चालू वर्तमानकाळ (4) : जन पळभर म्हणतील…

आपले नोकरीधंदेही दिरंगाई, चालढकल करत निभावतात. निरुत्साही, नीरस, निष्क्रिय, बधीर व मठ्ठ वातावरणात जाहिराती बघून सुखाच्या, समृद्धीच्या व्याख्या निश्चित करतात आणि बाजाराच्या करवती दातांमध्ये सापडलेला एक किडा बनून वळवळत राहतात. अशा सरपटणाऱ्या माणसांकडून संघर्षाची अपेक्षा कशी करायची?

By: | Last Updated: > Tuesday, 5 September 2017 9:31 AM
Kavita Mahajan’s blog in Chalu Vartaman Kal Series

ज्या दोन साध्वींनी बाबा रामरहीमच्या विरोधात पंतप्रधानांना निनावी का होईना पण पत्र लिहिलं, ते पत्र जाहीर प्रकाशित होऊनदेखील त्या चर्चेचं केंद्र बनल्या नाहीत. पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी हे पत्र आपल्या ‘पूरा सच’ या वृत्तपत्रात छापलं, त्यानंतर त्यांची हत्या केली गेली; त्या निर्भीड पत्रकाराचीही दखल विशेष कुणी घेतली नाही. मुळात असे आदर्श पत्रकार आता केवळ जुन्या कथा-कादंबऱ्या आणि जुन्या चित्रपटांमध्येच दिसतात; प्रत्यक्षात ही जमात आता जवळपास  नामशेष झालेली आहे असंच दिसतंय. कारण पंधरा वर्षांपूर्वीही हे धाडस करणारा हा एकमेवच होता. २००२ साली झालेल्या त्यांच्या हत्येच्या केसचा निकाल अजूनही लागलेला नाही. त्यावेळी दोन-चार दिवस बातम्या छापल्या गेल्या असतील; नंतरही ‘पाठपुरावा’ करायचा असतो, हेच आपली प्रसारमाध्यमं आता विसरून गेली आहेत. त्यांचं नवनव्या ब्रेकिंग न्यूजचं खूळ इतकं वाढलं आहे की, त्यामुळे कितीही मोठ्या बातमीचा जीव तात्काळ लहान-लहान होत जातो हे एकतर बहुतेकांना कळत नाही आणि ज्यांना कळतंय ते दुर्लक्ष करतात. कारण टीआरपीच्या रॅटरेसमध्ये आपण मागे पडू अशी धास्ती वाटणाऱ्या अनेक उंदरांमधला एक उंदीर बनून राहण्यातच त्यांचं सुखस्वास्थ्य सामावलेलं आहे. फेसबुक मेमरीमधून वर आलेल्या या आठवड्यातल्या पोस्ट पाहिल्या तर तीनेक वर्षांपूर्वीच्या आसारामबापूच्या भानगडी दिसल्या. अशा बुवाबापूंच्या या ‘कर्तृत्वा’चे आढावे रामरहीमच्या निमित्ताने घेतले गेले. जेमतेम दोन दिवस बातमी जगली, मग कोमात गेली.

ते निनावी पत्र लिहिल्यापासून ते केसचा हा निकाल येईतो त्या दोन साध्वींची पंधरा वर्षं कशी गेली असतील याचा मी विचार करत होते. प्रचंड ताणामुळे काही काळ तरी त्यांचे दैनंदिन व्यवहार मुश्कील झाले असतील. मग हळूहळू परिस्थितीचा स्वीकार करून त्यांनी स्वत:ला  जिवंत राहायला शिकवलं असेल. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांना शोधून काढलं, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असेल? त्यांच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया काय असेल? हो-नाही च्या गलक्यात मन स्थिर ठाम करत कोर्टासमोर उभं राहण्याचं धाडस त्यांनी कसं एकवटलं असेल? त्यांच्यासाठी काही वर्तमानकाळ शिल्लक असेल का की त्या भूतकाळाची हडळ मानगुटीवर घेऊनच पाठीचं धनुष्य करून, कुणाच्या डोळ्यांना डोळा न भिडवता मुकाट जगण्याचं कर्मकांड उरकून टाकत असतील? मनात आत्महत्येचे, मरणाचे उदास करडे विचार येत असतील की लालभडक संतापाचे निखारे फुलून ओठांवर शिव्याशाप येत असतील? कोर्टातलं पिवळट सरकारी वातावरण, कायद्याची बोजड आणि संशयाच्या व संभ्रमाच्या दुधारी सुरीवर उभं करणारी भाषा, सामान्य माणसांना न कळणारे वकिली डावपेच, पुन:पुन्हा त्याच किळसवाण्या आठवणीत प्रवास करायला लावणारी हलकट शब्द उच्चारणं भाग पाडणारी प्रश्नोत्तरं… पंधरा सेकंद हे वाचणंही नको वाटतं आपल्याला मग पंधरा वर्षं खेड्यातलं घर ते शहरातलं कोर्ट या खेपा किती बधीर करणाऱ्या असतील?

ज्या पीडित स्त्रियांचा प्रवास उंबरठा ओलांडून व्हाया पोलीसस्टेशन व हॉस्पिटल कोर्टापर्यंत जातो, त्याची बटबटीत झलक आपण अनेकदा चित्रपटांमधून पाहिलेली असते, मात्र ‘प्रत्यक्ष’ याहून कैकपट अधिक बटबटीत असू शकतं / असतंच, हे मात्र मनातही आलेलं नसतं; त्या स्त्रीच्या जागी कुणी कधीच स्वत:ला पाहू इच्छित नाही, पाहत नाही. फेसबुकवर थोडं हळहळून झालं, की आपण आपल्या दैनंदिन गोष्टी करायला मोकळे होतो; अनेकांना तितपतही तसदी घ्यावी वाटत नाही आणि ज्यांना प्रतिक्रिया व्यक्त करण्याची फुरसतच देत नाही आयुष्य, त्यांची संख्या तर इंटरनेटच्या आवाक्याबाहेर अमाप आहे. जास्त शोषित, पीडित तिथंच आहेत याचं भानही आता ‘आम्ही मजेत, सुखात, शांततेत जगतोय’ असा दिखावा करण्याच्या नादात लोकांना राहिलेलं नाही. या नव्या मध्यमवर्गाकडे आता विचारांना वेळ नाही, जागा नाही आणि नसते विचार करण्याची त्यांची इच्छाही नाही. रोज नवा विषय त्यांच्या डोक्यावर आदळतो आणि काहीवेळा तर एकाच दिवसात अनेक विषय आदळतात. साधारणपणे पंधराएक वर्षांपूर्वी ‘सगळं तुकडा-तुकडा झालंय’ असं म्हणणारे आम्ही, पाचेक वर्षांपूर्वी ‘सगळं पिक्सोलेट झालंय’ असं म्हणू लागलो आणि आज आत्ता ते फाटलेले ठिपकेही विखरून गेल्याचं अनुभवतो आहोत. यात दोष केवळ प्रसारमाध्यमांचा व तंत्रज्ञानाचा नाहीये; ती बाजारपेठेच्या महाभयंकर हत्याराच्या अनेक पात्यांमधली एकदोन पाती आहेत फक्त.

रस्त्यावर खूप खड्डे आहेत आणि ते नीट दुरुस्त न करता एखादाच पॅच लावत बसून अजून खोळंबा वाढवावा तसे माणसांच्या रोजच्या आयुष्यात अनेक लहानलहान त्रास, असंख्य छोट्या अडचणी, बारकेबारके अडथळे आहेत… ते त्यांना कुठेच गंभीर, गहिरं, सखोल होऊ देत नाहीत. बहुतांश माणसं उथळपणे अधिक उथळ टीव्ही मालिका बघत, व्हॉटसअपचे मेसेजेस फॉरवर्ड करत, मोबाईलवर व्हिडीओगेम खेळत ताण निवळवण्याची धडपड करत अनेक रांगांमध्ये तासानतास उभी राहतात, कशाचे ना कशाचे फॉर्म भरत बसतात, नवं तकलादू यंत्र घेऊन बिनसवयीचं तंत्रज्ञान शिकत आपण काळाच्या बरोबर चाललेलो आहोत हे स्वत:ला व जगाला पटवण्याची धडपड करतात. आपले नोकरीधंदेही दिरंगाई, चालढकल करत निभावतात. निरुत्साही, नीरस, निष्क्रिय, बधीर व मठ्ठ वातावरणात जाहिराती बघून सुखाच्या, समृद्धीच्या व्याख्या निश्चित करतात आणि बाजाराच्या करवती दातांमध्ये सापडलेला एक किडा बनून वळवळत राहतात. अशा सरपटणाऱ्या माणसांकडून संघर्षाची अपेक्षा कशी करायची? अत्याचाराविरुद्ध पंधरा वर्षे झगडणाऱ्या त्या साध्वींना आणि त्यांच्यासारख्या अनेकानेक स्त्रियांना सक्षम, विचारी सोबत व पाठबळ मिळेल, अशी अपेक्षा कशी करायची? जी फोलपटं बातम्यांमधून आपल्या अंगावर आणून फेकली जाताहेत ती उधळून लावणं आणि मूळ प्रश्नाकडून सतत नजर वळवली जातेय ती स्थिर करत नेणं वाटतं तितकं अवघड नाहीय. बाजारपेठेच्या गुलामांनाही आपण गुलाम आहोत हे कळलं की खळखळा तुटणाऱ्या बेड्यांचा आवाज हा जगातला सगळ्यांत मधुर आवाज असतो, हे त्यांनाही जाणवेल. वेळ गेलेली नाही, वेळ कधीच जात नसते… वर्तमानकाळ चालू असतोच.

(लेखात व्यक्त झालेली मतं लेखिकाची वैयक्तिक आहेत.)

 

चालू वर्तमानकाळसदरातील याआधीचे ब्लॉग

चालू वर्तमानकाळ (3) : आईचा घो आणि बापाची पत

चालू वर्तमानकाळ (२) – अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची!

चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब

News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Kavita Mahajan’s blog in Chalu Vartaman Kal Series
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published: