घुमक्कडी : (१४.) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!

घुमक्कडी : (१४.) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!

खेचेओपलरी नावाचं एक सुंदर सरोवर पर्वतांनी वेढलेल्या जागी सिक्कीममध्ये आहे. हा शब्द खचेओ आणि पलरी या दोन शब्दांनी मिळून बनलेला असून त्यांचा अर्थ आहे – ‘उडणाऱ्या देवदूताचा महाल.’ सिक्कीममधल्या बहुतांश जागांची नावं अशी काव्यात्म आणि अर्थपूर्ण आहेत. इतकं निवांत, शांत व स्वच्छ वातावरण कवींना इथं मिळाल्याचा हा चांगला परिणाम असणार. तसंही ‘लाचुंग’ म्हणजे ‘लहानसं खोरं’ ही जगभरातल्या लेखकांची लेखनासाठी येऊन निवांत राहण्याची जागाही याच राज्यात आहे. कांचनजंगा शिखर आपल्याला माहीत असतंच, पण त्या नावाचा अर्थ माहीत नसतो बहुतेकांना. ‘महान हिमनद्यांपासून बनलेली पाच शिखरं’ किंवा ‘बर्फाचा उंच पडदा वा भिंत’ म्हणजे कांचनजंगा! इथल्या एका मठाचं नाव आहे पेमायांगत्से, म्हणजे सर्वांत सुंदर कमळ! सात सरोवरांच्या परिसरात हा मठ आहे. एन्चेय म्हणजे ‘एकांत’ मठ. रावांग्ला इथं ताशीदिंग मठात ‘थोंग – वारंग – डोल’ नावाचा एक प्रसिद्ध चोर्टेन आहे, त्याचा अर्थ आहे – ‘एका नजरेत मुक्ती मिळवून देणारा!’ तो ज्या डोंगरावर आहे, त्या डोंगराचा आकार हृद्यासारखा आहे. नामची हे एका पर्वताचं नाव, अर्थ ‘आकाशाइतका उंच!’. तिथं गुरू पद्मसंभव यांची १३५ फुट उंचीची मूर्ती ही जगातली सर्वांत उंच मूर्ती आहे. खुद्द सिक्कीमची अनेक नावं आहेत. लेपचा जमातीचे लोक याला नये-माए-एल म्हणतात; त्याचा अर्थ आहे ‘स्वर्ग!’ लिंबू जमातीचे लोक याला सुक्खिम किंवा सिकहिम म्हणतात, त्याचा अर्थ आहे ‘नवीन घर!’ आणि भूतिया लोक याला बेयमुल डेनझाँग असं म्हणतात, त्याचा अर्थ आहे – ‘तांदळाचं रहस्यमय खोरं!’

सगळ्यांत कमी लोकसंख्येचं आणि आकारमानाचं हे राज्य गोव्यापाठोपाठ लहान राज्य आहे. लहान राज्य असलं तरी सिक्कीम भौगोलिकदृष्ट्या संपन्न आहे. नैसर्गिक सौंदर्य, स्वच्छता आणि राजकीय स्थैर्य या गोष्टींमुळे हे भारतातलं एक प्रमुख पर्यटनस्थळ समजलं जातं. भारतातली अजून काही राज्यं अशी स्वर्गसुंदर आहेत, पण पर्यटक सिक्कीमला ‘सुरक्षित स्वर्ग’ म्हणतात. दुसरं म्हणजे सिक्कीममध्ये सर्वधर्मीय लोक गुण्यागोविंदाने राहतात. हे भारतीय संघराज्यातलं सर्वात शांतताप्रिय राज्य समजलं जातं. साधं गंगटोकला बाजारात गेलं, तर स्वच्छ रस्ता, रस्त्याच्या दुतर्फा हिरवा रंग दिलेली दुकानं, रस्त्यावर कडेला बसण्यासाठी बाकं आणि अधूनमधून चक्क मन प्रसन्न करणारी कारंजी दिसतात.
जुलै ते सप्टेंबर या काळात सिक्कीममध्ये  फिरताना फार छान वाटतं. भरघोस पिकं लहरत असतात. त्यांचा हिरवा रंग हळूहळू सोनेरी होत जातो, त्यावेळी वारा सुटला की वातावरणात सगळीकडे वितळलेल्या सोन्याच्या लाटा लहरताहेत असं वाटतं. रात्री झोपेतही डोळ्यांपुढे अंधार येतच नाही, हे सोनंच तरळत राहतं. खरं सांगायचं तर सोन्याहूनही सुंदर दिसतात ही पिकं. कारण सोनं शेवटी एक धातू... निर्जीव... आणि ही पिकं मात्र सजीव असतात. ही निसर्गाची प्रार्थनाचक्रंच!

ghumakkadi 1

खेचेओपलरीला जाण्यासाठी गाडीवाट आहे, पण डोंगरवाटांनी चालत जाताना जे अनुभवता येतं, ते झुपकन गाडीतून जाऊन दिसणार नसतंच. चालायचं म्हणजे आधी डोंगर उतरावे लागतात, मग जरा विसावून प्रेचू नदीचा खळाळ कानात दागीन्यासारखा लेवून घेतला की पुन्हा चढावे लागतात. दाट हिरवाईने माखलेले डोंगर आणि त्यात जडवलेलं नीलमण्यासारखं नितळ, नितांत देखणं खेचेओपलरी!

ghumakkadi 2

या डोंगराचं नाव आहे ‘शो डझो शो’ म्हणजे ‘ये बाई, बस इथं!’ इथल्या पाण्यात पोहणे, अंघोळी करणे, कपडे धुणे इत्यादी सारं तर सोडाच, त्याला स्पर्श करणं देखील निषिद्ध मानलं जातं. निव्वळ नजरेने भोगायच्या काही गोष्टी असतात, त्यातली ही सर्वोच्च! माणसांसाठी अस्पर्श असल्यामुळे हे स्वच्छ राहिलं असणार हे तर खरंच; पण त्याहून एक नवलाईची गोष्ट या स्वच्छतेमागे आहे. पाणी निवळशंख करणाऱ्या निवळ्या आपल्याला नवलाच्या वाटतात, त्या पाण्यात राहून आपलं काम चोख बजावत असतात.... मात्र खेचेओपलरीला ही जबाबदारी पक्ष्यांनी उचललेली आहे. आजूबाजूला इतकी झाडी आहे, पण सरोवरात एखादं गळून पडलेलं वा वाऱ्याने वाहून आणलेलं साधं बारकं पिवळं पान देखील दिसत नाही, कारण एखादं पान पाण्यावर पडलं रे पडलं की तिथले पक्षी ते चोचीत उचलून घेतात आणि काठावर आणून टाकतात! काल्पनिक वाटाव्यात अशाच या एकेक कथा आहेत.

ghumakkadi 3

इथं प्रार्थना करणाऱ्यांच्या साऱ्या मनोकामना पूर्ण होतात, असं मानलं जातं. त्यासाठी सरोवराकाठी एक प्रार्थनाघाट देखील बांधलेला आहे. आजूबाजूला प्रार्थनाचक्रं आणि पताका लावलेल्या आहेत. रंगीत पताकांनी सरोवराचं सौंदर्य वाढतं आणि भाविकांना त्यामुळे वातावरणाचं पावित्र्य वाढलंय असं वाटतं. एकुणातच सिक्कीम स्वच्छ आहेच, पण इथली स्वच्छता पराकोटीची. कचरा-व्यवस्थापनात सिक्कीमचा देशात पहिला नंबर आहे, तो उगीच नाही. तिथं सिगारेटवरही बंदी आहे.

ghumakkadi 4

सरोवराच्या बाजूने पर्यटकांसाठी उभारलेली झोपडीवजा निवासस्थानं आहेत. तिथं मुक्काम करावा. छांग ही तांदळाची दारू प्यावी; सोबत मोमो, चाऊमीन, वानटोन, फकथू, थुक्पा, फग्शापा आणि चूर्पीसोबत निंग्रो असे स्थानिक पदार्थ खावेत. अजून भूक वाटली तर नुडल्सचे वा-वाई, चाऊमिन, थनथुक, फकथू वानटन आणि ग्याथूक हे प्रकार चाखावेत. जीव सुखी होतो.

खेचेओपलरी हे एक ‘प्राचीन लोकेशन’ आहे. महाभारतातला प्रसिद्ध असलेला धर्मराज – यक्ष संवाद इथंच घडला होता, असं स्थानिक लोक सांगतात.

यक्षाने विचारलेल्या अनेक प्रश्नांमधला एक प्रश्न होता : “सुख आणि शांतता यांचं रहस्य काय आहे?” धर्मराजाने सांगितलं, सत्य, सदाचार, प्रेम व क्षमा यांनी सुख लाभतं; असत्य, अनाचार, घृणा व क्रोध यांचा त्याग हाच शांतीमार्ग होय!

ghumakkadi 5

‘घुमक्कडी’ ब्लॉग मालिकेतील याआधीचे ब्लॉग :


घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे


घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो...!


 घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!


घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर…  


घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी


घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये


घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण


घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना


घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!


घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी


घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना


घुमक्कडी : (2) सीतेची तहान


घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: Ghumakkadi घुमक्कडी
First Published:
LiveTV