चालू वर्तमानकाळ (९) : बाईच्या थंडगार मांसाचे अजून काही तुकडे

हातातल्या टिपऱ्या नाचवून दाखवत ओठांचे चंबू करत सेल्फी कसे काढणार? रोजच मरतात माणसं, त्यांच्यासाठी काय रडायचं? आणि किती वेळ? अशा मानसिकतेचेच बहुसंख्य... त्यांच्यापुढे काय बोलणार?

By: | Last Updated: > Tuesday, 10 October 2017 11:27 AM
kavita mahajans 9th blog in chalu vartaman kal series

प्रतिक्रियेची घाई आणि उत्साह यांचं प्रमाण अत्यंत वेगाने वाढतंय आणि प्रसारमाध्यमांना त्याची जबरदस्त लागण झालेली दिसतेय. वाईट बातम्या आल्या की आनंदून जाणाऱ्या काही हिंस्र वृत्तीच्या विकृत पत्रकारांनी वाचक–प्रेक्षकांचे मेंदू ताब्यात घेऊन चपटे सपाट करून ठेवले आहेत. काहीतरी सनसनाटी शोधण्याची, नसेल तर सनसनाटी निर्माण करण्याची वखवख तारस्वरात बोलत, खूप हातवारे करत बातम्या देणाऱ्या – चर्चा करणाऱ्या टीव्ही पत्रकारांनी प्रथम हिंदीत दाखवून दिली आणि तिचं लोण काही काळातच मराठी वृत्तवाहिन्यांवर पसरलं. याचा प्रभाव प्रिंट मीडियावरही पडू लागला. एका प्रतिष्ठित इंग्लिश दैनिकाने लैंगिक छळा बाबतची अशीच एक बातमी पुरती शहानिशा न करताच छापली आणि दोन दिवसांनी ती मागे घेत जाहीर क्षमा मागितली.

 
एलफिन्स्टन रोड स्टेशनवर जी चेंगराचेंगरी झाली, त्यात अनेक निरपराध लोकांचे जीव गेले. बातम्या, प्रतिक्रिया, संताप, आक्रोश, हळहळ असा मोठा कोलाहल उठला. तो जरा शमू लागल्यावर काही लोकांनी याच रात्री देवीसमोर दांडिया खेळत नाचणाऱ्या, दुसऱ्या दिवशी बातमीतली सगळी भीषणता नजरेआड टाकून दसऱ्याच्या शुभेच्छा पाठवणाऱ्या उथळ लोकांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. एक रक्ताचं कारंजं उसळलं आणि काही मिनिटांत गोठलं… त्याविषयी तत्काळ उद्रेकातून प्रतिक्रिया नोंदवून झाल्या… आता कशाला ते डोक्यात ठेवायचं? अशानं आपले उत्सव आपण कधी आणि कसे साजरे करणार? आयटम सॉंगवर कमरा लचकवत, ढुंगणं हेलकावत, स्तनांमधल्या घळ्या दाखवत कसे नाचणार? हातातल्या टिपऱ्या नाचवून दाखवत ओठांचे चंबू करत सेल्फी कसे काढणार? रोजच मरतात माणसं, त्यांच्यासाठी काय रडायचं? आणि किती वेळ? अशा मानसिकतेचेच बहुसंख्य… त्यांच्यापुढे काय बोलणार? तिसऱ्या टप्प्यात या गर्दीत जखमी झालेल्या, मृत पावलेल्या व्यक्तींच्या मौल्यवान वस्तूंची लूट कशी झाली याच्या बातम्या, हकीकती ऐकू येऊ लागतात. आता मोबाइलवर फोटो, व्हिडीओ घेणं सोपं झाल्याने बातम्यांच्या अलीकडच्या – पलीकडच्या गोष्टी सामान्य माणसांकडून चित्रित होऊन सोशल मीडियावर कोणत्याही संपादनाशिवाय, सेन्सॉर न होता येऊन पडतात. त्यात या अपघातावेळचे दोन व्हिडीओ व्हायरल झाले. एकात एका बाईच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्या जात होत्या. आणि दुसरा व्हिडीओ तर भीषण होता…….

 

प्रेतांच्या ढिगाऱ्यात अडकलेली, शेवटचे श्वास घेणारी एक स्त्री रडत, मदतीसाठी क्षीण हाका मारत होती. ज्यांना हे दिसत, ऐकू येत होतं ते तिच्यापर्यंत गर्दीमुळे पोहोचू शकत नव्हते. एक हात त्या मरणोन्मुख शरीराशी गलिच्छ चाळे करत आहे असं त्या व्हिडीओसोबतच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. इंग्लिश वृत्तपत्रात आलेली बातमी याच व्हिडीओवर आधारित होती. त्यामुळे व्हिडीओ त्याच नजरेने पाहिला गेला. प्रोपगंडाचं वैशिष्ट्यच असं असतं की तणावाच्या काळात अस्थिर झालेली मनं पटकन विश्वास ठेवायला लागतात.

 

व्हिडीओ पाहिला तेव्हा अजून इतकी घाण अशा काही पुरुषांच्या वृत्तीत आहे यानं त्रास होऊ लागला. काहीवेळाने तर संतापाने रडू फुटेल असं वाटायला लागलं. जखमी, मृतवत स्त्रियांनाही न सोडणारे प्रेतांना तरी लैंगिक छळ केल्याबिगर कसे सोडतील असं मनात आलंच. मृतदेह बाजूला काढताना, जखमी लोकांना दवाखान्यात नेताना अनेक स्त्रियांच्या अंगावरचे कपडे फाटले आहेत हे ध्यानात येताच स्टेशनसमोरच्या इमारतीतील लोकांनी त्वरेने चादरी, टॉवेल्स पाठवले… ही चांगली गोष्ट वाचूनही हा व्हिडीओ डोळ्यांसमोरून हटेना.
आणि मग अपरिहार्यपणे मंटो आठवला.

 

मंटोच्या ‘ठंडा गोश्त’ या कथेचा काळ तब्बल ७० वर्षं जुना आहे. फाळणी काळातल्या अनेक कथा त्यानं लिहिल्या आहेत ही त्यातलीच एक. बऱ्याच दिवसांनी ईश्वरसिंह रात्री उशिराने परतला आहे. इतके दिवस कुठे कडमडला होतास, म्हणून त्याची बायको कुलवंतकौर जाब विचारते आहे. तो तिची नजर चुकवतोय. वरून हट्टाकट्टा दिसणारा ईश्वरसिंह थकलेला, आजारी असल्यागत पलंगावर तिच्याशेजारी जाऊन बसतो आणि ती जो प्रश्न पुन:पुन्हा विचारते आहे, त्याचं उत्तर देणं टाळण्यासाठी तिच्या अंगाला झटू लागतो. शहरातून लूट घेऊन आलाहेस ना? ती आपले प्रश्न सोडत नाही. आदल्याच आठवड्यात त्याने पैसे, दागिने लुटून आणले होते; तेव्हा बिछान्यावर असाच तिच्यासोबत खेळ सुरू केला होता आणि खेळ अर्ध्यातच सोडून तो अचानक उठून निघून गेला होता… तो आज उगवला होता. ईश्वरसिंह त्या दिवशी सोडलेला खेळ पुन्हा सुरू करतो. पण आज पुन्हा बिनसतं. आता ईश्वरसिंह आपल्यापासून काहीतरी लपवतोय, तो देहानं इथं असला तरी मनानं दुसरीकडे कुठंतरी आहे, कदाचित दुसरी कुणी स्त्री त्याच्या आयुष्यात आली आहे आणि तिच्या चिंतनात त्याला बायकोबरोबर संभोग करणं जमत नाहीये… कुलवंतकौरचं मन शंकांनी व्यापून जातं. ती लेचीपेची बाई नाहीये. संतापून बिछान्यातून उठून ती कपडे घालते आणि थेट विचारते. म्यान केळाच्या सालीसारखं काढून फेकून ती हत्यार हातात घेऊन त्याच्यावर वार करते. त्याला संतापून तीचं नाव विचारत राहते. तिनं केलेल्या घावातून ओघळणारं रक्त त्याच्या जिभेवर उतरतं. स्वत:च्याच रक्ताची चव लागल्याने शहारून तो सांगतो, याच हत्यारानं मी सहा लोकांना जिवे मारलं आहे. या सांगण्याकडे ती दुर्लक्ष करते. तिला केवळ त्या बाईचं नाव हवं आहे, या हत्याबित्यांशी तिचं काही देणंघेणं नाही. आवंढे गिळत तो हकीकत सांगतो. त्या हत्या केल्या, सोनंनाणं लुटलं; त्यावेळी तिथं एक देखणी तरुणी दिसली बेशुद्ध पडलेली. तिलाही मारून टाकावं वाटलं, पण देहाचा मोह झाला. तिला खांद्यावर टाकून पळवली, दूर निर्जन स्थळी झुडुपांत नेऊन टाकली आणि भोग सुरू केले… वासनेचा निर्लज्ज खेळ संपताना एकाएकी ध्यानात आलं की, तिच्यात जीवच नाहीये… आपण एका प्रेताला भोगत होतो. सांगून मोकळं झाल्यावर ईश्वरसिंह बायकोला आधारासाठी हात मागतो. ती त्याच्या हातात हात तर देते, पण तिचा हात बर्फगार असतो!

 

ही कथा त्यादिवशी पुन्हा वाचून काढली. वाटलं, जो कुणी तो अधम पुरुष असेल, त्याच्यापर्यंत हा व्हिडीओ, त्याची निदान काही लोकांनी केलेली नालस्ती पोहोचली असेल का? त्याचं हे कृत्य त्याच्या घराकुटुंबातल्या, कामाच्या जागच्या स्त्रियांनी पाहिलं असेल का? त्याला कुणी जाब विचारला असेल का?

 

आणि मग दुसरी बातमी आली की, सदर व्यक्ती मदतच करत होती, चाळे नाही. आपली चूक कबुल करून क्षमा मागण्याची कृती त्या दैनिकाने केली याचं बरं वाटलं, पण ते नंतर. आधी वाटलं की, एका महिला पत्रकाराला अशी बातमी देताना काहीच गांभीर्य का वाटू नये? हे वाचून किती संवेदनशील स्त्रीपुरुष अत्यंत अस्वस्थ होतील याचं भान नको का? तिच्या वरिष्ठांना या गंभीर बातमीची पुरेशी शहानिशा केली आहे ना हे विचारण्याची गरज का भासली नसेल? नंतर कारवाई झाली हे ठीक, पण आधी काळजी का नाही घेतली?
की त्यानाही वाटत होतं… काय फरक पडतो? १ जानेवारी २०१७ पासून आजच्या तारखेपर्यंत मुंबईत बलात्काराचे ४०७ गुन्हे नोंदवण्यात आलेत, त्यांत २५१ मुली अल्पवयीन आहेत. अपहरणाचे ७८५ गुन्हे नोंदवले गेलेत, त्यात ७७३ मुली अल्पवयीन आहेत. छेडछाड आणि विनयभंगाचे गुन्हे १२५७ आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचे आकडे थोडे जास्त आहेत. तसे ते नेहमीच वाढते असतात… यात नवं काय आहे? बाईच्या मांसाचे अजून थोडे थंडगार तुकडे झाले तर कुणाचं काय अडतं, काय बिघडतं?

 

मंटो पुन्हा माझ्या लिहिण्याच्या टेबलासमोरच्या खुर्चीत येऊन बसला… त्याच्या हातात ठंडा गोश्त नावाची कथा होती. त्यानं माझ्या नजरेला नजर दिली, आमच्या डोळ्यांमधल्या अश्रूंचा बर्फ झालेला होता.

 

चालू वर्तमानकाळ’ सदरातील याआधीचे ब्लॉग –

 

चालू वर्तमानकाळ (8) : बिनमहत्त्वाचे (?) प्रश्न आणि त्यांची हिंस्र उत्तरं

चालू वर्तमानकाळ (7) : अरुण साधू : आपुलकीच्या उबदार अस्तराचं नातं

चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या

चालू वर्तमानकाळ (5) : अनेक ‘कुत्र्या’ आहेत या देशात…

चालू वर्तमानकाळ (4) : जन पळभर म्हणतील…

चालू वर्तमानकाळ (3) : आईचा घो आणि बापाची पत

चालू वर्तमानकाळ (२) – अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची!

चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब

News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:kavita mahajans 9th blog in chalu vartaman kal series
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published: