घुमक्कडी (34) : लोकल दारवा आणि चखणे!

By: | Last Updated: > Wednesday, 29 March 2017 8:38 AM
kavita mahajans 34 article of ghumakkadi blog series

मणिपाल या नावाचा अर्थ आहे चिखलाचं तळं. मी गेले, तेव्हा ते कोरडं पडलेलं होतं. सगळ्या बाजूंना डोंगर आणि मध्ये गाव असं उंचावरून तरी भासत होतं आणि त्यामुळे मी म्हणजे  एखाद्या हिरव्या द्रोणात शिल्लक राहलेली तुती आहे, असं काहीबाही मनात येत होतं. उडुपीत थोडी भटकले, रात्री यक्षगान पाहिलं. मग दुसऱ्या संध्याकाळी कोडी बेंगरे. स्वर्णा आणि सीता या नद्यांची भेट होते आणि मग दोघी गळ्यात गळे वा प्रवाहात प्रवाह घालून पुढे निवांत चालत समुद्राला भेटतात… ती ही जागा!

 

map

आजवर दोन वा तीनही नद्यांचे संगम पाहिले होते, मात्र नदी समुद्राला मिळते ती कवींची कवितेत वर्णीण्यासाठीची लाडकी जागा मात्र अजून कुठे पाहिली नव्हती. ती अचानकच समजली आणि मणिपालहून तासाभरात आम्ही तिथं पोहोचलोदेखील. एके जागी रस्ता अरुंद झाला आणि नवल दिसू लागलं. उजव्या बाजूला नदी आणि डाव्या बाजूला समुद्र. एकीकडे लाटांचा कल्लोळ आणि दुसरीकडे मऊसूत कोवळे तरंग.

 

sea

 

उन्हं डोक्यावर होती, त्यामुळे समुद्रावर फारवेळ रेंगाळता येणार नव्हतं. मग एका झावळ्यांच्या खोपीत बसलो… तो ताडीबार! ताजे फडफडीत झिंगे तळून गरमागरम सर्व्ह केले जात होते, सोबत ताडी. मग अजून काही माशांचे प्रकार. नीर डोस्यासोबत चिकन करी. हळूहळू आभाळाचे रंग बदलले. मध्येच एक करडा ढग येऊन खूप वेळ सूर्याला झाकून थांबला. तो गेला तेव्हा सूर्य केशरी होऊ लागला होता. खाणंपिणं आटोपून मग डेडएंडला संगम पाहायला. एका अनिश्चित जागेवर लाटा फुटून लहान होत होत्या आणि त्यात मिसळणारी नदी वेगळा रंग लेवून आली होती. सीता आधीच एके जागी स्वर्णेला भेटते, ती जागा इथून जरा दूर होती.

 

village home

 

ताडीचा योग खूपच काळाने आला होता. ही आंध्रातली कल्लू, कर्नाटक आणि केरळमधली तोड्डी. केरळमध्ये हिच्यासोबत सुकं बीफ, सुकं पोर्क, सशाचं आणि कासवाचंही मटण, मसाला खेकडे, केळीच्या पानात भाजलेले मासे असा पुष्कळ चखणा मिळतो. लिव्हर रोस्ट खासच.

मग प्रांतोप्रांतीच्या लोकल दारवा आठवू लागल्या.

मेघालयातली क्यात. नागालँडची तांदळाची दारू मधु आणि झुत्से, झुथो व रुही या अजून काही. सिक्कीममधली छांग, थुंबा / तोंग्बा आणि राकी / रक्सी. मणिपूरमधली तांदळाची वैतेई, जामेल्लेई आणि वाय्यायू ( Yu ). राजस्थानातील केसर-कस्तुरी. हिमाचल प्रदेशातली सफरचंद आणि जर्दाळूपासून बनवलेली किनौरी घंटी वा चुल्ली आणि लुग्डी. गोव्यातली फेणी. झारखंडची हंडिया. लडाखमधील अरक. आसाममधली जुडिमा व क्साज. आन्ध्रातली उसाच्या मळीची गुडांबा. बस्तरची सुल्फी. महुआ वा मोहडा तर लाडकीच. एक ना दोन.

 

manipur-compressed

 

मणिपूरमधला चखणा माहिती विचारूनच खावा. भरपूर आलं घातलेलं डुकराचं मांस आणि चव घेऊन बघायला हरकत नाही, पण फारच वातड असल्यामुळे पुन्हा खाण्याची हिंमत होणार नाही असं कुत्र्याचं मांस देखील मिळतं. कुणा घरात मेजवानी मिळाली तर स्मोक्ड म्हणजे धुरावलेलं हरणाचं मांसही मिळतं. हे काहीच नको असेल तर बदकांच्या अंड्याचे पदार्थ किंवा नुसतं मीठ घालून उकडलेल्या विविध शेंगा. नागालँडमधले चखण्याचे मासे वेगळेच… बांबूचे कोंब आणि लसूण, मिरची यांचं वाटण करून माशांना लावून मुरवत ठेवलं जातं आणि मग मोठ्या पोकळ बांबूत हे मुरवलेले मासे भरून त्याच्या दोन्ही बाजू बंद करून भाजतात. बांबूचा रंग बदलला की मासे भाजून झाले समजायचं. रेशमाचे किडे आणि मुंग्या यांच्यासह अनेकानेक किडे इकडे चखणा म्हणून मिळतात. रेशमाचे किडे दीड-दोनशे रुपये किलो भावाने बाजारात मिळतात आणि तळून व उकडून दोन्ही पद्धतींनी चखणा म्हणून खाल्ले जातात.

 

starter-compressed

 

गोव्यात भोपळ्याची फुलं तळून खाल्लेली, तशी आसाममध्ये चक्क चहाची फुलं तळून मिळाली. इतरत्र जिथं जिथं चहाचे मळे होते, तिथं फुलांचं काय करता विचारलं तर लोकांनी चकित होऊन पाहिलं आणि ‘फुलं तर नुसतीच गळून जातात’ असं सांगितलं. आपल्याकडे हादग्याच्या फुलांची भजी करतात तेही तेव्हा आठवलेलं. आसाममध्ये तांदळाच्या पोह्यांचे चिवड्यासारखे प्रकारही मिळतात; सामोसा आणि निमकी हे अजून दोन स्टार्टर.

सिक्कीममधली  तोंग्बा मिलेट नावाच्या ज्वारीपासून बनवतात. किलोभर ज्वारीत पाणी आणि आणि चमचाभर यीस्ट घालून शिजवायचं आणि हवाबंद दारूपात्रात घालून ठेवायचं. दोनेक दिवसांत तोंग्बा तय्यार! ही गरम पाण्यात, तेही चक्क straw ने प्यायची.

 

Ghumakkadi pic 1

एक सुंदर आठवण आहे… हिमाचलप्रदेशात एका घराच्या निवांत परसबागेत जर्दाळूच्या वृक्षाखाली बसले होते. गवतकिडे रानफुलांवर नाचत उडत होते. कुंपणापलीकडे बकऱ्या चरत होत्या. पाळीव कुत्री लाड करून घेत पायाशी बसली होती आणि झाडावरून मध्येच एखादं छान पिकलेला पिवळसर केशरी जर्दाळू पडला की मान उंचावून बघून पुन्हा डोळे मिटून घेत होती. महिनाभर वृत्तपत्रं, टीव्ही, बातम्या काही माहीत नव्हतं. फोन जवळपास बंदच असल्यात जमा होता. निरभ्र आकाश, अवचित उजळणारी हिमशिखरं आणि प्यायला कधी चुल्ली कधी लुग्डी… क्वचित हनी व्हिस्की घेतली असेल पाप केल्यासारखी… स्थानिक दारवांची चव तिला कशी येणार?

 

Ghumakkadi pic 2-compressed

 

धो धो कोसळणाऱ्या पावसात गेस्टहाउसमधल्या अंगणात दगडी बाकावर बसून कधी ब्लॅककरंट वोडका प्यायली आहे? अट एकच… डोक्यावर छत्री ठेवायची नाही, फक्त ग्लासवर झाकण ठेवायचं! कधी चंदेरी वाळूच्या किनाऱ्यावर पाण्यात खुर्चीटेबल लावून सत्तावीस वर्षं जुनी, मसाले मुरवलेली रम प्यायली आहे? सोबत खारवलेले काजू आणि माशांचे नुसतं लिंबाचा रस व मीठ लावलेले कच्चे कागदासारखे पातळ काप असतात आणि पाण्यातले इवले मासे पायांना हलके चावे घेत असतात! अट एकच… बाकी काहीही आठवायचं नाही आणि मसाला रममध्ये मुरलेला दिसतो, त्याकडे बघत त्या क्षणात मुरून जायचं.

डोळ्यांत थेंबभर पाणी येत नाही आणि सगळं जग सुंदर भासतं.

 

Ghumakkadi pic 3-compressed

 

सर्व फोटो: कविता महाजन

 

‘घुमक्कडीमधील याआधीचे ब्लॉग :

 

घुमक्कडी (33) : रहिमन पानी राखिये, बिन पानी सब सून…

घुमक्कडी (32) : सर्वांत स्वच्छ गावं…

घुमक्कडी (31) : जीवट डोकऱ्या माशाची गोष्ट!

घुमक्कडी (30) : पलाश… धगधगती अग्निफुले…

घुमक्कडी (29) : एको आणि नार्सिसस

घुमक्कडी (28) : तू-ती आणि रेशमी प्रेमाचा लोचा

घुमक्कडी (27)  भई जब लाखो उदला वायरो

घुमक्कडी (26): महुआ बीने दोहर होये जाय

घुमक्कडी (25): साकाचं बेट

घुमक्कडी (24) : कार निकोबार आणि नारळ

घुमक्कडी (23) लावण्याची देवता आणि प्रलय

घुमक्कडी (22) : त्यांना दुसरे हृदय दे, वा मला वेगळी भाषा!

घुमक्कडी (21) : सतगुरु सिंवरो मोवण्या, जिण ओ संसार उपायो

घुमक्कडी (20): सात जिभांचा अग्नी आणि पुलोमाचे अश्रू

घुमक्कडी : (19) : जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे!

घुमक्कडी : (18) : जिवंत होणारी चित्रं

घुमक्कडी : (17) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ

घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे

घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे

घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!

घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे

घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!

घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!

घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर… 

घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी

घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये

घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण

घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना

घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!

घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी

घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना

घुमक्कडी : (2) सीतेची तहान

घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई

 

News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:kavita mahajans 34 article of ghumakkadi blog series
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published: