घुमक्कडी (२१) : सतगुरु सिंवरो मोवण्या, जिण ओ संसार उपायो

घुमक्कडी (२१) : सतगुरु सिंवरो मोवण्या, जिण ओ संसार उपायो

पाऊस पडावा म्हणून देशभरात अनेकजागी विधिनृत्यं केली जातात. त्यातली आदिवासींची काही नृत्यं मी त्या – त्या भागात पाहिलेली आहेत. पण अग्निनृत्य मात्र कधी पाहिलं नव्हतं. किंबहुना असं काही नृत्य असतं हे मला ऐकूनही माहीत नव्हतं. ते पाहिलं राजस्थानात. देशातलं पर्यटन वाढल्यापासून किंवा काही भागांमध्ये पर्यटन वाढावं म्हणून देखील अशी अनेक प्राचीन विधीनृत्यं धार्मिक स्थळांची चौकट ओलांडून आता ‘स्टेज’वर आली आहेत. विधिगीतं, कथागायन, नृत्यं ही अर्थात त्या त्या काळवेळात, ठरावीक स्थळी, तशाच रंगभूषेसह, त्याच पद्धतीने सादर व्हावीत अशी बंधनं आजही काही कर्मठ लोक घालतात; आपल्या धर्मकृत्यांचे पावित्र्य ते घालवू इच्छित नाहीत आणि यांना केवळ कलेच्या निखळ पातळीवर आणून लोकांच्या मनोरंजनासाठी त्यांचा बाजार मांडणं देखील त्यांना मान्य नसतं. त्यात काही फार चुकीचं आहे, असंही मला वाटत नाही. वारली चित्रकला ज्या वेगाने भ्रष्ट झाली; तिची विद्रूप विडंबने घरोघर व बाजारातही येताजाता दिसू लागली, ते पाहिल्यावर या जेष्ठ लोकांचं म्हणणं पटू लागतं. जात / जमात / धर्म यांचा कडवा अभिमान असणारी माणसं, यात वृद्ध – प्रौढ माणसं अधिक – कलांना व्यासपीठ नाकारतात. तर नव्या पिढीतले काही लोक कला भ्रष्ट होणार नाहीत, याची काळजी घेत; थोड्या तडजोडी करून व्यासपीठावर उतरतात. अग्निनृत्य त्यातलंच.

अग्नीचं तांडव म्हणतात, तसं घरावस्त्यांची राखरांगोळी करणारं नव्हे; माणसांनी केलेलं अग्निनृत्य. जसनाथी नावाचा एक पंथ आहे. या पंथात मृत्युनंतर दहन नव्हे, दफन केलं जातं. सुतक पाळत नाहीत. देवदेवतांची उपासना करत नाहीत. मात्र रोज सकाळी अंघोळ केल्यावर पक्ष्यांना ज्वारी, बाजरी, मटकीचे दाणे खाऊ घालतात. पक्ष्यांना, प्राण्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करतात. जसनाथी पंथाचे बारा धाम आहेत; त्यापैकी बिकानेरपासून ४५ किमी अंतरावर असलेलं कतरियासर हे प्रमुख धाम आहे. तिथं ‘जागरण’ केलं जातं;  अश्विन, माघ आणि चैत्र शुक्ला सप्तमी यापैकी एखादी तिथी निवडली जाते. त्यावेळी हवन, ‘सबद’गान आणि अग्निनृत्य यांचं रात्रीच्या वेळी आयोजन केलं जातं. अग्निनृत्य करण्यामागे जसनाथांची एक चमत्कारकथा सांगितली जाते. लहानपणी ते एकदा पेटवलेल्या शेकोटीत शिरून निखाऱ्यांवर जाऊन बसले. हे पाहिल्यावर त्यांची आई रुपांदे घाबरून धावत तिथं गेली आणि तिनं मुलाला बाहेर काढलं. पाहिलं, तर त्याला यत्किंचितही भाजलेलं नव्हतं. जणू तो स्वत:च अग्नी असल्यासारखा झळाळत होता. जसनाथी सिद्ध त्यामुळे असेच न भाजले जाता अग्निनृत्य करून जसनाथांचे स्मरण करतात.

देशातल्या अनेक जातीजमातींमधली पारंपरिक लोकनृत्ये मी पाहिलेली आहेत. त्यात जो हलकेफुलकेपणा असतो, तो या अग्निनृत्यात अजिबात नाही. विधिनृत्याचं गांभीर्य त्यात आढळतं. ते सहजी भ्रष्ट व्हावं इतकं सोपं, साध्य तर अजिबातच नाहीये.

Blog 1

सुमारे पाचशे वर्षांपासून सुरू असलेले हे जागरण आता लोकोत्सव, पर्यटन महोत्सव यांच्यातही पाहण्यास मिळतं. माती उडू नये म्हणून नृत्यस्थळ आधी पाणी शिंपडून गार केलेलं असतं. दोनेक तास आधीच मध्यभागी हवन करण्यासाठी लाकडं रचून विधीपूर्वक अग्नी प्रज्वलित केला जातो. दर्शक जमून चांगल्या जागा पटकावू लागतात. गायबिये म्हणजेच गायक-वादक तयारीला लागतात. प्रचंड मोठ्या आकाराच्या नगाऱ्यावर पहिला ध्वनी निघतो आणि स्तवन सुरू होते. उंच मंचावर जसनाथांचे चित्र आणि ध्वज लावून त्यासमोर गायक-वादक ‘चंद्राकार’ बसतात. नृत्यासाठी आखलेल्या जागेत नर्तकांशिवाय कुणीही प्रवेश करायचा नसतो. शुभ्र कपडे आणि डोक्यावर केशरी पागोटं अशा पोशाखात नर्तक येतात. गाण्यात अध्यात्म दिसतंच; त्याआडून पृथ्वीवरील सर्व क्षुद्रमहान जीवांना सुरक्षित, संतुलित जीवन जगता यावं आणि प्रत्येकाला आपल्या व्यक्तिगत गुणांचा विकास नैतिक मार्गांनी करता यावा अशी प्रार्थना असते. आधी हवन, मग आरती, नंतर गायनवादन आणि शेवटी नगाऱ्याच्या तालावर अग्निनृत्य असं चार टप्प्यांमध्ये हे जागरण असतं.

आरतीवेळी शंख फुंकले जातात. सबद गाताना राग बदलला हे सुचवण्यासाठी ‘फतै-फतै’चा घोष होतो. सबद गाताना मधूनमधून ‘अरथाव’चा थांबा येतो. हे गाण्याच्या ओळींचे अर्थ सांगणारं सुंदर भावपूर्ण निरुपण.

गायनाची फेरी संपली की नर्तक मैदानात उतरतात. अग्निनृत्य हे एका चांगल्या अर्थाने ‘आगीशी खेळणं’च आहे. ते सुरू होईपर्यंत मैदानाच्या मध्यात निखारे रसरसून पेटलेले असतात. ध्वज आणि नगार्यांना नमन करून नर्तक हवनाभोवती नाचतच चार फेऱ्या मारतात. मग नगाऱ्याच्या थापांनुसार स्टेप्स बदलत नाचतात. एक हात उंचावून, कधी दोन्ही हात जोडून नमस्कार करत, कधी दोन्ही हात आभाळाकडे उंचावत संथ लयीत गिरक्या घेतात. मध्येच जमिनीवर बसतात, मध्येच निखाऱ्यांवर, पुन्हा तीन थापा झाल्या की निखाऱ्यावर उभं राहून नाचायचं... कमालीच्या गिरक्या घेत चाललेलं लयदार नृत्य आपण डोळे विस्फारून पाहत राहतो. नर्तक एखाद्या फुलाप्रमाणे ते तप्त केशरी निखारे हातात घेतात. एखाद्या गोड पदार्थासारखे निखारे  जिभेवर ठेवतात आणि तोंडातून आगीचे फवारे फेकतात. एखाद्या मुलायम लोकरी गालिचावर नाचावं तसं अनवाणी पायांनी निखाऱ्यांवर नाचतात. मंद गतीने सुरू झालेलं नृत्य बघताबघता प्रचंड गतिमान होतं. ताल चुकला तर अग्नी भाजून काढणार, हे निश्चित असतंच; त्यामुळे तन्मयता आणि सजगता यांचं अद्भुत मिश्रण या नृत्यात पाहण्यास मिळतं.

Blog 2

अग्निनृत्य संपल्यावर हवनातले निखारे उचलून मैदानात भिरकावले जातात. त्यांना ‘मतीरा’ म्हणतात. ते कोणत्या दिशेला अधिक पडले त्यावरून या वर्षी पीकपाणी कसं असेल; दुष्काळ पडेल की सुकाळ येईल; याचा अंदाज बांधला जातो. दोन माणसं बैल बनतात, एक गाडीवान आणि काही माणसं धान्याची पोती! यांची एक ‘रचना’ तयार केली जाते. ती न कोसळता व्यवस्थित झाली, तर समृद्धी नांदेल असं मानलं जातं. दुसरे दिवशी हे मंदावलेले, अर्धविझलेले निखारे एकत्र करून लोक राखेसह घरी घेऊन जातात; शेतात टाकतात. मैदान स्वच्छ करून मगच  माणसं पांगतात.

धर्म, जाती, पंथ, कर्मकांडे, अंधश्रद्धा यांत मला रस नाही; मात्र सारेच सरसकट टाकावू नसते, त्यांत अशा अनेक रोचक गोष्टी सापडतात... ज्या कौशल्य, कला यांच्या सोबतीनेच पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश देतात... त्यात सामील होण्यात नक्कीच मनोमन आनंद वाटतो.

कतरियासरला दरवर्षी आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव भरतो. त्यावेळी हे जागरण अनुभवता येतं.

०००  


'घुमक्कडी' ब्लॉग मालिकेतील याआधीचे सर्व ब्लॉग :

घुमक्कडी (20): सात जिभांचा अग्नी आणि पुलोमाचे अश्रू


घुमक्कडी : (१९) : जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे!


घुमक्कडी : (१८) : जिवंत होणारी चित्रं


घुमक्कडी : (१७) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ


घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे


घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे


घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!


घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे


घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!


 घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!


घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर…  


घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी


घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये


घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण


घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना


घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!


घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी


घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना


घुमक्कडी : (2) सीतेची तहान


घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV