घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण

घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण

लक्षद्वीपला ज्या बेटावर मी आठवडाभर राहिले होते, तिथं केवळ बारा जोडप्यांची राहण्याची व्यवस्था तिथं होती. चोवीस लोकांची म्हणूया हवंतर, कारण एकटी येणारी, टिपीकल पर्यटक नसणारी लोकंच अशा जागी अधिक येतात. साधारण तितकाच निवासी स्टाफ. बाकी लोक कामापुरते बोटीतून येणारे-जाणारे, पण तेही दहाहून अधिक नसायचे. म्हणजे जास्तीत जास्त साठ लोकांची 'गर्दी' तिथं असायची. बाकी पर्यटक मोठ्या बेटांवर विमानतळ, सरकारी कचेऱ्या, शाळा, स्थानिक लोकांची व नोकरदारांची घरं आणि अर्थात पर्यटकांसाठी रिसोर्ट, हॉटेल्स असा गचका असलेल्या जागी राहत. तुलनेत ती खूपच स्वस्त होती आणि तिथं टीव्ही होते, फोन होते, मोबाइललाही रेंज येत असे. टिपीकल पर्यटक तेच ज्यांना या 'सुविधा' सोडायच्या नसतात. मला हे सगळं, अगदी या टिपीकल पर्यटकांसह वगळायचं असतं.

blog 1

मला खूप शांतता, अजिबात न बोलणं - ऐकणं आणि चालण्यासाठी भरपूर मोकळे लांबसडक रस्ते हवे वाटतात. केव्हाही उठावं आणि चालायला लागावं असा आसपास असला पाहिजे, असं वाटू लागलं की मी घुमक्कडी मोडमध्ये जाते.

मी राहते तिथली गोष्ट प्रातिनिधिक म्हणावी अशी आहे. खूप वेगाने आमची वस्ती वाढत गेली. टेकड्या, आमराया, बावखलं सगळं गायब झालं. मोकळी जागा इमारतींनी भरून गेली. बेकायदेशीर वसाहती, स्थलांतरित मजुरांनी गिळलेले फुटपाथ, झोपड्यांनी व्यापून गेलेला डोंगर. कुठंही प्राथमिक सोयीदेखील नाहीत नीट. बकाल होत चाललंय सगळं. अशा मिश्र वस्त्यांमध्ये प्रत्येकाला आपली 'ओळख' राखावी वाटतेय. त्यातून आपापले सण समूहानं साजरे करणं सुरू झालं. प्रचंड आवाज हे या बकालीचंच एक लक्षण. यावर्षी ईदला फुटपाथावर लाऊडस्पीकर्स लावून ठेवून सरबत वाटत होते. अय्यपाची मिरवणूक निघतेय दरवर्षी. शिखांच्या मिरवणुकी दरवर्षी निघतात. गणेशोत्सव व नवरात्रीचे गोंधळ तर नवे नाहीतच. ज्या टेकडीवर पूर्वी फिरायला जात असू तिथं एक साईबाबाचं मंदिर, एक मशीद आणि एक साऊथ इंडियन लोकांचं चर्च झालंय. एका भागात तीन वेगळी प्रादेशिक चर्च. अनेक देवांची मंदिरं. चर्चबेल वाजतात. संध्याकाळी मंदिर-मशीद-चर्चचा सामूहिक कल्ला सुरू असतो एकमेकांच्या आवाजांना वरचढ करत. सर्व धर्मांच्या ईश्वरांच्या वस्त्या झाल्यापासून शांतता हरवली आणि कोलाहल वाढला. खेरीज कॉलनीत लग्नं, बारशी, वाढदिवस, सणवार, नवीन वर्षाचं आगमन... इत्यादी शेकडो गोष्टी असतातच शांततेला हाकलून लावणार्यास. या जगात बहिरं होऊन राहिलं पाहिजे. आपल्याला काय ऐकायचंय हे आता महत्त्वाचं नाही; आपण काय ऐकतोय हे जगाला ऐकवणं अधिक महत्त्वाचं होऊन बसलंय. त्यानुसार सकाळ-संध्याकाळ विविध रेकॉर्डेड मंत्र, भजनं, प्रार्थना कानी पडत राहतात. शांततेसाठी ईश्वराचे बाजार नसतील अशा जागी जावं वाटतं.

blog 2-compressed

स्कंदपुराणात एक गोष्ट आहे.

एक हरिण कोरड्या विहिरीत पडलं. ते जखमी होऊन वेदनांनी कळवळून ओरडू लागलं. त्याच्या केविलवाण्या हंबरड्याने आसमंत भरून गेलं. सर्वत्र उदासी पसरू लागली. त्याला बाहेर कसं काढावं हे कुणाला सुचेना. निरनिराळे उपाय करून झाले, पण उपयोग झाला नाही. विहीर इतकी खोल, जुनाट व पडीक होती की तिच्यात कुणी उतरू धजत नव्हतं. लोकांनी तंडी नामक तपस्व्याला साकडं घातलं. त्याला घेऊन लोक विहिरीजवळ आले. वातावरणात चिडीचूप शांतता पसरली. माणसंच काय पशुपक्षी, किडेमुंग्याही गप्प बसली. केवळ हरणाचं ओरडणं ऐकू येत होतं. तंडीने विहिरीजवळ आसन घातलं. शांत चित्तानं 'हुंकार' करण्यास सुरुवात केली. त्या हुंकाराने कोरड्या विहिरीत पाणी भरण्यास सुरुवात झाली. पाणी वाढलं तसं हरीण तरंगू, पोहू लागलं. त्याचं ओरडणं बंद झालं. हळूहळू विहीर पाण्यानं तुडुंब भरली आणि हरीण विहिरीतून बाहेर आलं.
या गोष्टीतून अनेक अर्थ निघू शकतात. कुणी त्यातला फक्त चमत्कार पाहू शकतं आणि त्यावर विश्वास वा अविश्वास दाखवू शकतं. मी गोष्टीकडे वास्तवाचा वृत्तांत म्हणून कधीच पाहत नाही, उलट अनेकदा तर वृत्तांतात देखील गोष्टी शोधते. चमत्कार मला कल्पनाशक्तीचा एक उत्कृष्ट आविष्कार म्हणून ऐका-वाचायला आवडतात; त्यातून अंधश्रद्धा जोपासणं मान्य नाही. या गोष्टीतला हुंकार मला आदिम मंत्रांपैकी एक वाटतो. लक्ष केंद्रित करणं, एका जागी शांत चित्ताने स्थिरावून काम करणं, हेतू स्वच्छ व ध्येय स्पष्ट असणं, आपल्या कृतीबाबत पूर्ण आत्मविश्वास असणं, व्यर्थ गर्व व अभिमानाचा लवलेश नसणं असे अनेक गुण मला तंडीच्या या कृतीत दिसतात, जे त्याच्याकडून शिकावे - घ्यावे वाटतात.
कोचीला एअरपोर्टहून हॉटेलपर्यंत जाताना ड्रायव्हरने गाडीत एका मंत्राची टेप लावली होती. तो त्या गायकाने अर्थातच पूर्णवेळ गायला नव्हता. एकदा गायला की तोच कॉम्प्युटरवर कॉपी - पेस्ट करता येतो आजकाल, तसा केल्याने सपाट ऐकू येत होता. तो अभिमानाने म्हणाला की, "मी रोज जितका वेळ गाडी चालवतो तितका वेळ फक्त हाच मंत्र ऐकतो. आजवर चाळीस कॅसेट तरी खराब झाल्यात. "

मी त्याला दोन मिनिटांसाठी ते बंद करण्यास सांगितलं. म्हटलं, "इतका काळ इतका वेळ ऐकतोस तर तू एकदा म्हणून दाखव ना. पाठ झाला असेलच ना आता. "

तो गांगरला. त्याने आठवून पाहिलं तर अर्धी ओळ देखील आठवत नव्हती. म्हटलं, "म्हणजे कानात शिरतंय, पण मनात जागा नाही. ऐकताना तुझं मन दुसरीकडेच कुठे असणार. त्यामुळे हा कोलाहल लोकांच्या कानांवर कंपल्सरी आदळणं, त्यांनी बंद करा म्हटलं तर त्यांना धर्मद्वेष्टे ठरवणं हे बास कर. त्यात तुझा काडीचा फायदा नाहीये. त्यापेक्षा तुझा विश्वास आहे तर मंत्र नीट पाठ कर आणि सकाळी कामावर निघण्याआधी शांत बसून पाच वेळा म्हणत जा. फायदा होईल. अन्यथा त्या कोरड्या विहिरीत पडलेल्या हरणागत नुसताच हंबरत राहशील. "
blog 3
समुद्रात प्रवाळांची बेटं पाहण्यासाठी काचेचा तळ असलेल्या बोटीतून आत दूरवर गेले, तेव्हा तंडीच्या हुंकाराप्रमाणे फक्त लाटांच्या गाजेखेरीज दुसरं काही ऐकू येत नव्हतं. एका बाजूने उन्हं होती तिकडे समुद्र करडा दिसत होता आणि दुसरीकडे निळा. पुढे पुढे जाताना अनेकजागी पाण्यात निळ्या आणि हिरव्याच्या विविध छटा दिसत होत्या. नाविकाला विचारलं तर तो म्हणाला, "तळाची उंची - खोली किती आहे आणि तळाशी काय आहे यावर हे वरचे रंग बदलतात. तळाशी कुठे डोंगर आहेत, कुठे पाण्यातून अजून वर न आलेलं बेट आहे, कुठे प्रवाळांचं बेट आहे हे त्यावरून समजतं. "
म्हटलं, माणसांचं ही असंच आहे. ज्यांची बुद्धी जितकी सखोल त्यांचे रंग तितके गहिरे बनतात.
( चित्र व छायाचित्रे : कविता महाजन )

संबंधित ब्लॉग:

घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना

घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!

घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी

घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना

घुमक्कडी : (२) सीतेची तहान

घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV