घुमक्कडी (26): महुआ बीने दोहर होये जाय

घुमक्कडी (26): महुआ बीने दोहर होये जाय

काही गोष्टींबाबत क्रम अगदी उलटा होतो, तसं माझं ‘मोहा’च्या झाडाबाबत झालं. आदिवासी भागात फिरत असताना एका घराशी पाणी प्यायला थांबले. पाण्याला गोडूस वास होता. विचारलं, तर घरातली बाई म्हणाली, “पाण्यात महुव्याची दोन-तीन फुलं टाकलेली होती.”

उन्हाळ्यात पाण्यात वाळा, मोगऱ्याची फुलं मीही टाकते; त्यामुळे मला त्यात अस्वाभाविक वाटाण्याचं काही कारण नव्हतं. पण मोह आणि दारू हे कनेक्शन डोक्यात असल्याने ‘आता हे पाणीही चढणार की काय?’ या कल्पनेने धास्तावले; कारण अजून पाच-सहा तास तरी चालून मला मुक्कामाला पोहोचायचं होतं. ऐकून सगळे हसू लागले. मी फुलं पाहायला मागितली, तर ती काही सापडली नाहीत. सिझन नुकताच सुरू झाला होता, त्यामुळे सकाळी सहज मिळालेली फुलं कौतुकाने पाण्यात टाकली गेली होती. झाड कुठाय विचारलं, तर ते मला जिकडं जायचं होतं त्याच्या अचूक विरुद्ध दिशेला होतं. त्यानंतर कधीतरी मोहाची दारू चाखली; मग एका अंगणात वाळत घातलेली मोहाची फुलं पाहिली; मग एका भल्या पहाटे गर्द जंगलात मोहाच्या डेरेदार झाडाखाली उभी राहून मनसोक्त झाड न्याहाळलं... हा उलट क्रम.

Ghumakkadi pics 1-compressed

बाकी जंगलात भरपूर पाचोळा, पण मोहाखालची जागा मात्र स्वच्छ दिसे. मुक्कामात कळलं की रात्रीच मोठे खराटे घेऊन आदिवासी ही जागा झाडून स्वच्छ करून ठेवतात. पहाटे पोपटी रंगाच्या, जाडसर पाकळ्यांच्या फुलांचा सडा पडतो. तेव्हा ती फुलं गोळा करताना त्यात पानं, बाकी कचरा मिसळत नाही. कसलीच भेसळ नसलेली शुद्ध निखालस दारू घरोघर बनते. अनेक घरांच्या छतांना भोपळे टांगलेले दिसतात; ते जितके जुने, दारू तितकी मुरलेली. दुधी भोपळ्यापासून दारू प्यायची चिरूटासारखी दिसणारी भांडीही कोरून बनवली जातात.

Ghumakkadi pics 2

आदिवासी जीवनात या दारूला खास स्थान. नुकत्याच जन्मलेल्या मुलाच्या तोंडात दोन थेंब महुवाचे थेंब घालून सुरुवात होते; ती प्रत्येक धार्मिक विधीत, साखरपुडा – लग्न अशा सोहळ्यांत आणि अखेरीस अंत्यविधीच्या वेळीदेखील आवश्यक मानली जातेच.

गोंडांच्या उत्पत्तीकथेत महुवाचा संदर्भ आहेच. चंद्र-सूर्य या दोघांच्या प्रेमात पडून गरोदर राहिलेली कंकालकाली ही कुमारिका घराबाहेर काढली जाते आणि जंगलात प्रसूत होऊन तिला अनेक मुलं होतात. आपली साडी फाडून अर्ध्या तुकड्यात ती मुलांना गुंडाळते; त्यांना मोहाच्या झाडाखाली ठेवून महुवाचे थेंब त्यांच्या तोंडात पडत राहतील अशी व्यवस्था करून निघून जाते. यातली अर्धी मुलं हिंसक असतात आणि अर्धी अहिंसक... तेच गोंड!

मोहाच्या झाडाची एखादी उत्पत्तीकथा आहे का हे मी शोधत होते. ती गुजरातेत सापडली.

एक होता पोपट. त्याची जंगलातल्या वाघाशी घट्ट मैत्री होती. दररोज संध्याकाळी ते गप्पांचा अड्डा जमवत ते मध्यरात्र झाली तरी त्यांच्या गप्पा संपत नसत. सकाळी मात्र पोपट उडत उडत जंगलाजवळच्या माणसांच्या वस्तीतही जायचा. तिथं त्याची एका गाढवाशी मैत्री झाली होती आणि तेही दोघं पक्के दोस्त बनलेले होते. पोपट आपल्या दोन्ही मित्रांना एकमेकांविषयी सांगत असे. एका वर्षी पाऊसच पडला नाही आणि जंगलातली जीवांची साखळी विस्कटली. पुढच्याही वर्षी पाऊस पडला नाही, तशी गावाची घडीही विस्कटू लागली. गाढव कुठलेही उकिरडे फुंकून मिळेल ते खाऊ लागलं. वाघाने जंगलातले जवळपास सगळेच प्राणी खाऊन संपवले. पोपटाचं त्या दोघांच्या तुलनेत बरं चाललं होतं, कारण त्याची भूक लहान होती. हळूहळू सगळं जंगल वाळून हिरव्याचं पिवळं बनलं.

गावातली माणसं अन्नाच्या शोधात दूरवर निघून गेली. गाढव मागेच राहिलं. जंगलात भुकेने कासावीस झालेला वाघ अखेर जंगलाची सीमा ओलांडून आपल्याला काहीतरी खायला मिळेल म्हणून गावाच्या दिशेने निघाला. पोपट त्याच्या सोबत होताच. गावात बरोबर अशीच स्थिती झाल्याने निदान जंगलात तरी काही खायला मिळेल अशा आशेने गाढव जंगलाच्या दिशेने निघाले होते. जंगल आणि गावाच्या सीमेवरच त्यांची गाठ पडली. भुकेने व्याकूळ झालेल्या वाघाला गाढवाचे मांस खाल्ले तरी चालेल असे वाटू लागले. हे ध्यानात येऊन पोपटाला दु:ख झालं. तो वाघाला म्हणाला, “अरे ते गाढव माझा मित्र आहे. त्याला खाणं म्हणजे मलाच खाल्ल्यासारखं होईल.”

हे ऐकून वाघ ओशाळला. पण तो भुकेने इतका व्याकूळ झाला होता की तडफडून जागीच कोसळला आणि मरून गेला. पोपटाला फार दु:ख झालं. त्याला काहीच सुचेना. गाढवाने जवळ येऊन काय झालं असं विचारलं. पोपटाच्या आणि आपल्या मैत्रीपायी वाघाने आपल्याला मारून खाल्लं नाही, तो भुकेने तडफडून मेला, याने त्याला अपराधी वाटू लागलं आणि त्यानेही तिथेच प्राण सोडले. आपले दोन्ही जीवलग मित्र आपल्या डोळ्यांसमोर असे मृत्युमुखी पडलेले पाहून पोपट आक्रोश करू लागला. शोकाने त्याचाही मृत्यू झाला.

पुढच्या वर्षी भरपूर पाऊस आला. दुष्काळ सरला. वाघ, गाढव आणि पोपट जिथं मरून पडले होते त्या जागी एक अद्भूत झाड उगवलं. त्या झाडाची फुलं पोपटाच्या अंगरंगाची होती. माणसं त्या फुलांपासून दारू बनवू लागली. दोन भांडी दारू प्यायली की, ती पोपटासारखे बडबडू लागतात. चार भांडी दारू प्यायली की वाघासारखे आक्रमक होऊन शौर्य दाखवत भांडू – लढू लागतात. सहा भांडी दारू प्यायली की गाढवासारखे उकिरड्यावर लोळू लागतात.

लोककथा वाचण्याहून त्या प्रत्यक्ष ऐकणं अधिक रोचक असतं. पोपटाचे युक्तिवाद, वाघ भुकेने गडबडा लोळताना कसं स्वत:चीच आतडी बाहेर काढून फेकावी वाटतात असं म्हणतो, गाढवाचं बरळगाणं आणि वाघ मेला म्हणून त्याला आलेला हार्ट अटॅक... गोष्ट ऐकताना हसून हसून पुरेवाट होते.

Ghumakkadi pics 3-compressed

आदिवासींच्या लोकगीतांमध्ये देखील ही फुलं अपरिहार्यपणे डोकावतातच...

महुआ बीने दोहर होये जाय,

परदेशी के बोली नोहर होये जाय।

हे ‘उधवा’ नामक प्रकारातलं लोकगीत. फुलं वेचताना कुणा दूरदेशीचा एक मैतर मिळाला... फुलं वेचून झाली; आता त्याचे मधुर बोलही ऐकू येणार नाहीत!

मोहाचे अनेक पदार्थ मी चाखले. काही नव्याने बनवून पाहिले. मोहाच्या रसाच्या पुऱ्या, फुलांचा गर वाटून घालून केलेल्या पोळ्या, मोहाचं सारण भरून केलेल्या पुरणपोळ्या, चवीपुरती फुलं घालून केलेली डाळ, फुलांच्या रसाची खीर, मोहाचा हलवा... एक ना दोन, अनेक पदार्थ. वाळलेली फुलं उकडून खाणं, सुकलेली फुलं भाजून फुटाण्यांसोबत घोळून बनवलेला चखणा... एकेका पदार्थाच्या शेकडो शक्यता असतात; तशाच या मोहफुलांच्या देखील.

Ghumakkadi pics 4-compressed

मोहाचा चखणा

Ghumakkadi pics 5

Ghumakkadi pics 6

मोहाची खीर

Ghumakkadi pics 7-compressed

मोहाची पुरी

Ghumakkadi pics 8-compressed

मोहाची पोळी.

घुमक्कडीब्लॉग मालिकेतील याआधीचे सर्व ब्लॉग :

घुमक्कडी (25): साकाचं बेट
घुमक्कडी (२४) : कार निकोबार आणि नारळ

घुमक्कडी 23. लावण्याची देवता आणि प्रलय

घुमक्कडी (२१) : सतगुरु सिंवरो मोवण्या, जिण ओ संसार उपायो

घुमक्कडी (20): सात जिभांचा अग्नी आणि पुलोमाचे अश्रू

घुमक्कडी : (१९) : जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे!

घुमक्कडी : (१८) : जिवंत होणारी चित्रं

घुमक्कडी : (१७) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ

घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे

घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे

घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!

घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे

घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!

 घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!

घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर 

घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी

घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये

घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण

घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना

घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!

घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी

घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना

घुमक्कडी : (2) सीतेची तहान

घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV