घुमक्कडी : २२. त्यांना दुसरे हृदय दे, वा मला वेगळी भाषा!

घुमक्कडी : २२. त्यांना दुसरे हृदय दे, वा मला वेगळी भाषा!

बायबलमध्ये ‘टॉवर ऑफ बॅबेल’ नावाची एक गोष्ट आहे. कोणे एके काळी माणसं एकच भाषा बोलत होती, त्यांच्यात सुसंवाद आणि एकवाक्यता होती. माणसांनी स्वर्गापर्यंत पोहोचणारा एक मनोरा बांधायला घेतला. तो पूर्ण झाला तर संकट ओढवेल हे जाणून देवांनी पृथ्वीवर गोंधळ निर्माण करण्याचं ठरवलं. प्रत्येक माणसाच्या कानात त्यांनी काही सांगितलं आणि त्यामुळे सगळ्यांच्या भाषा वेगळ्या बनल्या. एकाचे दुसऱ्याला कळेना. ही माणसं एका जागची विखरून जगभर पांगली. त्यांच्यात वाद, विसंवाद, भांडणे, युद्धं होऊ लागली. एकोपा संपला.

1

मेघालयातल्या एका लोककथेची सुरुवात अशीच आहे. त्यात केवळ माणसांचीच नव्हे तर पृथ्वीवरच्या तमाम सजीव-निर्जीवांची आणि अगदी वारे, पाऊस, आग, उन्हं, जलाशयं, डोंगर इत्यादिकांची देखील ‘एकच भाषा’ होती, असं म्हटलं आहे.

गोष्ट अशी आहे -

कोणे एके काळी सगळे एकाच भाषेत बोलत असत.

तेव्हा एक खासी जमातीमधले एक राजा-राणी राज्य करीत होते. मूलबाळ नाही म्हणून ते दु:खी होते. मात्र एकेदिवशी त्यांना, राणी गरोदर असल्याची आनंदाची बातमी मिळाली. बाळंतपणाच्या वेळी तिच्यासोबत माहेरचं कुणी असावं म्हणून राणीच्या बहिणीला बोलावून घेण्यात आलं.

पण राणीच्या बहिणीला राणीचा मत्सर वाटू लागला. राजा-राणी आनंदात आहेत हे काही तिला बघवेना. राणीला तिळी मुलं झाली. दोन मुलगे आणि एक मुलगी. राणीच्या बहिणीनं त्या तिन्ही बाळांना एका टोपलीत ठेवलं आणि टोपली नदीच्या पाण्यात वाहवून दिली.

मग ती रडत रडत राजाकडे गेली आणि म्हणाली,"माझी बहीणच कमनशिबी आहे. तिनं मानवी मुलं जन्माला न घालता तीन भयानक नाग जन्माला घातले आहेत. हे नाग इतके विषारी असतात की त्यांचं विष कुणा माणसाच्या वा प्राण्याच्या डोळ्यांत गेलं तर ते तीव्र वेदनेने किंचाळत आंधळे होतात. त्यामुळे मी त्यांना जंगलात सोडून आले आहे.

राजा-राणीने तिच्यावर विश्वास ठेवला. ते बिचारे दु:खात बुडून गेले.

नदीतून वाहत जाणारी टोपली एका माणसाला मिळाली. त्यानं या तिन्ही मुलांना वाचवलं.

मुलं नदीकाठी जंगलात पशुपक्ष्यांशी बोलत, गात, खेळत आनंदात वाढली. सगळे सोबत आनंदात राहत होते.

एके दिवशी जंगलात त्यांना एक अनोळखी माणूस भेटला. तो म्हणाला, "या जंगलात इतके तऱ्हातऱ्हाचे पक्षी राहतात, पण इथल्या नदीत मला तो एक उच्च स्वरात सत्य कहाण्या गाणारा पाणपक्षी काही दिसतच नाहीये. त्याला शोधून आणलंत, तर तुमचं आयुष्य बदलेल."

दोघं भाऊ दोन दिशांना पाणपक्षी शोधायला गेले. तीनचार महिने उलटले तरी ते काही परत आलेच नाही.

मग त्यांची धाकटी बहीण काळजीत पडली. तिने विचार केला की आता आपणच जावं आणि भावांसह त्या पाणपक्ष्यालाही शोधावं. ती होडी घेऊन निघाली. तिने अनेक नद्या, अनेक पर्वत पार केले.

2

एका नदीच्या मध्यावर आल्यानंतर तिला एक म्हातारा भेटला. तिने त्याला उच्च स्वरात सत्य कहाण्या गाणाऱ्या पाणपक्ष्याविषयी विचारलं.

तो म्हणाला, "असा पाणपक्षी आहे खरा. पण तो तुला अशा जागी मिळेल, जिथे नदी आणि आकाश वेगवेगळे ओळखू येत नसतील. दरीतून वाहतंय ते नदीचं स्फटीकशुभ्र पाणी आहे की धवल ढग खाली उतरून आलेत हे समजणार नाही. सगळं एकसमान शुभ्र दिसेल. तिथेच तुला त्याला आणायला जावं लागेल."

ती म्हणाली,"माझे भाऊ देखील त्याला शोधण्यासाठी गेले आहेत, पण ते परत आले नाहीत. त्यांचाही मला शोध घ्यायचा आहे."

म्हातारा म्हणाला,"त्यांना तो मिळूच शकत नाही. कारण ते पुरुष आहेत. पाणपक्षी केवळ एखाद्या स्त्रीलाच आकाश धुंडाळून मिळू शकतो."

मग त्याच्या सांगण्यानुसार ती एका खडकावर चढून गेली आणि शिखरावर जाताच आकाशात अदृश्य झाली. ती परत आली, तेव्हा तिच्या हातात पाणपक्षी होता.

म्हाताऱ्याने सांगितलं,"आता त्याच्या पंखांमधलं पाणी पर्वतांमधून शिंपडत जा. या पाणपक्ष्याला आणायला जे जे आकाशापर्यंत जाण्याची धडपड करत होते, ते सगळे कोसळून मरून पडले. त्यांच्यात तुझे दोन्ही भाऊ देखील तुला सापडतील.

ती त्या सगळ्या प्रदेशांत पाणी शिंपडत फिरली. सगळे जिवंत झाले. त्यात तिचे दोन्ही भाऊही जिवंत झाले. त्यांना घेऊन ती घरी परत आली.

घरासमोरच्या तळ्यात तिनं त्या उच्च स्वरात सत्य कहाण्या गाणाऱ्या पाणपक्ष्याला ठेवलं. त्याच्याकडून ते दररोज निरनिराळ्या सत्यकहाण्या ऐकू लागले. त्याची ख्याती सर्वदूर पसरली. राजा-राणीच्या कानावरही गेली.

मग राजा -राणी उच्च स्वरात सत्य कहाण्या गाणाऱ्या पाणपक्ष्याकडून कहाणी ऐकण्यासाठी जंगलात आले. मुलं कामात मग्न होती. उच्च स्वरात सत्य कहाण्या गाणाऱ्या पाणपक्ष्यानं राजा-राणीला पाहून त्यांच्या तिन्ही मुलांचीच गोष्ट गाऊन सांगायला सुरुवात केली. राणीच्या बहिणीने कसं खोटं बोलून धोका दिला आणि मुलांना नदीत सोडून दिलं, हेही वर्णन करून सांगितलं. राजा-राणीच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. मग पाणपक्षी म्हणाला,"ही तिन्ही तुमची तीच मुलं आहेत... ज्यांना नदीनं, जंगलानं, पशुपक्ष्यांनी वाढवलंय."

राणीनं तिघांना आपल्या जवळ घेतलं आणि त्यांना घेऊन ती राजवाड्यात आली. राजाने राणीच्या बहिणीला मोठी शिक्षा सुनावली.

मग धाकट्या मुलीच्या हाती राज्याची सारी सूत्रं सोपवली आणि ते आनंदाने राहू लागले.

पाणपक्षी आजही उच्च स्वरात सत्य कहाण्या गातो. फक्त त्या ऐकण्यासाठी मात्र, जिथे नदी आणि आकाश वेगवेगळे ओळखू येत नसतील. दरीतून वाहतंय ते नदीचं स्फटीकशुभ्र पाणी आहे की धवल ढग खाली उतरून आलेत हे समजणार नाही. सगळं एकसमान शुभ्र दिसेल. तिथेच जावं लागतं. आपली भाषा त्या मूळ सत्यभाषेत विरघळवून टाकावी लागते. एकाच भाषेचे बनलो की सगळ्यांचं सगळं समजून घेता येऊ लागतं.

3

भाषा समजली तर सगळं समजतं, हा आशावाद मला मनापासून आवडतो. प्रियेला आपली भाषा समजत नाही, म्हणून तिला आपलं प्रेमही समजत नसावं; अशा कल्पनेने ‘दुसऱ्या भाषे’ची मागणी करणारा गालिबही अशावेळी आठवतो. आपल्या प्रिय माणसाला घेऊन मेघालयात जावं आणि ढगांमध्ये घुसलेल्या पहाडाच्या शिखरावर बसून त्याच्यासोबत पाणपक्ष्याच्या सत्य कहाण्या ऐकाव्यात... भाषेचा अडसर निघून जाईल आणि प्रेमही समजेल कदाचित.

4

‘घुमक्कडी’ ब्लॉग मालिकेतील याआधीचे सर्व ब्लॉग :


घुमक्कडी (२१) : सतगुरु सिंवरो मोवण्या, जिण ओ संसार उपायो


घुमक्कडी (20): सात जिभांचा अग्नी आणि पुलोमाचे अश्रू


घुमक्कडी : (१९) : जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे!


घुमक्कडी : (१८) : जिवंत होणारी चित्रं


घुमक्कडी : (१७) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ


घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे


घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे


घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!


घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे


घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!


 घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!


घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर…  


घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी


घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये


घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण


घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना


घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!


घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी


घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना


घुमक्कडी : (2) सीतेची तहान


घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई


शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: Ghumakkadi घुमक्कडी
First Published:
LiveTV