घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना

घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना

पहाटे उठले तेव्हा खिडकी उघडलेली नव्हती. नुसते पडदे दूर सारून बाहेरचा काळोख पाहिला. शहरांमधला काळोख देखील निर्भेळ नसतोच. त्यात कृत्रिम उजेडाचे पुंजके हिण मिसळतात आणि विचित्र रंग निर्माण करतात.

ध्यान संपल्यानंतर डोळे उघडले तासाभराने तेव्हा उजाडलं होतं लख्ख. बंद तावदानांमधून उजेड पाझरत होता. पलीकडच्या कुंड्यांमधली दोनपाच झाडंवेलींच्या पानांमधून हिरवा प्रकाश दिसत होता. पाखरांना पाण्यासाठी मातीचे वाडगे भरून ठेवलेले असतात, त्यामुळे खिडकीच्या त्या एवढ्याशा जागेत पाखरांची गर्दी झाली होती. कुणी येतजात होते, कुणी न्याहाळत होते, कुणी आपले पंख साफ करत होते. किलकिल सुरू होती. तावदानं बंद असल्यानं निचिंतीनं वावरत होते सारे. एक सूर्यपक्षी तावदानालगतच्या फांदीवर येऊन बसला आणि काचेला चोच चिकटवून आत बघू लागला. काय बघत असेल तो? काय दिसत असेल त्याला? त्याचा मेंदू माणसाइतका विकसित असता, तर आत्ता त्याच्या डोक्यात कोणते विचार असले असते आणि मनात कोणत्या भावना असत्या? माणसाचं घर कसं दिसतं याविषयी त्यानं काय लिहिलं असतं? असे प्रश्न एखाद्या लहान मुलीसारखे माझ्या मनात उगवू लागले आणि छान निरागस वाटू लागलं.

तेवढ्यात 'फाइंडिंग निमो' या चित्रपटातलं एक दृश्य आठवलं. निमो हे माशाचं छोटं पिल्लू बाबाचं न ऐकता सुळकन निसटून 'मोठ्या समुद्रा'त पळून जातं आणि 'हरवतं.' त्याचा आणि त्याला शोधण्यासाठी निघालेल्या त्याच्या बाबाचा सगळाच प्रवास अत्यंत नाट्यपूर्ण घटनांनी भरलेला आहे. समुद्राआतल्या भव्य जगातून क्वचित प्रसंगी बाहेरचं आकाश दिसतं, समुद्री पक्षी दिसतात; समुद्राच्या तळाशी कोणे एके काळी बुडून गंजून गेलेलं अवाढव्य जहाज दिसतं; तेव्हा थोडी थोडी माणसांच्या जगाची चाहूल लागते. पण मनातून तो समुद्रच इतका देखणा, इतका रंगांची भरलेला, नव्यानिराळ्या आकाराच्या सजीव-निर्जीवांचा आहे की या अ‍ॅनिमेशनपटात दिग्दर्शकाने 'कॅमेरा' पाण्यातून बाहेर नेऊ नये असं वाटत राहतं.

Nimo_1

(अ‍ॅक्वेरियममध्ये अडकलेला निमो )

आणि मग जे आपल्याला नको ते घडतंच. एक मोठं जहाज येतं, त्यातून जाळी फेकली जातात, निमो जाळ्यात सापडतो. त्याची विक्री होते आणि तो 'शोभे'साठीच्या एका अ‍ॅक्वेरियममध्ये दाखल होतो, जे एका डेंटिस्टच्या दवाखान्यात आहे. पुढची गोष्ट चित्रपटात पाहालच, मला इथं सांगायचं आहे ते एका विशेष दृश्याविषयी. डेंटिस्टकडे उपचारांसाठी आलेली डोरला. वाट पाहण्याच्या वेळेत काय करावं, हे तिला सुचत नाहीये. लहान, गोड, बिचारी मुलगी दिसतेय ती. तेवढ्यात तिला अ‍ॅक्वेरियम दिसतं आणि त्यातले मासे पाहण्यासाठी ती धावते. बाहेरून ती हे सारं पाहताना जे परिसरातले जे विविध आवाज कानी पडतात, जी दृश्यं दिसतात, ती आपल्याला नॉर्मल वाटतात; कारण तो आपल्या अनुभवातला रोजचाच भाग असतो. मग कॅमेरा जणू  अ‍ॅक्वेरियममध्ये शिरतो आणि निमोच्या नजरेतून बाहेरचं जग दिसू लागतं. आवाजाच्या पातळी इतकी कायच्या काय वाढून ध्वनींच्या भयाण जीवघेण्या लाटेसारखी कानांवर आदळते की आपलं अख्खं शरीर फक्त कान झालंय असं वाटतं. असह्य कोलाहल वाटू लागतो सगळा. अ‍ॅक्वेरियमच्या दिशेने हसत येऊन काचेवर टकटक करत मासे पाहणारी मुलगी इवल्याश्या निमोच्या नजरेने आतून पाहताना अक्षरशः राक्षसी दिसते आणि तिचं हसू, विकृत, तिरस्कृत भयावह वाटू लागतं. हे दृश्य माझ्या मनात कायमचं ठसलेलं आहे. त्यातून एखाद्या कवितेसारखे अनेक अर्थ मनात उलगडत असतात अनेकवेळी.

Dorla_2

(अ‍ॅक्वेरियमच्या काचेवर टकटक करणारी डोरला, निमोच्या नजरेतून )
एकदा वाटलं की, सगळे संदर्भच बदलतात जागा बदलल्यानंतर. आकारांचे अर्थ निराळे बनतात, ध्वनींचे अर्थ निराळे लागतात. हालचालींना वेगळाच अर्थ प्राप्त होतो. विचार, कल्पना, भावना सगळंच बदलून जातं इत्थंभूत.

पहिल्यांदा समुद्र पाहिला, तेव्हा १७-१८ वय होतं. अर्थात चकित झाले होते, पण ओहोटी होती म्हणून फार क्रेझ वाटली नसावी. मुळात जंगलाचं, डोंगरांचं अप्रूप मला जास्त. जंगलात दर क्षणाला, दर पावलाला दृश्यं बदलतात. समुद्रकिनाऱ्यावर कितीही वेळ बसून राहा किंवा फेऱ्या मारा किंवा नावेतून - जहाजातून हिंडा... लाटा येतात-जातात इतकंच, याहून काही विशेष बदलत नाही... असं वाटायचं. आकाश बदललं की पाण्याचा रंग बदलतो आणि ते काही झपाझप बदलत नाही. वादळ आलं तर अजून जास्त उंचीच्या लाटा येणार, म्हणजे दृश्य एनलार्ज होणार, भीतीही एनलार्ज होणार... अशा चुकीच्या समजुती होत्या. आपल्या मर्यादित अनुभवांवर पक्का विश्वास ठेवला आणि आपली आवडनिवड अमुकच आहे असं निश्चित करून त्या आवडीनिवडीच्या पिंजऱ्यात जाऊन बसलं की दुनिया वेगाने खुजी होते. नव्या गोष्टी करून पाहाव्या वाटत नाहीत आणि मग नवे अनुभव देखील येत नाहीत. आपण अधिकाधिक पाखंडी बनत जातो. ते टाळायचं तर स्वत:ला पुन:पुन्हा पिंजऱ्यातून बाहेर काढून उडवून लावणं करावं लागतं.त्यासाठी कधी निमित्तं शोधावी लागतात, तर कधी ती घरचालून येतात.

अशीच एकदा लक्षद्वीपला गेले. मुंबईहून कोची विमानानं. तिथून छोटुकल्या विमानानं लक्षद्वीप. त्या विमानात आठ प्रवासी, एक पायलट आणि एक एअरहोस्टेस असे मोजून दहा लोक. विमान उतरताना मी जोरात किंचाळले. जो समुद्री हिरवा सिनेमातल्या दृश्यांमध्येच पाहिल्यानं खोटा वाटत असतो आणि करडे वा करडट निळे समुद्रच कायम पाहिलेले असतात, असा रंग ही एखादी दैवी घटनाच वाटत होती.

Sea_3

तिथून बोटीने शेवटचं बेट गाठलं. ज्यावर निवांत रेंगाळत पूर्ण फेरी मारली तरी जास्तीत जास्त अर्धा तास लागेल. तिथं मला snorkeling करायचं होतं. पारदर्शक किनारे. अगदी छोटे मासे पार किनाऱ्यालगत पोहणारे, त्यात त्या उथळ तळापर्यंत पाण्यातून उन्ह शिरल्यानं नाचणाऱ्या प्रकाशरेषा. खरंच ते दुसरं जग होतं हे पाण्यात गेल्यावरच कळलं. खाली प्रवाळाचं जंगल, आपल्या बाजूने एखादं मोठं देखण्या नक्षीदार पाठीचं कासव फिरतंय, अविश्वसनीय वाटावेत अशा रंगांचे मासे भवताली त्यांच्या दैनंदिन व्यापातापात इकडून तिकडे जाताहेत.

Kavita_4

त्या समुद्रात मला काहीबाही छान सुचू लागलं आणि भवताली माझी पात्रंच पात्रं दिसू लागली. नंतर बऱ्याच वर्षांनी त्यातले काही लोक 'समुद्रच आहे एक विशाल जाळं' या माझ्या दीर्घकवितेत राहायला आले. श्वासाची किंमत त्या पाण्यातच कळली.

पाणी इतकं शाईसारखं निळंशार होतं की बाहेर आले तेव्हा अंगावरून शाई निथळतेय की काय आणि त्वचेचा रंगदेखील निळा बनला आहे की काय, असं वाटत होतं. स्वत:ला वेगळ्या जागी पाहिलं की आपणही वेगळे दिसतो!

०००

('फाइंडिंग निमो'मधली छायाचित्रे डिस्नेच्या वेबसाईटवरून. बाकी चित्रे व छायाचित्रे : कविता महाजन )

Kavita_5
पुनःपुन्हा निमो आठवत होता... कामात घुमत होतं... पोहत राहा, पोहत राहा, पोहत राहा!

००
Nimo_6

संबंधित ब्लॉग

घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!


घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी

घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना

घुमक्कडी : (२) सीतेची तहान

घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV