घुमक्कडी (27)  भई जब लाखो उदला वायरो

घुमक्कडी (27)  भई जब लाखो उदला वायरो

महाराष्ट्रातील बहुतेक सर्व आदिवासी जमातींमध्ये विश्व उत्त्पत्तीच्या कहाण्या सांगणारी लोकगीते ऐकण्यास मिळतात. खरेतर त्याचे नीट संकलन आणि अभ्यास होणे गरजेचे आहे. कोरकू या जमातीच्या एका गीतातील हा भाग -

भई जब लाखो उदला वायरो
वन जारण वाई लाखो उदल वाई
भई जब कौन हला देवान सेवान
वायालारो उदल वायरो
रोजा भी उदीला न वायरो
सेवा उदल वायरो
रोज भी कागलीया रो मांस
न सेवा रो उबल रारे
सगळ्यात आधी उधई म्हणजेच वाळवीची पूजा करावी. ती ‘दीमकदेवी’ आहे. कारण महादेवांना या पृथ्वीवर माणूस निर्माण करण्यासाठी लागणारी वारुळाची माती उधईने दिली. रावणानं महादेवाला सुचवलं की, पृथ्वीवर आता माणसं निर्माण करायला हवीत. मग उधईची माती आणायला सातपुड्याच्या महादेवाने कागेश्वराला म्हणजेच कावळ्याला पाठवलं. कावळ्यासाठी काही हे काम सोपं नव्हतं. दरवेळी तो उडू लागला की त्याचे पंख गळून पडायचे आणि थांबला की पुन्हा उगवून यायचे. अखेर वैतागून त्याने उडण्याऐवजी पायी चालत जाऊन माती आणण्याचं ठरवलं आणि वारुळापर्यंत तो चालत-चालतच गेला. वारुळाची माती आणून त्याने ती महादेवाला दिली. महादेवाने त्या मातीतून स्त्री आणि पुरुष घडवण्यास सुरुवात केली. माती भिजवून तो माणसांच्या बाहुल्या घडवायचा आणि सुकवत ठेवायचा. इंद्राला काही हा उपद्व्याप मान्य नव्हता. त्याने आपल्या घोड्याला या कामगिरीवर पाठवलं. रोज रात्री इंद्राचा घोडा दौडत यायचा आणि महादेव निद्रेत असतानाच त्या ओल्या बाहुल्या मोडून टाकून वेगाने निघून जायचा. हा रोजचाच त्रास झाल्यावर महादेव वैतागला. ही मोडतोड कोण करतंय याचा त्याने छडा लावायचा ठरवलं आणि माणसं बनवण्याच्या ऐवजी त्या दिवशी आधी एक कुत्रा बनवला. तोच सिटादेव. लहानसा असल्याने तो लवकर सुकला. महादेवाने त्याच्यात प्राण फुंकले. मातीचा कुत्रा जिवंत झाला. दुसऱ्या दिवशी महादेवाने निश्चिंतपणे ‘मुला’ आणि ‘मुलाई’ हे कोरकुंचे आदिम जोडपे निर्माण केले. कुत्र्याने त्यांचे इंद्राच्या घोड्यापासून रक्षण केले. महादेव, रावण, उधई, कावळा, कुत्रा ही सारीच त्यामुळे कोरकुंची श्रद्धास्थानं आहेत.

1

उधईची एकेक वस्ती पाहिली तर तिच्यात किमान दहा लाख किडे राहत असतात. मुंग्यांप्रमाणे उधईमध्येही एक राणीउधई असते. त्या एकीला शोधून मारलं तर अख्खी वस्ती नष्ट होते. राणी वाळवी दिवसाला तब्बल ३६०० अंडी घालते आणि हे प्रजनन ती तब्बल ५० वर्षं करत असते. कामकरी आणि सैनिक उधया अन्न मिळवण्याचं आणि रक्षण करण्याचं काम करत राहतात. अंधार आणि ओल त्यांना प्रिय. उधईच्या अणकुचीदार नांग्या इतक्या तीक्ष्ण असतात की लाकूड आणि सिमेंट त्या सहजी फोडतात.

2

3

गजानन माधव मुक्तिबोध यांची ‘पक्षी आणि वाळवी’ असं शीर्षक असलेली एक कथा आहे.  कथेत अर्थात वाळवी हे रूपक आहे. वाळवी एखादं झाड वा घर आतून पोखरून पोकळ करत अखेर नष्ट करते. तसाच माणसाला भ्रष्टाचारासारखा एखादा असाध्य आजार नष्ट करतो, हे त्यातून सुचवलं आहे. वाळवीच्या या ‘गुणां’मुळे तर ती माणसाच्या स्वप्नात येणं देखील अशुभ मानलं जातं. या कथेत नायक नायिकेला एक गोष्ट सांगतो, ती पक्षी आणि वाळवी यांची आहे....पक्षी उडतोय, त्याच्या थव्यात त्याचे वडील आणि मित्रही आहेत. खालच्या रस्त्यावरून एक बैलगाडी जातेय. गाडीवान हाकारे देतोय की, “एक पिस द्या आणि दोन वाळव्या घ्या.” त्याची  गाडी वाळवीच्या पोत्यांनी भरलेली आहे. पक्ष्याला उडायचा, अन्न मिळवून खायचा कंटाळा आलाय. आप्तमित्रांचे सल्ले न ऐकता तो गाडीवानाला पंखातलं एक पिस काढून देतो आणि त्याच्याकडून दोन वाळव्या घेऊन खातो. दुसऱ्या, तिसऱ्या दिवशीही हाच क्रम सुरू राहतो. त्याचे वडील त्याला समजावतात की, “बेटा, वाळवी काही आपला आहार नाहीये. आणि ती खाण्यासाठी हे असं आपली पिसं उपटून देणं तर अजिबातच योग्य नाही.” पण तरुण पक्षी म्हाताऱ्या बापाकडे अहंकाराने, तुच्छतेने पाहून मान वळवून घेतो. त्याला आता वाळवीची चटक लागली आहे. त्याला दुसरे कोणतेही किडे-अळ्या, फळं, धान्यधुन्य काहीच आवडेनासं झालं आहे. वाळवी त्याचा ‘शौक’ बनली आहे. हळूहळू त्याला इतर पक्ष्यांसारखं आभाळात उडणं ही गोष्ट मूर्खपणाची वाटू लागते. पिसं देऊन देऊन त्याचे पंख इतके विरळ होत जातात की एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जायचं तर तो पायांनी चालत जाऊ लागतो. काही दिवस गाडीवान दिसत नाही; मग पक्ष्याला वाटतं की, आपली वाळवी आपणच शोधूया. एका झाडाखाली त्याला वाळवीची वस्ती दिसते. तिथं जाऊन तो वाळवी खायला लागतो. मग त्याच्या मनात काय येतं कोण जाणे, पण तो वाळवी जमवून तिचा ढीग तयार करतो. काही दिवसांनी गाडीवान येतो तेव्हा तो त्याला ढीग दाखवतो. गाडीवान म्हणतो, “मला कशाला दाखवतो आहेस? मी या वाळवीचं काय करू?”

पक्षी म्हणतो, “ही वाळवी घे आणि मला पिसं दे.”

गाडीवान खदखदून हसत म्हणतो, “मी पिसं घेऊन वाळवी विकतो, वाळवी घेऊन पिसं नाही विकत.”

पक्ष्याला धक्का बसतो. गाडीवान हसतहसत निघून जातो. एक काळी मांजर येते आणि पक्ष्यावर झडप घालून तोंडात धरून नेऊ लागते. पक्ष्याच्या रक्ताचे लाल थेंब गवतावर पडत त्यांची एक रक्तरेषा उमटते.मुक्तीबोधांचा हा नायक तत्त्ववादी नायिकेच्या प्रेमाला बिचकतोय.  हिच्यासोबत नांदायचं तर किती भगव्या खादीधारी लोकांशी शत्रुत्व घ्यावं लागेल आणि त्यातून आपले ‘कमाई’चे मार्ग बंद होत जातील याचं करकरीत भान त्याला आहे. गांधीवादी बापाची ही मुलगी त्याला जंगलातल्या आदिवासींच्या कुऱ्हाडीसारखी भासते, जी बेईमान दोस्ताचं मुंडकं छाटू शकेल! सारे रोमांटिक विचार बाजूला ठेवून तो वास्तव स्वीकारतो. स्वत:ची अवस्था त्या वाळवी खाणाऱ्या पक्ष्यासारखी होऊ शकते हे माहीत असूनदेखील!

4

आपण इतरांनी विचारलेल्या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं द्यायला लागतो, तेव्हा कुठे स्वतःला तुकड्या-तुकड्यानं ओळखायला लागतो. एरवी या महानगराच्या वेगात स्वतःच स्वतःला प्रश्न विचारून उत्तरं शोधणं घडतं कुठे?  कवच तडकवून टाकणारे, कात फेकून द्या म्हणणारे प्रश्न नकोच वाटतात अनेकांना; आपल्या उबेचा आणि शांततेचा भ्रम मोडू द्यायचा नसतो; आणि दाखवून द्यायचं असतं आसपासच्या आपल्यासारख्याच माणसांना की मीही जगतोय सुखी आणि सुबक आणि तणावरहित.

मग आपण फेसबुकवर हिरवे पावसाळी फोटो शेअर करतो; सुविचार लिहितो आणि शब्द सांभाळून वापरतो; दचकतो उद्रेकाने आणि काय हा उन्माद म्हणतो आणि घाईघाईने बदलतो भिंती मित्रांच्या; अतीच झालं तर ब्लॉक करतो एखाद्याला आणि सुटकेचा नि:श्वास सोडून आपल्या शंखात जाऊन बसतो पवित्र रिश्ता बघत.

आपण प्रवास टाळतो असे एका टप्प्यावर आणि वाळवी विकत घेतो पंखांच्या बदल्यात.

०००

घुमक्कडीब्लॉग मालिकेतील याआधीचे सर्व ब्लॉग :

घुमक्कडी (26): महुआ बीने दोहर होये जाय

घुमक्कडी (25): साकाचं बेट
घुमक्कडी (२४) : कार निकोबार आणि नारळ

घुमक्कडी 23. लावण्याची देवता आणि प्रलय

घुमक्कडी (२१) : सतगुरु सिंवरो मोवण्या, जिण ओ संसार उपायो

घुमक्कडी (20): सात जिभांचा अग्नी आणि पुलोमाचे अश्रू

घुमक्कडी : (१९) : जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे!

घुमक्कडी : (१८) : जिवंत होणारी चित्रं

घुमक्कडी : (१७) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ

घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे

घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे

घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!

घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे

घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!

 घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!

घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर 

घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी

घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये

घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण

घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना

घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!

घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी

घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना

घुमक्कडी : (2) सीतेची तहान

घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV