल यावर्षी दि. १३ ते २७ डिसेंबरला साजरा होणार आहे. सारंगखेडा फेस्टीव्हलमध्येही यावर्षी भाविकांच्या हजेरीचा आकडा ५० लाखांच्या पार जाईल असा अंदाज आहे. ही यात्रा जवळपास महिनाभर सुरू असते. मुख्य कार्यक्रम १५ दिवस असतात.

 

Sarangkheda 7

 

सारंगखेडा येथे महानुभाव संप्रदायाचे एकमुखी दत्ताचे मंदिर आहे. हा दत्त कृष्णावतारातील आहे. त्यामुळे महानुभाव संप्रदायासोबत कृष्णाला दैवत मानणारा भाविक वर्ग येथे देशभरातून येतो. हाच भाविक आता ग्राहक व पर्यटक म्हणून कसा येथे येईल आणि या परिसरातील अर्थकारणाला त्याचा लाभ होईल ? याचा विचार करुन सारंगखेडा चेतक महोत्सव २०१६ चे नियोजन केले आहे. यासाठी  प्रसाद सेवाभावी आणि ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष जयपालसिंग रावल तथा मुन्नादादा यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

 

Sarangkheda 6

 

यात्रेच्या मूळ ३० दिवसांपैकी १५ दिवसांसाठी रंगारंग कार्यक्रमांचे आयोजन हे या वर्षाचे वैशिष्ट्य आहे. यात्रेचा प्रारंभ दि. १३ डिसेंबर, दत्त जयंतीला होईल. दि. १४ डिसेंबरला सारेगामा फेम ज्ञानेश्वर मेश्राम व कार्तिकी गायकवाड यांचा भजनसंध्या कार्यक्रम होईल. दि. १५ डिसेंबरला खास महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम होईल. टीव्ही वरील कार्यक्रमांचे सुप्रसिद्ध सूत्रसंचालक आदेश बांदेकर हे या कार्यक्रमाचे संचालन करतील. फेस्टीव्हलमधील लक्षवेधी दिवस असेल दि. १६ डिसेंबर. त्या दिवशी प्रो कबड्डीपटू शब्बीर बापू यांच्या उपस्थितीत कबड्डीचे सामने होतील.

 

Sarangkheda 8

 

यावर्षी महोत्सवातील कार्यक्रमांचा कळस असेल खानदेश रत्न पुरस्कारांचे वितरण. हा मेगा इव्हेंट दि. १७ डिसेंबरला होणार आहे. खानदेशच्या मातीत उद्योग, व्यापार, कला, व्यावसायिक, सामाजिक आणि राजकारण क्षेत्रात लक्षवेधी यश मिळवणाऱ्या मान्यवरांना खानदेश रत्न पुरस्कार दिले जातील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, विप्रोचे सीईओ अजिम प्रेमजी, भारतरत्न लता मंगेशकर आदींना निमंत्रण दिले आहे.

 

Sarangkheda 2

 

या फेस्टीव्हलमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी व माहितीसाठी खास तीन दिवस कृषीमेळा आयोजित केला आहे. दि. १६ ते १९ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या मेळात शेतीशी संबंधित विविध उद्योजक, व्यापारी सहभागी होतील. मेळ्याचे उद्घाटन राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल व खासदार डॉ. हिना गावित करतील. कृषी मेळात शेतीसंबंधित आधुनिक अवजारे व तंत्रज्ञान यांचे स्टॉल्स असतील. दि. १९ डिसेंबरला महाराष्ट्रासह बाहेरच्या मल्लांसाठी कुस्त्यांची दंगल होईल.

 

Sarangkheda 4

 

या फेस्टीव्हलमधील खरे आकर्षण घोड्यांशी संबंधित कवायत शो, नृत्य आणि धावण्याची स्पर्धा होतील. दि. १८ डिसेंबरला हॉर्स शो, दि. २० डिसेंबरला हॉर्स डान्स व दि. २३ डिसेंबरला हॉर्स रेस होईल. दि. २१ व २२ डिसेंबरला किर्तन जुलबंदी हा अनोखा कार्यक्रम होईल.

 

सारंगखेडा यात्रेत येणाऱ्या भाविकांचा वर्ग लक्षात घेवून यावेळी दि. २२ ते २५ डिसेंबर दरम्यान ऑटो एक्सपो आयोजित करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन अनुक्रमे पर्यटनमंत्री जयकुमार रावल व खासदार डॉ. हिना गावित करतील.

 

Sarangkheda 1

 

दि. २४ डिसेंबरला सैराटफेम आर्ची व परशा, तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक नागनाथ मंजुळे यांच्या उपस्थितीत युवा फेस्टीव्हल होईल. दि. २४ डिसेंबरला लावणी महोत्सव होणार आहे. यात सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर तथा वर्षा संगमनेरकर सहभागी होतील. दि. २५ व २६ डिसेंबरला पशू मेळा होणार आहे. त्यात जनावरांच्या खरेदी-विक्री व माहिती मिळेल.

 

Sarangkheda 5

 

डिसेंबर २०१६ मध्ये साजरा होणारा सारंगखेडा फेस्टीव्हल हा अशा प्रकारे अनेक उद्योग, व्यापार, व्यवसाय आदींना आपली माहिती, उत्पादने लोकांपर्यंत पोहचविण्याची संधी देणारा असणार आहे. त्यामुळे त्यात सहभागी होवून प्रचार-प्रसिद्धीची अनोखी संधी उपलब्ध होत आहे. मल्हार कम्युनिकेशन्स जळगाव हे त्याचे नियोजन करीत आहेत. (संपर्क फोन ०२५७ – २२६४३८०, ८१, ८२ मोबाईल ९३७००७७३११)

खान्देश खबरबातमधील याआधीचे ब्लॉग :

First Published: Monday, 3 October 2016 4:02 PM