घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!

By: कविता महाजन, लेखिका | Last Updated: Wednesday, 19 October 2016 7:58 AM
घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!

आत्म्याचा शृंगार हा शब्दप्रयोग कधी ऐकलाय? देह शृंगारणे तर प्राचीन आहे, पण आत्मा? आदिवासी प्रदेशांत फिरताना अनेक निराळ्या गोष्टी ऐकायला मिळतात आणि डोळ्यांना दिसतात देखील! त्यातलीच ही एक गोंदण्याची गोष्ट होती. इतकी वेदना सहन करत शरीरावर नेमकं कशासाठी गोंदून घ्यायचं असा मुलभूत प्रश्न मला पडला होता. कुणाचा अख्खा चेहरा गोंदलेला, कुणाची अख्खी पाठ, हात – पाय, गळा, छाती गोंदवलेले…. अगदी एकीने तर कमरेचं वस्त्र बांधलं जाण्याची जी निश्चित जागा असते, त्या रेषेवर प्रियकराचं नाव गोंदून घेतलं होतं. पूर्ण वस्त्रं त्या उतरवत नाहीत कधीच, दुसरं गुंडाळत आधीचं उतरवलं जातं; त्यामुळे ही जागा इतकी खासगी असते की तिथं काय गोंदले आहे याचा नवऱ्याला देखील पत्ता लागत नाही.

इली ओझिल गोदली बांहां

इज्जत गेली मरजद गेली

घांडी दे महां रे

– असं म्हणण्याचं धाडस करणारी एखादीच… की, अगं गोंदणारनी, तू माझ्या हातावर माझ्या प्रियकराचं नाव लिहून दे. माझ्या मैत्रिणी मला चिडवतील, नातेवाईक अब्रूचं खोबरं केलं म्हणून चिडतील; पण मला त्यांची पर्वा नाही. कारण एकदा का हे नाव माझ्या हातावर गोंदलं गेलं की माझा प्रियकर मला कधीच सोडून जाऊ शकणार नाही; तो कायम माझ्यासोबत राहील. मृत्यूनंतर देह जाळला तर सारे कपडेलत्ते, सारी आभूषणंही जळतात; पण गोंदण कधीच जळत नाही; कारण ते आत्म्याचा शृंगार असतं!

 

kavita mahajan blog 1

 

ही स्त्रियांची खासगी, पावित्र्याचं प्रतीक असलेली गोष्ट असते. जिच्या अंगावर जास्त गोंदलेलं असेल, तिचं माहेर तितकं अधिक श्रीमंत; त्यामुळे तिला सासरी जास्त मान. अख्खं शरीर गोंदवायचं तर टप्प्याटप्प्याने ते गोंदवण्यात एखाद्या बाईला किमान २५ ते ३० वर्षं लागतात. भाळगोंदण वयाच्या ८ ते १२ वर्षांत करतात. भिवयांच्या मधोमध इंग्रजी व्ही आकाराची ‘चूल’ गोंदवली जाते. तिच्या दोन्ही बाजूनी तीन – तीन बिंदू. दोन उभ्या रेषा आणि शेवटी एकेक आडवी रेष.

 

kavita mahajan blog 2

 

पाठगोंदण पंधरा-सोळाव्या वर्षी. मग मांडी. ही विवाहापूर्वीच गोंदवली गेली पाहिजे, अशी अट असते. त्यानंतर नितंब आणि कंबर. मग हात, दंड. शेवटी छाती. ही मात्र विवाहानंतरच गोंदतात. स्तनांचा भाग वगळून पूर्ण छाती व गळा गोंदवला जातो. सर्वात जास्त सहनशक्ती इथंच लागते आणि ती खूप गोंदणे अनुभवून झाल्यावर येत असावी; म्हणून वयाच्या पंचेचाळिशीत – पन्नाशीत स्त्रिया छाती गोंदवून घेतात. गोंदण्याची कारणंही कैक सांगितली जातात. त्यातलं मुख्य कारण असतं आजारांपासून संरक्षण!

बैगा जमातीत एक समजूत अशी आहे की, त्यांनी एखाद्या स्त्रीला देह गोंदवून घेताना चुकून जरी पाहिलं तर ते साधी हरणाची शिकार सुद्धा आयुष्यभर करू शकत नाहीत; त्यांच्यातली ती क्षमताच नष्ट होऊन जाते. गोंदण्याभोवती अशा शेकडो लोकसमजुती आहे. गोंदवताना स्त्रिया मधुर प्रेमगीतं गातात, तो लोकगीतांचा खजिना आहे आणि अर्थातच अनेक लोककथा देखील आहेत.

या लोककथांमधली सर्वात जुनी कथा आहे ती शंकर – पार्वतीची.

छत्तीसगढमध्ये शंकर – पार्वतीने सोळा वर्षं निवास केला. कारण पृथ्वी प्रदक्षिणा करायला सांगितल्यावर कार्तिकेय आपला मयुर घेऊन प्रदक्षिणेला निघाला आणि गणेश मात्र मातापित्याभोवती फेरी मारून पहिला आला व पूजेचा पहिला मान पटकावून बसला. हे समजल्यावर रुसून – रागावून कार्तिकेय छत्तीसगढमध्ये निघून गेला. त्याला मनवून परत नेण्यात शंकर – पार्वतीची सोळा वर्षं गेली.

शंकर – पार्वतीचे भक्त आणि गोंड जमातीचे देवगण अधूनमधून त्यांना भेटायला जात. एकदा शंकर – पार्वतीने या सगळ्यांना जेवण द्यायचं ठरवलं आणि सहकुटुंब आमंत्रित केलं. सगळे पोचले. आदरसत्कार झाले, उत्तम जेवण झालं, मग एकेकजण निरोप घेऊन निघाले. गोंडांच्या देवाची पत्नी इतर स्त्रियांसोबत पाठमोरी उभी होती; त्याने देहयष्टीवरून अंदाज बांधून मागूनच तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला आता परतूया असं सांगितलं. तिनं वळून पाहिल्यावर त्याच्या ध्यानात आलं की, आपण चूक केली; ही आपली पत्नी नाही, ही तर पार्वती!

पार्वती संतापली गेली होती, त्याने तिची कितीदा क्षमा मागितली. अखेर शंकराने झाल्या प्रकारावर मंद स्मित केलं आणि तिची समजूत काढली. पुन्हा असे घोटाळे होऊ नयेत म्हणून स्त्रियांनी देहावर वेगवेगळी चित्रं गोंदवून घ्यावीत, असंही सुचवलं. तेव्हापासून गोंड स्त्रिया गोंदवून घेऊ लागल्या. ती त्यांची स्वतंत्र ‘ओळख’ बनली.

 

फोटो सौजन्य: AP

फोटो सौजन्य: AP

 

मला ही गोष्ट अजून एका कारणासाठी आवडली. एरवी शंकराचं रूप रौद्र आणि पार्वती सौम्य दिसते; इथं ते बरोबर उलट होतं. पत्नीला समजून घेणारा, समजावून सांगणारा आणि दुसऱ्या पुरुषाकडून नकळत झालेली चूक सहजी माफ करणारा हा पती दुर्मिळच. मग त्याच्यासाठी गोंदवून घेताना ‘मनात प्रीत आणि डोळ्यांत पाणी’ आलं तरी हरकत ती काय असणार?

गोदना गोदवा ले मोर रानी

ये गोदना तो पिया के निशानी

मन में पिरीत अऊ आंखी में पानी

गोदना गोदवा ले ये गोदना तो निसैनी सुरग के

सुफल हो जाय जनम जिनगानी

 

(चित्र : कविता महाजन )

 

‘घुमक्कडी’ ब्लॉग मालिकेतील याआधीचे ब्लॉग :

 

घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर…  

घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी

घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये

घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण

घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना

घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!

घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी

घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना

घुमक्कडी : (2) सीतेची तहान

घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई

First Published: Wednesday, 19 October 2016 7:55 AM