घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!

घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!

वसईत मी राहते त्या भागात मिठाची शेती होते. रेल्वेस्टेशनावर उतरून घराकडे यायला निघालं की रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दूरपर्यंत पसरलेले चौकोन दिसतात. त्यात पाणी भरलेलं असतं. उगवत्या सूर्याचा प्रकाश थोडी कमी जादू करतो, पण संध्याकाळी मात्र या चौकोनांचं केशराच्या तळ्यात रूपांतर होतं. कितीही वेळ डोळे भरून पाहिलं तरी मन भरत नाही.

 

1

 

मोठाल्या पाइप्सनी धो धो खळाळतं खारट पाणी शेतांमध्ये सोडलं जातं. इवले इवले बांध घातलेले असतात आधीच, त्यातून वाटा काढत ते पुढच्या - पुढच्या चौकोनात नेतात. हिरवीगार पिकं वाढतात, डोलतात हे जितकं प्रेक्षणीय असतं तितकंच या तळ्यात तयार होत वाढत जाणारं मीठ पाहणं देखील आनंदाचं असतं. मुख्य फरक असतो तो रंगगंधाचा! मिठागराच्या वाटेवर पाऊल ठेवायचं म्हणजे आधीच नाकात खारट वास वेगानं घुसायला लागतो. जिभेवर अदृश्य कण वाहून येतात आणि नकळत तोंड खारट होऊन जातं. मिठाचे डोंगर वाढू लागले असले की फावड्याने मीठ खेचून रास करणाऱ्या कामगारांप्रमाणेच आपल्यालाही डोळ्यांवर गॉगल चढवावे लागतात... हो, अगदी बर्फाळ भागात फिरताना डोळ्यांची जी काळजी घ्यावी लागते, तीच स्थिती इथं असते.बर्फाइतकीच मिठाच्या खड्यांची चकाकी देखील तापदायक. पुन्हा दुरून साजरे दिसणारे मिठाचे पांढरेशुभ्र डोंगर आपण जसजसं जवळ जाऊ तसतसे करडे दिसायला लागतात आणि डोंगरासमोर उभं राहून पाहिलं की काळे! ही अजून एक जादू.

 

2
शेतं संपली की पल्याड काही कच्ची घरं, काही खोपटी दिसायला लागतात. या शेतांमधून काम करणारे कामगार या वस्तीत राहतात.मी गेली बावीस वर्षं वसईत राहते आहे. खूप दिवसांपासून मनात आहे की या लोकांचं आयुष्य जाणून घ्यावं आणि त्यांच्यावर काही लिहावं. मात्र अनेक विषय जवळ असून बाजूला राहतात तसा तो राहिला आहे.
लिहावं वाटण्यामागे काहीतरी गोष्ट असते.

 

3
'भिन्न' या कादंबरीचं लेखन सुरू केल्यापासून मी एड्स झालेल्या व्यक्तींसाठी सामाजिक काम करणाऱ्या काही संस्थांशी निगडित झाले. जिथं शक्य तिथं व्यक्तिगत मदती करणं सुरू झालं. मदती आर्थिक नव्हत्या, प्रत्यक्ष होत्या. माणसांना दवाखान्यात नेणं, दाखल केलेलं असेल तर रात्री त्यांच्यासोबत थांबणं, कुणाला एखादा घरगुती पदार्थ खावा वाटला तर बनवून नेणं आणि सगळ्यात अवघड म्हणजे मृत्यूनंतरचे सोपस्कार. अंत्यविधीसाठी कुणी यायचं नाही. एक वा दोन माणसं कशीबशी मिळत, क्वचित एकटीनेही जावं लागे. एकदा अशीच स्मशानात गेले असताना धावपळीने थकून तिथल्या कट्ट्यावर बसले होते. बाजूच्या चितेवरचं प्रेत जळून राख झालं तरी माणसं थांबली होती. मला नवल वाटलं. इतका वेळ कुणी थांबत नाही सहसा, लगेच जातात वा क्वचित कवटी फुटेपर्यंत थांबतात. चौकशी केली, तर मीठशेतीतला कामगार होता. मिठानं पाय इतके खराब होतात की बाकी शरीर जाळलं तरी पाय जळत नाहीत आणि म्हणून बाकी शरीर जाळून गेल्यावर शिल्लक राहिलेले पाय पुरण्यासाठी हे लोक थांबले होते.
किती कल्पनातीत गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात आणि आपण अनभिज्ञ असतो, हे पुन्हा एकदा जाणवलं.

 

4

मध्यंतरी 'माय नेम इज सॉल्ट' या नावाचा एक लघुपट पाहिला. फरीदा पाचा या दिग्दर्शिकेचं सुरुवातीपासूनच वेगळेपण जाणवत राहिलं. एक म्हणजे त्यात 'निवेदक' गायब होता. सगळं काही शब्दांत सांगत बसून प्रत्येक चित्रपटाचं बोलपटात रूपांतर करण्याची गरज नसते, हे म्हणताना अनेक लोक म्हणतात, पण प्रत्यक्षात शब्दांच्या राशी ओतल्याशिवाय त्यांना करमत नाही. चित्रभाषेविषयी पुरेसा आत्मविश्वास नसल्याचंच ते लक्षण असतं. इथं मात्र प्रत्येक फ्रेम बोलकी केली होती. संवाद क्वचित होते आणि तेही 'लिहून काढलेले' आणि मग 'बोलून घेतलेले' नव्हते. साधं, सहज बोलणं होतं ते.
संगीत क्वचित वापरलं होतं आणि बाकी सर्व आवाज त्या-त्या कृतीतून उगवणारे - उमलणारे - उमटणारे असेच होते. चित्रभाषा वरचढ असली, तरी 'रंगप्रभाव' सौम्य होता आणि आकार व पोत या गोष्टी अधिक ठसठशीत बनल्या होत्या... हेही आजवर कुठे विशेष न दिसलेलं पहिल्यांदा पाहिलं. रंग हे एक पात्रच आहे असं वाटत होतं. आकार आणि पोत आपल्याकडे अजून कुणी इतकं सुंदर व प्रभावी वापरलेलं पाहिलं नाहीये... ते या लघुपटात दिसलं. त्यासाठी देखील हा लघुपट पाहावाच.

विषय रोचक होता आणि सकारात्मक देखील!
मीठशेती करण्यासाठी वर्षातले आठ महिने देशातली ४०,००० कुटुंबं कच्छच्या रणात स्थलांतर करतात. त्यातल्या एका कुटुंबाचं चित्रण यात आहे. "सगळ्यांत पांढरंशुभ्र मीठ आम्ही बनवू" अशी 'महत्त्वाकांक्षा' बाळगून मनापासून कष्ट करणाऱ्या कुटुंबाची कामातली लय त्यात दाखवली आहे.
अनेकदा मजुरांचे कष्ट व हाल दाखवताना गरिबी, व्यसनं, बकाली हायलाईट केली जाते आणि मग हे जग माहीत नसणाऱ्या लोकांना 'ही माणसं जिवंत कशी राहतात?' असा प्रश्न पडतो. त्यांची तत्त्वज्ञानं, त्यांनी शोधलेल्या मनोरंजनाच्या सूक्ष्म वाटा व साधी साधनं, वेदनेला सामोरं जाण्याच्या व्यसनाशिवायच्या आपुलकीच्या पद्धती, शोषक-शोषित या नात्याशिवाय शेठ-कामगार यांच्यात असलेला व्यावसायिक धागा अशा कैक गोष्टी पाहताना मी चकित होत होते.

6                                                                   ( बागशाळेची दृश्य )

 

 

वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठीच्या ठाणे जिल्ह्यातल्या भोंगाशाळा, पुण्याजवळच्या उसकामगारांच्या मुलांसाठी असलेल्या साखरशाळा, मुंबईत फुटपाथवर / रेल्वेस्थानकांवर / पुलांखाली भरणाऱ्या शाळा मी पाहिल्या आहेत. किशोरदा जगतापसारखी माणसं एकांडा शिलेदार बनून, हातात एक फळा घेऊन रात्री फुटपाथ, सार्वजनिक बागा अशा जागी अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी तिथेच फळा लावून बागशाळा भरवतो आणि मोफत शिकवण्याचं काम वेडाचारासारखं तीस-पस्तीस वर्षं सातत्याने करतो. तेही कुठली जाहिरात, कुठलं फंडिंग, कुठली प्रसिद्धी वा पुरस्काराची अपेक्षा न करता... हेही माहीत आहे.

 

 

5        ( बागशाळेची दृश्य )

 

असाच एक लहान मुलगा या लघुपटात मीठशेतीत काम करणाऱ्या कामगारांच्या आपल्याहून लहान मुलांची शाळा घेताना दिसतो. शाळेची वेळ झाली की फुटका आरसा घेऊन एकेका मीठशेतघराच्या दिशेने तो चमकवतो आणि मुलंमुली शाळेला निघतात. मुलांनी आपल्या मनोरंजनासाठी शोधलेले खेळ देखील समाधान देतात.

 

7

 

बायका या पुरुषांहून शरीराने दुबळ्या असतात हा भ्रम कष्टकरी बायका तोडत असतातच, तशा त्या इथेही मीठ पिकवण्याच्या कामात सहभागी आहेत. मायलेकी तवाभर हातभाकऱ्या थापताना दिसतात, तसंच एक बिघडलेलं यंत्र कष्टाने व डोकं चालवून दुरुस्त करताना देखील दिसतात. एक मिठाची गोष्ट सांगताना तिच्यात अजून किती विषय नकळत गुंफले जातात!

 

8-compressed
(वसईच्या मिठागारातली छायाचित्रे : उदय ताडफळे,  चित्र : कविता महाजन )लेखिका कविता महाजन यांचे 'घुमक्कडी' मालिकेतील यापूर्वीचे ब्लॉगः


 

घुमक्कडी : (1) आभाळाचा कागद, समुद्राची शाई


घुमक्कडी : (2) सीतेची तहान


घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना


घुमक्कडी : (4) साता प्रश्नांची कहाणी

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV