घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो...!

By: | Last Updated: > Wednesday, 26 October 2016 8:24 AM
Kavita Mahajan blog Ghumakkadi 12

गोंदण हा खरं तर विस्ताराने लिहिण्याचा विषय आहे. गेल्या लेखात एक गोष्ट सांगितली आणि मग अजून पुष्कळ गोष्टी आठवायला लागल्या. कितीही महागामोलाचं मेकअपचं साहित्य आणून रंगरंगोटी करा… दुसरे दिवशी तुम्हाला स्वत:लाही काल संध्याकाळी लावलेल्या लिपस्टिकची शेड कोणती व कोणत्या रंगाची होती हे आठवणार नाही; इतरांना तर नाहीच नाही. कपडे आणि दागिने फार काही विशेष वेगळे असतील तर आठवतील कदाचित. पण गोंदण मात्र एकदा डोळ्यांत ठसलं की कायम राहतं. अगदी गोष्टीतलं सुद्धा. जी. ए. कुलकर्णींच्या कैरी या कथेतल्या मावशीच्या हनुवटीवरचं हिरवं गोंदण असंच लक्षात राहिलेलं. माझी चित्रकार मैत्रीण शुभा गोखले हिने मनगटावर एक हिरवा रावा गोंदून घेतला आहे… तो तर मला सारखा आठवत असतो. तिच्या ‘नायिका’ या चित्रमालिकेत देखील ‘शुकभाषिणी’ आहेतच.
1

आदिवासी स्त्रियांची गोंदणे पाहिली तर त्या नक्षीचा रंग काहीसा काळपट हिरवा असतो. क्वचित जागी तो ‘हिरवागार’ वा ‘पोपटी’ छटेचा दिसतो. आता आधुनिक साधनांनी गोंदून मिळतं त्यात अनेक रंग आणि अनेक छटा मिळतात, त्यामुळे शहरी स्त्रियांची गोंदणे पाहिली तर या चमकदार हिरव्या – पोपटी छटा दिसतात आणि पोपटांची आठवण करून देतात.

2

मनगटावर पोपट हे कैक प्राचीन शिल्पांमधून दिसणारं दृश्य.

 

एकदा चेन्नईला शेखर नावाचा एक माणूस भेटला. याचा व्यवसाय आहे कॅमेरादुरुस्ती. हा पोपटांसाठी अन्नछत्र चालवतो. त्याच्याकडे रोज सुमारे चार हजार पोपट येतात आणि जेवून जातात. चेन्नईतले लोक त्याला बर्ड मॅन म्हणून ओळखतात. २००४ साली आलेल्या त्सुनामीवेळी त्याने पोपटांचे हाल पाहिले आणि हे काम सुरू केलं. कमाईचा चाळीस टक्के हिस्सा या पोपटांना खाऊ घालण्यात जातो. आपल्या घराच्या लहानशा गच्चीत चिमण्या आणि खारी येतात म्हणून हा माणूस त्यांच्यासाठी कधी भात, कधी धान्य ठेवायचा. त्सुनामीच्या वेळी काही पोपट तिथं अन्नाच्या शोधात आले. मग हळूहळू ही संख्या वाढतच गेली. आता लांब मोठ्या लाकडी फळ्या तो गच्चीवर ठेवतो. त्यावर रोज सकाळी भात ठेवतो. शेकडो पोपट तिथं रांगेत बसून निवांत जेवू शकतात. अर्थात कधी चिमण्या, खारी, कबुतरं असे इतर लोकही येतात तिथं; पण पोपटांच्या हिरव्या झळाळीपुढे ते काय दिसणार? शेखर म्हणतो, “एकवेळ मी उपाशी राहिलो तरी चालेल, पण यांच्या जेवणाची वेळ मी चुकू देत नाही.”

3

हे एका मैत्रिणीला सांगत होते, तर तिने एक दुसरीच हकीकत सांगितली. ती गोष्ट होती पोपट नावाच्या भिकाऱ्याची. आता कुणाला कशावरून काय आठवावं याची खात्री देता येत नसतेच. तर तिने सांगितलं, “मी गुजराथमध्ये भूजला गेले होते. तिथं शिवमंदिराबाहेर एक वेडसर माणूस जवळपास चाळीसेक वर्षं भीक मागत बसायचा. तो अखंड वटवट करायचा म्हणून लोकांनी त्याचं नाव पोपट ठेवलं होतं. मंदिरात सकाळी दर्शनाला जायचा तेव्हा दर्शनानंतर तिथले एक पुजारी मौनीबाबा  त्याला चहा प्यायला द्यायचे. हातात असतील तेवढे पैसे तिथं ठेवून तो पुन्हा भीक मागायला बसायचा. या पैशांचा मौनीबाबांनी व्यवस्थित हिशेब ठेवला. ते तब्बल एक लाख पंधरा हजार झाले, तेव्हा त्यातून पोपटच्या नावाने एक चबुतरा बांधला. त्यात पक्ष्यांना अन्न देण्यासाठी वाडगे बांधलेले आहेत.”

4

एकदा हेमलकसा इथं प्रकाश आमटे यांच्याकडे गेले होते. बोलताना देणग्यांचा विषय निघाला. ते म्हणाले, “एकदा एका गृहस्थाने निवृत्तीनंतर मिळालेली मोठी रक्कम देणगी म्हणून दिली. मात्र त्यांची मुख्य अट होती की, यातले पाच पैसेही माणसांसाठी वापरायचे नाहीत. सर्व पैसे केवळ पशुपक्ष्यांवर खर्च करायचे. इतका काय माणसांचा वाईट अनुभव होता त्यांना कोण जाणे?”
आम्ही हसलो. माणसं किती वाईट असतात याचा अंदाज माणूसजातीचेच असल्याने आम्हाला होताच.

प्रवासात अनेक पक्षी, प्राणी दिसतात. त्यात सहज दिसणारी माकडं आणि पोपटांचे थवे कॉमन. पोपट मोरांपाठोपाठ लोकप्रिय. दागिन्यांत, साड्यांच्या काठापदरांवर, चोळीच्या बाहीवर, तळहाती रेखाटलेल्या मेंदीत… किती तऱ्हांनी सापडतात. लोकगीतं, लोककथा, बोधकथांमध्ये बोलके असल्याने ते हमखास असतातच; पण किस्से, कहाण्या आणि ‘ज्योक्स’मध्ये देखील असतात. प्रेमकविता, लावण्या लिहिणाऱ्यांचा तर तो आवडता पक्षी असावा इतके आढळतात. बहुतेक सर्व भारतीय भाषांमधल्या म्हणींमध्येही त्यांना स्थान आहेच.

मला या सगळ्या लोकसाहित्यात सर्वात जास्त लक्षात राहिलं ते म ठाकर या आदिवासी जमातीतलं एक लहानसं लोकगीत. त्यात एक कोडं आहे –
पाणी नाही पाऊस नाही रान झालं हिरवं

कात नाही चुना नाही तोंड झालं लाल हो

आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…

पहिल्या दोन ओळी इतरत्रही ऐकलेल्या होत्या पूर्वी… लोकगीतं वाऱ्यावर पसरत जात असतातच कुठून कुठे… पण तिसरी ओळ नवी होती. पहिल्या दोन ओळींचं उत्तर ठाऊक होतं – ‘पोपट.’

पण तिसरीचा काही अर्थ लागेना. हार पत्करली तेव्हा शहरातल्या शिकल्या-सवरलेल्या या बाईला आपण हरवलं म्हणून घोळक्यानं जमून मला गाणी देणाऱ्या बायका खिदळत हसल्या. मग एकीनं उत्तर दिलं, “तिन्ही ओळी एकाच कोड्याच्या आहेत, तर उत्तर एकच असणार ना?”

मी म्हटलं, “उलगडून सांगा नीट. मला अजूनही कळलेलं नाहीये.”

तर हे आदिवासींचं बारकाईने केलेलं किंवा आपसूक झालेलं म्हणूया जंगलनिरीक्षणाचं फलित होतं. पोपटीणबाईला पिल्लं होतात, तेव्हा तिची पिसं जून होऊन गळतात. काही काळाने नवी, तजेलदार हिरवी पिसं पुन्हा तिच्या अंगाला फुटू लागतात खरी; पण त्याआधीच तिची पिल्लं हिरव्यागार पिसांनी मस्त माखून गेलेली असतात. पोपटीणबाईच्या आधी तिची पिल्लं हिरवी होणं म्हणजेच आईच्या आधी लेकीला न्हाण येणं!

ऐकून मी त्यांना थेट साष्टांग दंडवत घातला. आता शिक्षा होतीच… दिवसभर रान तुडवून आलेली असले तरी आता पाय दुखताहेत असं शब्दानेही न म्हणता त्यांच्यासोबत रात्रभर नाचावं लागणार होतं. मी आनंदाने ही शिक्षा भोगायला तयार झाले…

टिपरं घरां, सन्मुख दारां, नाय राहवं मालं एकल्याला…            

गात गात आम्ही फेर धरून नाचत होतो. मनातला रावा माझ्या मनगटावर येऊन बसला होता.

 

‘घुमक्कडी’ ब्लॉग मालिकेतील याआधीचे ब्लॉग :

घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!

घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर…  

घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी

घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये

घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण

घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना

घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!

घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी

घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना

घुमक्कडी : (2) सीतेची तहान

घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई

First Published: