घुमक्कडी (30) : पलाश... धगधगती अग्निफुले...

घुमक्कडी (30) : पलाश... धगधगती अग्निफुले...

झाडांच्या उत्पत्तीकथांमध्ये आवडलेली एक आदिवासी लोककथा आहे ती पळसाची! पेंगू, भात्रा आणि मुरिया या तीन जमातींचे लोक एका जंगलात सुखानं नांदत होते. भात्रा जमातीतला चायटू हा तिन्ही जमातींचा मिळून मुखिया होता. त्याच्या मुलीचा मुरिया जातीतल्या एका तरुणावर जीव जडला. वेगळ्या जातीचा जावई चायटूला पसंद पडणार नव्हताच. त्यानं तिच्या मर्जीला न जुमानता तिचं एका भात्रा तरुणाशी लग्न लावून दिलं. लग्न झालं तरी ती काही आपल्या प्रियकराला विसरू शकली नाही. दोघं कुठे ना कुठे रोज चोरून भेटू लागली. पण अखेर एके दिवशी तिच्या नवऱ्याला ही गोष्ट समजलीच. त्यानं त्या दोघांना रंगेहात पकडायचं ठरवलं. आपण काही दिवस जवळच्या गावात राहणाऱ्या आपल्या बहिणीला भेटायला जाणार आहोत, असं बायकोला सांगितलं. तो गाठोडं आणि काठी घेऊन घरातून बाहेर पडला, तेव्हा बायकोच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू त्याच्या नजरेतून सुटलं नाही. गावाबाहेर जाऊन तो एका झाडावर लपून बसला आणि अंधार पडताच घराकडे परतला. पत्नी तिच्या प्रियकराला घरी बोलावून घेईल, हा त्याचा अंदाज खरा ठरला होता. त्यांना एकत्र पाहून तो इतका संतापला की, तीक्ष्ण हत्यारांनी वार करून त्याने दोघांनाही जीवे मारलं आणि त्यांची रक्तबंबाळ प्रेतं जंगलात दूरवर नेऊन फेकली. काही काळाने तिथं पळसाची दोन झाडं उगवली. प्रियकराच्या झाडाच्या फुलांचा रंग लाल-केशरी गडदगर्द होता आणि प्रेयसीच्या झाडाच्या फुलांचा रंग फिकट, पांढुरका होता. तिनं व्यभिचार केला, म्हणून तिच्या झाडाचं खोड काळ्या रंगाचं बनलं.

Palash 1-compressed

पलाश या नावाचा अर्थच मुळात पल+आश म्हणजे मांस + खाणं असा आहे. देशी भाषांमध्ये त्याची तब्बल ७०  नावं आढळतात... अग्निदमनक, कनक, कमलासन, काष्ठद्रु, किंचन, किंजुल, किरूमिस्तरू, किर्मि, किंशुक, कृमिघ्न, केसू, क्षारश्रेष्ठ, खाकरा, गुल पलास, छेवला, जटिला, टेसू, ढाक, तेल मोदुग, त्रिपत्रक, त्रिपर्ण, दमन, दाँवना, दीर्घपत्री, देवशेखर, दौना, द्रोण, परास, पलंकष, पलाश, पलाशक, पळस, पांगोंग पाँडर, पापड़ा, पीत चोंप, पुंडरौक, पूतद्रु, पूतुदारु, ब्रह्मजटी, ब्रह्मद्रुम, ब्रह्मपादप, ब्रह्मवृक्ष, ब्रह्मोपनेता, मदनक, मरुत्तक, मातुकाटेट्टु, मुनि पुत्रक, मुरक्कच्यूम, मोडूगा, यज्ञिक, याज्ञिक, यूप्य, रक्तपुष्प, राजादन, लाक्षातरु, वक्रपुष्पक, वातपोथक, वानप्रस्थ्य, विनीत, विपर्णक, विप्रप्रिय, श्याम, साधक, साधु, सुपर्णी, सुभीरक, सुभीरव, स्थूलपत्र, हस्तिकर्ण. अजूनही काही असतील, कारण झारखंडचं राज्यफूल असलेला पलाश देशात अनेक राज्यांत आढळतो.

याची एक पौराणिक कथाही आहे. तिच्या दोन आवृत्त्या आहेत. एकीत कामदेव पळसवृक्षावर चढून शंकराची समाधी भंग करतो आणि दुसरीत शंकर-पार्वती एकांतात असताना तो त्यांच्या कक्षाच्या दारावर थाप मारतो. पहिली शक्यता अधिक उचित वाटते. तर संतापलेला शंकर कामदेवाला शाप देऊन भस्म करतो. त्यामुळे तो ज्या पळसवृक्षावर बसलेला असतो तो वृक्षही पेटून जळू लागतो. पलाश शंकराला विनंती करतो की, “माझी यात काही चूक नाही, मला वाचवा!”

मग शंकर त्याला वाचवतो आणि ज्वाला त्याची फुलं बनतात, शंकराचे त्रिनेत्र त्याची पानं बनतात! पळसाला तीनच पानं असतात, त्याचं कारण हे! या पानांचे द्रोण बनवले जातात व पत्रावळीही. मणिपूरमधल्या मेईती समाजात एखादी व्यक्ती मृत झाल्याचं समजलं आणि तिचं शव मात्र मिळालं नाही, तर पळसाची एक फांदी तोडून तीवर त्याच्यानावे अंत्यसंस्कार केला जातो. पळसाचं लाकूड अग्नी धारण केलेलं असल्याने तेव्हापासून पाण्यात कुजत नाही. पाण्याजवळच्या वस्तू बनवण्यासाठी लोक पळसाचं लाकूड म्हणूनच वापरतात. रहाट, अंघोळीचे चौरंग, पाणी वाढायची वगराळी अशा कैक वस्तू या लाकडाच्या दिसतात. पवित्र मानलं गेल्याने समिधा म्हणून त्याचं लाकूड वापरलं जातं आणि शंकराच्या पूजेत त्याची फुलंही आवर्जून वापरतात. या फुलांसोबत तबकात दुर्वादी चिजा ठेवल्या, तर त्याही पाच-सात दिवस न सुकता-सडता चांगल्या टिकतात. त्याचे औषधी उपयोग तर असंख्य सांगितले जातात. पळसाची कैक क्विंटल फुलं गोळा करून त्यांचा रंग बनवून होळी खेळली जाते. हिंदीतली होळीची लोकगीतं पळसाच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊच शकत नाहीत.

Palash 2-compressed (1)

                                                                            ( होळीसाठी फुलं गोळा करणारी झारखंडमधील स्त्री. छायाचित्र : बिनय रुंगटा.)  

पळसाचं फूल पोपटाच्या चोचीसारखं बाकदार दिसतं. पळसाच्या झाडाच्या ढोल्यांमध्ये पोपटांची घरं हमखास असतातच. फिकं निळं आकाश शेकडो पोपट उडाल्याने हिरवं दिसू लागतं आणि खाली फुललेले केशरी पळस असले की नेमकं कुठे बघावं हे आपल्याला सुचेनासं होतं. पळस आणि पोपटाचा एक मजेशीर उखाणाही सापडला. पोपटाची लाल चोच पळसाचं फूल भासून भुंगा त्यावर झेपावतो आणि गडद रंगाचा भुंगा जांभूळ आहे असं वाटून पोपट त्याला खाऊ पाहतो!

अनेक गावांच्या नावात जसा पळस आहे, तसाच पुस्तकांच्या नावात ‘पळस’ आहे. पलाश हे नाव अनेक रसिक मंडळी आपल्या मुलासाठी निवडत असतात. पळसावर जितक्या कविता लिहिल्या गेल्या आहेत, तितक्या फुलांचा राजा मानल्या जाणाऱ्या गुलाबावर देखील नाहीत. हिंदीत तर पळसावरील कवितांचं एक संकलनही उपलब्ध आहे. या अनेक कवितांपैकी मला आवडलेली उदय प्रकाश यांची 'सुनो कारीगर' या संग्रहातली ‘वसंत’ ही कविता इथं अनुवाद करून देतेय...

रेलगाडी येते

आणि

न थांबता निघून जाते.

जंगलात

एक एकटा गार्ड पलाश

लाल झेंडे

दाखवत राहतो.

आता फेब्रुवारीपासून पळसफुलांचं दर्शन घडू लागेल, ते एप्रिलपर्यंत होईल. जंगलं ज्वालाफुलांनी धगधगून उठतील... यंदाही अजून काही कवी त्यावर कविता लिहितील, अजून काही चित्रकार त्यांची चित्रं रंगवतील.

Palash 3-compressed

                                                                                        ( चित्रकार रामचंद्रन यांचं चित्र : पलाशवृक्षाचा जन्म.)

संबंधित बातम्या:

घुमक्कडी (29) : एको आणि नार्सिसस

घुमक्कडी (28) : तू-ती आणि रेशमी प्रेमाचा लोचा

घुमक्कडी (27)  भई जब लाखो उदला वायरो

घुमक्कडी (26): महुआ बीने दोहर होये जाय

घुमक्कडी (25): साकाचं बेट

घुमक्कडी (२४) : कार निकोबार आणि नारळ

घुमक्कडी 23. लावण्याची देवता आणि प्रलय

घुमक्कडी (22) : त्यांना दुसरे हृदय दे, वा मला वेगळी भाषा!

घुमक्कडी (२१) : सतगुरु सिंवरो मोवण्या, जिण ओ संसार उपायो

घुमक्कडी (20): सात जिभांचा अग्नी आणि पुलोमाचे अश्रू

घुमक्कडी : (१९) : जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे!

घुमक्कडी : (१८) : जिवंत होणारी चित्रं

घुमक्कडी : (१७) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ

घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे

घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे

घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!

घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे

घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!

 घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!

घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर…  

घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी

घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये

घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण

घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना

घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!

घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी

घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना

घुमक्कडी : (2) सीतेची तहान

घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV